
भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये अनेक भारतीयांनी योगदान दिल्याचा इतिहास आपण वाचलेल्या आहे. आदिवासी वीरांनी जुलमी सत्तेला नकार दिला. प्रस्थापित सत्ता मोडून पर्यायी व्यवस्था उभी केली. संघटित प्रतिकार लढा उभा केला. गुन्हे ठरणाऱ्या कृती क्रांतीचा कार्यक्रम म्हणून स्वीकारला. ब्रिटिश सत्तेविरुध्द संघर्ष केला. ही सबाल्टर्न लढ्यांची नीती तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडा यांनी अवलंबून बलवान सत्तेला जेरीस आणले. बिरसा मुंडाच्या रूपाने आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, त्यांचा ब्रिटिश व तत्कालीन शोषणकर्त्या व्यवस्थेविरुध्दचा संघर्ष, आपली पृथक संस्कृती जपण्यासाठीचा एल्गार आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा ठरला आहे. संपर्काची अत्यंत कमी साधने असतानाही बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुध्द देशातील अत्यंत दुर्गम भागात एक प्रभावी बंड उभं केलं या बंडाच्या केंद्रस्थानी आपल्या लोकांच्या सांस्कृतिक, धार्मिक अस्मिता जपणे आणि त्या भागातील नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करणे हा हेतू होता.
- मुंडा जमातिचा इतिहास
भारतीय आदिवासी जमातीमध्ये मुंडा ही एक जमात असून त्यांची एक स्वतंत्र भाषा आहे. तिला मुंडारी भाषा म्हणून ओळखले जाते. मुंडारी या भाषेमध्ये मुंडा या शब्दाचा अर्थ “मुखिया” किंवा प्रमुख असा होतो. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव २९ मार्च १८५७ रोजी बैरकपूर (बंगाल) येथे झाला. त्याच्या ज्वाळा भारतभर पसरल्या. परंतु त्याही पूर्वी १८५५ साली सिद्ध आणि कान्हू या संथाल बंधूच्या सुजाण व सजग नेतृत्वाखाली संथाल आदिवासींचे फार मोठे व भविष्यसूचक बंड झाले. संथालांनी सात महिन्यात ते बंड मोडून काढणे शक्य झाले. बिहारमधील छोटा नागपूर, सिंघभूम जिल्हा व आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर मुंडांचे मूळ स्थान बनले आहे. मुंडांच्या संपर्क सान्निध्यात ओराँव, हो, कोल्हाण, खडिया, कोल, संथाल, बिरहूर व गोंड अशा विविध आदिवासी जमाती राहतात. १७७९ ते १८३२ या काळात मुंडांनी आपल्या अस्तित्व-अस्मितेचे व न्याय्य-हक्काचे आंदोलन अनेकदा उभे केले. प्रभावी शस्त्रधारी, प्रतिगामी शक्तींनी व पाशवी दडपशाहीने ती आंदोलने दडपून टाकली.

- बिरसा मुंडा जन्म व बालपण –
१५ नोव्हेंबर १८७५ ही बिरसाची जन्मतारीख आहे. चलकद ही बिरसाची जन्मभूमी असल्याचे सांगितले जाते. तर सिंजुरीचा टोला ‘बंबा’ ही बिरसाची जन्मभूमी असल्याचे कळते. त्याच्या वडिलाचे नाव सुगना मुंडा व आईचे नाव करमीहातू होते. बिरसाला दोन भाऊ होते. कोमता व कानू. कोमता मोठा व कानू लहान. त्याला दोन बहिणीही होत्या. त्यांची नावे दसकीर व चंपा अशी होती. गुरूवारला मुंडा जमातीत बिस्पुतवार बृहस्पतिवार म्हणत बिरसा यांचा जन्म गुरूवारचा असल्याने काही अभ्यासक म्हणतात की, बिरसा हे नाव त्यावरून ठेवण्यात आले आहे. बालपणी बिरसाला सर्वजण ‘दाऊद’ म्हणत असत. सर्वांचा तो लाडका होता. बालपणापासून तो शांत व गंभीर स्वाभवाचा होता. आज्ञाधारक होता. खोटे त्याला सहन होत नसे. अन्यायाची चीड होती. बिरसाच्या जन्मानंतर सुगना मुंडा व करमी आपल्या मुलामुलींना घेऊन चलकद या किर्रर्र जंगलांनी व्याप्त अशा गावात राहू लागले. बिरसा मुंडाचे बासरीचे वेड सांगताना विनायक तुमराम लिहितात की, “बिरसाचे बालपण कराल दारिद्र्यात गेले. उघड्याबोडक्या मुंडा मुलांशी खेळण्यात व जंगलात स्वच्छंदीपणे बागडण्यात मग्न असे. बालपणी बिरसाला बासरीवादनाचा भारी नाद होता. त्याची बासरी बांबूची असायची. तिच्या जोडीला ‘दुईली’ नावाचे एक तंतुवाद्यही तो वापरीत असे. बासरी घेऊन तो जंगलात जाई. गर्द सावलीत बसून तो बासरी वाजवी. तिचा सुमधुर सूर कानावर पडताच रानातले पशू त्याच्याभोवती गोळा होत. पंखांची फडफड करून झाडांवरची पाखरे त्याला प्रतिसाद देत. एकंदरीत, पशुपक्षी त्याला वश होते. रस्त्याने येणारे-जाणारेही क्षणभर थांबून बिरसाच्या बासरीची धून ऐकत. अशी देण बिरसाला मिळाली होती.”
तुमराम यांनी बिरसाच्या बालक्रिडांचे वर्णन केले आहे. त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणाची ओळख करून दिली आहे. ते पुढे सांगतात की, “एकदा एक घटना घडली. नेहमीप्रमाणे तो एके दिवशी बकऱ्या चारायला गेला. बकऱ्या चरू लागल्या. झाडाखाली बसून तो रखवाली करू लागला; परंतु दुर्दैव येथेही आड आले. जंगली पशूने एका बकऱ्याचा बळी घेतला. या चुकीसाठी त्याच्या मावसाने त्याला बेदम मारले. बिरसा खूप रडला. त्याच्या बालमनावर परिणाम झाला. त्या रात्री तो झोपला नाही. कुठे आई व कुठे मावशी! कुठे बाबा व कुठे मावसा! त्याचे बालमन दुखावले. क्षणभरही येथे थांबायचे नाही, असे त्याने ठरविले. एका रात्री त्याने तिथून पळ काढला. आपल्या गावी आला. घडलेल्या सर्व घटना आईबाबांना सांगितल्या. त्यांना फार दुःख झाले. पोराला पाठवायला नको होते असे त्यांना वाटले.”
आई वडिलांना सोडून शिक्षणाची कास धरणारा बिरसा स्वाभिमानी व तितकाच रागीट असल्याचेही लक्षात येते. त्याच्या सारखा विद्यार्थी मिळणे हे शिक्षकाचे भाग्यच म्हणावे लागेल. ते पुढील प्रसंगातून दिसून येते. “शिकवणारे, शिक्षणाचे संस्कार त्यांच्यावर रुजवणारे शिक्षक मिळणं ही एक सकारात्मक गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली होती. बिरसाला सकाळी उठल्यावर कधी एकदा शाळेत जातोय, असं वाटायचं. त्याच्या बरोबर शिकणाऱ्या इतर बऱ्याचशा मुलांना जयपाल नाग काय शिकवत आहेत, यात रस नसायचा. त्यांचं लक्ष इकडेतिकडे बघण्यात जास्त असायचं. बिरसा मात्र कानावर पडणारा प्रत्येक शब्दन्शब्द नीट लक्ष देऊन ऐकायचा. धडा संपल्यावर बिरसा प्रश्न विचारायचा. जणू त्याच्या मनातील कुतूहल आता प्रश्नांच्या रूपाने तो शिक्षकांसमोर उघडं करत होता. शाळेतल्या अभ्यासाशिवाय बिरसाला सर्वांत आवडायचं ते जयपाल नाग मास्तरांचं गोष्टी सांगणं. रोज न चुकता, शेवटच्या तासाला ते मुलांना रामायण, महाभारत यांतल्या गोष्टी रंगवून सांगायचे. त्या दंतकथा आणि मिथककथा ऐकताना त्याच्या कोवळ्या मनात तहेत-हेची चित्रं आकार घ्यायचीत.

उलिहातूमधला जमीनदार आणि इंग्रज सरकार हे रावणासारखेच आहेत, बिरसानं एकदा शाळेत सगळ्यांना सांगून टाकलं. जयपाल मास्तरांनी बिरसाकडे चमकून पाहिलं. वयाच्या हिशेबानं बिरसाला जास्त समज असल्याचं सुरुवातीपासूनच त्यांच्या लक्षात आलं होतं; पण इतक्या लहान वयात त्याला अनुभव आलेल्या माणसांचा संबंध तो ऐकत असलेल्या काल्पनिक व्यक्तींशी जोडत आहे, हे बघून ते चकित झाले. 'या मुलात काहीतरी असाधारण आहे,' बिरसाला महिनाभर शिकवल्यानंतर जयपाल मास्तरांनी जानीला सांगितलं, 'मी त्याला काय शिकवतोय याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतंत्र विचार करतो. इतर मुलं मी सांगेन ते फक्त ऐकतात, मात्र बिरसा विचार करतो, त्याचे स्वतःचे निष्कर्ष काढतो. त्याच्या मनात खूप कुतूहल असतं. एक गोष्ट लक्षात ठेव जानी त्याला आहे तसा राहू द्या त्याला बदलायचा अजिबात प्रयत्न करू नका. तो जसा आहे तसा राहू दे तसा वाढू दे.”३
बालवयातील समजदारपणा आणि धाडसी स्वाभाव हा बालवयातही लपून राहिला नाही. मातृभूमी विषयीचे प्रेम आणि परकीय सत्तेविषयी तिटकारा हा वरील प्रसंगातून आधोरेखित होतो. “फादर लूथरननी पत्र टेबलावर ठेवलं आणि ते परत खुर्चीवर बसले. हाताची घडी घालून त्यांनी बिरसाकडे परत एकदा बघितलं. 'बरं, आता तू सांग मला, तुला या शाळेत का प्रवेश देऊ?' त्यांनी विचारलं. बिरसा ताठ उभा राहिला. 'मला प्रवेश देण्याइतका मी हुशार आहे की नाही ते मला माहीत नाही; पण मला नवीन नवीन गोष्टी बघायला, समजून घ्यायला आवडतात. सगळ्याच मुलांना चांगलं शिकायला मिळालंच पाहिजे,' बिरसानं उत्तर दिलं. त्याचं वय आणि त्याच्या आयुष्याचं वास्तव बघता त्याने ज्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं ते नक्कीच कौतुकास्पद होतं.”
शिक्षणाची आवड आणि नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ त्यामुळे बिरसा कधी एका ठिकाणी रमले नाही. “बिरसा चाईबासा येथील जी. ई. एल. मिडलस्कूलमध्ये दाखल झाला. तेथील वातावरणात तो रमला; परतू बाहेरचे वातावरण त्याला काहीसे वेगले जाणवले. इंग्रजांच्या अन्याय-अत्याचाराची जाणीव झाली. तो विचार करू लागला. त्याच्या मनोभूमीत क्रांतिकारी विचारांचे बीज हळूहळू अंकुरित होऊ लागले होते. आणखी काही मुंडा मुले त्याच्यासोबत दाखल झाली होती. बिरसा मात्र त्या सर्वांहून वेगळा होता.मिशनमध्ये एक बंगाली मुलगा राहायचा. त्याचे नाव अमूल्य. तो हुशार होता. बिरसाशी त्याचे खूप पटायचे. ते दोघे मित्र बनले. अमूल्य बिरसाला गणित शिकवी. नकाशा काढायला शिकवी. नीटनेटके राहायला शिकवी. त्याला मदत करी. भावासारखे ते वागत असत.”५ बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. असे काहीसे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशा प्रकारचे बालपणातील प्रसंगातून बिरसाच्या व्यक्तीमत्वाचे दर्शन घडते.

बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारी उलगुलान –
‘सरदार आंदोनल’ हे आदिवांसीच्या अस्तित्व व अस्मिता यासाठी मुंडा, संथाल, ओरॉव, खासी, हो, गारी, कोल्हाण, कोलव गोंड या आदिवासी जमाती एकवटल्या. हे आंदोनल स्वहित रक्षणासाठी असल्याने ती शोषणमुक्तीची एक वैचारिक ललकारी होती. सरदारांनाच्या या बंडाची गोष्ट फादर नैट्रॅटला आवडली नाही. त्यांनी सरकारशी खलबल करून त्या सरदारांना अटक करविली त्यांच्यातील काही जणाचा पोलीस कोठडीत मरण पावले. हे जेव्हा बिरसाला समजले तेव्हा त्यांना वाईट वाटले. त्यातच एक दिवस प्रार्थनेच्या वेळी फादरणे आदिवासी सदारांना चोर, भामटे, व लुच्चे म्हटले. बिरसाला ही गोष्ट आवडली नाही. फादर आणि बिरसा यांच्यात भांडण झाले आणि बिरसाला मिशनरी शाळेतून काढून टाकण्यात आले. १८८६ साली मिशन सोडली. १८९१ मध्ये बिरसा बंदगावला राहाणारे आनंद पांडे यांना भेटले आणि त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली. आनंद पांडे त्यांना आजूबाजूच्या गावामध्ये सत्संगासाठी नेत असत. त्यामुळे बिरसा वरील ईसाई धर्माचा प्रभाव कमी झाला. सरदारांच्या आदोलनाचा प्रभाव पडल्याने बिरसाने आपल्या कार्याला सुरूवात केली. १८९४ सालच्या दुष्काळात छोटा नागपूर भागात लोकांचे हाल पाहून बिरसाने त्यांना धान्य पुरविण्याचे काम सुरू केले. बिरसाचा सेवाभाव पाहून लोक त्याला आपला कैवारी मानायला लागले.
ऑक्टोबर १८९४ मध्ये ‘वनशुल्क माफी’ मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले. प्रत्येक गावागावात जाऊन या आंदोलनासाठी लोकांना एकत्र केले. मोठ्या संख्येने चाईबासा येथील सरकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन धडकले. ब्रिटीश पोलीस यंत्रणा हादरली त्यांनी जमावावर बेधूद गोळीबार केला. परंतु आदिंवासींनी माघार घेतली नाही. तेव्हा पहिल्यांदा बिरसाचे नेतृत्त्व लक्षात घेऊन बिरसाच आपला नेता असल्याचे लोकांनी मान्य केले. दुष्काळात आदिवासी समाजाची सेवा केल्यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला होता. आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कासाठी जागृतीची गरज होती. त्यामुळे बिरसाने आपली पुढील रणनीती म्हणून वैचारिक क्रांतीला सुरूवात केली. वनशुल्क, वेठबिगारी याला नकार देण्यासाठी आदिवासींना पटवून देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. जंगलावर आणि त्यापासून उपलब्ध होणाऱ्या संपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे. तो आदिवासींना मिळालाच पाहिजे. असा आग्रही असलेले बिरसा यांनी समाजाला हे पटवून दिले की, आपल्यावर अन्याय- अत्याचार करणारे दिक्कू आहेत. वनशुल्क व शेतजमिनीचे शुल्क अन्यायकार असून ते आदिवासींनी देऊ नये. आपण संघटित होऊन लढलो तर राणीचे राज्य संपूष्ठात येईल असा विश्वास जनमाणसांच्या मनात निर्माण केला. त्यामुळे लोक सरकार विरूध्द उघड बोलायला लागले. विरोध करू लागले.
ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले की, बिरसा लोकांना भडकवतो आहे. याचा परीणाम २२ ऑगस्ट १८९५ रोजी बिरसाला अटक करण्याचे आदेश देण्यात आले. रात्री दोन वाजता जिल्हा पोलीस उपाधीक्षक मिर्यस यांनी बिरसा व त्यांच्या साथीदारांना अटक केली. त्यांना रांचीच्या तुरूंगात नेण्यात आले. रांची येथे त्यांच्यावर खटला भरण्याची तारीख ठरली. आदिवासींना ही बातमी समजली जंगलातून, डोंगरदऱ्यातून लोक खटला पाहाण्यासाठी लाखोच्या संख्येने आल्याने प्रचंड जनसमुदाय पाहून ब्रिटीश सरकार घाबरले. त्यांनी रांची येथील खटला रद्द केला. पुढे खटल्याची सुनावणी खुंटी येथे झाली १९ नोव्हेंबर १८९५ ला खटल्याचा निकाल बिसाच्या विरोध लागल्याने त्यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पन्नास रूपये दंड करण्यात आला. शिक्षापूर्ण झाल्यावर बिरसाने ब्रिटिशाच्या विरोधा सेना उभारली ११ ऑगस्ट १८९७ रोजी तीन हजार आदिवासी सहकाऱ्यांना घेऊन खुंटी पोहोचले. ही बातमी इंग्रजाना आधीच लागली होती. ते तयारीतच होते. आलेल्या जमावावर त्यांनी बेधूद गोळीबार केला. चवताळलेल्या जमावाने आणि सशस्त्र मुंडाच्या टोळीने जाळपोळ केली. त्यात पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला. या घटनेमुळे एच. सी. स्ट्रीलफील्ड यांची तात्काळ बदली करण्यात आली.
विनायक तुमराम म्हणतात, “२५ डिसेंबर, १८९९ चा तो दिवस. ख्रिसमसचा दिवस. याच दिवशी बिरसाच्या कार्यकर्त्यांनी योजना आखली. आपले पारंपरिक शस्त्र त्यांनी परजले. सशस्त्र आदिवासींच्या तुकड्यांनी ठिकठिकाणच्या चर्चवर प्रखर हमले चढविले. तीक्ष्ण व विषारी बाणांचा सतत मारा केला. त्यात अनेक फादर, मिशनरी लोक व इंग्रज अधिकारी जखमी झाले. काही मरण पावले. लढयाने आता हिंसक वळण घेतले होते. बिरसाइट्सना आता जीवाची पर्वा नव्हती.”
अशा प्रकारे बिरसाच्या आदोलनाने हिंसक वळण घेतल्याने ब्रिटीश सरकार हादरले होते. उलगुलानचा पहिला हुतात्मा- गया मुंडा यांचे वर्णन करताना मोहन भागवत म्हणतात की, “त्याच्या झोपडीला फौजेने चहूबाजूंनी वेढा घातला झोपडीत गया मुंडा, त्याची दोन मुले आणि चार महिला होत्या. दोन कुऱ्हाडी, दोन तलवारी व महिलांजवळ गवत कापण्याचे कोयते ही शस्त्रे त्याच्याजवळ होती. एवढ्याच बळावर संध्याकाळी ६ वाजेपासून पहाटे ४ वाजेपर्यंत त्या सर्वांनी बंदुकधारी फौजेचा प्रतिकार केला.”७ आदिवासी मुंडा जमातीचे आणि इंग्रजाचे युध्द जगाचे लक्ष वेधनारे होते. ते म्हणजे डोमबारीचा नरसंहार म्हणावा लागेल. डोमवारीच्या डोंगरामध्ये मुंडा एकत्र झाले आहेत ही बातमी गोऱ्यांना समजली. त्यांच्या फौजेने डोंगराला वेढा दिला. चार हजार मुंडा तेथे एकत्र आले होते कोणीच शरण येत नाही हे पाहून इंग्रजानी गोळीबार सुरू केला. अंधाधुंद गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. यामध्ये पुरूषांबरोबरच स्त्रिया व मुलेही होती. कोणीच सुटले नाही. या संघर्षात किती मुंडा मारले गेले याची गणतीच करता येणार नाही. बिरसाला त्याच्या सहकाऱ्यांनी भगवान तुम्ही वाचला पाहिजे म्हणून त्यांना दाट अरण्यांत घेऊन गेले. एक दिवस जंगलात भटकणाऱ्या त्यांच्या पत्नी सोली व तिची सहकारी यांना वाटले बिरसा बरेच दिवस उपाशी आहे. त्याच्यासाठी स्वयंपाक करावा म्हणून त्यांनी चुल पेटवली याच गोष्टीचा फायदा घेऊन फितूरांनी इंग्रजाना खबर दिली. बिरसाला त्यांनी चौफेर घेरले आणि झोपेत असतानाच अटक केली. तरूगात असतानाच अखेर तो काळा दिवस उजाडला. ९ जून १९०० या दिवसी सकाळी आठच्या सुमारास बिरसाला रक्ताच्या उलट्या झाल्या. नऊ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. एक घोंगावणारे वादळ अखेर शांत झाले.
आदिवासी समाजावर होणारा अन्याय, अत्याचार सावकारशाही, वेठबिगारी यांच्या विषयी आवाज उठवला. आदिवासींना नव संजीवनी देणारा महान क्रांतीकारक धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासींची अस्मिता, अस्तित्व व विकासासाठी आहोरात्र प्रयत्न केले. मातृभूमिला परकीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी आपले बिलदान दिले. अखंड भारतभूमीसाठी प्रयत्न करताना समाजात एक नवचैतन्य निर्माण केले. अशा आदिवासी क्रांतीकारकाचे सतत स्मरण करत राहाणे हे भारतीयांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
संदर्भ ग्रंथ –
१. तुमराम विनायक, ‘बिरसा मुंडा’, साकेत प्रकाश संभाजीनगर तृतीय आवृत्ती २०२३ पृ. २४
२. तुमराम विनायक, ‘बिरसा मुंडा’, तत्रैव पृ. २५.
३. वर्मा अंकिता, ‘बिरसा मुंडा’, अनुवाद प्राजक्ता चित्रे, मंजुल पब्लिशिंग हाऊस पुणे प्र. आ. २०२२ पृ. ५२
४. वर्मा अंकिता, ‘बिरसा मुंडा’, तत्रैव पृ. ५८.
५. तुमराम विनायक, ‘बिरसा मुंडा’, उनि, पृ. २६.
६. विनायक तुमराम, बिरसा मुंडा, तत्रैव पृ. ४२
७. मोहन भागवत, ‘बिरसा मुंडा’ श्री भारती प्रकाशन नागपूर, पुनर्मुद्रण मार्च २०२४ पृ. ३३.
लेखक परिचय
डॉ. कुंडलीक पारधी
मराठी विभाग
आबासाहेग गरवारे महाविद्यालय, पुणे