
व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' पुस्तकाचे प्रकाशन - लेखक - डॉ. शरद कुंटे , प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे
पुणे – सतराव्या ते एकोणिसाव्या शतकामध्ये भारतामध्ये अनेक चिंतक निर्माण झाले. या कालखंडाचा भारतातील प्रबोधन युग म्हणून विशेषत्वाने उल्लेख केला गेला आहे. प्रबोधन युगामध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा अनेक मान्यवरांनी समाजाचे जे प्रबोधन केले त्याचाच निचोड संघ कामाच्या रूपाने आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे असे प्रतिपादन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या मेळाव्यात 'व्यवस्थापन शास्त्र व संघ' या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. शरद कुंटे व प्रकाशक रविंद्र घाटपांडे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, एका अर्थाने समाजाच्या उत्कर्षासाठी सर्व महापुरुषांनी जो मार्ग दाखवून दिला त्याच मार्गाने संघाची वाटचाल निर्धाराने चालू आहे.
या पुस्तकात कार्यकर्त्याची जडणघडण, नेतृत्वगुणांचा विकास, समूहाने एखादा कार्यक्रम घडवून आणण्याचे तंत्र, आयोजनाचे तंत्र, नवीन कार्यक्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी संघटनेचा ठसा उमटवण्याची पद्धत व हे सर्व करत असताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण या प्रत्येक विषयामध्ये व्यवस्थापन शास्त्रातील अनेक तत्त्वांचा उपयोग केला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर चिल्लाळ यांनी केले

पुस्तकाचे अंतरंग -
या पुस्तकाची एकूण १५ प्रकरणे आहेत. संघाची स्थापना, विस्तार, जनसंघटनांची निर्मिती, संघाचे उद्दिष्ट व कार्यपद्धती यांची मांडणी हा प्रारंभिक विषय आलेला आहे. व्यवस्थापन शास्त्राचा आर्य चाणक्याने जो अर्थ दिलेला आहे तो म्हणजे 'जे उपलब्ध नाही ते मिळविण्याचे शास्त्र म्हणजे व्यवस्थापन शास्त्र. संघाला संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे म्हणजे देशातील प्रत्येक माणूस आपल्या संघटनेशी आणून जोडायचा आहे. या अर्थाने संघातील व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक माणूस संघटनेशी जोडण्याचे व्यवस्थापन असे म्हणता येईल.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे या पुस्तकातील एक प्रारंभिक प्रकरण आहे. कोणताही लहान मोठा उपक्रम ज्यावेळी संघामध्ये हातात घेतला जातो त्यावेळी त्या उपक्रमाचे नियोजन कशा पद्धतीने केले जाते याचे विस्ताराने विवरण या प्रकरणात केलेले आहे. शाखेचा एखादा उत्सव संपन्न करायचा असला तरी त्याच्यासाठी ५० छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या शोधून काढल्या जातात. त्या जबाबदाऱ्या ५० वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना सोपवल्या जातात व प्रत्येकाला आपापले काम नीट समजावून दिले जाते. व्यवस्थांचे नीट वाटप होण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक हे एक महत्त्वाचे माध्यम असते. जेवढे कार्यक्रमाचे नियोजन अधिक अचूकपणे होते तेवढा तो कार्यक्रम नेमकेपणाने पार पाडला जातो. एखादा मोठा उपक्रम म्हणजे सांघिक अथवा एखादा मोठा उत्सव याचे आयोजन करणे हा याच्या पुढचा टप्पा असतो. त्यासाठी लागणाऱ्या व्यवस्था अधिक व्यापक असतात. त्यामध्ये काही खर्चाचे भाग समाविष्ट असतात, त्याचप्रमाणे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा सहभाग मिळवणे हे देखील महत्त्वाचे असते. हे काम कसे करून घेतले जाते व त्यातून कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण कसे होते याची चर्चा या प्रकरणात आलेली आहे. संघाचे एखादे शिबिर किंवा संघशिक्षा वर्ग याचे नियोजन करणे हे एखाद्या अनुभवी व जेष्ठ कार्यकर्त्यालाच सांगितले जाते. कारण त्याच्यामध्ये नियोजनाचे अनेक आयाम समाविष्ट असतात. एखाद्या नवीन वस्तीमध्ये किंवा नवीन क्षेत्रामध्ये संघाचे काम सुरू करणे हा एक प्रकारचा प्रकल्प असतो. तो प्रकल्प पार पाडताना कार्यकर्ता अनेक नवीन गोष्टी शिकत जातो. हे शिक्षण त्याला समाजातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन त्या संस्था उत्तम प्रकारे चालवण्यासाठी उपयोगी पडते. जेव्हा एखादे प्रांत व्यापी अथवा देशव्यापी अभियान संघ कार्यकर्ते हातात घेतात, त्यावेळी नियोजनाचे चार किंवा पाच वेगवेगळे स्तर विचारात घ्यावे लागतात. या प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात. अशा प्रकारचे नियोजन हे हळूहळू अनुभवातून कार्यकर्ता आत्मसात करत जातो व त्यातून तो एक उत्तम संघटक घडत जातो.
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकास हा कार्यकर्त्याच्या जडणघडणीमध्ये असलेला अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक माणसांमध्ये स्वभावाचे काही कंगोरे असतातच. हे कंगोरे घासून संघाला हवा तसा कार्यकर्ता घडविणे याची एक प्रक्रिया आता सिद्ध झालेली आहे. व्यक्तीमध्ये असलेल्या अनेक अंगभूत गुणांची वाढ घडवून आणणे व त्याच्यामध्ये असलेले दोष हळूहळू कमी करत नेणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास. संघामध्ये इतर अनेक गोष्टी बरोबरच व्यक्तिगत चारित्र्य व सामाजिक चारित्र्य या दोन्ही आयामांकडे बारकाईने लक्ष दिले जाते व प्रत्येक कार्यकर्ता या दोन्ही आयामांमध्ये चांगल्या पद्धतीने विकसित व्हावा असा प्रयत्न केला जातो. समाजाचा संघावर विश्वास निर्माण व्हावा, यासाठी कार्यकर्त्याचा विचार उच्चार व आचार यामध्ये सुसंगती असणे आवश्यक असते. अशा प्रकारची सुसंगती संघ कार्यकर्त्यांच्या व्यवहारात कशी सहजपणे व्यक्त होते याचीही अनेक उदाहरणे पुस्तकात आलेली आहेत. विश्वास हाच संघटनेचा आधार आहे हे अतिशय सुंदर रीतीने व्यक्त केलेले आहे. कार्यकर्त्याचा आपल्या ध्येयावर असलेला विश्वास, आपल्या कार्यपद्धतीवर असलेला विश्वास, आपल्या नेत्यावर असलेला विश्वास, आपल्या सहकाऱ्यावर असलेला विश्वास, आपण ज्याच्याकडून काम करून घेणार आहोत त्या कार्यकर्त्यावर असलेला विश्वास, व समाजाच्या क्षमतेबद्दल असलेला विश्वास हे विश्वासाचे अनेक पैलू आहेत व या प्रत्येक पैलूतून कार्यकर्ता संघटनेशी अधिकाधिक घट्टपणे बांधला जात असतो याची उदाहरणे पुस्तकात आलेली आहेत.
संघटन व्यवस्थापन हे स्वतंत्र प्रकरण आहे अगदी लहानात लहान स्तर म्हणजे शाखेपासून ते मोठ्यात मोठा स्तर म्हणजे अखिल भारतीय कार्यकारणी पर्यंत संघटनेची बांधणी कशी सूत्र पद्धतीने झालेली आहे व यातील प्रत्येक स्तर दुसऱ्याला कसा पूरक आहे याचे स्पष्टीकरण या प्रकरणात आलेले आहे
कपॅसिटी बिल्डिंग म्हणजे कार्यकर्त्याची क्षमता वाढविणे हा एक स्वतंत्र पैलू आहे. समाजात जो कार्यकर्ता आपल्याला मिळतो त्याला संघटनेमध्ये आपण सामावून घेतो. त्याची क्षमता वाढवून आपल्याला हवा तसा कार्यकर्ता घडविणे हे संघाचे वैशिष्ट्य आहे. डॉक्टर हेडगेवार यांना संघ सुरू करताना जे पहिले दहा कार्यकर्ते सापडले ते सुरुवातीला असामान्य वाटण्याजोगे नव्हते. ते तुमच्या माझ्यासारखेच सामान्य कार्यकर्ते होते. परंतु त्यांनी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाऊन असामान्य कार्य केले ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे कार्यकर्त्याची क्षमता संघामध्ये कशी वाढवली जाते याचे स्पष्टीकरण या प्रकरणात आले आहे. याचाच पुढचा भाग हा नेतृत्व विकास म्हणजे लीडरशिप डेव्हलपमेंट असा आहे. जन्मजात नेतृत्व प्राप्त होण्यासाठी परमेश्वराची कृपा असावी लागते. परंतु संघाचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजाच्या एकेका क्षेत्रामध्ये नेता म्हणून उभा राहिला पाहिजे ही संघाची दृष्टी आहे. त्यासाठी कार्यकर्त्याची योग्य ती जडणघडण करणे व त्याच्यात नेतृत्वगुण निर्माण करणे यासाठी एक कार्यपद्धती संघाने विकसित केलेली आहे. ती व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीनेही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.
समस्या निवारण किंवा क्रायसिस मॅनेजमेंट हा कदाचित सर्वात महत्त्वाचा असा भाग म्हणावा लागेल. माणसांचे संघटन म्हटले की त्यात निरनिराळ्या समस्या निर्माण होणारच या समस्या सोडविण्यासाठी संघ विचार कसा करतो हे यात स्पष्ट केलेले आहे. कार्याची हानी होता कामा नये व कार्यकर्ता तुटता कामा नये, या दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. कोणताही निर्णय घेतला की काहीतरी नुकसान होईल अशी ज्यावेळी परिस्थिती येते त्यावेळी ज्या निर्णयाने कमीत कमी नुकसान होईल असा निर्णय घ्यावा लागतो. संघाच्या सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांना अनुभवातून समस्या निवारण कसे करावे हे शिकावे लागते. गेल्या शंभर वर्षांमध्ये देशभरात अशा हजारो अंतर्गत समस्या संघामध्ये निर्माण झाल्या व त्या समस्यांचे निवारण करून संघ आजपर्यंत पुढे वाटचाल करत आलेला आहे. हे करत असताना संघाच्या वाढीला कुठेही बाधा निर्माण झाली नाही किंवा कार्यकर्ते संघापासून कदाचित दूर झाले तरीही त्यांच्या मनामध्ये संघाविषयी असलेले प्रेम व आस्था ही कमी झाली नाही. या कार्यकर्त्यांकडून संघाचे कोणतेही नुकसान घडले नाही. या दोन्ही गोष्टी कशा सांभाळल्या जातात हे खरोखर मोठे आश्चर्य आहे. मोठ्या मोठ्या उद्योगांमध्ये क्रायसिस मॅनेजमेंट करणाऱ्या व्यक्तींना माणूस सांभाळण्याची गरज नसते. त्यांना कंपनीचा फायदा सांभाळला की पुरेसे असते. पण संघात मात्र संघाचे हित सांभाळणे व माणूस सांभाळणे ही दुहेरी कसरत करावी लागते. त्या दृष्टीने हे प्रकरण समजून घेणे फारच रोचक ठरणारे आहे.
व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' पुस्तकाचे प्रकाशन - लेखक - डॉ. शरद कुंटे , प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे