उपासना नारीशक्तीची
‘आनंदवेडी ‘निसर्गकन्या’ किरण झंवर
मन प्रसन्न, सकस, प्रवाही, दिशांत बंधन नाही,
क्षमता स्वप्नांना गाठी, क्षितिजाला अंतच नाही.
घर-निसर्ग साथ सर्वदा, तू नित्य सजग सेवेला,
तू समर्पित सर्वांगी, आत्मीय प्रकल्प शिगेला.
या कवितेच्या ओळी वाचल्यानंतर ज्यांची आठवण येते त्या सौ. किरण महेश झंवर. खरंच, मनाच्या प्रसन्नतेला सकारात्मकतेची जोड दिली की आयुष्य किती सुंदर करता येते याचे त्या चालते बोलते उदाहरण आहेत.
किरण ताई बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) आहेत लग्नानंतर राहिलेले शिक्षण त्यांनी पूर्ण केले हे कौतुकास्पदच आहे. त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांच्यातील कलांना वाव देऊन त्या शिक्षण देत आहेत. शिवाय, स्वतःही आपल्या कला जपत गेल्या आणि समाजासाठी काहीतरी करावे याच आवडीने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेशी जोडल्या गेल्या. शंभर पुस्तकांची पेटी घेऊन संगमनेरमधून नाशिकला येतात. सर्वांना वाचन करता यावे, आपली वाचन संस्कृती वाढावी, हा ताईंचा उद्देश आहे. हे करत असतानाच, वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन पुस्तके उपलब्ध करणे, वेगवेगळ्या लेखकांशी संवाद साधणे अशा प्रकारे वाचन मंडळात मैत्रिणींच्या मदतीने त्यांनी पुढाकार घेतला आहे.
त्याशिवाय ताईंना ट्रेकिंगची आवड आहे, जी त्यांनी जोपासली आहे (अनेकांना बरोबर घेऊन). गोवा आणि नैनीताल येथे त्यांनी सायकलिंगचा प्रकल्प केला. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निसर्ग जोपासण्याची आवड असल्यामुळे प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याकडे त्या लक्ष देतात. ओला कचरा, पालापाचोळा याचे विघटन करून खतनिर्मिती प्रकल्प स्वतःबरोबर गावाकडून करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. त्यासाठी निर्मळ ग्रुप बनवून सहकाऱ्यांच्या मदतीने त्या जोमाने काम करतात. ‘कचऱ्यातून नंदनवन’ या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने देऊन समाजप्रबोधनाचे काम करतात. याशिवाय मंदिरातील निर्माल्याचे खत बनवणे असे त्यांचे आवडते छंद आहेत, नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे.
याशिवाय सतत शिकण्याची धडपड असल्याने त्यांनी एम.ए. (सायकॉलॉजी) केले. त्याशिवाय Naturopathy (पुष्पौषधी) या गोष्टी आत्मसात केल्या. त्यांना निसर्गकन्या म्हणणे योग्यच ठरेल. विशेष म्हणजे संगमनेर नगरपालिकेनेही खतनिर्मिती प्रकल्पासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यासाठी संगमनेरमधील सामाजिक संस्था व नगरपालिकेने पुरस्कार देऊन किरणताईंना सन्मानित केले. झी युवा चॅनल आणि दैनिक ‘जागर’, ‘लोकमत’ ने त्यांच्या कामाची दाखल घेतली आहे. ताई स्वतःला आनंदवेडी म्हणतात, कारण त्या लोकांना आनंद देतात आणि स्वतःही आनंदी राहतात.अशा दुर्गेला वंदन.
मंजिरी मेहेंदळे