•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

श्रीमती मीनाक्षी निकम - २०२५ या वर्षाचा राष्ट्रीय स्तरावरील बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित...

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 22 days ago
भाष्य  

श्रीमती मीनाक्षी निकम - २०२५ या वर्षाचा राष्ट्रीय स्तरावरील बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित... 
.........

 दिव्यांग स्त्रियांच्या सशक्तीकरणाचे दुसरे नाव मीनाक्षी निकम 

 महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार यावर्षी चाळीसगाव, जि. जळगाव येथील 'स्वयंदीप' या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी निकम यांना जाहीर झाला आहे. कौटुंबिक, सामाजिक, भावनिक, आर्थिक असे विविध कंगोरे असलेला व काही अंशी समाज व शासकीय पातळीवर दुर्लक्षित अशा महिला दिव्यांग्याच्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर गेले ३१ वर्ष त्या कार्यरत आहेत. मुख्य म्हणजे केवळ दोन वर्षाचे वय असताना त्यांना पोलिओचे निमित्त होऊन दोन्ही पायांना अपंगत्व आले परंतु स्वतः भोगलेले दुःख अडचणी व कटू अनुभवांचा बाऊ न करता त्यांनाच जगण्याचे निमित्त करीत दिव्यांग स्त्रियांच्या सशक्तीकरणाकरिता त्या समर्थपणे अनेक दिव्यांग स्त्रियांमागे उभ्या राहिल्या. 

 'दिव्यांग घटकांकरिता शासन पातळीवरून सह अनुभूतीचा भाव राखत कल्याणकारी योजनांची निर्मिती व सुव्यवस्थापन व्हावे तसेच दिव्यांग घटकांकडे बघण्याचा कुटुंबाचा व सामाजिक दृष्टिकोन/मानसिकता बदल होणे ही खूप मोठी आव्हाने असल्याचे मीनाक्षीताई प्रत्येक व्यासपीठावरून सांगतात. त्यांच्याकरिता समान संधी साठी विशेष संधीची अनेक दारे उघडली पाहिजेत या त्यांच्या विश्वासावर त्या ठाम असून, याकरिता शासन व राज्यकर्त्यांची सकारात्मक इच्छाशक्ती महत्वाची हे त्या मानतात. राष्ट्रीय एकात्मतेच्या' दृष्टीने या कामाचे महत्त्व आहेच. दिव्यांग हे आपल्या समाजातील एक घटक आहेत व अनेक जण देशाच्या आर्थिक प्रगतीत सहभाग देतात, त्यांचा सहभाग अधिक सन्मानपूर्वक व्हावा हा विचार मांडणाऱ्या मीनाक्षीताईंच्या कार्याची दखल घेत त्यांना अत्यंत आदरपूर्वकरित्या बाया कर्वे पुरस्काराने पुणे येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे दिव्यांगांसाठी कार्यरत असणा-या 'सक्षम' या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.डॉ.श्री. अविनाश वाचासुंदर यांच्या हस्ते दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सन्मानित करण्यात येत आहे. एक लाख एक हजार रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

 १२५ वर्षापूर्वी भारतरत्न महर्षी कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या शताब्दी वर्षापासून म्हणजेच १९९६ पासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना महर्षी कर्वे यांच्या पत्नी आनंदी बाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचा नावे देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते.समाजाच्या उत्थानाकरीता, संबंधित समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता एखाद्या सामजिक प्रश्नाचा पाठपुरावा करीत, त्या प्रश्नावर असामान्य व अव्दितीय असे प्रेरणादायी कार्य उभ्या करणाऱ्या महिलांचा सन्मान यानिमिताने संस्थेमार्फत केला जातो. या कामासह, या महिलांनी या कार्य उभारणीत पेललेली आव्हाने व अडचणींची ही विशेष ओळख; या निमित्ताने समाजाला करून दिली जाते. 

 मीनाक्षीताईंनी स्वतःतील अपंगत्व जाणत, जगण्यातील आव्हाने लक्षात येत असतानाच; याच प्रश्नावर कार्य हाती घेण्याचे निश्चित केले. एक स्त्री म्हणून या शारीरिक वैगुण्यावर स्वतःसह समस्त दिव्यांग स्त्रियांच्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे काम हाती घेत असताना त्यांना या घटकां मधील मानसिक ऊर्जा व इच्छाशक्तीचे बळ लक्षात आले व हाच दुवा पकडत त्यांनी एका अनुकरणीय कार्याची मुहूर्तमेढ रोवली. कौटुंबिक पार्श्वभूमी फारशी अनुकूल नसतानाही त्यांनी सर्व अडचणींवर मात करीत मोठ्या जिद्दीने बारावी पर्यतचे शिक्षण आणि हस्तकला - शिवणकामाचा डिप्लोमा पूर्ण केला. हे शिक्षण पूर्ण करीत असताना, अपंग स्त्रियांच्या आत्मसन्मानाकरिता आपले आयुष्य समर्पित करण्याचा निश्चयही दृढ होत गेला. प्रत्यक्ष कार्याचा श्रीगणेशा हा दोन्ही पायांनी अपंगत्व असलेल्या महिलांसाठी निवासी प्रशिक्षण व हाताला काम असा उपक्रम हाती घेत झाला. पोटच्या अपंग मुलीदेखील अनेकदा कुटुंबियांना नकोशा होतात. या मुलींना छत्र व हाताला काम देण्याकरिता आज हा उपक्रम २० महिलांना प्रशिक्षण, काम व निवास व्यवस्था उपलब्ध करून देत आहे.

 १९९४ साली त्यांनी ‘राज क्लासेस’ ची स्थापना केली व दिव्यांग महिलांना पूर्णत: नि:शुल्क प्रशिक्षण या माध्यमातून देण्यास प्रारंभ झाला. आज अशा सुमारे २००० महिला याद्वारे आत्मनिर्भर झाल्या आहेत. 
कामाचा पसारा वाढत असताना, या कार्याला एक संस्थात्मक चौकटीत बसविण्याच्या दृष्टीने २०१६ त्यांनी ‘स्वयंदीप’ हा प्रकल्प सुरू केला. संस्थेच्या माध्यमातून दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या मुलींचे पालन करणे, त्यांना शिकवणे आणि पुढे जाण्यास प्रेरित करणे ही सर्व कामे एकाच छताखाली सुरु झाली. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार शिबिरे, पुनर्वसन कार्यक्रम आयोजित करण्याचे काम त्या सातत्याने करीत आहेत. विविध सामाजिक कल्याणकारी संस्थांच्या सहकार्याने शेकडो  दिव्यांगांना ट्रायसाइकिल, व्हीलचेयर, कैलिपर्स आणि हियरिंग एड्स देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना समाजभूषण, तेजस्विनी, प्रेरणा तसेच ZEE TV कडून ‘उंच माझा झोका’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 'स्वयंदीप' च्या कामासह त्या २०२३ पासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या सिनेट सदस्य म्हणून ही सक्रियरित्या कार्यरत आहेत. दिव्यांग घटकांचे प्रश्न, अडचणी, मर्यादा व त्यांच्या प्रति असलेला दुर्लक्षित भाव या सगळ्यावर आपल्या परखड लेखणीतून समाज प्रबोधन     'अपंग स्मृती' साप्ताहिकाचे सह-संपादक या पदावरून म्हणून करीत आहेत. तसेच अपंग विकास बहुउद्देशीय संस्था (चाळीसगाव) च्या अध्यक्ष म्हणूनही त्या आपले दायित्व निभावत आहेत. दिव्यांग घटकांच्या विकासासाठी झटणाऱ्या मीनाक्षीताईंना अपंग विकासासाठी राष्ट्रीय महासंघात विभागीय अध्यक्ष म्हणून देखील दायित्व देण्यात आले.

 मीनाक्षीताईंनी आपल्या कार्यातून, समाजातील एका दुर्लक्षित अशा घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची किमया केली. हे कार्य हाती घेणे व पुढे त्यास संस्थामक आकार देणे सहज सोपे नव्हते. मात्र त्यांच्या मनाचा निश्चय व या कामाप्रती असलेल्या निष्ठा व प्रेमामुळे; अनेक कठीण प्रसंगातून त्या अधिकच खंबीर व धीट झाल्या. अनेक कडू प्रसंगातून त्या, हाती घेतलेल्या कामाशी समरस होत गेल्या. आपले काम, हाच आपला प्रपंच हे मानणार्या मीनाक्षीताईंनी या कार्यात आयुष्यभर समर्पित राहण्याचा संकल्पच केला. त्यांच्या सह काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्या या दिव्यांग सेवा करण्याचा संकल्प करतात हे ही विशेष. 

 आज मीनाक्षीताईंनी हजारो स्त्रि्यांना त्यांचा जगण्यातील आत्मविश्वास दिला आहे.मीनाक्षीताईनी दृढ निश्चयाचे एक अप्रतिम परंतु तितकेच आव्हानात्मक कार्य स्वतःवरील विश्वास, कामातील निष्ठा व समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व जपत उभे केले. ज्या दिव्यांग घटकांच्या उन्नतीकरिता त्या समर्पित आहेत स्वतः देखील दिव्यांग आहेत अशा तेजपुंजास सन्मानित करताना, संस्था म्हणून आम्ही ही गौरान्वित झाल्याचे नक्कीच अनुभवीत आहोत.    

 मीनाक्षी निकम यांच्या कार्याला शतश: प्रणाम व वंदन! 

---लेखिका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत---  

 यापूर्वीच्या बाया कर्वे पुरस्काराच्या *मानकरी....
 कै. गंगूताई पटवर्धन, कै. निर्मलाताई पुरंदरे, कै. विजयाताई लवाटे डॉ. मंदा आमटे, श्रीम. नसिमा हुरजुक, श्रीम. पुष्पा नडे, श्रीम. प्रेमा पुरव, श्रीम.लीला पाटील, श्रीम. सुनंदा पटवर्धन, श्रीम.रेणू दांडेकर, डॉ. स्मिता कोल्हे, श्रीम.मीना इनामदार, श्रीम.सिंधुताई अंबिके, डॉ. माया तुळपुळे, श्रीम.पद्मजा गोडबोले, श्रीम.मीरा बडवे, श्रीम. अनुराधा भोसले डॉ. संजीवनी केळकर, श्रीम.जयश्री काळे, श्रीम. सुवर्णा गोखले, श्रीम. सुनीता गोडबोले, श्रीम.चंद्रिका चौहान, श्रीम. रूषाताई वळवी, श्रीम.जया तासुंग मोयोंग, किलांबी  पंकजा वल्ली, बुधरी ताती

 

 -स्मिता कुलकर्णी 


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • ट्रायसाइकिल
  • व्हीलचेयर
  • कैलिपर्स
Share With Friends

अभिप्राय

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था.महिला सक्षमीकरणासाठी अविरत कार्य करत आहे. तसेच महिलांसाठी काम करणाऱ्यांना सन्मानीत करत प्रोत्साहित करते.
Smita Belapurkar 27 Nov 2025 16:28


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (13), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (8), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.