
बांगलादेश नव्हे, हा तर कंगालदेश!!!
सध्या आपल्या देशाचा शेजारी, ज्याला भारतानेच पाकिस्तानच्या विळख्यातून सोडवून स्वतंत्र केला होता, अशा बांगलादेशामध्ये आज असणारी परिस्थिती अत्यंत भयावह आहे. बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असून, दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. परंतु अचानक असे नेमके काय घडले, एकंदरीत घटनाक्रम काय, त्याचा संबंध केवळ हिंदूंशीच आहे का, हा केवळ हिंदू-मुस्लिम प्रश्न आहे का असे अनेक प्रश्न आहेत.
अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदू समाजावर अत्याचार होणे ही बाब काही नवीन नाही, परंतु सद्यस्थितीत उडालेल्या भडक्याची सुरुवात ही बांगलादेश उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर झाली.
5 जून 2024 रोजी, बांगलादेश उच्च न्यायालयाने बांगलादेश मुक्ती युद्धात भाग घेतलेल्यांच्या वारसदारांसाठी 30% नागरी सेवा पदे राखून ठेवणारी नोकरी कोटा प्रणाली पुनर्संचयित केली. आपल्या देशासाठी झटणाऱ्या, स्वतःचे कुटुंब, आयुष्यच पणाला लावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशी काही प्रणाली आणणे किंवा पुनर्संचयित हे साहजिकच आहे.
वास्तवात अश्या प्रस्तावाचे स्वागत होणे अपेक्षित असते. परंतु दुसऱ्या दिवशी, 6 जून रोजी, जमात-ए-इस्लामी, या कट्टरपंथी संघटनेच्या विद्यार्थी शाखेने पोलीस स्टेशन आणि प्रमुख विद्यापीठे, म्हणजे, ढाका विद्यापीठ, जगन्नाथ विद्यापीठ, शेर-ए-बंगाल यासारखी अत्यावश्यक ठिकाणे आणि रस्ते अडवून निषेध सुरू केला. बांगलादेशातील या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत चीन, पाकिस्तान आणि कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी त्यांच्या अजेंड्याचा प्रचार करण्याची आणि बांगलादेशात भारतविरोधी आणि हिंदूविरोधी वातावरण निर्माण करण्याची संधी साधली.
या साऱ्याची परिणीती बांगलादेशाच्या पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांच्या राजीनाम्यामध्ये झाली. शेख हसीना यांचे सरकारच नव्हे तर प्राण देखील संकटात सापडले. त्यांना अखेर भारतामध्ये स्थलांतरित व्हावे लागले. हवालदिल झालेल्या हिंदूंवरील अत्याचारांचे सत्र तीव्रतेने सुरु झाले. कलाकार, खेळाडू, गायक, पोलीस अधिकारी अशा अनेक पेशातील हजारो हिंदूंची हत्या करण्यात आली. खुलना, रंगपूर, राजशाही, बारिसाल अशा विभांगामध्ये अजूनही हे सत्र सुरूच आहे. पूर्वापार चालत आलेली इस्लामिक आक्रमकांच्या अत्याचाराची परंपरा आजही बांगलादेशामध्ये सुरु आहे. हिंदू हा काफिर आहे आणि काफिराला ठार केलेच पाहिजे ही सातव्या शतकापासून दिसलेली मनोवृत्ती आजही तशीच जिवंत असल्याचे बांगलादेश हे उदाहरण आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, या साऱ्या घटनांचा कोणत्याही, उलेमाने किंवा बॉलिवूडच्या खाना-वळी ने निषेध केला नाही किंवा कँडल मार्च काढला नाही. असो. भारतीय हिंदूंनीच यांना अब्जोपती बनवले आहे आणि आजही त्यांचे सर्वात जास्त फॅन्स हे हिंदूच आहेत. खरं तर, शेख हसीना यांच्या कालखंडामध्ये, भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तसे स्नेहाचेच राहिले आहेत. आजही कित्येक भारतीय आस्थापनांनी आपले कारखाने उभे करून, बांगलादेशाच्या अर्थोन्नतीमध्ये सहकार्यच केले आहे. परंतु बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी ( ज्यांच्या नेत्याला २०१८ मध्ये एका ग्रेनेड हल्ला प्रकरणात जन्मठेप झाली होती आणि शेख हसीना देश सोडून गेल्यावर तो खटलाच अवैध ठरवून त्याला मुक्त करण्यात आले), कडवट आणि कट्टर इस्लामवाद मानणारी 'जमात-ए-इस्लाम' ही संघटना, त्याच प्रमाणे दहशतवादाचा इतिहास असणारी, खिलापतचे राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट असणारी, विखारी विचारांचा पुरस्कार करणारी 'तहरीर' ही संघटना यांनी बांगलादेशाला विषारी इस्लामवादाच्या भोवऱ्यात अडकवले आहे. चुकीचा किंवा फेक नॅरेटिव्ह (विमर्श) निर्माण करणाऱ्या डाव्या विचारांच्या संघटना, चीन चा विस्तारवाद, पाकिस्तानचा टोकाचा इस्लामवाद या साऱ्यांनी त्याला अधिकचे खतपाणी घातले आहे.
पाकिस्तानचा बांगलादेशाकडे असणारा ओढा हा केवळ पॅन-इस्लामिझम पुरता नसून, १९७१ साली विभाजित भूमीला पुन्हा प्राप्त करण्याचा देखील आहे. चीनचे या पाठीमागे असणारे आर्थिक पाठबळ हे, धार्मिक उद्देशाने नसून केवळ भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करून, भारताच्या होत असणाऱ्या उत्पादन व व्यावसायिक भरभराट आणि पर्यायाने आर्थिक उन्नतीला खीळ घालणे, भारताची जगभरात वाढत असणारी विश्वासार्हता धोक्यात आणणे आदि बाबींसाठी आहे. एकंदरीतच काय तर बांगलादेश एका गंभीर टप्प्यावर येत आहे, जिथे पाकिस्तान आणि चीनकडून समर्थित कट्टर इस्लामी घटक आपली राजकीय पकड मजबूत करत आहेत. जमात-ए-इस्लामी आणि हिजबुल तहरीर सारख्या अतिरेकी गटांकडून हिंदू, बौद्ध यांसारख्या अल्पसंख्यांकांवर क्रूर हल्ल्यांच्या रूपात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. राजकीय विरोधकांना पाकिस्तान-समर्थक वृत्तीमुळे वाढत्या दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. प्रादेशिक सुरक्षेविरुद्ध तसेच बांगलादेशाच्या धर्मनिरपेक्ष मुळांच्या विरोधात लष्करी आणि सांस्कृतिक आघाड्यांवरही सामना करावा लागत आहे.
अल्पसंख्याक, सांस्कृतिक चिन्हे आणि भारतविरोधी वाढत्या कृत्यांमुळे, बांगलादेशाची भविष्यातील दिशा त्याच्या अंतर्गत स्थिरता आणि व्यापक प्रादेशिक शांततेसाठी गंभीर धोके निर्माण करत आहे. बुद्धिवैभव, सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसलेली बांगलादेशी तरुणाई बौद्धिक दृष्ट्या कंगाल होत आहे हे स्पष्टच आहे. जर भारतीय उद्योजकांनी आपली तेथील गुंतवणूक काढून घेतली तर हा देश भुकेकंगाल झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणूनच जेव्हा वरील संघटनांचे उद्देश सफल होतील किंवा फसतील तेव्हा बांग्लादेश हा कंगालदेश असेल हे निश्चित.
त्या देशाचे जे होणे असेल ते होवो परंतु आज एक हिंदू म्हणून मी भारत सरकारला कळकळीची विनंती करतो की, बांगलादेशी हिंदू आणि बौद्ध बांधवांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आणावा. त्याचप्रमाणे माझ्या देशबांधवांनो आपणही बांगलादेशात तयार होणाऱ्या वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकावा. अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अन्य कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग साईट वर आपण मागवत असणाऱ्या वस्तूची माहिती घ्यावी आणि त्यामधे 'कंट्री ऑफ ओरिजिन' बांगलादेश असेल तर अशा वस्तू मागवू नयेत. कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्याला कानाखाली किंवा पार्श्वभागावर मारून अक्कल येत नाही तेव्हा त्याच्या पोटावरच लाथ मारावी लागते.
आणखी काय …आपण सुज्ञ आहोतच .....
लेखक - श्रीपाद श्रीकांत रामदासी