
भारतीय इतिहासात अलौकिक शौर्य गाजवणारे अनेक क्रांतिवीर होऊन गेले, पण त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत म्हणावा तसा पोहोचलेला नाहीये, अशा अज्ञात वीरांपैकी एका वीराची कथा आहे भागोजी नाईक यांची कथा.
1804 मध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावी भागोजी नाईक यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे शिक्षण घेणे शक्यच नव्हते व समाजात शिक्षणासाठी सोयी सुविधा पण खूपच कमी होत्या. लहानपणापासून बरोबरीच्या मुलांसोबत गुरे राखायला जावे लागे. रानात हिंडता फिरताना काठी फिरवणे, तीरकमठा चालवणे शिकताना, यामध्ये भागोजी अतिशय तरबेज झाले. एकदा त्यांच्या कळपातील वासरावर वाघाने हल्ला केला, अशावेळी वासराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी वाघाशी लढा दिला. फक्त कुऱ्हाडीच्या जोरावर वाघाला मारले. हे धाडस पाहून भोवताली सारे गाव अचंबित झाले. भोवतालच्या गावात सुद्धा ही बातमी पसरली. तशीच ही बातमी इंग्रज सरकार पर्यंत पोहोचली. या मुलाचे हे धाडस पाहून त्यांनी त्याला पोलीस खात्यात नोकरी दिली.
एक तर रानावनात फिरण्याची सवय असलेल्या या मुलाला नोकरीच्या बंधनात राहणे जड जाऊ लागले, व तेथे काम करताना आपल्याच बांधवांविरूद्ध काम करणे त्यांना खटकू लागले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्याचे त्यांना आकर्षण वाटू लागले. नोकरीच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या कामाचे महत्त्व पण कळत होते. काही दिवस झाल्यावर इंग्रजांना भागोजीं बद्दल असा संशय येऊ लागला की ते क्रांतिकारकांना मदत करतात, म्हणून त्यांना एक वर्ष कारावासाची सजा देऊन बडतर्फ करण्यात आले. भागोजी तुरुंगातून बाहेर पडले ते स्वातंत्र्याची शपथ घेऊनच.
1857 चा काळ हा धगधगता काळ होता. स्वातंत्र्याचे वारे जोरात वाहत होते. ठीक ठिकाणी इंग्रज राजवटीविरुद्ध बंड पुकारण्यात येत होते. भागोजी यांनी पण आपल्या भोवताली आपल्या भिल्ल सहकाऱ्यांना बरोबर घेऊन क्रांतीसाठी,स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी निजाम राज्यातून काही मदत मिळवली. प्रथम काही काळ हा भिल्ल कोळ्यांचा उठाव आहे असे वाटून ब्रिटिश सरकारने तिकडे दुर्लक्ष केले, पण हळूहळू हा उठाव वेग घेऊ लागला. 4 ऑक्टोबर 1857 रोजी ब्रिटिश सुपरिंटेंडेंट जेम्स विल्यम हैन्री यांनी या उठावाचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. टेलर व थँकर यांच्या हुकूमती खालील पलटणी होत्या, त्यासकट नांदूर शिंगोटेजवळ भागोजी नाईक यांच्या सैन्यावर हल्ला केला. आता ब्रिटिश सैन्य आणि भागोजी नाईक यांच्यात लढाई सुरू झाली. पहिली चकमक नांदूर शिंगोटे जवळील टेकड्यांमध्ये झाली. हेंन्री यांनी भागोजीला शरण येण्यासाठी निरोप पाठवला पण अर्थातच भागोजींनी नकार दिला. त्यानंतर जी चकमक झाली त्यावेळी भागोजींच्या गोळीला हेन्री यांचा घोडा बळी पडला हे पाहून भिल्लांचा जोर वाढला आणि ब्रिटिशांनी माघार घेतली याच युद्धात हेन्री मरण पावले. त्यानंतर तेथे त्यांच्या पत्नीने त्यांची समाधी उभारली आहे.
हे पाहून ठिकठिकाणीच्या भिल्लांनी उठाव केला. राहुरी भागातील पाथर्डी नाईक यांनी देखील उठाव केला. यामुळे चिडलेले इंग्रज सरकार भागोजींच्या मागावर होते, त्यांनी त्यांचा भाऊ महिपती व नंतर मुलगा यशवंत यांना ठार केले. तरीही भागोजींनी माघार घेतली नाही. इंग्रजांबरोबर तीन लढाया झाल्या. अखेरची लढाई सिन्नर तालुक्यातील मीठसागरे, पंचाळे व सांगवी या भागात झाली. युद्धामध्ये भागोजीला हरवणे शक्य नाही याची आता इंग्रजांना खात्री पटली. म्हणून त्यांनी फितुरीचा मार्ग स्वीकारला. पंचाळे येथील पाटलाने मीठसागरे येथील इंग्रज अधिकारी फ्रॅंक सुटर याला, भागोजी पंचाळे मध्ये असल्याची खबर दिली. याबद्दल भागोजींना काहीच कल्पना नव्हती. पण रात्रीमध्ये इंग्रजांनी मात्र खंडेराव काळे यांच्या घरात लपलेल्या भागोजींना पकडण्यासाठी सापळा रचला होता. भागोजी जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारांवर हल्ला करण्यात आला, गोळीबार करण्यात आला. कसेबसे स्वतःचा जीव वाचवून ते सहकाऱ्यांसकट तेथून निसटले आणि सांगवीच्या दिशेने निघाले. सांगवी इथल्या देवनदी व गोदावरीच्या संगमावर घनघोर युद्ध झाले. या युद्धात भागोजींना गोळी लागून वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या साथीदारांनी अंत्यसंस्कार करून त्यांची समाधी उभारली .म्हणून सांगवीकरांचा इंग्रजांनी प्रचंड छळ केला, पण आपल्या क्रांतिवीरासाठी गावकरी इंग्रजांना विरोध करत राहिले, म्हणून सांगवीला 'लढाईची सांगवी' म्हटले जाऊ लागले.
पुढे काही दिवसांनी पुराच्या तडाख्यात समाधीचे प्रचंड नुकसान झाले पण गावातील तरुणांनी एकत्र येऊन डागडुजी केली, आणि सांगवीच्या ग्रामस्थांनी हा ठेवा जपून ठेवला. आजही गोदावरीच्या संगमावर ही समाधी उभी आहे.
भागोजी नाईक या धाडसी स्वातंत्र्यवीराला शतशत नमन.
मोहिनी प्रभाकर पाटणकर
'वनपुण्याई 'संपादक
ज.क.आ. कार्यकर्ती.