
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
समाजात महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी चिरंतन काम उभे करणारे उपासनी महाराज
कुणालाही त्रास देऊ नये.
दु:ख भोगणे आणि इतरांना उपयोगी पडणे.
आहे या स्थितीत समाधानी राहणे ही त्यांची मुख्य शिकवण
शंभर वर्षांपूर्वीचा तो काळ होता. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. अशा काळात, स्त्रियांनी शिकावे, या विचारांचे प्रणेते ‘श्री उपासनी महाराज.’
श्री उपासनी महाराजांना, प. पु. सती गोदावरी माताजी, या सर्वप्रथम शिष्यारूपाने लाभल्या. त्यांचा आदर्श घेऊन भक्तांच्या मुलींनी देखील, आपले जीवन श्री सद्गुरू चरणी समर्पित करून,ब्रह्मचर्याचे व्रत स्वीकारून, वेद अध्ययन करण्याचा निर्णय घेतला.
श्री उपासनी महाराजांनी प्रथम कन्या मंडळींना काही पौराणिक मंत्र शिकवले. वे. शा. स. वसंत शास्त्री देशमुख यांनी कन्या मंडळींना यज्ञाचे, पौरोहित्याचे शिक्षण दिले. पहिल्याच यज्ञाचे वेळेस त्यांना एक अद्भुत अनुभव आला. तो असा की, ज्या देवतांचा कन्या मंडळी स्वाहाकार करत आहेत, त्या देवता साक्षात यज्ञकुंडातून प्रगट होऊन आहुती स्वीकारत आहेत. मग श्री उपासनी महाराजांनी पुढचे पाऊल उचलले आणि दीक्षाविधीनंतर कन्यांना वेदाचा अधिकार दिला. त्या काळात स्त्रियांनी वेद ऐकण्याची देखील परवानगी नव्हती. त्यामुळे श्री उपासनी महाराजांनी केलेले कार्य क्रांतिकारी ठरले. त्यांना या कार्यासाठी प्रचंड विरोध झाला.कार्याची टीका झाली. परंतु हेतू शुद्ध असल्याकारणाने तावूनसुलाखून श्री उपासनी महाराजांनी ही क्रांतिकारी चळवळ यशस्वी केली. केवळ वेदाधिकारच नव्हे, तर गायन, वादन, किर्तन, प्रवचन, विविध कलाकुसर अशा सर्व गोष्टी शिकवून कन्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडविले. श्री उपासनी महाराजांनी २४ कन्यांना दीक्षा दिली. शिर्डी जवळ असणाऱ्या, श्री उपासनी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री उपासनी कन्याकुमारी स्थान, साकुरी येथे १९३३ पासून आजतागायत संपूर्ण वर्षात सात यज्ञ संपन्न होतात.
श्री सूर्ययाग,श्री रुद्रयाग, श्री रामयाग, श्री गुरुयाग,श्री विष्णूयाग, श्री गणेशयाग, श्री चंडीयाग हे सात यज्ञ कन्या मंडळीद्वारा केले जातात.विशेष म्हणजे या यज्ञांचा आणि सत्कर्मांचा संकल्प ‘सकलजगत् कल्याणार्थ’असा केला जातो.
श्री उपासनी महाराजांनी देह ठेवल्यानंतर प. पु. सद्गुरु सती गोदावरी माताजी यांनी ३३ कन्यांना दीक्षा दिली. आणि केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही यज्ञ संस्थेचा प्रचार आणि प्रसार केला. येथून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊनच अनेक ठिकाणी स्त्रियांना वेदांचे शिक्षण दिले जात आहे. १९९० ला प.पू. गोदावरी माताजी यांनी देह ठेवला. श्री उपासनी महाराजांनी आखून दिलेल्या दिनक्रमानुसार सर्व सत्कर्म, यज्ञयाग कन्यामंडळीद्वारे अविरत चालू आहेत.ही श्री उपासनी महाराजांच्या कार्याची ही साक्ष आहे.
स्थानाचा सर्व कार्यभार या ब्रह्मचारिणी कन्यांच्या द्वारेच सांभाळला जातो. शेतीपासून ते गायीच्या गोठ्यापर्यंत, यज्ञापासून ते सर्व पूजा-अर्चा, मूर्तीच्या शृंगारसेवेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या कन्यामंडळीच सांभाळताना व आपले जीवन सद्गुरू चरणी व्यतीत करताना दिसतात.
जयमाला कुलकर्णी, साकोरी

छान माहिती दिली आहे.
उदय देशमुख
09 Jan 2025 10:40