पुण्याजवळचे खडकवासला धरण हे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि महाराष्ट्राला जोडणारा एक बंध आहे. या धरणाला लावलेले आपोआप उघडणारे कळसूत्री दरवाजे हे सर्वात प्रथम त्यांनी तयार केले. नंतर त्या कल्पनेचा उपयोग पनामा कालव्यात करण्यात आला. आपल्या या आविष्काराचे त्यांनी पेटेंट तर घेतले होते, मात्र त्यातून एका पैशाचीही रॉयल्टी घेतली नाही.याचसोबत नीरा कालव्यात वापरलेल्या ब्लॉक सिस्टिमची मूळ कल्पनासुद्धा त्यांचीच होती. सर जॉन मॅकेझी या विख्यात अभियांत्रिकी तज्ञाने त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते.

सुप्रसिद्ध स्थापत्यविज्ञारद व अभिनव कल्पनांचे जनक सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना भारतीय औद्योगिक युगाचे अग्रदूत म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म १५ सप्टे. १८६१ रोजी झाला.
कर्नाटक राज्यातील कोलार जिल्हयातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी हे विश्वेश्वरय्या यांचे जन्मस्थान. यांचे वडील श्रीनिवास शास्त्री व आई वेंकटलक्षम्मा हे गरीब पण अत्यंत धार्मिक होते. बंगळुरुच्या सेंट्रल कॉलेजांतून त्यांनी पदवी १८८१ साली घेतली व म्हैसूर सरकारच्या शिष्यवृत्तीवर ते पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग मधून एल. सी. ई. परीक्षेत पहिले आले. त्यांची पहिली नियुक्ती मुंबई प्रांताच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीयपपदी झाली. प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये कालव्यांच्या कामांचा अनुभव घेत हे मुंबई सरकारचे सॅनिटरी इंजिनीयर झाले. नंतर १९०७ मध्ये त्यांनी एडन शहराचा पाणीपुरवठा व सफाई यांची योजनाही तयार केली.
पुण्याजवळचे खडकवासला धरण हे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि महाराष्ट्राला जोडणारा एक बंध आहे. या धरणाला लावलेले आपोआप उघडणारे कळसूत्री दरवाजे हे सर्वात प्रथम त्यांनी तयार केले. नंतर त्या कल्पनेचा उपयोग पनामा कालव्यात करण्यात आला. आपल्या या आविष्काराचे त्यांनी पेटेंट तर घेतले होते, मात्र त्यातून एका पैशाचीही रॉयल्टी घेतली नाही.याचसोबत नीरा कालव्यात वापरलेल्या ब्लॉक सिस्टिमची मूळ कल्पनासुद्धा त्यांचीच होती. सर जॉन मॅकेझी या विख्यात अभियांत्रिकी तज्ञाने त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. महाराष्ट्रात काम करीत असतानाच न्या. महादेव गोविंद रानडे, ना. गोपाळ कृष्ण गोखले व न. चिं. केळकर यांच्याशी त्यांचा विशेष परिचय झाला.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी काही काळ हैदराबाद राज्यांत सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर म्हैसूर राज्यांत मुख्य इंजिनीयर म्हणून यांची नेमणूक झाली. तीन वर्षानंतर त्यांना म्हैसूर राज्याचे मुख्य दिवाण नेमण्यांत आले. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी संस्थानांतील प्रत्येक खात्यात बदल घडवून आणला आणि नवचैतन्य उत्पन्न केले. म्हैसूर राज्याच्या अर्थशात्रीय पुनरूज्जीवनाचे श्रेय त्यांना दिले जाते. नव्या प्रचंड योजना पद्धतशीर आंखून त्या व्यवहारांत उतरविण्यांत त्यांचे विशेष कौशल्य दिसून येते.
विश्वेश्वरय्या यांची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी कावेरी नदीचा बंधारा वाढवून कृष्णराजसागर तलावाला प्रचंड स्वरूप दिले. दोन कोटी रुपये खर्च करून काढलेल्या कालव्यांनी त्यांनी दीड लक्ष एकर जमीन भिजती केली. शिवसमुद्र धबधब्यातून पूर्वीपेक्षा दहा पट अधिक पाणी पडण्याची व्यवस्था करून विजेचा पुरवठा भरपूर केला. आता त्याच्या शेजारी असलेले 'वृंदावन उद्यान' जगप्रसिद्ध आहे. त्यांनी खोदलेल्या कालव्यांमुळेच म्हैसूरच्या पठाराला सर्वत्र पाणीपुरवठा झाला आणि म्हैसूर व बंगळुरु ही शहरे उद्यान- नगरे बनली.
नवी राज्यघटना, सडका, वीज, विद्यापीठ, चामराज राजेन्द्र टेक्निकल व मेकॅनिकल इंजिनीयरिंग स्कूल, साबण, तेले, कागद वगैरेंचे कारखाने आणि भद्रावती आयर्न वर्स्ल हा लोखंडी सामानाचा कारखाना अशा अनेक योजना त्यांनी आखल्या व त्या प्रत्यक्ष व्यवहारांत आणल्या. रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया, अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया, नेशन बिल्डिंग आणि प्रॉस्परीटी थ्रू इंडस्ट्री हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली.
सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीश सरकारनेही त्यांनी जनहिताच्या कामामुळे 'नाईट' या पुरस्काराने सन्मानित केले. शतायुषी कृतार्थ आयुष्य जगल्यानंतर १४ एप्रिल १९५५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.