पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे ऐतिहासिक महत्त्व
अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे भारताच्या इतिहासावर झालेले परिणाम महत्त्वाचे आहेत. विशेषत: हिंदू धर्म रक्षण आणि संवर्धन या दृष्टीने त्यांचे योगदान मोठे आहे. त्याचे विश्लेषण करणारा हा लेख.
आठव्या शतकात इस्लामी आक्रमकांनी हिंदुस्थानात प्रवेश केल्यानंतर पुढील आठशे वर्षे पराक्रम, पराभव आणि गुलामगिरी या सर्वांचा अनुभव आपल्या पूर्वजांनी घेतला. मानसिकदृष्ट्या खच्ची झालेल्या, सार्वजनिकरीत्या सण-समारंभ साजरे करण्यास प्रतिबंध असलेल्या हिंदू समाजात शिवरायांनी नवचैतन्य निर्माण केले. शिवरायांनी केवळ राज्यविस्तार केला नाही तर कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी काम केले. शिवराज्याभिषेक आणि शिवरायांनी निर्माण केलेल्या प्रशासकीय व्यवस्था यांचे दूरगामी परिणाम झाले. त्यांना दिल्ली जिंकायची होती याचे समकालीन पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळेच शिवरायांचे हिंदवी स्वराज्य ही प्रादेशिक नाही तर राष्ट्रीय संकल्पना आहे असे आपल्याला निश्चितपणे म्हणता येते. आपल्याला राज्य कशासाठी निर्माण करायचे आहे आणि त्याचा विस्तार का करायचा आहे याचे उत्तर त्यांनी आपल्या राजमुद्रेत करून ठेवले आहे. 'प्रजेचा संतोष हाच राज्याचा पाया', ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून आणि हिंदू संस्कृतीतून आपल्याला मिळते.
शिवरायांनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, थोरले शाहू महाराज यांच्या काळात स्वराज्य रक्षण आणि संवर्धनाचे काम झाले. थोरल्या बाजीरावांनी स्वराज्याचा विस्तार करीत असताना शिंदे, गायकवाड, होळकर, पवार यांच्या रूपाने नवे नेतृत्व विकसित केले. त्यातील होळकर घराण्याची सून असलेल्या अहिल्यादेवींचे आपल्या राष्ट्राच्या इतिहासात आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोठे योगदान आहे. अनेक उपाध्यादेखील कमी पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. मध्ययुगीन काळात इस्लामी आणि ख्रिश्चन राजसत्तांमुळे जगातील अनेक संस्कृतींचा ऱ्हास झाला. परंतु असंख्य अत्याचार सहन करूनही हिंदू संस्कृती टिकून राहिली यामध्ये अहिल्यादेवींचे मोठे योगदान आहे. हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांचे चरित्र नवीन पिढीपुढे येणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवींनी विनाश आणि आक्रमण यांची प्रक्रिया थांबवून पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरु केली . पूर्वीच्या केली. अहमदनगर म्हणजेच आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी गावी ज्येष्ठ वद्य सप्तमी, शके १६७४ अर्थात ३१ मे १७२५ रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला. माहेरचे शिंदे घराणे होते. बालपणी गावात त्यांची अक्षरओळख झाली. वयाच्या आठव्या वर्षी लग्न झाले. त्यांच्या लग्नानंतर पहिल्या १५-२० वर्षांत घरातील सुमारे २३ जणांचे निधन झाले. वयाच्या २८व्या वर्षी अहिल्यादेवींना वैधव्याला सामोरे जावे लागले. त्यानंतरही त्यांनी सक्षमपणे राज्यकारभार केला. कौटील्यीय अर्थशास्त्रात राजाच्या कर्तव्याविषयी वर्णन केले आहे, "प्रजा सुखे सुखं राज्ञ: प्रजा नां तु हिते हितम्." याचा अर्थ प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे व प्रजेच्या हितातच त्याला स्वहित दिसले पाहिजे. अहिल्यादेवी म्हणजे आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहे. शुद्ध आचरण, पवित्रता, उच्च विचारसरणी यांद्वारे त्यांनी केलेला राज्यव्यवहार आदर्शवत आहे. त्या वैयक्तिक जीवन अगदी साधेपणाने जगल्या.
अहिल्यादेवी शिवभक्त होत्या. त्यांच्या पत्रव्यवहारात 'श्री शंकर आज्ञेवरून' असा उल्लेख असे. होळकरांच्या नाण्यांवर बिल्वपत्र आणि शिवलिंग असे. स्त्रियांना आत्मसन्मानाची वागणूक, धर्मकारण, राजकारण, तह, करारनामे, जनकल्याण, पायाभूत सुविधा आणि विकासकामे, निर्णयशक्ती, न्यायबुद्धी, दानशूरता, अर्थकारण यासंबंधीच्या धोरणांमधून त्यांच्या आदर्श राज्यकारभाराचे प्रतिबिंब दिसते. नद्यांवर घाट, मंदिरे, धर्मशाळा, वृक्षलागवड, रस्ते, जलसंवर्धन, जलवितरण, कलेला प्रोत्साहन, अन्नछत्रे, मुलींची पाठशाळा, हुंडाबंदी, दारूबंदी, जंगलतोडीस विरोध, भिल्ल समाजाला आपलेसे करून राष्ट्रीय प्रवाहात आणणे, गतिमान दळणवळण साधनांची निर्मिती, वेदांच्या अध्ययनासाठी काशीजवळ ब्रह्मपुरीची स्थापना अशा अनेक गोष्टी त्यांनी यशस्वी रीतीने केल्या.
शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्याने औरंगजेबाशी 'न भूतो न भविष्यति' अशी लढत देऊन त्याला याच भूमीत गाडले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव आणि नानासाहेब यांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाने स्वराज्याचे अटक ते कटक अशा विशाल साम्राज्यात रूपांतर झाले. त्यांना शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, नागपूरकर भोसले आणि इतर अनेक सरदार घराण्यातील कर्तृत्ववान मंडळींची साथ मिळाली. या साम्राज्यात शिवरायांनी आखून दिलेल्या अनेक प्रशासकीय योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी झाली. शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करून हिंदू समाजाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या ध्येयाशी जोडले. त्याचा परिणाम अठराव्या शतकात दिसून आला. मराठा साम्राज्यात राजा, पेशवे आणि सुभेदार विविध समाजातील होते. या शतकातील राजकीय विजयानंतर स्थायी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न अहिल्यादेवींच्या काळात झाला. पराधीनतेच्या काळात 'आपण कधी एक राष्ट्र नव्हतो' अशी मांडणी केली जात होती. परंतु संस्कृतीच्या आधारावर एक समृद्ध राष्ट्रजीवन इथे विकसित झाले होते याची अनुभूती अहिल्यादेवींच्या कार्यातून येते. विविधता असलेल्या आपल्या देशात एकात्मता रुजवण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. त्यांच्या धार्मिक कार्यामागे एक व्यापक दृष्टी होती ती म्हणजे या देशातील विविध भागात राहणाऱ्या लोकांना एका सांस्कृतिक साखळीने जोडून त्यांच्या मनात देशाबद्दल आपलेपणा निर्माण करणे.
अहिल्यादेवींच्या या कार्यामुळेच उत्तरेतील केदार, काशी विश्वनाथापासून दक्षिणेतील रामेश्वरपर्यंत महाराष्ट्रातील जेजुरी आणि पश्चिमेकडील द्वारकेपासून पूर्वेकडील जगन्नाथपुरीपर्यंतचा प्रदेश, भाषा, विविध जाती-जमातीतील समाज एका सांस्कृतिक बंधनाने एकत्र येण्यास कळत नकळत मदत झाली. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना त्याचे सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय परिणाम यांचा विचार करणे आवश्यक आहे.
भिल्ल समाज त्यांच्या परिसरात उपद्रव देत होता. तेव्हा अहिल्यादेवींनी भिलकवडी कर सुरू केला आणि त्यातून व्यवस्था निर्माण केल्या. त्यांना भांडवल उपलब्ध करून दिले, जंगलातील पडीक जमिनीवर शेती करण्यासाठी वाटप करून दिले. पण त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंगलातील वाटसरूंच्या संरक्षणाची जबाबदारी भिल्ल समाजावरच सोपविली. अशा रीतीने बाजूला पडलेल्या भिल्ल समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणले.
सैन्याच्या हालचालींच्या वेळी शेतजमिनी खराब होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याच्या सूचना अहिल्यादेवींनी दिल्या. होळकरांच्या राज्यात नियमबद्ध न्यायालयांची मुहूर्तमेढ त्यांच्या काळापासून रोवली गेली. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायालये स्थापन करून त्यावर योग्य न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या. न्यायालायांमध्ये ज्यांचे समाधान होत नसे ते लोक अहिल्याबाईंकडे येत. त्यांच्या दरबारात समाजातील सर्व वर्गांना येण्याची परवानगी होती. अर्थकारणाच्या दृष्टीने इंदोर आणि महेश्वर बाजारपेठ उभ्या करून तसेच विविध प्रकारची विकास कामे करून अहिल्यादेवींनी समाजाला रोजगार उपलब्ध करून दिला. हुंडा या विषयात त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. "अहो वधूला देवी म्हणावे, लक्ष्मी म्हणावे आणि तिच्या प्रवेशाचे, आदिमायेच्या स्वागताचे पैसे घावे, हे कसे? स्त्रीच्या कौतुकाची नुसती सोंगे, नुसता खोटा देखावा." नवीन पिढीशी कसे जोडून घ्यायचे असा प्रश्न असेल तर त्यांच्यासमोर घेऊन जाता येईल असे व्यक्तिमत्त्व अहिल्यादेवींचे आहे. आदर्श आणि परिभाषा यांचा विचार करायचा झाल्यास, त्यासाठी उत्तम जीवन अहिल्यादेवींचे आहे. परिवर्तन आणि सातत्य यांचा समन्वय त्यांनी ठेवला. स्त्रियांवरील अन्याय आणि बहुजनांवरील अन्याय या दोन्हीचे चित्र बदलण्यासाठी अहिल्यादेवींचे चरित्र उपयोगी आहे.
अहिल्यादेवींच्या चरित्राचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, महिला सबलीकरण, राष्ट्रीय दृष्टीकोन, कुशल प्रशासक, वंचित उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य, समरसता भाव, राष्ट्रीय पुनर्निर्माण असे अनेक पैलू आहेत. आज अहिल्यादेवींची अगदी प्राथमिक माहिती समाजाला आहे. ती विस्तृत स्वरूपात करून देण्यासाठी या त्रिशताब्दी वर्षाचा उपयोग होईल. मागासवर्गातून आलेली एक महिला देशाच्या संस्कृती रक्षणात मोलाची भूमिका बजावते हे सत्य असताना अहिल्यादेवींच्या चरित्रातून धर्म बाजूला काढून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न डाव्यांनी चालविला आहे. परंतु ज्यामधून धर्म बाजूला काढता येत नाही असे चरित्र त्यांचे आहे.
अहिल्यादेवींनी ज्या क्षणी कारभार हाती घेतला तेव्हा देवाब्राह्मणांसमक्ष संपत्तीवर तुळशीपत्र ठेवले आणि प्रतिज्ञा केली, ती महेश्वरच्या वाड्यावर लिहिली आहे.
- माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
- माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे.
- सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे काही काम करीत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
- परमेश्वराने ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत त्या मला पार पाडायच्या आहेत.
या प्रतिज्ञेप्रमाणे अहिल्यादेवींनी खरोखरच जनकल्याणाची अनेक कार्ये केली. मंदिर निर्माण, मंदिरांचा जीर्णोद्धार, मंदिरामध्ये पूजेची आणि तेलवातीची व्यवस्था, धर्मशाळांची निर्मिती, सदावर्त चालू करणे, बागा आणि छत्री बांधणे, नद्यांवर घाटांची निर्मिती, पाण्यासाठी कुंडे, गरिबांना दान मिळण्याची व्यवस्था, नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांसाठी अन्नछत्र, रामपंचायतनाच्या मूर्तींची स्थापना, पुजाऱ्यांना उपजीविकेसाठी गावे धर्मादाय देणे, मार्गद्वारांचे बांधकाम, तलावांची निर्मिती, बारवांची निर्मिती, कुंडांची निर्मिती यांची भली मोठी यादी पाहिली तर थक्क व्हायला होते. अहिल्यादेवींनी केलेल्या विकासकामांची बेरीज आजच्या काळात काही हजार कोटी रुपयांची होईल. अशा पद्धतीने अत्यंत सफल जीवन जगून अहिल्यादेवी १३ ऑगस्ट १७९५ रोजी निजधामाला गेल्या.
अहिल्यादेवींच्या निधनाच्या सुमारासच, म्हणजे इ.स. १७९३ ते १८०० या काळात दुर्दैवाने मराठा साम्राज्यातील त्यामध्ये रघुजी आंग्रे , महादजी शिंदे हरिपंत फडके, सवाई माधवराव पेशवे, तुकोजी होळकर, नाना फडणीस अशा अनेक दिग्गजांचे अल्पावधीत निधन झाले. त्यानंतर बहुतांश घराण्यांमध्ये वारसा हक्काचे वाद किंवा संघर्ष सुरू झाले. एकीकडे राज्य काबीज करण्यासाठी इंग्रज टपून बसले असताना राज्यात चालू झालेल्या अंतर्गत संघर्षामुळे अस्थिरता आली आणि सर्व मंडळींना समजावून सांगून एकोप्याने राज्यकारभार करणारी कोणी एक व्यक्ती शिल्लक राहिली नाही. इंग्रजांनी सर्व राज्यकर्त्यांशी स्वतंत्र तह करून त्यांना एकमेकांपासून कायमचे दूर केले. यामुळे पुढील काळात मराठा साम्राज्याचा फार वेगाने पाडाव झाला.
अठराव्या शतकात मराठ्यांच्या राजकीय विजयानंतर अहिल्यादेवींनी अनेक सांस्कृतिक कामे केली. परंतु आपण या विजयाचे सांस्कृतिक विजयात रूपांतर करू शकलो नाही. तसेच स्वतःमध्ये घडवून आणावयाचे बदल करण्यात हिंदू समाजाला अपयश आले. या वास्तवाबरोबरच मराठा साम्राज्याच्या उपलब्धींची नोंद घेणे आवश्यक आहे. भारताला इस्लाममय करण्याचे इतिहासाचे कालचक्र शिवशाहीने परतवून लावले. मराठा साम्राज्याचा लोककल्याणकारी कारभार आणि हिंदू संस्कृतीची ओळख टिकवून ठेवण्यात आलेले यश हे त्याचे महत्त्वाचे पैलू आहेत.
या सर्व गोष्टींचा अभ्यास नवीन पिढीने करणे आवश्यक आहे. इंग्रजांच्या धोरणांमुळे मराठा साम्राज्याच्या उपलब्धींची नोंदच घेतली नाही. परंतु महाराष्ट्रातील इतिहासकारांच्या मोठ्या योगदानामुळे इतिहासाची माहिती आपल्याला मिळाली. पुढील काळात इतिहासातील चुकांपासून बोध घेऊन आपण हिंदू समाजातील आंतरिक एकत्व प्रबळ करणे आवश्यक आहे. आचार, पंथ, भाषा यांच्या बाबतीत वेगवेगळे विचार असणारे आपण सर्वजण हिंदू समाजाचेच घटक आहोत हे लक्षात आणून देऊन त्यांच्यात एकत्वाची जाणीव निर्माण करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामाची प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंपासून अहिल्यादेवींपर्यंतच्या विविध व्यक्तिमत्त्वांमधून मिळते. शिवशाहीच्या काळात असे वाटत होते की, जुलमी इस्लामी सत्ता नष्ट केली की सर्व समस्या संपतील. मराठ्यांनी या सत्ता जवळजवळ संपुष्टात आणल्या होत्या, तरी पुढील काळात इंग्रजांनी विभाजनवादी शक्तींना प्रोत्साहन दिले आणि प्रबळ होण्यासाठी सहकार्य केले. त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशाचे विभाजन झाले. त्यामुळे आजच्या समस्यांवर मात करायची असेल तर भारतात झालेल्या इस्लामी राजवटींच्या स्वरूपाचा तसेच इंग्रजांच्या कूटनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
आपल्याला अत्यंत सावध राहून हिंदू समाज सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून, संकटांपासून आणि अंतर्गत संघर्षापासून मुक्त कसा राहील या दृष्टीकोनातून आपली पुढची धोरणे ठरविणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करीत असताना आपण या दृष्टीने विचार करूया.
साभार – एकता
सुधीर थोरात
9422016539
कार्यवाह, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ