भारताची आत्मप्रेरणा जागवणारा राज्याभिषेक अर्थात हिंदू साम्राज्य दिन

शिवराज्याभिषेक म्हणजेच खरं तर हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला स्वयमेव मृगेंद्रता याची आठवण करून देण्यासाठी आजपासून ३५० वर्षांहून अधिक काळ शिवाजी महाराजांनी घडवलेला कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयाचा जल्लोष करण्याची सवय मोडलेल्या हिंदू समाजात विजयी चैतन्य जागविण्यासाठी घडवून आणलेला चैतन्य जागरण कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक.डिलोपार्जित गादीवर वडिलांच्या नंतर वारसाहक्काने बसण्याचा एक तांत्रिक उपक्रम म्हणून राज्याभिषेक नव्हता. तर हिंदू सरदार असतील, फार तर मांडलिक असतील पण स्वघोषित राजा असू शकेल? शक्यच नाही असे उत्तर खोटे ठरवून दाखविण्यासाठी केलेला त्या सहस्त्रकातील सर्वात रोमांचकारी उपक्रम म्हणून या शिवराज्याभिषेकाचा आठव करावयाचा आहे. म्हणून सर्वार्थाने हा हिंदू साम्राज्य उत्सव आहे. संपूर्ण भारत वर्षाने साजरा करण्याचा दिवस आहे. हिंदू साम्राज्य दिन आहे. यात फक्त गडकोट किल्ले किती जिंकले याचा हिशोब नाही तर हिशोब ठेवायचा आहे शिवाजी महाराजांच्या उद्दिष्टांचा. जी उद्दिष्टे या शिवराज्याभिषेकात व्यक्त होतात. म्हणून शिवाजी महाराजांच्या कोणत्याही रणांगणातील पराक्रमांपेक्षा राज्याभिषेक हा श्रेष्ठ पराक्रम आहे.यात सप्त सिंधूंचे स्मरण आहे, काशी विश्वनाथ मंदिर मुक्तीचे स्वप्न आहे, धर्मपरावर्तनाच्या प्रक्रिया सुरू करायच्या होत्या त्याची चाहुल आहे, फक्त महाराष्ट्र ही सीमा नव्हती तर संपूर्ण देश हे स्वप्न होते हे सांगणारा हा राज्याभिषेक आहे, संस्कृती पुनरुज्जीवन हे उद्दिष्ट होते, हे सर्व जगासमोर मांडण्याचे व्यासपीठ म्हणजे शिवराज्याभिषेक होय. म्हणूनच तो हिंदू साम्राज्य दिन आहे, शिवशाहीतील सुवर्ण क्षण म्हणून हा दिवस साजरा करूया.
या युग प्रवर्तक उपक्रमाचे व हा दिवस हिंदुंसाठी युग प्रवर्तक का आहे हे समजून घेण्यासाठी काही पैलू आपण पाहूयात.
शिवराज्याभिषेक व गागाभट्ट
आपण शिवराज्याभिषेक हा हिंदू साम्राज्य उत्सव का व कसा? हे पहात आहोत. अखंड ३५० वर्षांहून अधिक हिंदू समाजाला हा दिवस प्रेरणा व उत्साह देत आहे. महत्त्वाचे म्हणजे हिंदू समाजाची स्वयमेव मृग्रेंदता ही भावना जागी ठेवत आहे. एकेका उदाहरणामधून आपण हा अर्थबोध करून घेत आहोत.
आज भेटू या गागाभट्ट यांना. काशीहून राजगडावर आले,हजारो मैलांचा प्रवास करून आले. बिन बुलाए मेहमान म्हणून आले व येथेच लिहिले गेले शिवराज्याभिषेक हा सामान्य राज्याभिषेक सोहळा नसून संपूर्ण भारत वर्षाची ही आर्त गरज आहे.
कारण गागाभट्ट एकटे आले नाहीत, तर त्यांच्या बरोबर हिंदुत्वाचे, राष्ट्रीयत्वाचे भूत, वर्तमान व भविष्य चालत आले होते, आता हिंदू राजा हवा ही आर्त मागणी चालत आली, भग्न पावलेली मंदीरे, त्याचे चिरे चालत येत होते, असुरक्षित स्त्रीची वेदना चालत येत होती, एका मागास तत्वज्ञानावर आधारित क्रुर पंथाच्या विकृत वर्तनाने भांबावून गेलेला सर्वसमावेशक हिंदू विचार चालत येत होता, संपूर्ण देश चालत येत होता. म्हणून हा राज्याभिषेक संपूर्ण देशाचा हिंदू साम्राज्य दिन उत्सव होता.
गागाभट्टांना राजगडावरून निमंत्रण गेले नव्हते. ते स्वतःहून आले होते. राजाला राज्याभिषेक करून घे ही विनंती करायला आले होते. यातच या राज्याभिषेकाचे सर्व महत्व अधोरेखित झाले आहे. भगवान शंकराच्या ज्ञानव्यापी मंदिराचा विध्वंस व अशा अनेक मंदीरांचा इस्लामिक क्रुरतेमुळे झालेला विध्वंस आपल्या पुर्नप्रतिष्ठेसाठी गागाभट्टांच्या रुपाने या ठिकाणी आला होता. झिझिया कराने अपमानित होणारा हिंदू समाज आपल्या अपमानाच्या बदल्याच्या अपेक्षेने आला होता. मोगलाईला कंटाळलेला हिंदू आपली दु:खी कहाणी घेऊन आला होता. विकृत विचारधारेमुळे अपमानित स्त्री समुदाय होता.गागाभट्ट आले म्हणजे हे सगळे आले. म्हणून हा राज्याभिषेक फक्त राजाचा सन्मान नव्हता तर या संपूर्ण भारतीय समाजाचे ते स्वप्न होते. म्हणून हा संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी दिवस आहे. हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य उत्सव आहे.
हिंदू साम्राज्य दिन व राज्य व्यवहार कोष
शिवराज्याभिषेक सोहळा हा म्हणजे हिंदू साम्राज्य उत्सव होता म्हणून त्या दिवसाला समस्त भारतीय समाजात एक चैतन्य लहरी निर्माण होते.हे कसे? याचा अजून एक पैलू या ठिकाणी उलगडून पाहूया. शिवराज्याभिषेकाच्या आधीही शिवाजी महाराजांचा राज्य कारभार चालूच होता. पण तो प्रामुख्याने फारसी शब्दांवर चालत होता. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्याचे व राजाचे सार्वभौमत्व, वैशिष्ट्य, स्वत्वाची ओळख हे सर्वच येते व त्यातच शिवराज्याभिषेक या सोहळ्याची अखिल भारतीय ओळख होते आणि त्या दिवसाचे महान पण जाणवते.
राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांनी नवीन राज्य व्यवहार कोष तयार करून घेतला. पण एवढेच याचे महत्त्व नाही, तर हा राज्य व्यवहार कोष संस्कृत भाषेत आहे. जर शिवाजी महाराजांच्या मनात हे मराठी राज्य असते तर हा कोष तत्कालीन मराठीतही बनू शकला असता. पण तसे घडायचे नव्हते.
हा कोष बनविण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य यांच्यावर सोपविली. त्यांनी ती जबाबदारी धुंडीराज म्हणून विद्वानांच्या मदतीने पूर्ण केली. १३८० फारसी, उर्दू शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द दिलेला बृहद् ग्रंथ अस्तित्वात आला.
संस्कृत भाषेची अक्षम्य हेळसांड झाल्यामुळे स्वतंत्र भारतात सुध्दा राष्ट्रीय एकात्मतेसाठी किती अडचणी येत आहेत ते आपण पहातो. त्याकाळी सकल राष्ट्र एकात्म करणारी संस्कृत भाषा ही कोषाची भाषा ठरली त्यातूनच शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय अस्मितेच्या प्रकटीकरणाचा सोहळा आहे हे निश्चित झाले व संपूर्ण देश मोहरून गेला.
या प्रत्येक वैशिष्ट्याने हे सिद्ध केले की, हा एका राजाचा सामान्य राज्याभिषेक नाही तर राष्ट्र अस्मिता जागरणाचा हा हिंदू कल्लोळ सोहळा आहे. म्हणून त्याचे स्मरण संपूर्ण देशाला आवश्यक आणि गरजेचे आहे. हे स्मरण हिंदू साम्राज्य दिन म्हणूनच व्हायला पाहिजे. शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य उत्सव आहे हे समजणे त्यासाठी गरजेचे आहे.
शिवराज्याभिषेक व काशी विश्वनाथ शिवराज्याभिषेक सोहळा हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर संपूर्ण देशाचा व संस्कृतीचा महिमा वाढावा म्हणून केलेला एक राष्ट्र जागरणाचा उपक्रमच होता. मी उभे करीत असलेले हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे हा विश्वास भारतभर पसरलेल्या हिंदू समाजाला व आग्र्याहून राजगडापर्यंत सर्व गावोगावच्या हिंदू नागरिकांनी आमचा राजा म्हणून जे सहकार्य शिवाजी महाराजांना केले, त्या नात्याचा उच्चरवात केलेला हुंकार म्हणजे शिवराज्याभिषेक. म्हणून हा राष्ट्रीय सोहळा. म्हणून हा हिंदू साम्राज्य उत्सव. व आपण आजही हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणूनच साजरा करतो.
सन १६६६ साली शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली व १६६९ साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदीराला भ्रष्ट केले. त्यानंतरची शिवाजी महाराज संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करत होते न की फक्त महाराष्ट्र वा मराठी माणसांचा. मी आपला सेवकच आहे म्हणत त्यांनी तक्रार काय केली तर जिझिया कर रद्द करा. हिंदुंवरील अन्यायाविरूद्ध तक्रार केली आहे. डोळ्यासमोर संपूर्ण हिंदू समाज आहे. म्हणून शिवराज्याभिषेक हा अनन्यसाधारण महत्वाचा आहे व राष्ट्रीयत्वाचा अर्थ उलगडणारा आहे.शिवाजी महाराज हे आग्र्याहून सुटले पण राजगडावर पोहोचे पर्यंत एका अर्थाने शत्रूच्या मुलखातुन येत होते व दिवसेंदिवस प्रवास करत होते. हे कसे जमले? याचे उत्तर आहे, आपल परका हा फरक जाणणारा हिंदू समाज या सर्व वाटेवर होता. औरंगजेब परका व शिवाजी महाराज आमचा हे कळणारा समाज हेच शिवाजी महाराजांचे संरक्षण कवच होते. अशा कवच देणा-या भारतभर पसरलेल्या हिंदू समाजाला विश्वास देण्यासाठी हा शिवराज्याभिषेक होता. संपूर्ण देश आपला सोहळा म्हणून पहात होता.संभाजीराजे थोडे थोडके नाहीत तर वर्षभर मथुरेत औरंगजेबापासून हाकेच्या अंतरावर रहात होते. मुंज करून ब्राह्मण म्हणून. हे का घडले? कारण मथुरेतील हिंदुंना आपला राजा सांभाळायचा होता. कारण सांस्कृतिक राष्ट्र कधीच परतंत्र नसते.आग्रा ते राजगड हा प्रवास फक्त युध्दस्य कथा रम्या नव्हत्या तर पराभूत देश असतानाही सांस्कृतिक राष्ट्र तसेच पूर्ण जाणीवांनिशी जिवंत होते याचे प्रतिक आहे. म्हणून हा प्रवास सांगतो शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ की हा हिंदू साम्राज्य दिन आहे. का शिवराज्याभिषेक साजरा करायचा तर शिवाजी महाराजांचे उद्दीष्ट कळावे म्हणून. शत्रू मित्र भाव कळावा म्हणून. सांस्कृतिक एकात्मता कळावी म्हणून. हे सर्व सांगण्यासाठी शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून घेतला.
सुनील देशपांडे