
पुणे, दिनांक २५ मे २०२६ : "भारतीय संविधान हा केवळ एक कायदा नसून तो देशातील सामाजिक क्रांतीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. भारताची प्राचीन परंपरा आणि इथली वैशिष्ट्यपूर्ण समाजरचना लक्षात घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करताना प्रत्येक विषयाचे अतिशय गहन आणि सखोल चिंतन केले होते. हेच चिंतन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या पुस्तकाचे लेखन केले आहे," असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले.
साप्ताहिक 'विवेक' (पुणे) च्या वतीने पद्मश्री रमेश पतंगे लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. २४) सावरकर अध्यासन केंद्र येथे पार पडला. या पुस्तकामागची भूमिका मांडताना पतंगे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्रांत संघटन मंत्री नितीन केळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. व्यासपीठावर सामाजिक गतिविधीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक विलास लांडगे आणि समरसता साहित्य मंचाच्या अध्यक्षा वैशाली मोहिते उपस्थित होत्या. श्रोत्यांमध्ये पद्मश्री गिरीश प्रभुणे, शाम भुर्के यांच्यासह पुण्यातील अनेक संघ पदाधिकारी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पतंगे पुढे म्हणाले, "भारतीय संविधान हे देशातील राजसत्तेला कधीही अनियंत्रित होऊ देत नाही, तर तिच्यावर लोकशाहीचा एक सुयोग्य अंकुश ठेवते. या राज्यघटनेचे हेच अनन्यसाधारण महत्त्व मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे." यावेळी त्यांनी घटना समितीचे काम चालत असताना डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या सखोल चिंतनाची विविध उदाहरणे दिली. "डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व आणि त्यांचे राष्ट्रीय विचार लक्षात घेऊनच तत्कालीन शीर्षस्थ नेते वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद आदींनी त्यांना घटना समितीवर निवडून आणले होते," असा ऐतिहासिक दाखलाही त्यांनी आपल्या भाषणात दिला.
- पतंगे सरांच्या पुस्तकांमुळेच संविधानाचे नेमके आकलन : योगेश सोमण
प्रमुख पाहुणे योगेश सोमण आपल्या भाषणात म्हणाले, "भारतीय संविधान नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी पतंगे सरांनी संविधानावर लिहिलेली पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे. मी जेव्हा संविधानावरील एका कार्यक्रमासाठी अभ्यास करत होतो, तेव्हा अमेरिकन, फ्रेंच आणि ब्रिटिश राज्यघटनेवर पतंगे सरांनी लिहिलेली सोपी पुस्तके मला मार्गदर्शक ठरली; त्यातूनच मला भारतीय राज्यघटनेचा खरा आवाका समजला."
संविधान बदलण्याच्या कथित चर्चेवर बोलताना सोमण म्हणाले, "संविधान बदलले जाणार, असे खोटे नॅरेटिव्ह २०१४ सालापासून पद्धतशीरपणे चालवले जात आहे. हा एक राजकीय कट असून त्याला वैचारिक पातळीवर चोख उत्तर देणे गरजेचे आहे."

- संघाने नेहमीच घटनेचा आदर केला : नितीन केळकर
अध्यक्षीय भाषणात नितीन केळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्षेप घेणाऱ्या टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, "संघावर टीका करणाऱ्यांनीच आजवर अनेकदा भारतीय राज्यघटना पायदळी तुडवली आहे. संघाने मात्र घटनेचा नेहमीच सर्वोच्च आदर केला आहे. गेल्या १२ वर्षांत संविधानात नेमके काय वाईट बदल करण्यात आले, याचे उत्तर विरोधकांकडे नाही."
साप्ताहिक 'विवेक'च्या पुणे कार्यालयाचे प्रमुख धनाजीराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. 'विवेक'चे प्रतिनिधी रमेश देवी यांनी गित सादर केले. उमा व्यास यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन अमृता खाकुर्डीकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुधीर पाचपोर यांनी गायलेल्या पसायदानाने झाली, तर डॉ. वैशाली मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रमेशमामा देवी, प्रवीण शेटे, सचिन साठे, शरद शिंदे आणि राजेंद्र पंढरपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
(साभार - धनाजी जाधव)