सनातन हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्या शक्तींना वेळीच रोखा - आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज
पाथर्डी प्रतिनिधी : - सनातन व प्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीवर विविध मार्गांनी आक्रमण करणाऱ्या शक्तींना वेळीच रोखा. देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आगामी काळात सावधपणे कोणत्याही फुटीरतावादी व संस्कृती विरोधी शक्तींना धारा देवु नका. आपण शिवरायांच्या स्वराज्याचे पाईक आहोत ती हिंदवी स्वराज्याची शिवरायांची संकल्पना मनी बाळगून हिंदू म्हणून संघटीत होत या देशविरोधी ताकदीचा सामना करु. जातीयवादाला कुठेही धारा देवु नका हिंदू म्हणून एकत्र या तरच हिंदू धर्म व संस्कृतीचे संरक्षण होईल. अन्यथा पश्चात्तापा शिवाय काहीच शिल्लक राहणार नाही. असे प्रतिपादन अयोध्येतील राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.
चैत्र प्रतिपदेपासून सुरू झालेल्या शिवचैतन्य जागरण यात्रा पाथर्डी शहरात पोहचली यावेळी शहरातील अजंठा चौकात तालुक्यातील जनतेला ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शहरातील अर्जुना लॉन्सपासून अजंठा चौकापर्यंत या यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. हजारो रामभक्ताच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या मिरवणूकीत हजारो तरुण व नागरिकांसह हिंदू रक्षा युवा मंचचे युवक सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करत स्वामीजींचे स्वागत केले.
यावेळी तरुणांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. यावेळी रॅली दरम्यान आमदार मोनिका राजळे यांनी ही सर्व संत महंतांचे आशिर्वाद घेतले. तर केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन युवा नेते ऋषिकेश ढाकणे यांनी ही मिरवणूकी दरम्यान आचार्य गोविंद देव गीरीजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत त्यांचे स्वागत केले.
चैत्र प्रतिपदेला हरिद्वार येथील पतंजली योगपीठापासुन सुरू झालेल्या या शिवचैतन्य जागरण यात्रेचे महत्त्व विषद करत स्वामी गोविंदगिरी म्हणाले, विविध संस्कृतीने परंपरेने व संस्काराने नटलेल्या या भारतभूमीमध्ये परक्यांच्या आक्रमणानंतर शेकडो वर्षे या देशात अंधकार पसरला होता. यानंतर पुन्हा कधी हिंदू राजा होऊ शकेल असं कुणाला वाटलंही नव्हतं. अनेक विशाल हिंदू मंदिरे पाडली, मूर्तीभंजन, गोहत्या व अत्याचारांमुळे कोणतीही स्त्री सुरक्षित नव्हती. धर्मांतरण व सर्वत्र गुलामी असताना शिवनेरी किल्ल्यावर एका तेजोमय सुर्याचा अर्थात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मातेच्या गर्भात असतानाच या राजाने जे यवनांचे अत्याचार अनुभवले. आपल्या पित्यासह सर्व भावांची हत्या झाल्यामुळे जिजामातेचं अंतकरण कळवळलं होतं. याच वेदनांतून घडविलेल्या शिवाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी आपल्यातील धर्माभिमानी संस्कार व गुण दाखवत कुणापुढेही झुकणार नाही हे दाखवून दिले. १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. कारण, त्यांना हिंदूंचं साम्राज्य स्थापन करायचं होतं. म्हणून, त्यांनी मिर्झा राजा जयसिंगांनाही दिल्लीच्या सिंहासनावर बसण्याचं आवाहन केलं. त्यावेळच्या दिल्लीश्वरांच्या मनातील मनसुबे ओळखून व बलाढ्य हिंदूंना आपसात लढायला लावायचे हा हेतू शिवरायांनी ओळखला होता. हिंदू राजा सत्तेवर असणं गरजेचं होतं. सर्व धर्म राजधर्मावर अवलंबून असतात, हे त्यामागचं कारण होतं.
सध्याची परिस्थिती पाहता आताही तोच प्रश्न निर्माण झाल्याचे सांगताना स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले की, अनेक गिधाडं आपल्या देशाचे तुकडे व्हावेत यासाठी टपून बसली आहेत आणि पप्पू नावाचं घुबड धर्मनिरपेक्षतेचा राग आळवत आहे. नगर जिल्ह्यातील कानिफनाथ देवस्थानच्या जमीनीवर देखील वक्फ बोर्ड दावा करत आहे. त्यामुळे, मढी देवस्थान हिंदूंच्या ताब्यात राहील की नाही याची कुठलीही शाश्वती नाही. बांगलादेशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच उंबरठ्यावर आपला देश उभा आहे. यावेळी आपण काहीच प्रयत्न केला नाही हा कलंक लागायला नको म्हणून मी जागरण करत फिरत आहे. त्यासाठी तुम्हीही प्रचाराला सुरुवात करा आणि दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर सर्व हिंदूंचं मतदान घडवून आणा. लोकशाहीत विद्वत्तेला नाही तर डोक्यांना महत्व आहे. मतदान कुणाला करायचं हे मी सांगणार नाही. तो आमचा उद्देश ही नाही. परंतु राष्ट्रवादी व्यक्ती सिंहासनावर राज्यकर्ते म्हणून यायला हवीत. हिंदूंची मंदिरं शासनापासून मुक्त करणं गरजेचं आहे. हिंदूंपेक्षा बलवान कुणीही नाही परंतु फुट पडायला नको. अगोदर हिंदू नंतर पोटजाती महत्वाच्या आहेत. एकीकरणासाठी हिंदुत्वाचं जागरण महत्वाचं आहे. देशाचं भवितव्य धोक्यात आहे. बांगलादेशातील घटनांनंतर मला ते जाणवू लागलं आहे. म्हणूनच ही शिवचैतन्य यात्रा काढली असल्याचं शेवटी स्वामी गोविंदगिरी म्हणाले.
यावेळी प्रज्ञाचक्षु मुकुंद महाराज जाळदेवळेकर, राम महाराज झिंजुर्के, हभप.गोविंद महाराज आदि संत महंत उपस्थित होते.