भारताच्या सर्व समस्यांवर उपाय आहेत गरज आहे ती रामनिती आणि कृष्णनितीची - अश्विनी उपाध्याय
नाशिक - आपल्या पूर्वजांमुळे आपण आपल्या धर्मात सुरक्षित आहोत.या भूमीत अनेक मान्यवर घडून गेले, परंतु आपली आज काय परिस्थिती आहे? आपण मंदिरामध्ये पूजा अर्चना करतो पण रामनिती, कृष्णनीती आपल्याकडे नाही.ती जर असेल तर समस्या राहणार नाहीत. असे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी व्यक्त केले.
आयाम नाशिक या नाशिक येथील संस्थेच्या वतीने आयोजित ‘महान भारत’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 14 एप्रिलला गुरूदक्षिणा सभागृहात हा कार्यक्रम झाला.
संविधानात सगळ्या गोष्टींची मीमांसा केली गेली आहे. काही राजकीय लोकांनी त्याबाबत जाणून बुजून गैरसमज पसरवले. देशाचा केवळ भौतिक विकास महत्त्वाचा नाही तर नैतिक, आध्यात्मिक विकास महत्वाचा आहे.असे सांगत ते पुढे म्हणाले की, देशात अनेक गोष्टींवर वाद चालू आहेत.संविधानातील अनेक कलमांचा गैरवापर झाला. अनेक गोष्टी नियोजनपूर्वक संविधानातून काढल्या गेल्या.भारतात माओवाद, नक्षलवाद, धर्मांतरण अशा अनेक उग्र समस्या आहेत,अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत,अशा वेळेस आपली न्यायव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था यांनी आपले दायित्व योग्य पद्धतीने निभावले पाहिजे. त्यासाठी सामान्य नागरिकांनी यावर बोलले पाहिजे, विचारले पाहिजे. यासाठी भेटले पाहिजे.जातीवर भांडण्यापेक्षा सत्य जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आज सरकारी कार्यालये भ्रष्टाचाराची दुकाने झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांच्यासारखी आदर्श न्यायव्यवस्था हवी.असे आताच्या काळात झाले तरच संविधान, लोकशाही वाचेल. संसदेत यावर चर्चा व्हावी. कायदे व्हावेत.संविधानाचे संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे.या संविधानाच्या संरक्षणासाठी आवश्यक कायद्यासाठी, त्यांच्या अंमलबजावणीसाठी अनेक जनहित याचिका दाखल केल्या जात आहेत. कायद्याचा धाक राहिला तरच सुरक्षित राहू".यासाठी अश्विनी उपाध्याय यांनी संविधानातील तरतुदी,त्यांचे तत्कालीन राजकीय नेत्यांनी केलेले बदल आणि त्यामुळे उद्भवलेली आताची परिस्थिती या विषयी प्रबोधन केले.
आयाम ,नाशिकचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांनी प्रास्ताविक केले.ते म्हणाले," आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे. भारताचे संविधान डॉ. आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान आहे.संविधान सर्वसमावेशक, समरसता, सत्य,सुचिता, करुणा , तपस या सगळ्याचे उत्तम उदाहरण आहे.आपल्याला या शक्ती स्थानांचा विसर पडू न देता,त्यांचा प्रचार, प्रसार करायचा आहे.
भारताचा इतिहास, कायदा व्यवस्था याची या कार्यक्रमामुळे अतिशय विस्तृत माहिती झाली.कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पाहुण्यांचा सत्कार डॉ. भरत केळकर यांच्या हस्ते झाला