•  26 Jun 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

विज्ञान आणि आनंदाचा समन्वय - भारतीय सण आणि उत्स

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) today
विज्ञान आणि तंत्रज्ञान  

 विज्ञान आणि आनंदाचा समन्वय - भारतीय सण आणि उत्सव

आपल्या भारत देशाचा विचार करताना भारतीय जीवनाच्या अंगोपांगी बहरत जाणारी एक संकल्पना म्हणजे संस्कृती. आपण काय खातो? आपण कोणत्या प्रकारचा पोशाख धारण करतो ? आपली श्रद्धास्थाने कोणती ? आपली मूल्ये कोणती, याचा विचार आपण संस्कृतीमधे करतो. याच संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे सण आणि उत्सव हे बरेचदा लक्षात येत नाही कारण ते आपल्याला फक्त सोहळे म्ह्णून माहिती असतात.  

संस्कृती म्हणजे भाषा, भूषा, भोजन आणि भजन. संस्कृतीचा मूळ अर्थ अधिक उत्तम करणे असा आहे. जी मानवी समाजाचे उन्नयन करते ती संस्कृती. भारतीय परंपरेत असा कोणताही विषय नाही ज्यामागे विज्ञानाचा आधार नाही. आपल्या सणांच्या आचरणात भूगोल, खगोलशास्त्र, शरीरशास्त्र, पर्यावरण आणि समाजशास्त्र यांचा सुंदर समन्वय दिसून येतो.

भारत हा आजही कृषिप्रधान देश आहे. शेतीभोवती विकसित झालेली जीवनपद्धती, ऋतूंचे चक्र आणि निसर्गातील बदल यांमधून अनेक सण निर्माण झाले. मकरसंक्रांत, पोंगल, भोगाली बिहू किंवा मकरसंक्रमण ही त्याचीच उदाहरणे. नावांमध्ये आणि प्रथांमध्ये विविधता असली तरी त्यामागील भावना एकच आहे.

शेती आणि तिच्या भोवती नांदणारी समृद्धी यामुळेच ऋतूंवर आधारित सण उत्सव भारतात उदयाला आले. या प्रत्येक उत्सवात, सणात कोणत्या ना कोणत्या देवतेची आराधना आहे.

भारतीय सणांचा निसर्गाशी असलेला संबंध विशेष लक्षवेधी आहे. आषाढातील मुसळधार पावसात घरात राहून उपासना करण्याची परंपरा आहे. श्रावणात सृष्टी बहरते आणि नागपंचमीसारख्या सणांतून सर्पांसारख्या जीवांबद्दल आदर व्यक्त केला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून कोळी बांधव मासेमारीचा हंगाम सुरू करतात.

भाद्रपदात शेतातल्या मातीचा किंवा नदीकाठच्या ओल्या मातीचा गणपती तयार करा आणि त्याची पूजा करून विसर्जन करा. ओहोळावरून, नदीवरून खडे आणा आणि त्यांची गौरी म्हणून पूजा. निसर्गात या काळात फुललेला तेरडासुद्धा गौरी म्हणूनच पूजणारी आपली संस्कृती. हे सारे लोकमानसातून आले, जपले गेले, जिवंत राहिले. निसर्गाच्या विविध रूपांची पूजा हा संस्कृतीचा मानबिंदू. लोकांच्या मनातील निसर्गाविषयीच्या आस्थेला दिलेलं हे विधायक रूप म्हणजेच लोकधर्म.  

फाल्गुनातील होळी हा सणही निसर्ग आणि मानवी मन यांचा सुंदर मिलाफ घडवितो. वृक्षांची पानगळ, नव्या ऋतूचे आगमन आणि जीवनातील नकारात्मक भावनांचे प्रतीकात्मक दहन या सर्वांचा संदेश या उत्सवात दडलेला आहे. होळीच्या अग्नीत राग, द्वेष, मत्सर जाळून टाकायचा आणि आयुष्यात आनंदाचे रंग भरायचे ही लोकसंस्कृतीची सुंदर शिकवण आहे.

चैत्र शुक्ल प्रतिपदेचा गुढीपाडवा हा नववर्षारंभाचा सण आहे. या दिवशी अभ्यंगस्नान, कडुनिंबाचे सेवन, गुढीपूजन अशा प्रथांमागे आरोग्यशास्त्रीय विचार आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी पाणपोई उभारण्याची परंपरा समाजहिताचा संदेश देते. स्वतःपुरता विचार न करता समाजाच्या गरजांकडे लक्ष देण्याची शिकवण यातून मिळते.

हिंदू धर्म आणि संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात निसर्ग, नाती आणि आध्यात्म यांचा सुंदर संगम दिसतो. नागपंचमीच्या निमित्ताने महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते. झाडांना झोके बांधणे, मेंदी काढणे, लोकगीते म्हणणे या परंपरा सामाजिक ऐक्य वाढवितात. नारळी पौर्णिमेला समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, तर जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून भक्ती, प्रेम आणि कर्तव्य यांचा संदेश दिला जातो.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे व्रत हे ‘पार्थिव गणेश व्रत’ म्हणून प्रसिद्ध आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वीतून आलेले. गाणपत्य संप्रदायाच्या उपासकाला विहित असे हे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या एक महिन्याच्या काळात करावयाचे हे व्रत आहे. उपासकाने दररोज नदीवर जाऊन स्नान, संध्या करावी. त्यानंतर नदीकाठची माती घेऊन आपल्या तळहातावर आपल्या हाताच्या अंगठ्याएवढ्या आकाराची गणेशमूर्ती तयार करावी. अथर्वशीर्ष म्हणून तिची विधिवत् पूजा करावी आणि लगेच ती विसर्जन करावी. आता आपण या व्रताच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मृण्मय मूर्तीची स्थापना व पूजा करतो. या व्रताची आख्यायिका अशी - एक गरीब क्षत्रिय होता. त्याला कोणत्याच व्यवसायात यश येईना. कंटाळून तो रानात निघून गेला. तेथे त्याला सौभरी ऋषी भेटले. त्यांनी त्याला श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या काळात गणेशाची आराधना करण्यास सांगितले. पुढील जन्मात तो क्षत्रिय; कर्दम ऋषी म्हणून जन्म पावला.

देवतेला अर्पण केल्या जाणा-या विविध पत्री या म्हणजे  निसर्गाशी जवळीकच  साधणे आहे. पावसाळ्यात उपलब्ध असणा-या या सर्व औषधी वनस्पतींचे शरीर उपयोगी गुणधर्म जाणून घेणे हे यामध्ये अपेक्षित आहे.  

शारदीय नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. देवीची उपासना करताना तिचे गुण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणे हे या सणाचे वैशिष्ट्य आहे. कृषिसंस्कृतीत भूमीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. देवीपुढे पेरलेल्या धान्यांमधून शेतीविषयक निरीक्षणांची परंपराही दिसून येते. भोंडला आणि गरबा यांसारखे लोकउत्सव स्त्रीच्या सर्जनशीलतेचा, सामूहिक आनंदाचा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा गौरव करतात. श्रीसूक्त हे देवीची विविध रूपे आपल्यासमोर मांडते. यातील देवी ही आत्मतृप्ता, गंधयुक्त, नेहमी संतुष्ट, अशी आहे.

कोजागरी पौर्णिमा आणि दिवाळी हे सुगीचे, समृद्धीचे आणि आनंदाचे उत्सव आहेत. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजनातून आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सतेज बुद्धी यासाठी संकल्प करण्याची प्रेरणा या दिवसातून मिळते.

दिवाळी सणाचा एक भाग असलेली त्रयोदशी तिथी ही धनत्रयोदशी म्हणून ओळखली जाते. धनत्रयोदशीबद्दल एक कथा प्रचलित आहे. ही कथा विष्णु पुराणात आलेली आहे. जेव्हा असुरांनी आणि देवांनी अमृत प्राप्तीसाठी  समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून भगवान धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले.

धन्वंतरी हे वैद्यराज असून त्यांच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. म्हणून त्या दिवसास "धन्वंतरी जयंती" असेही म्हणतात. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात.

अमृतत्त्व प्रत्येकालाच हवे असते. मानवी आयुष्यात माणसाला अमरत्व प्राप्त होणे खचितच कठीण. पण आपले आरोग्य निरोगी सुदृढ ठेवणे, मन आनंदी ठेवणे, बुद्धी सतेज ठेवणे यासाठीचे संकल्प या दिवशी आवर्जून करावेत आणि भगवान धन्वंतरी यांचे  स्मरण- पूजन करावे असा हा औचित्याचा दिवस आहे.  

दिवाळीनंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे संक्रमण. मकरसंक्रांत हा सूर्याच्या उत्तरायणाशी संबंधित सण आहे. ऋतुचक्रातील बदल, आरोग्यदायी आहार आणि सामाजिक स्नेह यांचा समन्वय या सणात दिसतो. तिळगूळाचे पदार्थ, भोगीची भाजी, पतंगोत्सव, पोंगल किंवा बिहू या विविध परंपरांमधून भारताची सांस्कृतिक विविधता आणि एकात्मता दोन्ही अनुभवास येतात. सूर्यपूजा ही केवळ धार्मिक कृती नसून जीवनदायी ऊर्जेबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे.

रांगोळी ही भारताची धार्मिक - सांस्कृतिक परंपरा आहे. स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, लक्ष्मीची पावले अशा प्रतीकांमधून शुभत्व, समृद्धी आणि निसर्गाबद्दलचा आदर व्यक्त केला जातो.

आपण ज्या निसर्गाची लेकरं आहोत त्याच्याशी आपले नाते अविभाज्य आहे. भारतीय संस्कृती ही जशी ऋषी संस्कृती आहे तशीच ती कृषी संस्कृतीही आहे. अग्नी, वारा, पाऊस, नद्या आणि पृथ्वी यांना देवत्व बहाल करून आपल्या पूर्वजांनी निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. पर्यावरण किंवा निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भागच आहे. त्यामुळे मानव आणि पर्यावरण असे द्वैत मानणं योग्य होईल का ? तर नाही त्यामुळे पंचमाहाभूते, निसर्ग, शरीरशास्त्र, खगोलीय गणिती ज्ञान, आहार विचार, ऋतुचर्या अशा भारतीय प्राचीन विज्ञानाशी जोडले गेलेले भारतीय सण आणि उत्सव आजही भारतीय जनात - मनात उत्साहाने जपले जात आहेत.

प्रा. डॉ. आर्या आशुतोष जोशी


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • भारतीय सण
  • विज्ञान
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (16), सामाजिक (166), कला (3), संस्कृती (41), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (66), रा. स्व. संघ आणि परिवार (82), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (9), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

trending

आणीबाणी : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन, जनआंदोलन आणि लोकशाहीचे पुनरुज्जीवन

संघाच्या देशप्रेमाने प्रभावित होऊन जेपी यांनी 'संघ लोकशाही मानत नाही' हा काँग्रेसचा...
विश्व संवाद केंद्र - पुणे काल

 पुस्तक परिचय  दिन विशेष   संपादकीय शिफारस  मनोरंजन  पर्यावरण  'अर्थ'पूर्ण  आंतरराष्ट्रीय  मुलाखत   कायद्याचे बोल  संकीर्ण   बातम्या   पर्यटन  
Read more

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.