जीएमआरटीमुळे तब्बल 34 महाकाय दुर्मिळ रेडिओस्त्रोतांचा शोध लागला असून, दीर्घिकांच्या अंतिम टप्प्यातील विज्ञान उलगडण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. पुणे स्थित राष्ट्रीय रेडीओ खगोलभौतिकी केंद्राच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.
- सम्राट कदम, namastesamrat@gmail.com

पुणे ः भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञांनी तब्बल 34 अतीविशाल रेडिओ स्त्रोतांचा शोध घेतला असून, अत्यंत दुर्मिळ असलेल्या स्त्रोतांमुळे दीर्घिकेच्या अंतिम टप्प्यातील विज्ञान उलगडण्यास मदत होणार आहे. खोडद (नारायणगाव) जवळील अद्ययावत जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (GMRT) सहाय्याने हा शोध लागला आहे.
टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (NCRA) शास्त्रज्ञांनी संपूर्ण आकाशाचेच सर्वेक्षण केले आहे. त्यातूनच ब्रह्मांडातील महाकाय आणि तेवढ्याच दुर्मिळ असलेल्या रेडिओ स्त्रोतांचा शोध शक्य झाला आहे. पीएचडीचे विद्यार्थी नेताई भुक्ता आणि सौविक माणिक यांनी हे संशोधन केले आहे. एनसीआरएचे शास्त्रज्ञ सब्यसाची पाल आणि सुशांत मोंडल यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. या संबंधिचा शोधनिबंध अमेरिकन अॅस्ट्रोमिकल सोसायटीच्या अॅस्ट्रोफिजीकल जर्नल सप्लिमेंट सिरीज मध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे.

-----
संशोधनाचे महत्त्व काय?
- ब्रह्मांडात अतिविशाल रेडिओस्त्रोत अपवादात्मक स्थितीत आढळतात
- प्रचंड आकार आणि मुळ दीर्घिकेपासून दूर असल्यामुळे रेडिओ स्त्रोतांची उत्क्रांती समजून घेण्यास मदत
- यातील दोन रेडिओ स्त्रोत आजवरच्या संकल्पनांपेक्षा भिन्न असून, नवीन विज्ञान प्रस्थापित होण्याची शक्यता
- ब्रह्मांडातील आजवरची महाकाय आणि दुर्मिळ रचना असल्यामुळे शास्त्रज्ञ कोड्यात
----
असे झाले संशोधन -
- 2010 ते 2012 दरम्यान 150 मेगाहर्ड्झ वारंवारितेवर आकाशाचे सर्वेक्षण करण्यात आले
- टीआयएफआर जीएमआरटी स्काय सर्वे म्हणून हा ओळखला जातो, ज्यामध्ये 90 टक्के आकाशाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
- प्राप्त डेटाचे विश्लेषण केल्यावर 34 महाकाय रेडिओ स्त्रोतांचा शोध
-----
संशोधनाचा फायदा काय
- प्रचंड लांबी आणि अतिविशाल आकारामुळे दीर्घिकांच्या उत्क्रांतीतील अंतिम टप्प्याची माहिती मिळेल
- आंतरतारकीय माध्यमाचा (इंटरस्टेलर) अभ्यास शक्य
- विविध तरंगलांबीच्या माध्यमातून भौतिक गुणधर्मांचा शोध घेता येणार
-------------