नगर, दिनांक - २२ सप्टेंबर ः संविधानात बदल होणार, असा अपप्रचार राजकीय हेतूने जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. विविधतेने नटलेल्या भारतीयांच्या एकतेचे सूत्र हे संविधान आहे. कोणाचा बापही संविधान बदलू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती संविधानाचे अभ्यासक अॅड. विजय गव्हाळे यांनी दिली.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने राज्यभर सामाजिक संवाद मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. नगरमध्ये वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा "'सामाजिक संवाद मेळावा" (Samajik Samwad Melava) संपन्न झाला.
या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्यायाच्या विषयासंदर्भात चर्चा - संवाद झाला. मेळाव्यात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी मंचावर विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे, प्रमुख वक्ते ॲड. विजय गव्हाळे, चंद्रकांत काळोखे व अजिंक्य गुरावे यांची उपस्थिती होती.
यावेळी सागर शिंदे म्हणाले की, "अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जनसामान्यांमध्ये संविधानाचा प्रचार होणे गरजेचे आहे. कट्टरतावादी धर्मांध इस्लामिक संघटना, नक्षलवादी संघटना व फुटीरतावादी शक्तींच्याकडून संविधानाला खरा धोका आहे."
संविधान सरनामा वाचनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजिंक्य गुरावे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन निशांत नन्नवरे यांनी केले.