•  09 Aug 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

संत नामदेव यांची भारतयात्रा आणि सामाजिक-आध्यात्मिक कार्य

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
राष्ट्र संत  

संत नामदेव यांची भारतयात्रा आणि सामाजिक-आध्यात्मिक कार्य


संत नामदेवांनी उत्तर भारतात तब्बल ५४ (चोपन्न) वर्षे समाजजागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केले. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांबरोबरच पुढे संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे संत या भक्तिगंगेत सामील झाले. या संतकवींनी अज्ञानरूपी अंधकारात ज्ञानाचे दीप प्रज्वलित करण्याचे मौलिक कार्य केले. महाराष्ट्रातून सुरुवात करून नामदेवांनी थेट पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब असा प्रवास करत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचे प्रबोधन केले.

राजस्थानातील जयपूर, भरतपूर, बिकानेर, अलवर यांसारख्या मोठ्या शहरांत नामदेवांची मंदिरे आणि त्यांच्या नावाने सुरू असलेल्या शाळा आजही पाहायला मिळतात.

"ज्ञानदीप लावूं जगीं"

या काव्यपंक्तीत म्हटल्याप्रमाणे, ईश्वरभक्तीच्या ज्ञानज्योतीने असंख्य दीप उजळवून मानवी जीवन उज्ज्वल करणे हेच नामदेवांचे ध्येय होते. "बोलूं ऐसे बोल" या अभंगचरणातून त्यांनी व्यक्‍त केले की—ज्या शब्दांनी जनता जनार्दन डोलू लागेल, सर्वत्र प्रेमभाव वाढेल आणि आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित होईल, अशा साहित्याची निर्मिती करणे हीच त्यांची प्रेरणा होती. जनतेचा आध्यात्मिक विकास व्हावा हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याने त्यांची भाषा आणि विचार कोणत्याही प्रांतिक मर्यादेत अडकून राहिले नाहीत.

- भारतयात्रा आणि प्रांतीय भाषांचा स्वीकार
भक्तिप्रचारासाठी नामदेवांनी त्या काळातील लोकभाषा असणाऱ्या हिंदी भाषेत रचना केल्या आणि आयुष्यभर भारतयात्रा चालू ठेवली. ते विविध प्रांतांच्या भाषा शिकले. महाराष्ट्रातून निघाल्यावर ते दक्षिणेकडे म्हैसूर (कर्नाटक), तमिळनाडू आणि रामेश्वरपर्यंत गेले. तर उत्तरेकडे गुजरात, सौराष्ट्र, सिंध, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत भक्तिमार्ग पसरवत गेले. त्यांनी पंजाबी भाषेतही पदे लिहिली. विविध प्रांतांतील भाषा आत्मसात करून त्यांनी त्यांचा उपयोग लोकजागृतीसाठी केला.

१. दक्षिण भारत पदयात्रा:
नवीन उपलब्ध झालेल्या 'तीर्थावळी'तील माहितीनुसार, नामदेवांनी शके १२१८ च्या सुमारास दक्षिण भारतात दुसरी पदयात्रा केली. श्रीशैलशिखर, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबर, विष्णुकांची, रामेश्वर, ताम्रपर्णी, आळुवा, कन्याकुमारी आणि हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी भागवतधर्माचा प्रचार केला. या यात्रेमुळे दक्षिण भारतातील 'दर्जी' आणि 'छिप्पिगा' या समाजावर त्यांचा मोठा प्रभाव पडला. तेव्हापासून तो समाज स्वतःला 'नामदेव' म्हणवून घेऊ लागला. तमिळनाडूतील 'भूसागर' आणि 'मल्ला' या ज्ञातीही 'नामदेव' हेच आपले समानार्थक नाव मानू लागल्या.

२. अखंड भारत पदयात्रा (६ वर्षांची यात्रा):
पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात शके १५०३ मध्ये लिहिलेले शके १२२० ते १२२६ (६ वर्षे) या काळातील एक जुने हस्तलिखित (वै. प्र. सी. सुबंध यांना) मिळाले. चौदा अभंगांच्या या टांचणात नामदेवांनी एकट्याने केलेल्या भारतभ्रमणाचे संक्षिप्त वर्णन आहे. या यात्रेत नामदेव काही तीर्थक्षेत्री अनेक महिने मुक्कामाला असत.

"षण्मास राहिल्या द्वारकेचे पुण्य । एके दिवशी संकोद्वारी तेथे जाऊनि पाहिला देव ॥"

या अभंगावरून कळते की, द्वारकेत त्यांचा सहा महिने मुक्काम होता. ही पदयात्रा पश्चिमेकडून सुरू होऊन उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडील तीर्थक्षेत्रे पाहत पुन्हा पंढरपूर येथे समाप्त झाली.

यात्रेचा मार्ग: नीरा-भीमा संगम, गोदावरी नाशिक-पंचवटी, घृष्णेश्वर, ओंकार-मांधाता, द्वारका, रैवतक, ढवळपूर, मुचकुंदगुंफा, प्रभास, सोरटी सोमनाथ, सिद्धपूर, पुष्कर, कुरुक्षेत्र, ठाणेश्वर, यमुनातीर, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, अंतर्वेदी, मायापूर, हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, केदारनाथ, कैलास, बद्रीनाथ, मानसरोवर, गंडकी, अयोध्या, नैमिषारण्य, मधुपुरी, गोकुळ-वृंदावन, कालियाडोह, गौतमेश्वर, मिथिला (जनकनगरी), उज्जैन, प्रयाग, काशी (विश्वेश्वर), गया, गंगा-सागर संगम, महाबळेश्वर आणि शेवटी पंढरपूर.

- उत्तर भारतावर आणि साहित्यावर झालेला प्रभाव
नामदेवांनी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून विठ्ठलनामाचा इतका प्रचार केला की, त्याचा खोल प्रभाव मध्य व उत्तर भारतातील साहित्यावर पडला. राजस्थानातील जयपूर, जोधपूर, अलवर, बिकानेरजवळील कोलायतजी (येथील नामदेवरायांची विहीर), पुष्कराज, बगरू, सांगानेर, काळाडेरा इत्यादी ठिकाणी १५० हून अधिक लहान-मोठी नामदेवाची मंदिरे त्यांच्या राजस्थानमधील कार्याची साक्ष देतात. तेथील शिंपी समाज आजही स्वतःला 'नामावंशी छिपा दर्जी' म्हणवतो. राजस्थानातील प्रसिद्ध संत-कवयित्री मीराबाई (इ.स. १४९८ ते १५४६) यांनी पूर्वसुरींचा उल्लेख करताना नामदेवांचा गौरवपूर्ण निर्देश केला आहे:
म्हारे नैंणा आगे रहाजो जी, स्याम गोविंद...
दास कबीर घर बालद जो लाया, नामदेव की छान छबन्द।
दास घना को खेत निपजायो, गज की टेर सुनन्द।
सब सन्तो का काज सुधारा, मीरा सूं दूर रहन्द॥

(अर्थ: हे श्यामवर्ण गोविंदा, कबीराच्या घरी बैल आणलात, नामदेवाचे छप्पर शाकारून दिले, भक्तांच्या हाकेला धावून गेलात आणि सर्व संतांची कामे केलीत...)

- सामाजिक समता आणि अस्पृश्यता निवारण

नामदेवांनी कीर्तनाच्या व्यासपीठावरून एकेश्वरवाद, विशुद्ध भक्ती, जातिवर्णनिरपेक्ष मानवधर्म आणि सदाचाराचा संदेश दिला.

- अस्पृश्योद्धाराचे कार्य:

शके १२६० वद्य पंचमीस नामदेवांचे परमशिष्य संत चोखामेळा यांनी मंगळवेढा येथे काम करताना इहलोक सोडला. नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी गोळा करून पंढरपूरला आणल्या आणि विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोरच आपल्या शिष्योत्तमाचे स्मारक उभारले. त्या काळातील बिकट अस्पृश्यतेच्या समस्येवर मात करत नामदेवांनी माणसा-माणसांतील विषमता दूर करण्याचा क्रांतिकारी प्रयत्न केला.

- पंजाबमधील कार्य आणि 'गुरुग्रंथ साहेब'
शके १२६१ च्या सुमारास नामदेव पुन्हा उत्तरेकडे गेले. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्हा ही त्यांची दीर्घकाळ कर्मभूमी बनली. त्यांनी अमृतसरजवळील 'भूतविंड' या गावी अडोली नावाच्या विधवेच्या आजारी मुलाला (बाला) बरे केले. तोच पुढे नामदेवांचा पट्टशिष्य 'बोहरदास' म्हणून प्रसिद्ध झाला. घुमान (जि. गुरुदासपूर): नामदेवांनी घुमान शहराची स्थापना केली आणि तेथे १७ वर्षे ध्यानधारणा केली. मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार 'नामदेव दरवाजा' म्हणून ओळखले जाते.

- 'गुरुग्रंथ साहेब'मधील स्थान:

शीख धर्माच्या 'श्री गुरुग्रंथ साहेब' या पवित्र ग्रंथात संत नामदेवांची ६१ हिंदी पदे समाविष्ट आहेत. त्यांना "बाबा नामदेवजी की मुखबानी" म्हणून अत्यंत आदरपूर्वक ओळखले जाते.

- संत नामदेवांचे साहित्यिक वैशिष्ट्य
१. चरित्रकार: संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर नामदेवांनी 'समाधी' व 'तीर्थावळी' या ग्रंथांमधून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले.

२. सुलभ व भावोत्कट काव्य:

"देह जावो अथवा राहो, माझे तीर्थ पंढरी।"
"अमृताहुनी गोड नाम तुझे देवा।"

३. प्रसिद्ध आरती रचना:

"घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।"

ही जगप्रसिद्ध रचना संत नामदेवांचीच आहे.
संत तुकाराम महाराजांनी नामदेवांच्या काव्याचे वर्णन 'कविता गोमटी नामयाची' अशा शब्दांत केले आहे.

- संजीवन समाधी
वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी संत नामदेवांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी संजीवन समाधी घेतली. विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या संत-सज्जनांच्या पायांची धूळ आपल्या मस्तकी लागावी म्हणून त्यांनी महाद्वाराच्या पहिल्या पायरीचा दगड होण्यात धन्यता मानली. या पायरीला आज "नामदेवाची पायरी" म्हणून ओळखले जाते.

- संतांचे महत्त्व आणि आजचा समाज (निष्कर्ष)
संत नामदेवांनी सांस्कृतिक राष्ट्रीयता वृद्धिंगत केली आणि सबंध भारतवर्ष भक्तीमार्गाने जोडला. ते खऱ्या अर्थाने आद्य शंकराचार्यांचे उत्तराधिकारी शोभून दिसतात. संतांची वृत्ती ही गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ असते. 'बुडती हे जन न देखवे डोळा' ही त्यांची खरी वृत्ती असते. आजचा समाज भौतिक सुखांच्या मागे धावताना अस्वस्थ आणि धास्तावलेला आहे. अशा काळात संतांचे विचार आणि आचरण आपल्याला सद्सद्विवेकबुद्धीचा मार्ग दाखवतात.
काय मानू मी संतांचे उपकार । मज नित्य जागविती ॥

संदर्भ: संत नामदेव माहात्म्य
महाराष्ट्र आणि संत परंपरा: डॉ. आरती दातार

(संकलन - विश्व संवाद केंद्र पुणे)


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • संत नामदेव
  • सामाजिक-आध्यात्मिक कार्य
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (186), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (87), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.