•  02 Aug 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

प्रमिलाताई मेढे : महिला सक्षमीकरणाचा नंदादीप

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 2 days ago
भाष्य  

प्रमिलाताई मेढे : महिला सक्षमीकरणाचा नंदादीप 

संस्कार, कडक शिस्त, असीम वात्सल्य आणि राष्ट्रकार्यासाठी निरपेक्ष समर्पण यांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे राष्ट्र सेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे. आपल्या जीवनकार्याने हजारो सेविकांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या प्रमिला मावशींच्या निधनाने समिती परिवारातील एक तेजोमय दीप शांत झाला आहे. आयुष्याचा प्रत्येक श्वास राष्ट्राय स्वाहा करत, वयाच्या ९७ व्या वर्षापर्यंत तत्त्वनिष्ठ राहिलेल्या या महान 'मातृछाये'च्या प्रेरक स्मृती आणि जीवनपटाचा घेतलेला हा मागोवा....

३१ जुलै २०२५ ची सकाळ आम्हा सर्व सेविकांसाठी मातृछाया हरपल्याची जाणीव करून देणारी ठरली. राष्ट्र सेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे (वय ९७) यांचे नागपूर येथील समितीच्या धंतोली परिसरातील देवी अहिल्या मंदिर कार्यालयात सकाळी ९:०५ वाजता निधन झाले आणि एका ध्येयासाठी सतत तेवणारा तेजोमय दीप शांत झाला.

समितीच्या संस्थापिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर (मावशी) यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. वंदनीय मावशींसोबत काम करणाऱ्या काही सेविकारूपी मोत्यांच्या अखंड प्रयत्नांमुळेच समितीचा वटवृक्ष आज सर्वदूर विस्तारलेला दिसतो. त्या मौक्तिक माळेतील एक मोती निखळला.

मूळ नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे बालपण व्यतीत केलेल्या प्रमिला मावशी शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्ताने नागपूर येथे आल्या आणि कायमच्या नागपूरच्याच झाल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नागपूरमध्ये शिक्षिका म्हणून आणि नंतर सरकारी नोकरीत वरिष्ठ अंकेक्षक (Senior Auditor) म्हणूनही काम केले. मात्र, समितीच्या कार्यासाठी त्यांनी १२ वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि स्वतःला पूर्णपणे संघटनेच्या कार्यासाठी वाहून घेतले. १९५० ते १९६४ पर्यंत त्या विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका होत्या.  

काही वर्षे DAGPT मधील नोकरी सांभाळत त्या वं. मावशींसोबत समितीचे काम करत होत्या. सन १९६५ मध्ये त्या नागपुरातील अहिल्या मंदिर या समितीच्या कार्यालयात वास्तव्यास आल्या, त्या शेवटच्या श्वासापर्यंत... म्हणजे तब्बल ६ दशके त्या अहिल्या मंदिरात होत्या. देवी अहिल्या यांच्या नावाने असलेली ही वास्तू पुण्यवान होतीच, त्यात प्रमिला मावशींच्या कार्यसमिधेतून ही वास्तू अधिक पुनीत झाली. स्वेच्छानिवृत्ती घेऊन समितीकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या प्रमिला मावशींचा जीवनपट डोळ्यांसमोर येताना बा. भ. बोरकर यांची कविता आठवते –  

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे,
गोरटे की सावळे ते मोल नाही फारसे...

उंच, सडपातळ बांधा असलेल्या प्रमिला मावशी शिस्तीच्या अतिशय कडक आणि वक्तशीर असल्या, तरी मनाने अतिशय निर्मळ व प्रेमळ होत्या. जळगावच्या ज्येष्ठ सेविका हेमाताई लिमये यांनी सन १९६७ सालापासूनच्या आठवणी उजागर करताना त्यांच्या कडक शिस्तीचे अनेक किस्से सांगितले. त्या सांगत होत्या— एकदा 'संख्या अग्रेसरिका' म्हणून संख्या सांगायला जाताना कमरेला खोचलेला पदर चुकून निसटला; तेव्हा काहीही न बोलता केवळ नजरेतून प्रमिला मावशींनी चूक लक्षात आणून दिली आणि 'शिस्तीत तडजोड (compromise) नाही' ही शिकवण दिली. कितीही मोठा प्रवास करून थकून आलेल्या असल्या, तरी पहाटे पाच वाजता उठून सर्व आवराआवर करण्याची त्यांची शिस्त कधीही मोडली नाही. अगदी शेवटच्या काही दिवसांपर्यंत त्यांची वक्तशीर दिनचर्या सुरू होती. स्वतःची नऊवारी साडी त्या स्वतः धुवत असत; ती नऊवारी साडी कोणत्याही सुरकुत्या न पडता वाळत घालण्यातील व्यवस्थितपणाही आम्हा सेविकांना नकळत खूप काही शिकवून जात असे.

कडक शिस्तीच्या मावशी मनाने मात्र नारळासारख्या होत्या. त्यांच्या मधुर व निर्मळ वाणीतील संवाद अनेकांना आधार देत असत. योगिनीताई टिळक सांगतात, "मातृत्वाची अनुभूती घेत असताना आलेल्या कटू अनुभवात, स्वतः सांसारिक जीवन अनुभवले नसतानाही एका आईचे मन ओळखून केलेल्या मावशींच्या प्रेमळ व प्रांजळ संवादानेच मला सावरले."

तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा,
ओळिती दुःखे जनांच्या सांडीती नेत्रप्रभा...

सेविकांच्या मनातील भावना जाणून घेऊन मायेचा हात फिरवत सेविकांचे मनोबल वाढवणाऱ्या मावशी अनेकांनी पाहिल्या. संघटनेच्या कामासाठी त्यांनी पायाला जणू भिंगरीच लावली होती. सतत प्रवास करत असताना सोबत कायम समितीचे साहित्य भरलेल्या पिशव्या असत. प्रवासात येता-जाता शक्य त्या रेल्वे स्थानकावर काही मिनिटांसाठी का असेना, त्या सेविकांना भेटत असत. लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेकदा जळगाव, भुसावळ मध्यवर्ती असल्याने रेल्वे स्थानकात डबे द्यायला आम्ही जात असू. जळगाव स्थानकात तर केवळ दोन मिनिटे गाडीला थांबा होता, परंतु त्या वेळातही वयाच्या ७५ व्या वर्षी रेल्वेच्या दारात उभे राहून त्या सेविकांशी संवाद साधत आणि न विसरता हातावर काही ना काही खाऊ देत असत. त्या थोड्या अवधीत मावशींशी झालेला संवाद अत्यंत प्रेरणादायी ठरत असे. प्रत्येक भेटीतून पुन्हा पुन्हा भेटीची ओढ वाढत असे.

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे,
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे...

२००३ मध्ये समितीच्या 'प्रमुख कार्यवाहिका' पदाची जबाबदारी असताना वंदनीय मावशी जन्मशताब्दी वर्षात त्यांनी २६६ दिवसांची 'भारत परिक्रमा' केली; ज्यामध्ये त्यांनी सुमारे २८ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्त्रीशक्तीचे संघटन मजबूत केले. या प्रवासात अनेक सेविकांना त्या सोबत घेत असत. सेविकांना जपत कार्यकर्ता घडवण्याची व निर्माण करण्याची त्यांची धडपड यातून दिसत असे. त्यांच्या प्रेरणेतून आज अनेक सेविका आपल्या कार्यसमिधा समितीकार्यात अर्पण करत आहेत.

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती,
वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती...

भारताला परमवैभवाला नेण्यासाठी आवश्यक ते सर्व केले पाहिजे, असा विचार मांडताना देश-विदेशात काय घडत आहे याविषयी त्या कायम सजग असत. इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे वाचणे हा त्यांच्या दिनचर्येचा एक भाग होता. प्रमिला मावशींचे मराठीबरोबरच संस्कृत व इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होते. त्यांचे विचार आणि वक्तृत्व अनेकांना प्रभावित करत असे. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही नऊवारी साडीतील त्यांची सडपातळ मूर्ती, त्यांचे ज्ञान, बोलण्याची पद्धत आणि वक्तृत्व यामुळे सर्वजण आकर्षित होत असत. यामुळेच की काय, त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिकेतील 'न्यू जर्सी' शहराच्या महापौरांनी त्यांना 'मानद नागरिकत्व' बहाल केले होते. जानेवारी २०२० मध्ये 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा'ने (SNDT) त्यांच्या जीवनकार्याच्या गौरवार्थ 'डी.लिट.' (D.Litt.) ही मानद पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.

समितीच्या वंदनीय चतुर्थ प्रमुख संचालिका असताना त्यांनी विविध विषयांवर केलेले उद्बोधन म्हणजे जणू देवी सरस्वतीच्या मुखातून प्रकट होणारे ज्ञान असे. अनेक विषयांवरील त्यांचा अभ्यास आणि चिंतन त्यांच्या प्रत्येक वक्तव्यातून दिसून येत असे. त्यांनी कायम स्वतःला (Update) अद्ययावत ठेवले. मोबाईल, इंटरनेट यांसह व्हॉट्सॲपसारखे नवीन ॲप्सही त्यांनी शिकून घेतले होते. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्या व्हॉट्सॲपवरील स्टेटस पाहून आशीर्वादपर संदेश पाठवत असत.

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके,
चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे...

आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास संघटनेच्या वृद्धीसाठी देणाऱ्या मावशी प्रमुख संचालिका दायित्वातून मुक्त झाल्यानंतरही कायम कार्यरत होत्या. सेविकांशी असणारा संपर्क त्यांनी कधीही कमी होऊ दिला नाही. मातृत्वाने भरलेले त्यांचे काळीज कायम आपल्या सेविकांचा विचार करत असे. आमच्या लग्नात मावशींनी आठवणीने पत्र पाठवले होते; ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते— "गृहस्थाश्रम अर्थात कर्तव्यपूर्ण जीवन". त्यांनी पाठवलेले ते पत्र आम्ही दोघेही अधूनमधून जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा वाचत असतो. गृहस्थजीवन कसे जगावे, याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या पत्ररूपी आशीर्वादातून आम्हाला दिला.

शांत, संयत, निस्वार्थी व राष्ट्रकार्यासाठी जीवन जगलेल्या प्रमिला मावशींनी आपल्या शेवटच्या पत्रातून "माझे कुठेही फोटो लावू नका" असे सांगताना "राष्ट्राय स्वाहा इदं न मम" चाच संदेश दिला आहे. "राष्ट्रासाठी झिजले कणकण तेच खरोखर विजयी जीवन" या काव्यपंक्तींनुसार त्यांचे जीवनकार्य प्रत्येक सेविकेला कायम प्रेरणा देत राहील यात शंका नाही.

पुन्हा बा. भ. बोरकर यांचीच कविता आठवते –

नाहीं चिरा नाहीं पणती, तेथें कर माझे जुळती
दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथें कर माझे जुळती...

– अपर्णा महाशब्दे-पाटील
9823766644
(लेखिका राष्ट्र सेविका समितिच्या कार्यकर्त्या आहेत.)


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • महिला सक्षमीकरणाचा नंदादीप
  • प्रमिलाताई मेढे
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (178), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (87), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.