हिंदूंच्या जागृतीमुळे राष्ट्र बळकट - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
'कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय'चा नागपुरात समारोप; उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर, दिनांक ४ जून २०२६ :
भारताचे भवितव्य ज्याच्या खांद्यावर आहे तो हिंदू समाज आता मोठ्या प्रमाणात जागृत होत असून, त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम देशात समोर येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
नागपूर येथील रेशीमबागस्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात ११ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत आयोजित २५ दिवसीय 'कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय (सामान्य)' या विशेष प्रशिक्षण वर्गाचा जाहीर समारोप सोहळा पार पडला, त्यावेळी सरसंघचालक बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला उपस्थित होते. तर व्यासपीठावर वर्ग सर्वाधिकारी सरदार महेंद्र सिंह मग्गो (जयपूर प्रांत संघचालक), विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. या वर्गात देशभरातील ४६ प्रांतांमधून ८७४ शिक्षार्थी, ११२ शिक्षक, ४६ प्रांत प्रमुख, ५८ प्रबंधक सहभागी होते. वर्गकार्यवाह म्हणून के बी. श्रीकुमार यांनी प्रतिवेदन सादर केले. वर्ग पालक म्हणून अतुल लिमये यांच्याकडे दायित्व होते.

- अशांत जगात भारताचीच वेळ : डॉ. मोहन भागवत
जगभरात सध्या सुरू असलेली अशांतता आणि युद्धाच्या परिस्थितीवर भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले, "आज जगात केवळ शक्तिशाली देशांचेच ऐकले जाते. बलाढ्य देश आपल्या मनमानी कारभाराने कोणाच्याही भूभागावर ताबा मिळवतात, बॉम्ब टाकतात आणि कमजोर देशांना त्यांचे ऐकावेच लागते. मात्र, जेव्हा भारत संपूर्ण सामर्थ्याने उभा राहील, तेव्हा ही जागतिक परिस्थिती नक्कीच बदलेल. आता जगाला भारताची अत्यंत गरज असून भारताची वेळ आली आहे."
नागरिकांना आणि स्वयंसेवकांना आत्मपरीक्षणाचे आवाहन करताना ते म्हणाले की, "जगातील युद्धांमुळे आपल्याकडे तेलाचे दर वाढत आहेत. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, केवळ संकटांकडे न पाहता आपण स्वतःच्या सामर्थ्याचा विचार केला पाहिजे. भारताने नेहमीच आपली शक्ती कमकुवत देशांवर अन्याय करण्यासाठी न वापरता जगाच्या कल्याणासाठी वापरली आहे आणि हीच खरी जागतिक शांततेची गुरुकिल्ली आहे."

- जातपात विसरून संपूर्ण हिंदू समाज एकसंध व्हावा
संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना डॉ. भागवत म्हणाले की, संघाने गेल्या अनेक दशकांत सर्व प्रकारचे जातीभेद पूर्णपणे नष्ट करून संपूर्ण हिंदू समाज एकसंध आणि संघटित करण्याची वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती विकसित केली आहे. हिंदू हा देशासाठी नेहमीच दायित्वशील राहिला आहे. संघाच्या शताब्दी वर्षात स्वयंसेवक अहोरात्र समाजात जाऊन थेट सामान्य जनतेशी संपर्क साधत आहेत.
आपल्या प्रदीर्घ गुलामगिरीच्या इतिहासाचा संदर्भ देत ते म्हणाले, "ज्यांनी आमच्यावर हजार वर्षे राज्य केले, ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ नव्हते; उलट आम्ही आमच्याच काही श्रेष्ठ गोष्टी विसरलो म्हणून आमचा पराभव झाला. आता आपल्याला तीच पूर्वतयारी पुन्हा करावी लागेल. संघ जे काही करत आहे, ते केवळ देशासाठी करत आहे. आमचे नाव इतिहासात आले नाही तरी चालेल, पण देशाचे हित सर्वोच्च राहिले पाहिजे." तसेच, देशात अंतर्गत फूट पाडणाऱ्या भारतविरोधी ताकदी आजही सक्रिय असल्याचा इशारा त्यांनी दिला. शेवटी त्यांनी नागरिकांना संघात येऊन थेट किंवा सहयोगी बनून देशकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

- उद्योग आणि राष्ट्रविकास एकमेकांना पूरक : कुमार मंगलम बिर्ला
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी संघाच्या शिस्तीचे आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये आर्थिक सुबत्ता आणि चारित्र्यसंपन्न नागरिक हे दोन मुख्य स्तंभ असतात. देशातील उद्योग क्षेत्र केवळ संपत्ती निर्मिती करत नाही, तर रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून राष्ट्रविकासाचा पाया मजबूत करते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या पद्धतीने तरुणांमध्ये देशप्रेम, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत आहे, ते कार्य कौतुकास्पद आहे. जेव्हा देशातील नागरिक संघटित आणि कर्तव्यदक्ष बनतात, तेव्हाच आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रगतीला खऱ्या अर्थाने गती मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.