पुणे ः सार्वजनिक जीवनाची सात तत्त्वे नोलन तत्त्वे म्हणून ओळखली जातात. 1994 मध्ये शास्त्रज्ञ नोलन यांनी निस्वार्थीपणा, सचोटी, वस्तुनिष्ठता, जबाबदारी, मोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि नेतृत्व ही सात तत्वे सांगितले. परंतू, 300 वर्षांपुर्वीच अहिल्याबाई होळकर यांनी ही तत्वे प्रत्यक्ष आचरणात आणली. म्हणून या नोलन प्रिन्सिपल्सला सुशासनाची अहिल्या तत्वे म्हणायला हवे, असे मत विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी व्यक्त केले.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे लोककल्याणकारी सुशासन या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात त्या बोलत होता. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अभ्यासकांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अद्वितीय वारशावर चर्चा व चिंतन केले. कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्राख्यात लेखक डॉ. देविदास पोटे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव आदी उपस्थित होते.
परिषद दुपारी ४ वाजता विनय सहस्रबुद्धे यांच्या प्रारंभिक भाषणाने सुरू झाली. त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यावर प्रकाश टाकत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना "तत्त्वज्ञानी राणी" म्हणून गौरवले. त्यांच्या नैतिक मूल्यांमुळे आणि नेतृत्वामुळे त्यांनी सुशासनाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे त्यांनी अधोरेखन केले. मध्य प्रदेशचे मा. मुख्यमंत्री श्री. मोहन यादव यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या शासन व प्रशासनावर सखोल भाष्य केले. त्यांनी पुणे व इंदूर या दोन संस्कृतीनं समृद्ध शहरांच्या वारशाचा परामर्श घेतला, ज्यांवर अहिल्याबाईंचा प्रभाव होता.
राजस्थानचे मा. राज्यपाल श्री. हरीभाऊ बागडे यांनी अध्यक्षीय भाषण दिले. त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंब, व्यक्तिगत जीवन आणि सासरच्या कुटुंबासोबतच्या संबंधांवर भाष्य केले. त्यांनी इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी केलेल्या अहिल्याबाईंच्या स्तुतीचा उल्लेख केला आणि त्यांच्या मंदिर पुनर्निर्माण आणि सार्वजनिक कल्याणाच्या कार्याची प्रशंसा केली. अहिल्याबाई होळकर यांच्या सुशासनामुळे कवींना आणि नेत्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री. जयंत कुलकर्णी यांनी सर्व मान्यवर आणि सहभागींचे आभार मानून उद्घाटन सत्राचा समारोप केला.
सत्र दुसरे
दुसऱ्या सत्रात विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ. निवेदिता भिडे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या शासनाच्या तत्त्वांवर सखोल चर्चा केली. त्यांनी त्यांच्या सात प्रमुख तत्त्वांवर प्रकाश टाकत, अहिल्याबाईंच्या शिस्तबद्ध जीवनशैली, शास्त्रांवरील निष्ठा, आणि मंदिर व्यवस्थापन कौशल्यावर विचार मांडले. प्रख्यात लेखक श्री. देविदास पोटे यांनी महिलांच्या सशक्तीकरण व सामाजिक कल्याणात अहिल्याबाई होळकर यांच्या योगदानावर भाष्य केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करत, राष्ट्रनिर्माणात आणि जनतेला एकत्रित करण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेच्या समारोपात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. त्यांनी अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श स्त्रियांसाठी प्रेरणादायी कसा आहे, यावर भाष्य केले. त्यांनी एक पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे अहिल्याबाई होळकर यांचे वास्तुकला, अभियांत्रिकी आणि भगवान शिवाप्रती निष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित केले. चर्चासत्राच्या निमित्ताने महाराष्ट्र स्तरावर अहिल्याबाईंच्या कार्यावर , जीवनावर आधारित निबंध लेखन स्पर्धा, पोस्टर्स रेखाटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ या चर्चासत्रामध्ये संपन्न झाला.