
गेल्यावर्षी गेल्यावर्षी पौष शुद्ध द्वादशी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीला अयोध्येत श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त.
समरसतेचा आदर्श प्रभू श्रीराम
आपल्या सर्वांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी खंडप्राय असा देश जोडण्याचे व या देशातल्या व्यक्ती-व्यक्तींना जोडण्याचे काम केले आहे. प्रभू रामचंद्रांना वनवासाचा भाग म्हणून तसेच सीतामाईच्या शोधासाठी उत्तर-दक्षिण असा प्रवास करावा लागला. या प्रवासामुळे संपूर्ण देश जोडला गेला, तो त्याकाळीही जोडला गेला व आजही प्रभुरामचंद्रांची अस्मिता मनात बाळगून लोकांनी तो तसाच जोडलेला ठेवला आहे. राम कुठे - कुठे राहिले म्हणून, कुठे कुठे फिरले म्हणून, कुठे ते विसावले म्हणून, कुठे ते लढले म्हणून, कुठे ते जेवले म्हणून, कुठे ते थांबले म्हणून, कुठे ते पहुडले म्हणून, कुठे त्यांनी मंदिर स्थापले तर कुठे त्यांनी कोणाचा उद्धार केला म्हणून या देशातील उत्तर ते दक्षिण या प्रदेशातील असंख्य ठिकाणे आजही रामाच्या नावाने जपली जातात, पवित्र मानून त्या भूमीचा अभिमान बाळगला जातो, म्हणजेच एका अर्थाने प्रभू रामचंद्रांनी या पद्धतीने उत्तर-दक्षिण असा देश जोडण्याचे काम केले आहे.
प्रभू रामरायामुळे जसा हा देश जोडला गेला, त्याच प्रमाणे प्रभू रामरायाच्या आचार - विचारातून त्याकाळात जी माणसे जोडली गेली, त्यातूनही आजही आपण राम हा समरसतेचा आदर्श म्हणून त्याचा उपयोग करून समाजाला जोडू शकतो, किंबहुना जोडत आलो आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या राज्यातील, तसेच वनवासात असताना अथवा सीतामाईचा शोध घेण्यास जात असताना ज्या - ज्या लोकांशी आत्मीयतेचा, प्रेमाचा व्यवहार केला ती सर्व मंडळी रामाबरोबर एकमेकांशीदेखील जोडली गेली. आपण पुराणकाळातील अनेक उदाहरणे पाहू शकतो. शबरी मातेच्या हातून बोरे खाण्याचा प्रसंग असो अथवा राजा निषादबरोबर वनात राहण्याचा अथवा फिरण्याचा प्रसंग असो, यातून वनवासी बांधवांना राम आपला वाटतो तर सुग्रीव, हनुमान व एकूणच वानरसेनेबरोबरचा श्रीरामाचा लोभ पाहता प्रभू रामराय यांनी मनुष्य व प्राणी असा देखील भेद केल्याचे दिसून येत नाही. प्रभू रामचंद्रांना करुणाराम किंवा करूणाराघव या नावाने देखील त्यामुळेच ओळखले जात असावे. प्रभू रामचंद्रांनी व्यक्ती - व्यक्तीला कसे जोडून ठेवले होते याचा आजच्या कालखंडात विचार केला तर असे लक्षात येते, की आजही समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील प्रत्येक जातीला प्रभू रामचंद्र हा पुराणातील कोणत्यातरी प्रसंगातून आपलाच आहे असे वाटते. मग या जाती सर्वसाधारण प्रवर्गातील असो, भटक्या - विमुक्त असो, गिरीकंदरात राहणाऱ्या वनवासी असोत अथवा वंचित वर्गातल्या असो. या सर्वांनाच राम आपला वाटतो व राम या एकाच धाग्याने या सर्व जाती एकमेकांशी बांधल्या गेल्या आहेत, म्हणूनच त्या अजूनही स्वतःला हिंदु मानत आहेत. वेगवेगळ्या स्तरातील या सर्वच जातींनी प्रभू रामरायांना आदर्श मानले आहे. प्रभू रामरायाशी नाते जोडून अनेक जाती आजही वेगवेगळ्या परंपरा सांभाळताना दिसून येतात, उदाहरणच द्यायचे झाले तर आपण हनुमानाच्या कुळातील आहोत असे समजून सुवर्ण मृगाच्या कातड्यापासून चोळी बनविण्याच्या मोहातून सीतामाई व प्रभू रामचंद्रांना त्रास सहन करावा लागला याची खंत बाळगून वडार समाजातील स्त्रिया अंगावर चोळी घालत नसत. परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये आता या गोष्टी त्या जातीमध्ये दिसून येत नाहीत. परंतु त्यांची प्रभू रामरायावरील निष्ठा या कृतीतून दिसून येते. अशा अनेक गोष्टी प्रभू रामरायाशी नाते सांगून अनेक जातींमध्ये केल्या जातात, म्हणूनच या भूमीमध्ये सर्वांना जोडणारा प्रभू रामराया हा एक आदर्श आहे व समरसतेचा मानबिंदू आहे.
प्रभू रामरायाला विष्णूचा अवतार मानले जाते परंतु अशा रामरायांनी श्रीलंकेवर हल्ला करण्यापूर्वी दक्षिणेत समुद्र किनारी म्हणजेच सध्याच्या रामेश्वर या ठिकाणी शिवाची उपासना करून शिवलिंगाची स्थापना केली, म्हणजेच वैष्णव व शैव हे वेगळे नसल्याचा देखील संदेशच रामरायांनी दिला आहे. आज लिंगायत हा वेगळा धर्म असल्याचे मानणाऱ्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा आहे.
अनेकदा आपण राम राज्य आलं पाहिजे असं म्हणतो, याचाच दुसरा अर्थ असा, की ज्या राज्यात सर्वजण भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहात आहेत व या राज्यामध्ये विषमतामुक्त, शोषणमुक्त, एकरस व समतायुक्त समाजाची निर्मिती झाली आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या राज्यात या पद्धतीच्या समाजाची निर्मिती आपल्या आचरणातून व कर्तव्य पालनातून केली होती, म्हणूनच असा समरस समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला परत परत रामराज्याची आठवण येते, म्हणूनच प्रभू रामचंद्र हा समरसतेचा महान असा आदर्श आहे. अशा प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवरील भव्य राममंदिराच्या निर्माणानंतर भारतामध्ये समरस समाज निर्माण होऊन खऱ्या अर्थाने राष्ट्र मंदिराची उभारणी होईल असा विश्वास वाटतो.
डॉ. सचिन वसंतराव लादे
( लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)