
लोककल्याणकारी अहिल्यादेवी
'ईश्वराने जे उत्तरदायित्व माझ्यावर सोपवले आहे ते पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. प्रजेला सुखी करणे हे माझे काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज, सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करीत आहे त्याचा मला परमेश्वरासमोर अखेरीस जाब द्यावा लागेल.' अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचे अधिष्ठान म्हणजे त्यांची ही प्रतिज्ञा. 'एक भारत-श्रेष्ठ भारत, एक हिंदू-श्रेष्ठ हिंदू' या उक्तीची बीजे पेरणाऱ्या जनहितरक्षक अहिल्यादेवी.
लोककल्याणकारी राज्य -
अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता. त्यांचे राज्य 'लोककल्याणकारी राज्य' होते. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना अनेक दुःखांना सामोरे जावे लागले, परंतु त्यांनी नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या राज्यातील करपद्धती अतिशय चोख होती. राज्यातील गोंड, भिल्ल आदी जमातींना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. आपल्या राज्यात शांतता राखण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याची प्रशंसा सर जॉन माल्कम याने आपल्या 'A Memoir of Central India including Malwa' या ग्रंथात केली आहे.
शेतकरी हा जगाचा अन्नदाता असतो. हे ध्यानात घेऊन अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात शेतकरी आणि शेती यांच्या हिताचा विचार केला. शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. होतकरू शेतकऱ्यांना जमिनी दिल्या आणि फळझाडांची लागवड करण्यास प्राधान्य दिले. शेतीवरील कर उत्पन्नाप्रमाणे आकारण्यास सुरुवात केली. त्यांच्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था असल्यामुळे शेती, उद्योग आणि व्यापाराचाही उत्कर्ष झाला. परिणामी त्यांच्या कारकिर्दीत राज्याचे उत्पन्न वाढले.
कर्तव्यकठोरता -
न्यायदानाबाबत अहिल्यादेवी कर्तव्यकठोर होत्या. कर्तव्यापुढे त्या नातेगोतेही पाहत नसत. आपल्या अधिकाऱ्यांनी प्रजेवर जुलूम करू नये अथवा गैरकारभार करू नये याबाबत त्या अतिशय दक्ष असत. सिरोजमध्ये खेमदास नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याला मूलबाळ नव्हते, तो मृत्यू पावल्यानंतर त्याच्या कुटुंबात त्याच्या विधवा पत्नीशिवाय कुणीच नव्हतं. संपत्तीला वारसही नव्हता. हे पाहून तिथल्या अधिकाऱ्याने त्या विधवेस धमक्या देण्यास सुरुवात केली, "तुमची सर्व संपत्ती बेवारस असल्यामुळे सरकारजमा करण्यात येईल." ती विधवा घाबरली. ती म्हणाली, "मी दत्तक घेईन, पण असे करू नका." त्या अधिकाऱ्याने त्या विधवेकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली. तीन लाख दिल्यास संपत्ती तुमच्या नावे करून देईन. ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये, अशी धमकीही त्याने दिली. त्या विधवेच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी त्या महिलेस महेश्वरला जाऊन ही हकिकत अहिल्यादेवींच्या कानावर घालण्याचा सल्ला दिला. ती महिला महेश्वरास गेली आणि तिने अहिल्याबाईंना हा सगळा प्रकार कथन केला. तो प्रकार ऐकताच अहिल्यादेवी संतापल्या. त्यांनी ताबडतोब त्या अधिकाऱ्यास पदावरून बडतर्फ केले आणि विधवेला मूल दत्तक घेण्याची संमती दिली. हे उदाहरण बघता जॉन माल्कमने 'अहिल्यादेवींसारखा न्यायाधीश पुन्हा होणे नाही' असे अतिशय सार्थ उद्गार काढले आहेत.
लोककल्याणाचा ध्यास -
अहिल्यादेवींनी केवळ राज्य चालवले असे नाही तर त्या राज्याला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्याबाबत विजया जहागीरदार लिहितात - 'प्रजेच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीकडेही त्यांनी लक्ष दिले. कथा-कीर्तन, भजन हे कार्यक्रम, दानधर्म यातला निरामय आनंद आणि समाधान प्रजेला लाभले. त्यांनी स्वतःचे जीवन पवित्र, त्यागमय ठेवून आणि अतिशय साधी राहणी अवलंबून जनतेपुढे आदर्श ठेवला होता. प्रजेसाठी नवे नियम त्यांनी केले आणि त्याचवेळी पूर्वीचे जाचक नियम रद्द करून टाकले. प्रजेमध्ये सुरक्षिततेची भावना होती. त्यांना कोणापासूनही भय नव्हते. कधी कशाची टंचाई भासली नाही, की दुष्काळ पडला नाही. कित्येक ठिकाणी अन्नछत्रे चालू होती. तेथे कुणालाही दुजाभाव नव्हता. अहिल्याबाईंनी कुठलाही धाकधपटशा, बळजबरी वा दहशत दाखवून राज्य केले नाही तर अत्यंत मायाळूपणे, प्रेमाने राज्य केले. त्यांच्या काळात प्रजेत असंतोष निर्माण झाला नाही किंवा प्रजेने कधी उपद्रव दिला नाही. त्यांच्या दरबारात प्रजेला मुक्तद्वार होते. सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे हे त्यांचे कौशल्य होते. त्या जितक्या मृदू आणि मायाळू होत्या, तितक्याच कर्तव्यकठोर आणि कडक होत्या. त्यांच्या वागण्यात हे दोन्हीही रंग सारखेच प्रभावी आहेत. म्हणूनच त्यांचे चरित्र म्हणजे वज्रासारख्या कठोर अशा स्त्रीचे आणि त्याचवेळी कुसुमकोमल अशा हृदयाचेही आहे. कर्तव्यकठोर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्तीचे आहे तसेच नम्र अशा प्रजापालनकर्तीचेही आहे. रणचंडिकेचे आहे आणि वात्सल्यमयीचेही आहे. अहिल्यादेवी म्हणजे सात्त्विकता आणि कर्तव्यकठोरता यांचे एक अजब रसायन होते."
ढासळलेल्या स्वाभिमानाचे पुनरुज्जीवन -
अहिल्यादेवी अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या धार्मिक निष्ठेइतकीच त्यांची राष्ट्रीय व सामाजिक जाणीव प्रगल्भ होती. त्यांनी केवळ भंगलेल्या धार्मिक श्रद्धास्थानांचा जीर्णोद्धार केला असे नाही तर भारताचा ढासळलेला स्वाभिमानच पुनरुज्जीवित केला. एक प्रकारे त्यांनी या देशाचे धार्मिक आणि राष्ट्रीय आयुष्य नव्याने घडवले. श्रद्धेला गेलेले तडे सांधून घेतले. या कार्यामुळे देशातील कला, उद्योग, साहित्य, संस्कृती याला सर्वपरीने बळ मिळाले. महेश्वर येथील त्यांची राजधानी म्हणजे एक प्रकारे भारताचे हृदयस्थान बनले. त्या धामधुमीच्या काळात या हृदयस्थानातून सांस्कृतिक एकतेचा प्रवाह देशभर अभिसारीत होत राहिला. हिंदुस्थानभर पुन्हा चैतन्याचा संचार होऊ लागला. अहिल्याबाईंनी प्रजेच्या बाबतीत आपला व परका असे कधी भेद मानले नाहीत. जात-धर्म-प्रांत याच्या पलीकडे जाऊन हिंदुस्थानभर भारताची प्राचीन संस्कृती दिसेल, जतन होईल अशा प्रकारची बांधकामे केली. महेश्वरात विणकरांना वसवून जगप्रसिद्ध असे महेश्वरी वस्त्रच नव्हे तर भारतीयांच्या एकत्वाचा धागाच जणू विणला.
एकत्वाचा धागा -
वाटसरूंना सुविधा पुरवणे, वाटेवर झाडे लावणे, पाणपोया, अन्नछत्रे या सुविधा देत तो संस्कार समाजमनात रुजवला. समाजमनाचे उन्नयन, देशाविषयी, परंपरांविषयी आपलेपणा, प्राचीन धर्मस्थळांविषयी आस्था अशा अनेक बाबी यातून नकळत साधल्या गेल्या. त्यांची धर्मनिष्ठा आंधळी नव्हती. विधवा स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून देणे, त्यांना दत्तक घेण्याचा हक्क देणे या बाबत त्या नेहमीच दक्ष राहिल्या. 'पतीमागे सती गेलेल्या सर्व स्त्रियांची श्राद्धे झाली पाहिजेत मग त्या यवन असल्या तरी त्यांची पतिनिष्ठा महत्त्वाची आहे' असे त्यांनी ठामपणे सांगितले.
करुणा व मातृभाव -
होतकरूंसाठी अन्नछत्रे, वाटसरूंसाठी पाणपोया व निवारे, प्रवाशांसाठी उत्तम रस्ते व सुरक्षा, देवस्थानांची पूजाअर्चा नियमित व्हावी यासाठी कायम स्वरूपी योजना, अन्यायावर न्याय्य व त्वरित तोडगा, कुकर्मे करणाऱ्यांचे परिवर्तन आणि पुनर्वसन अशीही कामे त्यांनी केली. त्यांची करुणा व मातृभाव हा मानवापुरता मर्यादित नव्हता. झाडे लावण्याची योजना, शेत नांगरणाऱ्या बैलांसाठी पाणी, पक्ष्यांना दाणे टिपण्यासाठी राखीव शिवारे, वनात फिरणाऱ्या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी तलाव अशी सारी जीवसृष्टी त्यांच्या निगराणीखाली सुरक्षित होती.
अलोट वैभव असूनही पराकोटीचा साधेपणा, सशक्त राज्यकर्ती असूनही सहकार्याचे धोरण, प्रचंड दानधर्म करूनही अतिशय चोख हिशोब, धार्मिक असूनही अनिष्ट रूढींना विरोध आणि अपार दुःख सोसूनही सदैव प्रजेच्या सुखाची कार्ये केली. पर्यावरणसंरक्षण, कौशल्य विकास , पर्यटन स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात अहिल्यादेवी यांच्या कार्याचा आदर्श आजही उपयुक्त ठरतो आहे. कर्तृत्व, दातृत्व, मातृत्व, नेतृत्व असे चतुर्विध आदर्श आपल्यापुढे त्यांनी ठेवले आहेत.
श्रद्धास्थानांची पुनर्बांधणी -
नुसता मंदिरांचा जीर्णोद्धार करूनच त्या थांबल्या नाहीत तर वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चोंडी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे, चारधामे या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, बारव, विहिरी, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रेकरूंची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ मंदिर बांधले. कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली. यातून त्यांनी श्रद्धास्थानांची लौकिकरीत्या पुनर्बांधणी केली. तीर्थस्थानी भारतभरातून कुठल्याही कोपऱ्यातून आलेल्या भाविकांना किमान अन्न, पाणी आणि निवाऱ्याची सुरक्षित सुविधा मिळावी याची व्यवस्था केली. कुणी आजारी झालेच, तर त्यांना उपचार मिळावेत यासाठी लोककल्याणकारी अहिल्यादेवींनी नामांकित वैदूनांही वसवले. प्रवास करताना नागरिकांना उन्हातान्हात वृक्षांची छाया मिळावी यासाठी वृक्षांची लागवडही केली. देवस्थानांना जोडणारे रस्ते, पायवाटाही बांधल्या. कोणत्याही भाविकांना देवस्थानी यायचे असेल, तर त्याला कसलीच तोशीस पडू नये याची जाणीवपूर्वक खबरदारी घेतली. श्रीमंतांबरोबरच गोरगरिबांनाही देवस्थानाचे दर्शन घेता यावे यासाठी अत्यंत काटेकोरपणे केलेले नियोजन आजही आदर्शवत ठरावे असे आहे.
सर्वस्पर्शी नियोजन -
सजीवांसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. आज पृथ्वीवर दूषित पाण्याचे प्रमाण वाढत आहे आणि पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. पिण्यायोग्य पाण्याच्या प्रमाणाचा सतत होणारा ऱ्हास ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि हे टाळण्यासाठी जलसंवर्धनावर आज भर दिला जातो. पण त्याकाळी अहिल्यादेवींनी पाण्याचे महत्त्व जाणले होते. पिण्यायोग्य पाण्याच्या सुविधेसाठी त्यांनी बारवा, जलकुंडे, विहिरी आणि तलावांची निर्मिती केली.
उत्तम मार्गदर्शक आणि व्यवस्थापन -
त्याकाळी अनेक ठिकाणी जंगलातील वाटेवर चोर, लुटारू असत. ते येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूला लुटत. त्यामुळे आपल्या देवाचे दर्शन घ्यायला गेलो, तिथे सगळी सुविधा असली तरीसुद्धा वाटेत चोर, दरोडेखोर लुटणार आणि कदाचित जीवही घेणार या भीतीमुळे लोक यात्रा करत नसत. यावर उपाय म्हणून आणि प्रजेमध्ये सुरक्षा प्रस्थापित व्हावी यासाठी अहिल्यादेवी यांनी नवीन योजना निर्माण केली. ज्या मार्गावर दरोडेखोर असत तेथील माहिती घेऊन दरोडेखोरांच्या अर्थार्जनासाठी एक नवाच उपाय शोधून काढला. त्यामार्गावरून जाणारे प्रवासी या दरोडेखोरांना, लुटारूंना जुजबी शुल्क देतील. त्याबदल्यात या दरोडेखोरांनी या प्रवाशांच्या, यात्रेकरूंच्या जीविताची आणि संपत्तीची काळजी घ्यावी. त्याची जर क्षुल्लक जरी हानी झाली तरी त्याची जबाबदारी आणि त्याबद्दल शासन हे तिथल्या दरोडेखोरांना होणार असा आदेशच काढला. तसेच या लोकांनी गुन्हेगारी सोडून द्यावी म्हणून त्यांना शेती करण्यासाठी जमिनी दिल्या. शेतीचे उत्पन्न आणि मार्गस्थ होणाऱ्या प्रवासी यात्रेकरूंकडून मिळणाऱ्या शुल्कातून या लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले. त्यामुळे नर्मदेच्या तीरावरील दाट जंगलभागातून प्रवास करत दक्षिणोत्तर किंवा पूर्वपश्चिम प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षा मिळाली. हे सगळे करताना स्थानिक जनतेच्या हिताचाही विचार या प्रजाहितदक्ष राणीने केला. त्यासाठी जिथे जिथे मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तिथे तिथे स्थानिक समाजातील कलाकुसर आणि व्यापार उदिमाला प्रोत्साहनपर उपक्रम सुरू केले. त्यामुळेच पशुपक्ष्यांच्या अन्न आणि निवाऱ्यासकट उपचारासाठीही त्यांनी केंद्रे सुरू केली. इतकेच काय तर पशूंना चरण्यासाठी वेगळी शेती असावी असा दंडकही सुरू केला. गरीब भूमिहीनांना शेतीसाठी जमीन दिली आणि अशी एक आख्यायिका सांगितली जाते की सरकारी खर्चातून १२ फळझाडे लावली जात, तर त्यातल्या सात फळझाडांचे उत्पन्न त्या गरीब शेतकऱ्याने स्वतःकरिता राखायचे आणि पाच फळझाडांचे उत्पन्न सरकारी खजिन्यात द्यायचे. त्यासाठी सरकारदरबारी वेगळे हिशोब ठेवले जायचे. याचबरोबर नर्मदामैयावर अतीव श्रद्धा असलेल्या अहिल्याबाईंनी नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून दैनंदिन वापरासाठी नदीच्या प्रवाहाचे विभाजन करून वेगळा प्रवाह काढला.
एक भारत - श्रेष्ठ भारत, एक हिंदू - श्रेष्ठ हिंदू -
मंदिर जीर्णोद्धारातून आणि लोकहितात्मक कार्यातून अखिल भारतवर्षाला धार्मिक आस्थेने जोडले. उत्तरेचे काशिविश्वनाथ मंदिर, दक्षिणेचे रामेश्वर मंदिर, पश्चिमेचे सोरटी सोमनाथ मंदिर आणि पूर्वचे विष्णुपद मंदिर या सगळ्या मंदिरांची पुनर्बांधणी केली. 'एक भारत - श्रेष्ठ भारत, एक हिंदू - श्रेष्ठ हिंदू' या जाणिवेची बीजे पेरली.
अशा या दातृत्वातील मेरुमणी असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन.
अंजली तागडे
(लेखिका विश्व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्ट्रच्या संपादक आहेत.)
साभार – एकता