•  30 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

गुरुतत्त्वाचा महामेरू: महर्षी वेदव्यास आणि व्यासपौर्णिमेचे अलौकिक महत्त्व

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
भाष्य  

गुरुतत्त्वाचा महामेरू: महर्षी वेदव्यास आणि व्यासपौर्णिमेचे अलौकिक महत्त्व

वर्ग: अध्यात्म आणि संस्कृती | गुरुपौर्णिमा विशेष


जेव्हा अज्ञानाचा अंधकार माणसाचे जीवन व्यापून टाकतो, तेव्हा ज्ञानरूपी काजळाची काडी धरून डोळे उघडणारा एकमेव मार्गदर्शक म्हणजे 'गुरु'. वैशाखाचा दाह संपून आषाढाच्या मुसळधारांनी तृप्त झालेली सृष्टी ज्याप्रमाणे नव्या अंकुरांसाठी आतुर असते, तसेच मानवी मन आत्मज्ञानाच्या शिडकाव्यासाठी गुरुचरणी लीन होते. तीच आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'व्यासपौर्णिमा' अर्थात 'गुरुपौर्णिमा'!

भारतीय संस्कृतीचा पाया रचणारे, वेदांचे विभाजन करणारे आणि महाभारतासारखा पंचम वेद जगाला देणारे महर्षी वेदव्यास हे केवळ एक व्यक्ती नसून, ते सकल मानवजातीला सन्मार्ग दाखवणारे अलौकिक 'गुरुतत्त्व' आहेत.

१. गुरुभक्तीची संकल्पना आणि सद्गुरूंचे स्थान : 

संस्कृत सुभाषितात व्यासांचे स्मरण करताना म्हटले आहे:

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।
येन त्वया भारततैलपूर्ण: प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदीप:॥

(हे विशाल बुद्धीच्या आणि विकसित कमळासारखे नेत्र असणाऱ्या व्यास महर्षी, ज्यांनी महाभारताच्या रूपाने ज्ञानमय प्रदीप प्रज्वलित केला, त्यांना माझा सविनय प्रणाम!)

हा पावन दिवस म्हणजे गुरुप्रति उतराई होण्याचा दिवस. गुरुला आपण काय अर्पण करतो यापेक्षा आपल्या मनातील भाव महत्त्वाचा असतो. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात:

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥

आई ही प्रत्येक जिवाची पहिली गुरु असते. पुढे जीवनप्रवासात शिक्षण, कला किंवा व्यावहारिक कौशल्यांसाठी आपल्याला विविध गुरूंची गरज भासते. परंतु, काय करावे आणि काय करू नये अशा संभ्रमात योग्य मार्ग दाखवून प्रगतीपथावर नेणारे स्थान म्हणजे 'सद्गुरू'. लहान मूल जसे आईचा हात धरून निर्भय होते, तसेच सद्गुरू आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला अभय देतात. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आपला हात अत्यंत विश्वासाने सद्गुरु माऊलींच्या हाती द्या, ते आपल्याला निश्चितपणे परमेश्वराकडे घेऊन जातील." म्हणूनच "सद्गुरु वाचोनि सापडेना सोय, धराव तें पाय आधी आधी" असा उपदेश संत करतात.

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया।
चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥
(अज्ञानरूपी अंधकाराने आंधळ्या झालेल्या माणसाचे डोळे जो ज्ञानरूपी काजळाच्या काडीने उघडतो, त्या श्रीगुरुला माझा नमस्कार असो.)

२. महर्षी वेदव्यासांचे जन्म आणि नामकरण
सकल गुरूंचे गुरु म्हणून महर्षी व्यासांचा उल्लेख अत्यंत सन्मानाने केला जातो. पराशरमुनी आणि मत्स्यगंधा (सत्यवती) यांच्या पोटी ज्ञानाची परंपरा अखंड राहावी म्हणून व्यासांचा जन्म झाला. त्यांच्या विविध नावांमागे ऐतिहासिक व आध्यात्मिक संदर्भ आहेत:

व्यास: वेळूच्या (वेताच्या) वनामध्ये जन्म झाला म्हणून त्यांना 'व्यास' म्हटले गेले.
कृष्णा: त्यांची कांती श्यामवर्ण (काळीभोर) असल्याने माता सत्यवती त्यांना 'कृष्णा' म्हणत असे.
द्वैपायन: त्यांचा जन्म एका बेटावर (द्वीपावर) झाला, म्हणून ते 'कृष्णद्वैपायन' ठरले.
वेदव्यास: पुढे त्यांनी मानवी बुद्धिमत्तेचा विचार करून वेदांचे सुलभ विभाजन केले, म्हणून त्यांना 'वेदव्यास' ही उपाधी मिळाली.
बादरायण: वनात ज्ञानाची साधना करताना ते केवळ बोरे (बदरी) खाऊन राहत असत, म्हणून त्यांना 'बादरायण' असेही ओळखले जाते.
'शुकसुधी' ग्रंथातील 'स्वधर्मामृतसिंधू'नुसार वेदमहर्षी व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला.

३. भारतीय संस्कृतीचा कणा: व्यास वाङ्मय : 

भारतीय संस्कृती आणि व्यास हे परस्परांशी इतके एकरूप झाले आहेत की "व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्" (जगातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उष्टे आहे) अशी उक्ती प्रचलित झाली.
ब्रह्मसूत्रे: त्यांनी रचलेली ब्रह्मसूत्रे म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा, कर्माचा, भक्तीचा आणि ज्ञानाचा सुवासिक गाभा आहे.
महाभारत (पंचम वेद): एक लाख श्लोक असलेला हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे अथांग भांडार आहे. हे लेखन करताना श्रीगणेशांनी अट घातली होती की लेखणी थांबता कामा नये; तर व्यासांनी अट घातली की श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय लिहायचे नाही. अधूनमधून व्यास कूट श्लोक सांगत आणि गणेशजी विचार करेपर्यंत नित्यकर्म उरकून घेत. लिहिता लिहिता लेखणी मोडल्यावर श्रीगणेशांनी आपला एक दात तोडून लेखन चालू ठेवले, म्हणूनच त्यांना 'एकदंत' नाव मिळाले.

४. श्रीमद्भागवत पुराण आणि पुराणांचे सार : 
महाभारत व १७ पुराणांची रचना करूनही सरस्वती नदीकाठी शम्याप्रास आश्रमात व्यासमुनी उदास बसले होते. तेथे आलेल्या देवर्षी नारदांनी व्यासांना औदासिन्याचे कारण विचारले- "का ते चिंता बलीयसी?"

नारदांनी सांगितले, "आपण अथांग ज्ञान दिले, पण मुरलीमनोहराच्या बाललीलांचे आणि भक्तिरसाचे वर्णन केले नाही." त्यानंतर व्यासांच्या सिद्धहस्त लेखणीतून 'श्रीमद्भागवत महापुराणा'ची निर्मिती झाली आणि त्यांच्या मनाला पूर्ण शांती मिळाली.

मानवी समाजात उपजत असणारी विषमता ओळखून व्यासांनी प्रत्येकाच्या कल्याणासाठी १८ पुराणांची रचना केली. या सर्व पुराणांचा अत्यंत सोपा व सार्वकालिक संदेश खालील सुभाषितामध्ये दिला आहे:
अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम्॥

(दोनच गोष्टी ध्यानात ठेवाव्या — परोपकार करणे हे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे हे पाप!)

५. व्यासांचे अलौकिक स्वरूप : 
श्री वेदव्यास हे प्रत्यक्ष महाविष्णुचा अवतार मानले जातात. 'पांडवप्रताप' ग्रंथात श्रीधर स्वामींनी त्यांचे वर्णन करताना लिहिले आहे:
एकानन तू सत्य लोकेश। विभुज परि रमा विलास।
अभाललोचने व्योमकेश। आम्हा दीना रक्षिसी॥

तसेच संस्कृत सुभाषितकारांनीही व्यासांमधील त्रिदेवांचे रूप असे रेखाटले आहे:
अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः।
अभाललोचनः शम्भुर्भगवान् बादरायणः॥
(चार मुखे नसतानाही ते ब्रह्मा आहेत, दोनच हात असूनही ते विष्णु आहेत आणि कपाळावर तिसरा डोळा नसतानाही ते साक्षात शिवशंकर आहेत — असे हे भगवान बादरायण व्यास आहेत!)

अशा या तेजस्वी, ओजस्वी आणि कल्याणकारी महर्षी वेदव्यासांना आणि त्यांच्या परंपरेला व्यासपौर्णिमेच्या दिवशी कोटी कोटी प्रणाम

लेखिका: अवंती भावे


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • गुरुतत्त्वाचा महामेरू
  • महर्षी वेदव्यास
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (176), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (86), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.