त्र्यंबकेश्वर, नाशिकस १४ ऑगस्ट (विश्व संवाद केंद्र प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी, पर्वतराज ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेची अनेक पिढ्यांपासून चालत आलेली पावन परंपरा आजही कायम आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे येतात. मात्र याचवेळी प्रदक्षिणा मार्गावर प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. हीच जबाबदारी ओळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक निर्मल प्रदक्षिणा हा उपक्रम राबवत आहे.
सध्या या प्रदक्षिणेला 'फेरी' या नावाने ओळख मिळाली आहे. मात्र, 'फेरी' म्हणजे केवळ फिरणे किंवा भटकंती करणे, तर 'प्रदक्षिणा' म्हणजे भक्तिभावाने आणि नतमस्तक होऊन केलेली परिक्रमा. प्रदक्षिणा ही एक धार्मिक साधना आहे. तिच्यात प्रत्येक पावलागणिक ईश्वराशी नाते दृढ होते, अहंकाराचा क्षय होतो आणि आत्मशुद्धी साधली जाते. ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा म्हणजे निसर्गमातेची परिक्रमा होय. या पर्वतावरील जलस्रोत, वृक्षराजी आणि निसर्गाला साक्षी ठेवून भाविक आपला आध्यात्मिक प्रवास पूर्ण करतात. त्यामुळे ही केवळ चाल नसून आत्मिक उन्नती, पर्यावरण संरक्षण आणि भक्तिभावाचा संगम आहे.
‘निर्मल प्रदक्षिणा’ उपक्रमातून पर्यावरणाचे रक्षण
लाखो भाविक एकत्र आल्याने प्रदक्षिणा मार्गावर प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पादत्राणे आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण ही आपल्या तीर्थयात्रेची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) गेली अनेक वर्षे 'निर्मल प्रदक्षिणा' हा उपक्रम राबवत आहे.
या उपक्रमाला रा.स्व.संघाचे नाशिक ग्रामीण जिल्हा पर्यावरण गतिविधी प्रमुख, श्री. महादेव स्वामी गुरुजी यांचे गेल्या नऊ वर्षांपासून मोलाचे सहकार्य लाभत आहे. यंदा हरसूल परिसरातील जातेगाव खुर्द व बुद्रुक, चिंचवड, सारस्ते, तोरंगण, महादेव नगर आणि देवडोंगरी या भागांतील सुमारे २०० ते २५० वनवासी स्वयंसेवकांनी उत्साहाने या सेवेत सहभाग घेतला. या वर्षी महिला कार्यकर्त्यांचा सहभाग विशेषत्वाने वाढलेला दिसला.
पंढरपूरच्या 'निर्मल वारी'प्रमाणेच, सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या या प्रदक्षिणा मार्गावरून ६ ट्रॅक्टर भरतील इतका कचरा गोळा करण्यात आला. प्रदक्षिणा सुरू होण्यापूर्वीच दुकानदार आणि टपरीधारकांना ३०० कचरा पिशव्या देण्यात आल्या होत्या आणि त्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.
प्रदक्षिणा म्हणजे निसर्गरक्षणाची शपथ
या उपक्रमादरम्यान ह.भ.प. श्री. योगेश महाराज धात्रक यांनी "ही फेरी नाही, ही प्रदक्षिणा आहे — प्रत्येक पाऊल ईश्वराला अर्पण आहे, आणि प्रत्येक पाऊल निसर्गरक्षणाची शपथ आहे," असा संदेश दिला. त्यांनी तीर्थराज कुशावर्ताचे पावित्र्य, पर्वतराज ब्रह्मगिरीचे आध्यात्मिक महत्त्व आणि पापनाशिनी ज्ञानगंगा गोदावरीचे जीवनदायी स्वरूप यांवर प्रकाश टाकला. तसेच, त्यांनी विश्वगुरु संत निवृत्तीनाथांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.
श्रद्धांजली आणि कृतज्ञता
'निर्मल प्रदक्षिणा' कार्याचा समारोप 'केशव स्मृती मंगल कार्यालय' येथे झाला. सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, श्री. भिमरावकाका गोरे यांच्या निधनामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा सेवा कार्य प्रमुख, श्री. वामन गायधनी यांनी गोरे काकांच्या कार्याचा आढावा सादर केला.
कार्यक्रमाची सांगता रक्षाबंधन समारंभ आणि भावनिक प्रसादाने झाली. या वेळी 'निर्मल प्रदक्षिणा'साठी अर्थयोगदान देणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्थांचे मनःपूर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
अशा प्रकारे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केवळ भक्तीचा उत्सव न राहता भक्तिभाव, अध्यात्म, पर्यावरण संवर्धन आणि सेवाभावाचा प्रेरणादायी संगम ठरली. या उपक्रमाचे नियोजन त्र्यंबकेश्वर तालुका सेवा कार्य प्रमुख, श्री. जयदीप शिखरे आणि तालुका संपर्क प्रमुख, श्री. विशाल काळे यांनी केले होते.