
आणीबाणीच्या पर्वाला २५ जून २०२३ ला ४८ वर्षे पूर्ण झाली. या काळातील राजकीय नेते, सामाजिक नेतृत्व करणारे आणि त्यांचे अनुयायी या जगात आता बहुतांश नाहीत. त्या काळात तरुण असलेले अनेक जण वेगवेगळ्या पक्षात नेतृत्व करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील एक काळरात्र म्हणून ज्या पर्वाचा उल्लेख करावा लागेल तो काळ म्हणजे हा आणीबाणीचा काळ. २५ जून १९७५ ते २० मार्च १९७७.
पार्श्वभूमी
१९७१मध्ये प्रचंड मताने "गरिबी हटाव" चा नारा देत इंदिरा गांधी सत्तेत आल्या. बांगलादेश निर्मिती आणि पाकिस्तानचा पराभव यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली. त्याच काळात इंदिराजी यांच्या निवडणुकी संदर्भातील खटला अलाहाबाद कोर्टात दाखल झाला होता. तो राज नारायण या इंदिराजी यांच्या विरोधातील उमेदवाराने दाखल केला होता. निवडणुकीतील भ्रष्ट मार्ग अवलंबून त्यांनी निवडणूक जिंकली असा राज नारायण यांचा आरोप होता. गरिबी हटाव नारा देवून सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींना गरिबी तर दूर करता आली नव्हती. परंतु भ्रष्टाचार मात्र वाढत चालला होता. नगरवाला प्रकरण, तुलमोहन राम प्रकरण गाजत होते. त्यातच ललित नारायण मिश्र यांची हत्या झाली. संसदेत असलेले पाशवी बहुमत आणि त्यातून निर्माण झालेली उन्मादक वृत्ती यातून पक्षात न राहिलेला विरोध यामुळे इंदिरा गांधी यांची मानसिक अवस्था ही हुकुमशहासारखी झालीच होती. चंद्रशेखर, मोहन धारिया, रामधन या सारखे तरुण तुर्क आवाज उठवत होते परंतु त्यांचा तो दाबला जात होता. अशातच बिहारमध्ये नवनिर्माण आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. गुजराथमध्ये चिमणभाई पटेल यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले. विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी करायचे मान्य केले. विरोधी पक्ष जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली संघटित झाला. गुजरातमध्ये निवडणुका टाळल्या जात होत्या. मोरारजी देसाई यांच्या उपोषणामुळे निवडणुका घ्याव्या लागल्या ज्यात काँग्रेस पराभूत झाली. अजून त्यात भर म्हणून तो ऐतिहासिक निर्णय जस्टिस जगमोहन सिन्हा यांनी दिला. रायबरेलीत १९७१मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिराजीनी गैरमार्ग अवलंबून भ्रष्टाचार केला हा आरोप मान्य करत त्यांनी त्यामुळे ती निवड रद्द समजावी असा निकाल दिला आणि निवडणूक लढवण्यास इंदिरा गांधींना सहा वर्ष बंदी घातली. खरे तर यात राजीनामा द्यायचा आणि सुप्रीम कोर्टात दाद मागायची हा सरळ सरळ पर्याय समोर असताना त्यांनी राजीनामा न देण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला. अर्थात या मागे इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा असे म्हणणारे देवकांत बारुवा, सिद्धार्थ शंकर रे, बन्सीलाल आणि मुख्य म्हणजे सुपुत्र संजय गांधी होते. इतर ज्येष्ठ नेत्यांना (स्वर्णसिंग, यशवंतराव किंवा जगजीवन राम) धाडस नव्हते. (देशाच्या इतिहासात घटनेची अशी पायमल्ली कधीच झाली नव्हती. जाता येता संविधान बचाव म्हणून बोंब मारणारे आणि त्यांचे राजकीय पूर्वज त्यावेळेस शेपूट घालून बसले होते आणि या उलट ज्यांना देशाच्या घटनेचे हत्यारे असे संबोधले जाते त्याच विचारसरणीच्या लोकांनी आपला जीव आणि आयुष्यपणाला लावून घटना वाचवली हे विसरता कामा नये.)
आणीबाणीची घोषणा आणि वीस कलमी कार्यक्रम
देशभरातील असंतोष आणि हा निकाल यातून हुकुमशाही वृत्तीतून आणीबाणीचा निर्णय त्यांनी घोषित केला. या पार्श्वभूमीवर लोक संघर्ष समितीची स्थापना झाली होती. नानाजी देशमुख त्या समितीचे कार्यवाह होते आणि जयप्रकाशजी अध्यक्ष. आणि काळ रात्र सुरू झाली. आणीबाणी लागू झाली तसे देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेते मंडळींची धरपकड सुरू झाली . त्या पाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. कार्यालये सील झाली. अनेक कार्यकर्त्यांना पकडून डांबण्यात आले. मिसासारखा कायदा मंजूर करण्यात आला. त्या कायद्याने सरकारला विनाचौकशी, विना जामीन कुठल्याही व्यक्तीला तुरुंगात डांबून ठेवण्याचे अधिकार प्राप्त झाले. लाखो देशभक्त संघ कार्यकर्ते, विरोधी पक्षातील ज्येष्ठ मंडळी आणि जिल्हा, तालुका पातळीवर काम करणारे कार्यकर्ते तुरुंगात गेले. वीस कलमी नावाचा एक कार्यक्रम आखला गेला. त्यात लोकसंख्या रोखण्यासाठी नसबंदी हा उपाय दिला गेला. त्या नावाखाली सगळ्या सरकारी कार्यालयांना टार्गेट दिल्याने नागरिकांवर खूप अत्याचार सुरू झाले. लग्न न झालेले तरुण आणि म्हातारे पुरुष सर्वांचीच नसबंदी सुरू झाली. तुर्कमान गेट प्रकरण अजून ही विसरले जाऊ शकत नाही. न्याय व्यवस्था हतबल झाली. संसद मूक झाली. वृत्तपत्र , रेडिओ आणि इतर माध्यमे यावर सेन्सॉरशिप लादली गेली. सरकारला हवे ते, हवे तसे छापायचे, त्यांना हवे ते बोलायचे अशी स्थिती झाली होती. अनेक वेळा स्वाभिमानी वृत्तपत्रांचे अग्रलेख कोरे असायचे. विद्याचरण शुक्ल हे नभोवाणी मंत्री होते. काँग्रसच्या अधिवेशनात किशोर कुमार यांस गाणी म्हणण्यास बोलावले होते त्यांनी नकार दिला त्यानंतर आणिबाणी उठेपर्यंत आकाशवाणी केंद्रावर त्यांची गाणी लावली जात नव्हती. "आंधी" हा गुलजार यांचा सिनेमा. केवळ इंदिरा गांधी यांच्या खासगी जीवनाशी मिळते जुळते कथानक म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली. काळरात्र अधिकच गडद होत चालली होती आणि पहाटेची चिन्ह दिसत नव्हती. सर्वत्र अंधार पसरला होता. आमावस्या एव्हढी दीर्घ कशी? असा प्रश्न पडत होता. स्वातंत्र्य मिळून जेमतेम २८ वर्ष होत नाही तर देश पुन्हा पारतंत्र्यात गेल्यासारखी स्थिती होती. त्यावेळेस तरी राज्यकर्ते परकीय होते पण हे तर आमचेच. ज्यांना जनतेने विश्वासाने प्रचंड मताधिक्याने निवडून दिले ते. पाशवी बहुमत या शब्दाचा अर्थ कळत होता. महाभारतातील हतबल कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य जिकडे तिकडे दिसत होते. भारतमातेचे, लोकशाहीचे वस्त्रहरण रोज लोकशाहीच्या मंदिरात होत होते. राष्ट्रपती आणि न्याय व्यवस्था रबरी स्टॅम्प झाली होती. पांडव वनवासात होते आणि कृष्णाची चाहूल लागत नव्हती. भारतमातेच्या कपाळी फाळणीनंतर पुन्हा एक संकट कोसळले होते. काळ रात्र संपत नव्हती. जयप्रकाश नारायण यांनी अटक होत असताना सूचक वाक्य उच्चारले "विनाशकाले विपरीत बुद्धी".
धरपकड आणि संपर्क यंत्रणा
दुर्योधनाने जमा केलेली चांडाळ चौकडी येथे ही जमली, फक्त नावे बदलली होती. कृती तीच होती. धृतराष्ट्र नव्हते परंतु गांधारी डोळ्यावर पट्टी ओढून बसली कारण सिंहासनाच्या सुखापुढे सगळी मूल्य गळून पडली. आणि संधीकाल सुरू झाला. रात्र आणि पहाट यात एक असा काळ येतो ज्यात अंधकार तर गेलेला नसतो. मात्र त्याची जाण्याची आणि पहाट उगवण्याची चिन्ह मात्र दिसत असतात. तोच तो संधी काळ. संघाने या अन्यायाविरूद्ध रणशिंग फुंकले आणि तो संधी काळ दिसू लागला. भारतीय जनसंघ आणि अभाविप भ्रष्टाचाराच्या विरोधातील जयप्रकाश यांच्या आदोलनात सामील झालेच होते. परंतु लोकशाहीच्या लढ्यासाठी संघाने उतरायचे ठरवले. पू. बाळासाहेब देवरस येरवडा येथे होते त्यांच्याशी संपर्काचे सूत्र ठरवले गेले. संघाच्या कामाचे केंद्र मुंबई ठरले. राजेंद्र सिंह उत्तर, यादवराव जोशी दक्षिण, मोरोपंत पिंगळे पश्चिम आणि भाऊराव देवरस यांनी पूर्व भाग अशी प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली. माधवराव मुळे समन्वय करत होते. एकनाथ रानडे सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करत होते. सत्याग्रह अत्यंत योजना करून ठरले. कोणतेही निरोप शेवटपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था वाटून दिली गेली. देशभरात सत्याग्रह झालेल्या पैकी ७५ टक्के म्हणजे जवळजवळ ८० हजार स्वयंसेवक सत्याग्रहात सहभागी झाले. नानाजी यांस अटक झाल्यावर रवींद्र वर्मा आणि त्यांस अटक झाल्यावर लोक संघर्ष समितीची सूत्रे दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडे आली. क्रांतीच्या गप्पा मारणारे आणि परिवर्तनाच्या वल्गना करणारे सगळे डावे काही अपवाद वगळता गलीतगात्र झाले होते. मराठी बांधवांसाठी रस्त्यावर येऊन आपल्याच अन्य बांधवांची डोकी फोडणारी मंडळीही परिस्थितीला शरण गेली होती. परंतु संघाच्या अनेक प्रचारकांनी भूमिगत होऊन सत्याग्रहाची चळवळ संघटित करण्यास सुरुवात केली होती. इंदिरा गांधी यांना हे अपेक्षित नव्हते. सर्व प्रकारचे निर्बंध आणि दडपशाही असूनही पत्रके छापली जात होती ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी सत्याग्रह होत होते, पत्रके वाटली जात होती. सत्याग्रह केलेल्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांवर अनन्वित अत्याचार होत होते. सत्याग्रह करणाऱ्यांच्या घरी किंवा मिसाबंधुंच्या घरी आर्थिक मदत, घरातील वयोवृद्ध मंडळींची औषधव्यवस्था, प्रसंगी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था, त्यांच्या घरातील शुभ कार्य किंवा घडणाऱ्या दुःखद घटना या सर्व गोष्टी प्रचारक आणि भूमिगत राहून काम करणारे कार्यकर्ते करत होते.
कुटुंबाची भक्कम साथ
सत्याग्रहाची शिक्षा पूर्ण झाल्यावर लगेच अनेकांना मिसामध्ये अटक केली जात होती. परंतु सत्याग्रहाचा ओघ काही थांबत नव्हता ही सरकारच्या दृष्टीने चिंता वाढवणारी गोष्ट ठरत होती. कार्यालये सील होत होती परंतु कार्यकर्त्यांची घरे कार्यालय बनली होती. भूमिगत कार्यकर्ते त्या घरचे भाऊ, मामा, काका बनले होते. जेलमध्ये जाणाऱ्यांना किती वर्ष राहावे लागेल हे माहीत नव्हते कदाचित तुरुंगातच आपला मृत्यु येणार अशी स्थिती होती पण कुणीही माफी मागून जेलमधून बाहेर येण्यास तयार नव्हते. मनोबल उंच होते. जेल हीच प्रशिक्षण केंद्र बनली होती. जेथे अन्य विचारांची मंडळी धीर सोडून नकारात्मक बोलत होते तिथे संघाचा फाटका कार्यकर्ता धीरोदात्तपणे उभा होता. दोन-दोन भाऊ जेलमध्ये असताना तिसरा भाऊ सत्याग्रह करतो आहे, वडील मिसात आहेत आणि एकुलता एक मुलगा सत्याग्रह करतो आहे अशी असंख्य उदाहरणे सर्वत्र दिसत होती. घरात एकही कर्ता पुरुष नसताना स्वाभिमानाने असंख्य उर्मिलारुपी माता-भगिनी संसाराचा गाडा ओढत होत्या. मुलाला , दिराला सत्याग्रह करण्यास प्रोत्साहन देत होत्या आणि माफी मागून आला तर मी कधी माफ करणार नाही असे पतीला सांगणाऱ्या वीरांगना हा लढा यशस्वी करत होत्या.
जेलमध्ये कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम संघाचे अधिकारी करत होते. अन्य संघटना, पक्ष अगदी मुस्लीम समाजाचे नेते मंडळी संघाच्या कार्यकर्त्यांचे धीरोदात्त वागणे बघून प्रभावित होत होते. संघाबद्दल असणारे समज गळून पडत होते. संघ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग जणू भरले होते. अनेक विषयातले तज्ज्ञ वेगवेगळ्या कारागृहात डांबले गेले होते. ते आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा सहकारी कार्यकर्त्यांना करून देत होते. या प्रक्रियेतूनच आज भारतातील विविध पक्षातील नेतृत्वाची फळी उभी राहिली आहे हे येथे लक्षात घ्यावे लागेल. परिणाम दिसू लागले: जसा जसा काळ पुढे जाऊ लागला तसा तसा सरकारकडून संयम सुटायला लागला. अत्याचार वाढले. नांदेडला संजय गांधीच्या उपस्थितीत सत्याग्रह झाल्यावर भास्करराव ब्रह्मनादकर आणि त्यांच्या मित्रांना प्रचंड मारहाण झाली होती. कारण मुख्यमंत्र्याच्या गावात (शंकरराव चव्हाण) हे घडले होते. लाचारी किती असावी? संजय गांधी यांची चप्पल उचलणारे मुख्यमंत्री लोकांनी बघितले. नगर जिल्ह्यात एका मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत असताना मागून संजय गांधी यांनी कोट ओढल्यावर अर्धे वाक्य सोडून भाषण थांबवणारे मुख्यमंत्री सर्वांनी बघितले. महाराष्ट्राचे जाणते राजे, त्यांचे राजकीय गुरू आणि समस्त काँग्रेसजन या राजपुत्राला शरण गेले होते लाचार झाले होते. ( ज्या महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ज्यांनी थेट आग्र्यात जाऊन औरंगजेबाला आव्हान दिले, स्वतःचा जीव धोक्यात घातला पण अपमान सहन केला नाही त्याच महाराष्ट्रातील नेतृत्त्व लाचार आणि मिंधे झालेले बघवत नव्हते.) एकेकाळी लाल, बाल आणि पाल ज्यांनी काँग्रेस ला स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक बनवले होते. त्या काँग्रेसची ही दुरवस्था झाली होती. याविरुद्ध बंड उभारणारे काँग्रेस कार्यकर्ते चंद्रशेखर, मोहन धारिया अशी माणसे पण जेलमध्ये गेली होती. लेखण्या सगळ्या सत्तेपुढे झुकल्या होत्या. कला आणि कलाकार चाकरी करण्यात धन्यता मानत होते.
दुर्गा कडाडली
अशा वेळेस महाराष्ट्रात एक दुर्गा कडाडली आणि ती सगळ्यांनी बघितली आणि ती दुर्गा होती दुर्गा भागवत. निमित्त होते साहित्य संमेलनाचे. यशवंतराव चव्हाण यांच्या उस्थितीमध्ये अध्यक्ष पदावरून दुर्गा भागवत यांनी केलेले ऐतिहासिक भाषण म्हणजे मराठी सारस्वतातील सोनेरी पान ठरले. देशात असे वातावरण पेटत असताना बाहेर पण फ्रेंडस ऑफ इंडिया म्हणून जगातील लोकांना भारतात होत असलेला लोकशाहीचा खून आणि अत्याचार सांगितला जात होता. त्याचे नेतृत्व सुब्रमण्यम स्वामींसारखे विद्वान मंडळी करत होते. केदारनाथ सहानी, वाढता आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारतातील पण सत्याग्रह यातून निवडणूक लढवून लोकांचा पाठिंबा आपल्यालाच आहे हे सिद्ध करू आणि मग पुन्हा आपला मार्ग सुरू करू या कल्पनेतून इंदिरा गांधी यांनी १९ महिन्यांनी निवडणुका घोषित केल्या.
रक्तहीन क्रांती
सुरुवातीला ही निवडणूक आपण सहज जिंकू अशी इंदिराजी कल्पना यांची होती. विस्कटले गेलेले विरोधी पक्ष एकत्र येणे अशक्य हा आडाखा होता. पक्षाचे कार्यकर्ते जेलमधून सुटले होते तरी अन्य सर्व संघटनांचे आणि संघाचे कार्यकर्ते जेलमध्येच होते. विरोधी पक्षाकडून प्रचाराला पैसा आणि कार्यकर्ते दोघेही नाहीत त्यामुळे निवडणूक आपण जिंकणारच असा राजकीय होरा होता. पण जयप्रकाशजी, नानाजी, दत्तोपंत ठेंगडी, संघाचे सरकार्यवाह माधवराव मुळे, आचार्य कृपलानी यांनी प्रयत्न करून सर्व पक्ष एकत्र आणले. जनता पक्ष स्थापन झाला. निवडणुका एकत्र लढवल्या. पहिलीच ऐतिहासिक सभा रामलीला मैदानावर झाली. सभेतील उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गर्दी यांनी इंदिरा आणि चांडाळ चौकडी यांची झोप उडवून दिली. रामलीला मैदानावर अटलजी यांनी काढलेले तीन उद्गार सभेत टाळ्यांचा पाऊस पाडून गेले. "बहुत मुद्दत के बाद मील रहे हैं! " हे त्यातील पहिले वाक्य होते. अटलजी यांचे भाषण आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे सभा ऐतिहासिक ठरली. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सज्जन आणि देशभक्त लोकांना विनाकारण तुरुंगात डांबले आहे याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड क्षोभ होता. आणि तो संघटित केला होता, संघाच्या असंख्य अनामिक स्वयंसेवकांनी. संपूर्ण भारतात विशेषतः उत्तर आणि पश्चिम भारतात इंदिरा गांधी यांच्या विरोधात प्रचंड मोठी सुप्त लाट होती. परंतु सरकारच्या दडपशाहीला भिणारी आणि लाचार मंडळी खरे बोलत नव्हती. बाबू जगजीवनराम यांनी त्यात काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला यामुळे त्यात अधिकच भर पडली. आणि निवडणुकांचे निकाल एकदम धक्कादायक लागले. इंदिरा गांधी आणि संजय गांधीसहित सगळे आणीबाणीचे गुन्हेगार पराभूत झाले. जनता पार्टी पूर्ण बहुमताने सत्तेत आली. स्वातंत्र्या नंतर प्रथमच गैरकाँग्रेस सरकार केंद्रस्थानी आले. सगळ्या मिसा बंधूंची सुटका झाली. देशद्रोही म्हणून तुरुंगात अटकेत पडलेले स्वातंत्र्ययोद्धे म्हणून बाहेर आले. सगळीकडे त्यांच्या मिरवणुका काढून समाजाने स्वागत केले.
इतिहासाचा धडा
हा सगळा इतिहास झाला. पण यात देशाने काय मिळवले काय गमावले? का ह्या आठवणी पुन्हा काढायच्या? एव्हढ्या ४५ वर्षापूर्वी च्या घटनेचे महत्त्व काय? हे आठवणे अशासाठी गरजेचे आहे कारण इतिहास विसरल्यामुळे आमच्या देशाने खूप भोगले आहे. इतिहास विसरलो म्हणून पारतंत्र्यात गेलो. इतिहास विसरलो म्हणून इस्लामी राजवटीखाली आम्ही अत्याचार सहन करत राहिलो. इतिहास विसरलो म्हणून आम्हाला आमच्या देशाची फाळणी पहावी लागली. इतिहास विसरलो म्हणून पुन्हा काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवादाने डोके वर काढले. घराणेशाही, व्यक्तिवादी राजकारण, सामूहिक निर्णयाचा अभाव आणि विचार आचार यात भारतीय मूल्यांचा अभाव ही स्वातंत्र्यानंतर आम्हाला राजकारण्यांनी दिलेली देणगी होती. त्यातूनच भ्रष्टाचार आणि एकाधिकारशाही वृत्ती वाढीला लागली आणि यातूनच आणीबाणीचा जन्म झाला. त्या वेळेस काँग्रेस पक्षात एकही जण असा नव्हता जो या हुकुमशाही वृत्तीला विरोध करेल. आज दुर्दैवाने काँग्रेसजन हे विसरल्यामुळे काँग्रेस आणि एकूणच सगळे राजकीय पक्ष एका घरासाठी जन्माला आल्यासारखे झाले आहेत. जाहीरनाम्यात काही पण लिहिले तरी अलिखित धोरण कुणाला तरी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान करण्यासाठी हे पक्ष जन्म घेतात आणि आणीबाणी सारखा इतिहास माहीत नसल्यामुळे किंवा विसरल्यामुळे पुन्हा पुन्हा ती चूक लोक करत राहतात. आपल्याला मिळालेले पहिले स्वातंत्र्य आणि त्याला लागलेले ग्रहण दूर करत मिळालेले दुसरे स्वातंत्र्य दोन्ही खूप किंमत देऊन मिळाले आहेत. स्वातंत्र्याचा इतिहास काही प्रमाणात का होईना पाठ्यपुस्तकात शब्दबद्ध आहे. परंतु आणीबाणीचा इतिहास आजच्या पिढ्यांना खूप कमी माहिती आहे. आणीबाणीच्या लढ्यात असंख्य लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांचे आर्थिक कंबरडे असे मोडले की परत उभे राहणे मुश्किल झाले. केवळ मला नगर जिल्ह्यातील माहीत असल्यामुळे कोपरगाव येथील बडदे घरातील तीन कर्ते मुले जेलमध्ये गेले. पुणंताब्यात चार वहाडणे जेलमध्ये गेले. नेवासा येथील तीन नळकांडे जेल मध्ये गेले. अशी उदाहरणं माहीत आहेत. पण देशभरात ही उदाहरणे होती. शेती दोन वर्ष पडीक झाली अशी असंख्य उदाहरणे देशभरात होती. काहींचे मेडिकल दुकान बंद झाले ते २० महिन्यांनी उघडले सगळी औषधं एक्स्पायर झाल्यावर. काहींचे दवाखाने, काहींचे हॉस्पिटल बंद पडले. (मराठवाड्यात रुग्ण सेवा द्यावी म्हणून सुवर्णपदक मिळालेले माननीय अशोकराव कुकडे काका यांना पण मिसा कायद्याखाली जेलमध्ये जावे लागले ज्यांना अलीकडे पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि भूकंप ग्रस्तांच्या कामापोटी फाय फाऊंडेशनने गौरवले) अनेकांच्या खासगी नोकऱ्या गेल्या. काहींनी सत्याग्रह करायचे म्हणून नोकरीचे राजीनामें दिले. काहींना आयुष्यभरासाठी आजार पाठीमागे लागले. जॉर्ज फर्नंडिस सारख्या माणसावर बडोदा डायनामेट या घटनेच्या आरोपावरून जवळजवळ फाशी देण्याचीच तयारी सुरू होती. भूमिगत कार्यकर्ते जे होते ते संघाचे प्रचारक होते. अनेक वेळा उपासमार. अनेक वेळा रात्री अपरात्री मिळेल त्या साधनाने प्रवास. अनेक वेळा आजाराकडे दुर्लक्ष करत अंगावर काढणे. अनेक मंडळींना कायमचे आजार पाठीमागे लागले. काहीजण यात गेले. पू. बाळासाहेब देवरस यांना जेलमधून बाहेर आल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही जेलमध्ये असताना हा लढा यशस्वी होईल याची तुम्हाला खात्री होती का? तुम्ही हे कसे साधले? पू. बाळासाहेब म्हणाले अहो एक सरसंघचालक जेलमध्ये होता, परंतु बाहेर असंख्य सरसंघचालक भूमिगत होऊन काम करत होते. त्यांनी निर्देश केलेल्यांपैकी एक म्हणजे माधवराव मुळे. माधवराव हे फाळणीच्या वेळेस तेथील हिंदू समाजासाठी कार्य करत होते आणि नंतर आणीबाणीत लोकसंघर्ष समिती, सत्याग्रह, निवडणुकीत जनता पक्ष म्हणून निर्मिती या सर्व प्रक्रियेचे सूत्रधार होते. विदेशात इंडिया फॉर डेमोक्रसी, फ्रेंडस ऑफ इंडिया या संघटना स्थापन करण्याची प्रेरणा त्यांची. केदारनाथ सहानी, मकरंद देसाई आणि सुब्रमण्यम स्वामी यांना लक्ष्मणराव भिडे यांच्याशी जोडून देत विदेशातून लोकशाहीसाठी केंद्र सरकारवर दडपण आणण्याचे काम भारतात राहून माधवराव यांनी केले. (येथे हे लक्षात ठेवावे लागेल आजसारखी आधुनिक साधने त्यावेळेस नव्हती) प्रकृतीची तमा न बाळगता त्यांनी काम केले. शेवटी एकदा डॉक्टरांनी बळेच १५ दिवस त्यांना विश्रांती घ्यायला लावली. मातृभूमी संकटात असताना मी कसा झोपून राहू शकतो? हे त्यांचे उद्गार होते. त्यावेळेस ते संघाचे सरकार्यवाह होते. आणीबाणीतील दगदग सहन न झाल्याने त्यांनी निवडणूक निकाल लागल्यावर आणि बंदी उठल्यावर राजेंद्रसिंह यांच्याकडे जबाबदारी सोपवली. त्यानंतर वर्षभरातच त्यांचे निधन झाले. जणू त्यांनी बाजीप्रभूसारखी खिंड लढवण्याची प्रतिज्ञा केली होती. या इतिहासाची आठवण यासाठी ठेवायची, कारण ज्यांनी देशावर दुसरे पारतंत्र्य आणले, ज्यांनी या सगळ्या काळात मूक साक्षीदार होणे पसंत केले, अशांचे राजकीय किंवा पुढील पिढ्यांतील वारसदार निर्लज्जपणे संघावर टीका करताना संघाने स्वातंत्र्य लढ्यात काय केले हा प्रश्न विचारतात. घटनेची, संविधानाची मोडतोड करणारे आणि हे होत असताना त्यांच्या मांडीला मांडीला लावून बसणारे संघाला (ज्याने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचा बळी देवून संविधान वाचवले त्या संघटनेला) संविधानाचे मारेकरी ठरवतात. पुरस्कार वापसी गॅंगचे पूर्वज याच घटनाद्रोही कृत्याच्या वेळेस आणि त्या वेळेस झालेल्या मॉब लिन्चिंग बाबतीत मूग गिळून बसले होते आणि आज हे जुन्या घटना सोयीस्करपणे विसरत आहेत. विचार स्वातंत्र्याच्या नावाने टाहो फोडणारे कला क्षेत्रातील पुरोगामी त्या वेळेस प्राण, किशोरकुमार किंवा देव आनंद यांच्यावरचा अन्याय विसरतात अहो एव्हढेच काय गुलजार स्वतः आंधी वरील बंदी विसरतात. पू. बाळासाहेब म्हणाले होते ‘विसरा आणि क्षमा करा’ कारण हीच प्राकृत अवस्था आहे. प्रतिशोध कधी सकारात्मक नसतो त्यामुळे संघनेतृत्व आणि स्वयंसेवक त्यानंतर लगेच स्वतःला रचनात्मक कामात गुंतून आपले भारतमातेप्रती कर्तव्य करण्यास लागले पणं ते संघटना आणि व्यक्ती म्हणून जरी विसरले तरी समाज म्हणून आम्ही हा इतिहास विसरणे म्हणजे खूप मोठी चूक ठरेल कारण इतिहास हा चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लक्षात ठेवायचा असतो. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी लक्षात ठेवायचा असतो. दुर्दैवाने आमच्याकडे इतिहास हा सत्याची मोडतोड करूनच मांडण्याची परंपरा निर्माण झाली. त्यामुळे अर्वाचीन असो किंवा प्राचीन, मध्य युगातला असो किंवा आधुनिक, आम्ही आमच्या पिढ्यांना खरा इतिहास कधी सांगितला नाही. आम्ही इतिहास हा व्यक्तीप्रेम किंवा व्यक्तीद्वेष या आधारावर लिहिला. नायक नक्की केले आणि खलनायकही.आणि मग इतिहासाची पटकथा बनली. इतिहास हा कधीच पटकथा नसतो हे ज्या समाजाला समजते तो समाज त्यातून शिकतो आणि उत्कर्ष पावतो. जपान, जर्मनी, इस्राईल यांस ते समजले ते उत्कर्ष पावले. आज या आठवणी मांडताना देशातील व्यक्तिवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार याच्याविरोधात लोकशाहीची मूल्ये ही जाती आणि प्रांत या पलीकडे जाऊन जपण्याची गरज आहे. तरच लोकशाहीची जी मूल्ये आमच्या परंपरा आणि संस्कृतीने आम्हाला दिली आणि पू. बाबासाहेबांनी आधुनिक रुपात संविधानाच्या रुपात स्थापित केली ती मूल्ये टिकतील. आणीबाणीच्या कटू आठवणी एव्हढ्याच करता काढायच्या. या ऐतिहासिक लढ्यातील सर्व ज्ञात नेत्यांना आणि अज्ञात, अनामिक वीरांना भावपूर्ण आदरांजली.
===