•  01 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

सामाजिक जाणिवेची भाऊबीज.....

स्मिता कुलकर्णी 11 days ago
भाष्य  

सामाजिक जाणिवेची भाऊबीज.....

दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे सायं ५.३० वा भाऊबीज निधी समर्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते होत आहे. त्या निमिताने ‘भाऊबीज निधी’ संकल्पनेचा इतिहास व ओळख या लेखाद्वारे करून देत आहोत.   

भाऊ-बहिणीचे नाते हे स्नेहपूर्ण व एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा अधिकार सांगणारे असे असते. या नात्याचा उत्सव, घराघरातून भाऊबीजेच्या दिवशी केला जातो, या सणाचे निमित्त साधत कुणी सामाजिक उपक्रम म्हणून; एखाद्या ध्येयसाधक संस्थेची आर्थिक गरज पूर्ण करेल असा विचार बारा दशकांपूर्वी कोणाच्या मनातही आला नसेल. परंतु हे नाविन्यपूर्ण व कल्पकतेला सांस्कृतिक साज चढवित दृष्टेपण दाखविले ते श्री.गोपाल महादेव उर्फ बापूसाहेब चिपळूणकरांनी. बापूसाहेब हे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांचे एक कार्यनिष्ठ व जवळचे सहकारी. 

महर्षि अण्णांनी अनाथ बालिकां-विधवांसाठी हिंगणे-पुणे येथे सुरु केलेल्या संस्थेतील मुलींचे संगोपन व शिक्षणाकरीता लागणारा दैनंदिन खर्च खूप मोठा होता. अण्णांच्या कार्याचा परिचय सर्वदूर पोहचल्यामुळे, संस्थेत दाखल होणार्या मुलींची संख्या ही वाढत होती. मात्र यामुळे, वाढता आर्थिक भार पेलणे हे एक मोठे आव्हान संस्थेसमोर उभे ठाकले होते. संस्थात्मक कार्य उभे राहत असताना, ते निरंतर व योग्य त्या गतीने सुरु राहण्याकरिता तसेच संस्थेच्या मुलभूत गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने भक्कम व सातत्यपूर्ण आर्थिक स्रोत असणे महत्त्वाचे असते. तसेच प्रासंगिक खर्चाची तरतूद करून ठेवणे हे देखील संस्थात्मक कार्यातील एक महत्त्वाची बाब असते. समविचारी कार्यकर्त्यांना जोडणे व संस्थेच्या आर्थिक गरजा भागविणे या दोन्ही गोष्टींचा योग्य तोल ही संस्थेस सांभाळावा लागतो. स्त्री-शिक्षणाचे कार्य उभे करीत असताना अण्णांना या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने काम करावे लागत होते. या कार्याची महती व गरज जाणून, अनेक सेवाव्रती कार्यकर्ते त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांना लाभले. पत्नी सौ.आनंदीबाई, मेहुणी श्रीमती पार्वतीबाई आठवले, या कुटुंबातील सदस्यांसह अनेक समविचारी सहकारी, त्यांच्या या कार्यातील महत्त्वाचे सहप्रवासी होते. त्यांच्या या सर्व सहकार्यांनी संस्थेतील अन्य कामांसह आश्रमाकरीता निधी गोळा करण्याचे देखील काम अथकपणे अगदी प्रसंगी परदेशात प्रवास करूनही आयुष्यभर केले.

भाऊ-बहिणीच्या या नात्यांतील स्नेहाचा ओलावा जपत, अत्यंत सन्मानपूर्वकरीत्या निधी संकलित करण्याचा वेगळेपणा; महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेने तब्बल १०० हून अधिक वर्ष, अगणित कुटुंबांच्या सहभागातून करून दाखविला आहे. या उपक्रमाचे शताब्दी वर्ष सन २०२० साली साजरे करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या सामाजिक जाणिवेच्या भाऊबीजेचा, आजपर्यंतचा प्रवास ही अत्यंत कौतुकाचा व अनेकदा समाधानाने डोळे व मन भरून येणारा ठरला आहे.

बापूसाहेबांनी प्रथम हा प्रयोग १९१९ साली केला. आश्रमातील मुलींनी दिवाळीच्या सुट्टीत घरी गेल्यावर, गावातील लोकांना संस्थेच्या कार्याविषयी माहिती द्यायची व आश्रमातील मुलींकरीता 'भाऊबीज' गोळा करायची अशी संकल्पना मांडली. संस्थेस दैनंदिन व्यवहार व्यवस्थितपणे चालण्यासाठी निधीचे अखंड पाठबळ लागते. हे काम अधिक लोकांकडून विस्तृत प्रदेशात व कमी काळात होणे गरजेचे होते. काळ कमी असल्याने स्वयंसेवकांचा उत्साह टिकून राहील व उत्साही वातावरणात लोकांनाही पैसे देणे जड जाणार नाही हा विचार प्रामुख्याने या संकल्पनेमागे होता. अर्थातच या प्रयोगाचे फलित काय असेल?, याबाबत व्यवस्थापन मंडळात अनेक संभ्रम होते. मात्र बापूसाहेबांनी अतिशय बारकाईने या संकल्पनेचा विचार (सूक्ष्म नियोजन ) केला होता. भाऊबीज निधी संकलनाकरीता जाताना, मुलींनी कसे व नेमके काय बोलावे, कसे वागावे, कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हिशोब कसा ठेवावा, पावती देणे आवश्यक का?, या सर्व गोष्टींचे ते मार्गदर्शन मुलींना करीत.मुख्य म्हणजे मुलींची समिती नेमुनच ते हिशोब चोख ठेवीत. पुढील दहा वर्षात भाऊबीज संकल्पनेची घडी बसविण्यात बापूसाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. मुळातच ते स्वतः कल्पक व हरहुन्नरी होते. निरनिराळ्या योजनांची आखणी करणे, तिची यशस्वी कार्यवाही करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. याच दरम्यान महिला विद्यापीठाची जबाबदारी संस्थेने घेतली असल्यामुळे या कामात अण्णांचा बराच वेळ जाई. अशा स्थितीत संस्थेची आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी बापूसाहेबांनी ही योजना मांडली व या कामाची घडीही उत्तमरीत्या बसविली होती. बापूसाहेबांनी अशा प्रकाराने निधी संकलित होताना अनेक पाश्चिमात्य देशात पहिले होते. 

पहिल्या वर्षी म्हणजे १९१९ साली या कल्पक व तितक्याच भावनिक संकल्पनेस मिळालेला समाजाचा सकारात्मक प्रतिसाद पाहून ही योजना प्रतिवर्षी चालविण्याची संमती व्यवस्थापक मंडळाने दिली. भाऊबीजेला एक परंपरेचा सांस्कृतिक व भावनिक संबंधही असल्यामुळे समाजाने या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला व आजही अगदी शंभर वर्षानंतर ही तो तसाच उत्साहपूर्ण आहे हे विशेष. आपल्या कुटुंबातील बहिणीला भाऊबीज देताना, आश्रमातील बहीणीलाही भाऊबीज देण्याची जणू सवयच या उपक्रमाने जगाच्या पाठीवरील अनेक कुटुंबांना लावली आहे. मुख्य म्हणजे समाजाच्या उतरंडीवरील सर्व घटकांपर्यंत ही संकल्पना पोहचविण्याकरिता व ती सर्व स्तरातून स्वीकारली जावी या दृष्टीने संस्थेतील अनेक स्वयंसेवकांनी (स्त्री-पुरुष)अत्यंत निष्ठेने व सातत्य राखत अनके कुटुंबांना न चुकता नित्यनेमाने भेटी दिल्या व त्यांच्या ओंजळभर मदतीचे निमित्त साधत अनेक छोटे-मोठे हितचिंतक व संस्थेत स्नेहाचा साकव बांधला. अगदी फुलवाले,भेळ-फुटाणे विकणारे, शेतकरी, गावातील बारा बलुतेदार, कष्टकरी समाज,  निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे, नोकरदार वर्ग इ. सर्वांना सामावून घेणारी ही योजना आहे. एक-दोन पैशांपासून अगदी काही शे रुपये देणारे हितचिंतक या स्वयंसेवकांनी संस्थेशी बांधले. 

आज संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढत असताना गरजू विद्यार्थिनींची संख्या ही त्याच पटीने वाढत आहे; त्यामुळे काळानुरूप भाऊबीज संकल्पनेचे महत्त्व ही दिवसागणिक वाढतच आहे. म्हणूनच आज ही  संस्थेची व्याप्ती वाढत असताना, हितचिंतकांच्या औंजळभर मदतीस अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. भाऊबीज निधी संकलन करणाऱ्या स्वयंसेवकांची वाट पाहणारी कुटुंबे, आज ही पहायला मिळतात हे या योजनेचे लोकांच्या मनातील स्थान आहे. पुढे संस्थेच्या संपर्कात आलेले हितचिंतकही भाऊबीज संकलन उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी झाले. अगदी वयाची सत्तरी ओलांडलेले स्वयंसेवक देखील मोठ्या उत्साहाने या कामात स्वत:ला झोकून देताना आजही दिसतात. आधुनिक जगातील आव्हाने लक्षात घेत आज भाऊबीज आणि अन्य निधीचे संकलन सुलभ पद्धतीने व्हावे आणि देणगीदारांना त्वरित पावत्या मिळाव्यात, यासाठी नव्याने तयार केलेल्या ‘कन्यार्थ’ या डिजिटल पावती-पुस्तकाचा उपयोग ही मोठ्या संख्येने केला जात आहे हे विशेष.

“भाऊबीज उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेस एका अक्षय व अखंड वाहणार्या निर्झराची किंवा गंगोत्रीची प्राप्ती झाली” असा उल्लेख अण्णांच्या लिखाणात दिसून येतो. बापूसाहेबांनी आश्रमात कामांस सुरुवात केली व १९१९ साली ते संस्थेचे आजन्म सेवक झाले. १९१७ मध्ये सुरु झालेल्या शाळेत मुलींची संख्या तीन इतकीच होती, मात्र त्यांच्या मृत्यूपर्यंत ती संख्या ३९५ पर्यंत गेली होती. आज ही संख्या अंदाजे पस्तीस हजारावर आहे. १९२९ मधे त्यांचा अकाली मृत्यू विषमज्वराने झाला. मात्र तो पर्यंत (१९१९ ते १९२८) त्यांनी भाऊबीज संकलनाचा निधी मोठ्या रकमेपर्यत पोहचविला होता. त्यांच्या मृत्यूनंतरही भाऊबीज योजना त्याच पद्धतीने चालू आहे. संस्थेतील विद्यार्थीनी, सेवकवर्ग, हितचिंतक आज ही भाऊबीज निधी संकलनात त्याच विश्वासाने व निष्ठेने  कार्यरत आहेत. श्रीमती शांताबाई परांजपे, श्री. गजानन जोशी, श्रीमती‌ कुसुमताई शेंडे, श्री. शशिकांत ठाकूर गुरुजी,आणि श्रीमती मनीषा कोपरकर अशी काही ठळक नावे भाऊबीज निधी संकलनातील अग्रणी म्हणून घेता येतील. आज शालेय विद्यार्थिनी, तरुण पिढीही याकामात उत्साहपूर्ण सहभाग देत आहे. 

भाऊबीज योजना, संस्थेची आर्थिक गरज भागविण्यात उपयुक्त ठरलीच परंतु या निमित्ताने आज लाखो कुटुंबे महर्षी अण्णांच्या संस्थेचे हितचिंतक झाले. “संस्थेस मदत, सहकार्य करणारे चार मोठे देणगीदार कमी पडले तरी चालतील मात्र संस्थेचे हितचिंतक हे वाढलेच पाहिजेत” असा मोठा विचार या योजनेमागे दिसून येतो. खरे तर कोणत्याही संस्थेचे अस्तित्व हे हितचिंतकांच्या जोरावरच अबाधित राहते, त्यात असतो कौटुंबिक आपुलकीचा भाव व यातूनच संस्थेला, मदती करिता मिळतात शेकडो सहकार्याचे हात. 

“अण्णांची संस्था होण्या मोठी, द्या भाऊबीज जरी असेल छोटी”...म्हणत या योजनेने अनेक कुटुंबे जोडली व अनेक गरीब व गरजू मुलींसाठी शिक्षणाची दालने खुली केली.या योजनेच्या यशामागे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे; कमीत कमी निधी बाबत नसणारी अट व त्यामुळेच समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने या सेवेच्या यज्ञकुंडात योगदान देत राहिली. सामाजिक संस्था दीर्घायुषी करण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी कायमच केला पाहिजे, संस्था अल्पायुषी होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जमा खर्चाची अव्यवस्था, हे अण्णांच्या संस्थेने कायम लक्षात ठेवले आहे आणि ही कार्यपद्धती विकसित केली आहे. संस्थेतील आर्थिक शिस्त, पारदर्शकता व सामाजिक उत्तरदायित्वाची प्रबळ भावना ह्या सर्व गोष्टींवर भर दिल्यामुळे समाजाचा संस्थेवर प्रचंड विश्वास अधोरेखित होत आहे. सामाजिक भाऊबीजेचा हा उपक्रम सर्वांनाच मार्गदर्शक झाला आहे. स्वच्छ व प्रभावी कार्य असेल तर अशा कार्याला मोठी समाज मान्यता मिळते आणि पैशाची कमतरता अजिबात भासत नाही हे या उपक्रमातून संस्थेने एक चांगले, आदर्श उदाहरण  घडविले आहे.  

आपण ही या ईश्वरी कार्यात सहभागी होवू शकता व भाऊबीज निधी संकलन उपक्रमात स्वयंसेवक म्हणून आपले योगदान देवू शकता. आपल्या कुटुंबातील बहिणींसह, आश्रमातील आपल्या बहीणीलाही न विसरता भाऊबीज पाठवून, एक अधिक नाते स्नेहाचे बांधूच शकता.  


(लेखिका महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत)

कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण लिंक

https://youtube.com/live/DSVdkyG-inU?feature=share

स्मिता कुलकर्णी
9822752056


- स्मिता कुलकर्णी

  • शेतकरी
  • गावातील बारा बलुतेदार
  • कष्टकरी समाज
  • निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

स्मिता कुलकर्णी

 सामाजिक (3),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.