'सक्षम'च्या प्रशिक्षण शिबिरातून दिव्यांग सेवेची नवी दिशा
पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिरात आगामी वर्षाच्या उपक्रमांची आखणी; दिव्यांग संस्थांना प्रत्यक्ष भेट

सांगली, दि. २ जुलै २०२६ : दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या 'सक्षम' संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सेवा, संवेदना आणि संघटन यांचा समन्वय साधत आगामी वर्षभरातील उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली.
सांगलीतील गणपती मंदिर परिसरातील हेरंब लॉन्स येथे शनिवार आणि रविवारी झालेल्या या शिबिरात राज्यभरातील प्रतिनिधींनी सहभाग घेत विविध दिव्यांग संस्थांना भेटी देत त्यांच्या कार्याचा अभ्यास केला.
शिबिराचे उद्घाटन संत सूरदास, अष्टवक्र आणि सरस्वती माता यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलनाने झाले. प्रांत सचिव नरेंद्र बापट यांनी प्रास्ताविकातून आगामी कार्यक्रमांची रूपरेषा मांडली. दिवसभरात जिल्ह्यातील तीन दिव्यांग संस्थांना राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी भेटी दिल्या. या भेटींचे नेतृत्व पंकज मिठभाकरे, डॉ. अजित पाटील आणि आनंद मोरे यांनी केले. नरेंद्र ताटके, डॉ. वीणा, अजय वणकुद्रे, शहाबुद्दीन शेख तसेच डॉ. गौरी वराडे यांनी संबंधित संस्थांच्या कार्याची माहिती दिली. प्रांत कोषाध्यक्ष विवेक जोशी यांनी या सत्राचा समारोप केला.

'सविता प्रकोष्ठ' सत्रात सतीश सावंत यांनी कुष्ठरोगासमोरील नव्या आव्हानांवर मार्गदर्शन केले. यावेळी सुधीर चाफोरकर उपस्थित होते. शशिकांत देशपांडे यांनी बौद्धिक खेळांच्या माध्यमातून संघबांधणी कार्यशाळा घेतली. रविवारी दुसऱ्या दिवशी विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी शिबिराचा आढावा घेतला. पुढील राज्य अधिवेशन सोलापूर येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली. 'प्रणव प्रकोष्ठ' सत्रात माधुरी गडेकर यांनी सांकेतिक भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. दिव्यांग पालकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांवरही मार्गदर्शन करण्यात आले. शिल्पा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. प्रीती पोहेकर, नितीन देशमाने आणि ॲड. मुरलीधर कचरे यांनी कार्यशाळेचा समारोप केला. या शिबिरात गणेश जोशी, डॉ. अजित पाटील, गहिनीनाथ नलावडे, अंजली सूर्यवंशी, दीपक वाळिंबे, महेंद्र यारगट्टी यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- तीन दिव्यांग संस्थांना प्रत्यक्ष भेटी
पहिल्याच दिवशी प्रतिनिधींनी तीन गटांत विभागून मिरजेतील रा. वि. भिडे मूकबधिर शाळा, कुपवाड येथील सौ. सुशीला घोडावत अंध शाळा आणि इनाम धामणी येथील कोहम पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तेथील कार्याची माहिती घेतली. कोहम केंद्राच्या राजेंद्र कोरे यांना 'सक्षम' संस्थेचे प्रांत सचिव नरेंद्र बापट यांनी स्मृतीचिन्ह भेट देऊन आभार मानले.