
कृष्णभक्त मीराबाई
जयंतीनिमित्त अभिवादन
ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन...
अशी मीरा आपण लहानपणापासून ऐकत आहोत.
मीराबाईचा जन्म १४९८ मध्ये राजघराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रतनसिंह राठोड होते. लहानपणीच मातृछत्र हरपले. त्यामुळे कट्टर विष्णु भक्त व वीर योद्धा असलेल्या आजोबांच्या देखरेखीखाली त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. आजोबांच्या घरी नेहमीच संतांचा मेळा भरत असे. त्यामुळे मीरेच्या मनावर लहानपणीच कृष्णभक्ती व संत सहवास यांचा पगडा पडला.
१५१६ मध्ये तिचे लग्न मेवाडचा राजपुत्र भोजराज याच्याबरोबर झाले. १५१८ मध्ये दिल्लीच्या बादशहाबरोबर झालेल्या लढतीत ते जखमी झाले. १५२१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. नंतर पाठोपाठ काही वर्षांतच मीरेचे वडील व सासरेही युध्दात मारले गेले. अशा रीतीने एकापाठोपाठ एक तिचे आधार तिच्यापासून दूर होत गेले.
पतीच्या निधनानंतर सती जाण्यास तिने नकार दिल्याने तिच्या अनुपस्थितीत तिच्या पतीवर अंत्यसंस्कार केले गेले. पतीच्या मृत्यूनंतर तिने सौभाग्य अलंकार काढले नाहीत, कारण कृष्णाला ती पती मानत होती. स्त्रियांना समाजात प्रचलित असलेल्या चालीरीतींच्या विरोधात वागण्याचे स्वातंत्र्य नव्हते. राजघराण्यातील व्यक्तींवर सामाजिक बंधने होती. पण ती झुगारून मीरेने आपली भक्ती कायम ठेवली. यातच तिची निडर, बंडखोर, निग्रही, लढाऊ वृत्ती दिसून येते. तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे ती विरही व विरक्त झाली. तिच्या काव्यामध्ये शांत रस, शृंगार रसात विरह गुण दिसून येतो. तिची जवळजवळ १३०० भजने उपलब्ध आहेत. ज्यामध्ये गेयता व माधुर्य आहे.
आयुष्यात अनेक दुःखे तिच्या वाट्याला आली. बालपणी मातृवियोग, लग्नानंतर अल्पावधीतच पतीवियोग, पितृवियोग, श्वसुरवियोग यांना तिला सामोरे जावे लागले. ज्याला आपण जगण्याचा आधार म्हणतो ते सर्व नियतीने तिच्याकडून हिरावून घेतले. मीरेची कृष्णभक्ती, समाजाभिमुख वागणे, भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचणे, राजवाड्यातून बाहेर जाणे हे सर्व राजघराण्याच्या चालीरिती विरुद्ध होते. त्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला.
पग घुंगरू बांध मीरा नाची रे।
मै तो नारायण की आपहि हो गयी दासी रे।
लोग कहे मीरा भई बावरी न्यात कहे कुलनासी रे।
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
मीरा के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अनिवासी रे।
जीवनात आलेली दुःखे सहज गिळून मी हसते, ते फक्त कृष्णभक्तीच्या भरवशावर असे तिचे म्हणणे आहे.
कृष्ण भक्तीचा मार्ग तिने लहानपणापासूनच अनुसरला आहे. ती प्रभुला म्हणते...
प्रभुजी तुम दर्शन बिन मोय घडी चैन न आवडे।
कृष्ण दुःख कधी निवारणार, असा विचार ती कृष्णापुढे मांडते..
हरि तुम हरो जन की भीर
द्रौपदी की लाज रखी, तुम बढायो चीर।
भक्त के कारण रुप नरहरि, धरयो आप शरीर।
हिरण्यकश्यपु मार दीन्हों, धरयो नार्हिन धीर।
बूडते गजराज राखे, कियो बाहर नीर।
दासि मीरा लाल गिरिधर, दुःख जहाँ पहँपीर।
साऱ्या भक्तांचे रक्षण तुम्ही केले, त्यांचे दुःख दिसले. आता ही मीरा, जी तुमची दासी आहे, तिला या दुःखातून पार करा असे ती कृष्णास सांगते.
मीराची भक्ती सगुणावरही आहे आणि निर्गुणावरही आहे. तिची भक्ती मधुरा भक्तीत मोडते. श्रीकृष्ण हा एकच पुरुष आहे, असे तिचे मत आहे. कृष्ण प्राप्तीसाठी ती काहीही करायला तयार आहे.
चाकर रहस्यूँ बाग लगास्यूँ नित उठ दरसण प्यास्यूँ।
या पदात, कृष्ण सहवासासाठी ती नोकर बनून बागबगीचाची कामे करेन म्हणते. वृन्दावनच्या गल्लीतून कृष्णलीला सांगेन असे सांगते. यातून तिला नेहमी कृष्णदर्शन होईल, तिच्या प्रियजनांची आठवण येणार नाही, तिच्या भक्तीचे सामर्थ्य वाढेल असे तीन फायदे दिसतात.
येथे आपल्या लक्षात येते कि संसाराच्या पीडेतून तिला मुक्ती हवी होती. कृष्णच आपला तारणकर्ता आहे असे तिचे दृढमत झाले होते.
मीरेचे सारे भावनिक बंध तुटत गेले, ती कृष्णमय होत गेली. तिला चराचरात कृष्ण दिसू लागला, तिच्या पदांमधून केवळ कृष्ण भक्ती दिसून येऊ लागली...
मेरे तो गिरिधर गोपाल दुसरों न कोई ।
जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई ।
तिची सर्व नाती आता ती कृष्णातच बघते.
तात मात भ्रात बंधु, आपनो न कोई ।
छाडि दई कुलकि कानि, कहा करि रे कोई ।
आता तिला कुणी उरलेच नाही, कृष्णच तिचे सर्वस्व आहे.
मैं म्हारो सुपनमा पनरि दीनानाथ।
छप्पन कोटा जाना पधराया दूल्हा श्री बृजनाथ।
या दोह्यात स्वप्नात मीरा श्रीकृष्ण पती रुपात भेटल्याचे सांगते.
मीरेचे पद तिला प्रसिद्ध करत गेले. पदातील माधुर्य, गांभीर्य, विरह, प्रेमामधील तन्मयता, भक्तीतील तन्मयता, दृढता, निश्चलता, निडरता सर्वांना आवडत गेली. तिची पदे आसवांनी भिजलेली आहेत. तिने तिच्या दुःखाचे अवडंबर केले नाही. त्यामुळे तिची पदे लोकांच्या मनाला भिडतात. या पदांमध्ये सहजता, सरलता आहे. मुख्य म्हणजे गेयता आहे. मीरा भावविभोर होऊन नाचते.
मीराबाईंचे चार ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
बरसी की मायरा, गीत गोविंद टीका, राग गोविंद आणि राग सौरठ
तिच्या गीतांचे संकलन ‘मीराबाई की पदावली’ या नावाने प्रसिद्ध आहे.
मीरेने तिचे गुरु म्हणून रैदास यांना मानले.
गुरु मिलिया रैदास दीन्ही ज्ञान की गुटकी।
आपल्याला मीरेच्या चरित्रातून असे दिसून येते की, मीरेने दुःखमय भवसागरातून निर्भिडपणे प्रवास करताना कृष्णभक्तीचा आधार घेतला. तिच्यापुढे समाजाने सती जाणे, विष पिणे असे आत्मघातकी मार्ग ठेवले होते. परंतु, ती कृष्णभक्तीत इतकी लीन झाली की तिच्या पदांमधून अजरामर झाली. तिने तिच्या भक्तीतून, साहित्यातून भक्तीचे गहिरे, अमर्याद रुप दाखवून दिले.
ती म्हणते...
पायो जी मैने रामरतन धन पायो।
गीताग्रजा