युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार
डॉ. हेडगेवार यांचे घराणे व आजोळ
कै. नारायण हरी तथा नाना पालकर यांनी डॉक्टरांचे विस्तृत चरित्र लिहायला घेतले तेव्हा डॉक्टरांच्या पूर्वचरित्राचे (त्यांचे मूळ गाव, कूळ, वंशावळ इ.) फार थोडे तपशील उपलब्ध होते. डॉक्टरांचे चुलते मोरेश्वर श्रीधर (आबाजी) आणि थोरले बंधू सीतारामपंत यांना हेडगेवार घराण्याची माहिती एकत्र केली होती. पण गांधीवधानंतर झालेल्या जाळपोळीत ती सर्व कागदपत्रे नष्ट झाली.
हेडगेवार पूर्व चरित्र संशोधन मंडळ
डॉक्टरांचे मूळ गाव 'कंदकुर्ती' होते, या पलीकडे काहीच तपशील उपलब्ध नाही याची बोच मूळचे कंदकुर्तीचे पण शिक्षणासाठी हैदराबाद येथे असणारे संघस्वयंसेवक यादवराव कंदकुर्तीकर यांना वाटत असे. नाना पालकर डॉक्टरांचे विस्तृत चरित्र लिहिणार असल्याचे समजल्यावर त्यांना आनंद झाला. हैदराबादचे जिल्हा प्रचारक श्री. बाळ सावरेकर यांनी त्यांना नाना पालकरांची या संबंधातील एक-दोन पत्रे दाखवली. पुढे कंदकुर्तीकरांना सरकारी नोकरी लागली आणि दैवयोगाने त्यांची बदली कंदकुर्तीला झाली. हा ईश्वरी संकेत असल्याचीच त्यांची भावना झाली. डॉक्टरांच्या पूर्वचरित्राची साधने गोळा करण्याच्या कामात ते आनंदाने सहभागी झाले. 'हेडगेवार पूर्व चरित्र संशोधन मंडळ' स्थापन व्हावे अशी नाना पालकरांची सूचना होतीच. कंदकुर्तीकर मंडळाचे सदस्य झाले. विजयादशमी शक १८७८ ( दि. १४ ऑक्टोबर १९५६) ला मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे एकूण सहा सभासद असून त्यांतील एक हेडगेवार वंशस्थ होते.
मंडळाचे सभासद पुढीलप्रमाणे :
१) गजानन महाराज ( पानगंटीवार), वय वर्षे ४०, संस्कृतज्ज्ञ विद्वान, कीर्तनकार, कवी व चिकित्सक संशोधक
२) शामसुंदर हर्गेवार (हर्गे), वय वर्षे ३५, बुद्धिवादी संशोधक; हेडगेवार हे त्यांच्या वंशाचे कुलगुरू असल्यामुळे त्यांनी गुरुसेवा म्हणून प्रत्येक कार्यात मदत केली
३) श्रीराम शास्त्री हेडगेवार (निजाबाद), वय वर्षे ३२, हेडगेवार वंशाचे हयात वंशस्थापैकी असून फार कडक व कर्मठ व्यक्ती. "हे आमच्या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणून मी असा वागतो" हे त्यांचे याबाबतचे स्पष्टीकरण. दुसरे वंशस्थ गोविंद हेडगेवार (रंजल) असून या दोघा वंशस्थांनी हेडगेवार घराण्याची अधिकाधिक माहिती दिल्यामुळे कार्य सुकर झाले
४) रामचंद्र महाराज हर्गेवार (हर्गे), वय वर्षे २५
५) लक्ष्मण महाराज हर्गेवार (हर्गे), वय वर्षे २२
रामचंद्र महाराज आणि लक्ष्मण महाराज हे दोघे कंदकुर्तीच्या प्रख्यात श्रीधर महाराजांचे वंशस्थ संस्थानिक होत. हेडगेवार हे हर्गेवार घराण्याचे कुलगुरू होते. कुलगुरूचा अर्थ पौरोहित्यापुरता सीमित नसून पूर्वापार वंशस्थांचे हित पाहणारे, धर्माचरणाचे योग्य मार्गदर्शन करणारे असा होतो. हर्गे वंशस्थांना तर्पण समयी नित्यनेमे कुलगुरूचे स्मरण करावे लागते, तसेच श्राद्धदिनी कुलगुरूच्या स्मरणाने पिंडदान करावे लागते. डॉक्टरांचे कार्य म्हणजे आपल्या कुलगुरुपदी असलेल्या घराण्याचीच सेवा होय या पवित्र भावनेने दोघेही कामाला लागले.
६) यादवराव कंदकुर्तीकर (पूर्वी चुकैवार), वय वर्षे २२
विदर्भ साहित्य संशोधन मंडळाचे तत्कालीन कार्यवाह दे. गो. लांडगे, श्री. देव ( डॉक्टरांच्या भगिनी सौ. शरयू यांचे यजमान), विश्वनाथ शास्त्री संगमकर, डॉ. नरसिंह पुरुषोत्तम पैठणकर (डॉक्टरांचे मामेभाऊ) यांनी मंडळाला बहुमोल माहिती दिली. 'हेडगेवार पूर्व चरित्र संशोधन मंडळा'ने पुरावे, वृद्ध लोकांच्या भेटी, मुलाखती, तत्कालीन परिस्थिती, ऐकीव माहिती, स्थलमहात्म्य, वंशावळ व घराण्याकडून मिळालेली माहिती यांच्या आधारे ४५ पृष्ठांचा अहवाल पाच भाग व परिशिष्ट स्वरूपात सिद्ध केला. दि. १६ फेब्रुवारी १९५८ (महाशिवरात्री) ला मंडळाने आपला अहवाल नाना पालकरांना सादर केला. या सर्व मंडळींनी डॉक्टरांच्या पूर्वचरित्राचे तपशील गोळा करून आपल्यावर मोठे उपकार केले आहेत. या माहितीच्या आधारे कै. नानांनी डॉक्टरांच्या पूर्वचरित्राचे तपशील आपल्या महान ग्रंथात लिहिले.
या लेखात पालकर-लिखित चरित्रात न आलेले अथवा ओझरत्या स्वरूपात आलेले तपशील तेवढे दिले आहेत. दि. २३ मार्च १९५८ च्या 'विवेक'च्या अंकात 'हेडगेवार कुलाची परंपरा' हा लेख श्री. भाग्यवंत यांच्या नावे प्रसिद्ध झाला होता. तो लेखही मंडळाने केलेल्या कामाच्या आधारे लिहिण्यात आला होता.
कंदकुर्तीचे महात्म्य
कंदकुर्ती हे हेडगेवार घराण्याचे मूळ गाव. हे गाव सध्या आंध्र प्रदेशच्या तेलंगण भागात असून निजामाबाद (पूर्वीचे नाव इंदूर) जिल्ह्यातील रंजल (रेंजल) मंडलात आहे. निजामाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण या गावापासून ३० किमी पश्चिमेला आहे. धर्माबाद हे नांदेड जिल्ह्यातील शहर कंदकुर्तीपासून १२ किमी उत्तरेला आहे. बासर, फखराबाद (प्रत्येकी १० किमी अंतरावर), बोधन (२५ किमी अंतरावर) ही कंदकुर्तीजवळ असलेली रेल्वे स्थानके.
कंदकुर्तीचे प्राचीन नाव 'स्कंद-किराती' वा 'स्कंदपुरी' होते. येथे जवळच गोदाकाठावर भिल्लांचे एक तीर्थस्थान आहे. भिल्ल अथवा 'किरात' व स्कंदपुरीचे 'स्कंद' या दोन नावांवरून 'स्कंद-किरात' व त्याचे 'स्कंद किराती' होऊन शेवटी अपभ्रंशित उच्चार 'कंदकुर्ती' झाला असावा. तसेच कन्नड भाषेच्या प्रभावाने 'कंद - कुडती' पासून 'कंदकुर्ती' शब्द आला असण्याची शक्यता आहे. कन्नड भाषेत 'कंद' म्हणजे गड्डा किंवा टेकडी व 'कुडती' म्हणजे वसलेला; यावरून 'टेकडीजवळ वसलेले' असाही 'कंदकुर्ती' चा अर्थ निघतो. हे गाव गोदावरीच्या दक्षिण तटावर असून इथेच गोदावरी, हरिद्रा आणि मंजिरा यांचा त्रिवेणी संगम होतो. या नद्यांचा संगम 'वंजरा-संगम' या नावाने तीर्थराज म्हणून प्रसिद्ध आहे. या संगमास 'गरुडगंगा' असे नाव असून मेषसंक्रमणाला बरेच यात्रेकरू येतात. या संगमावर अहिल्याबाई होळकर यांनी एक उत्तम घाट व देऊळ नदीच्या तीरावर बांधले.
कंदकुर्ती गावात पुरातन देवळे-रावळे असून त्यांतील श्रीराम व केशवमूर्ती यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. यांतील केशवमूर्ती हे दैवत प्रथम भुयारात होते. तेथून ती मूर्ती पन्नासच्या दशकात बाहेर काढण्यात आली. या केशवमूर्ती दैवताची उपासना हेडगेवार घराण्यात प्रचलित होती व या दैवताच्या भक्तीतूनच बळीरामपंत हेडगेवारांनी आपल्या मुलाचे नाव 'केशव' ठेवले असे काही लोकांचे म्हणणे होते.
हेडगेवार घराणे
हेडगेवार घराणे कंदकुर्तीहून चार ठिकाणी स्थलांतरित होऊन स्थायिक झाल्याचे दिसते - रंजल (निजामाबाद जिल्ह्यातील मंडलस्थान, कंदकुर्तीपासून १० किमी अंतरावर), रुद्रूर (तालुका बोधन; कंदकुर्तीपासून २६ किमी अंतरावर), इंदूर (निजामाबाद, कंदकुर्तीपासून ३० किमी अंतरावर) व नागपूर (कंदकुर्तीपासून २८८ किमी अंतरावर). पेशवे व निजाम यांच्यात झालेल्या युद्धानंतर कंदकुर्ती आणि जवळपासचा प्रांत नागपूरच्या भोसले घराण्याकडे व्यवस्थेसाठी काही काळ होता. भोसले राजघराणे हिंदुधर्माचे अभिमानी आणि गो--ब्राह्मण प्रतिपालक हे ब्रीद सार्थ करणारे होते. त्यामुळे कंदकुर्तीची अनेक ब्राह्मण घराणी नागपूरला स्थायिक झाली. यात्रा अथवा फिरतीवरून परत येताना भोसले राजघराण्याचे वंशस्थ फार मोठा आश्रित वर्ग बरोबर आणून त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना तोषवीत असत. हेडगेवार घराण्याची एक शाखा सन १७६० च्या सुमारास नागपूरला स्थायिक झाली असावी. नरहरशास्त्री हेडगे हे डॉक्टरांचे पणजोबा सर्वप्रथम नागपुरास स्थायिक झाले असावेत. कंदकुर्तीचे विख्यात संत श्रीधर महाराज (हर्गेकर) व नरहरशास्त्री यांचे निकटचे संबंध होते. हेडगेवार घराण्याची शाखा आणि कंदकुर्तीमध्ये असलेल्या मूळ शाखेमध्ये अशौच, पत्रव्यवहार, जाणे-येणे इ. पद्धतीने अव्याहतपणे संबंध चालू होते. नागपूरला कोणीतरी (बहुधा बळीरामपंत) प्लेगने वारल्यावर कंदकुर्तीतील वंशस्थाने मृताशौच पाळले होते, अशी आठवण त्याकाळात बाल्यावस्थेत असलेल्या हर्णेकर वंशस्थाने मंडळाला सांगितली होती.
या घटनेनंतर पाच- सहा वर्षांनी नागपूरकडून एक हेडगेवार वंशस्थ ( डॉक्टरांचे सर्वांत थोरले बंधू महादेवशास्त्री) यात्रेनिमित्त कंदकुर्तीला आले होते आणि स्वतःच्या घरी राहिले होते असेही काही ग्रामस्थांनी मंडळाच्या सदस्यांना सांगितले. परंतु त्या वंशस्थाचे नाव मात्र हे ग्रामस्थ सांगू शकले नाहीत.
हेडगेवार नावाची व्युत्पत्ती
या घराण्याचे मूळ नाव 'हेडगे' असून तेही नावापूर्वी वापरत, असे मंडळाला जुन्या कागदपत्रांवरून आढळून आले. मल्याळममध्ये 'वारू' या शब्दाचा अर्थ आचार्य, गुरू, प्रतिष्ठित असा होतो. श्रीमद् शंकराचार्य कंदकुर्ती भागात येत तेव्हा ते वेदाध्ययनात अग्रेसर असलेल्या हेडगेवार कुटुंबातील विद्वानांना आपले प्रतिनिधी म्हणून नियुक्त करायचे. तेव्हापासून कदाचित 'हेडगे' पुढे 'वारू' व नंतर 'वार' लावण्याची प्रथा सुरू झाली असावी. 'वार' हे उपपद तेलंगी भाषेच्या प्रभावामुळे पडले असावे असाही एक मतप्रवाह आहे. कारण तेलंगी भाषेत 'वारी' हा शब्द मराठीतील 'चा' या प्रत्ययाचे काम करतो. त्यामुळे 'हेडगेवारी नरहरभट'चा अर्थ 'हेडग्यांचे नरहरभट' असा होतो. तेव्हा अशा अर्थाने 'हेडगेवारी' हे आडनाव रूढ होऊन त्याचा पुढे 'हेडगेवार' असा अपभ्रंश झाल्याची शक्यता आहे.
कलकत्त्याहून नागपुरात परत आल्यानंतर (१९१६ च्या प्रारंभी) काही दिवस डॉक्टरांच्या मनात आपल्या आडनावाविषयी चिकित्सा सुरू झाली. 'कंदकुर्तीकर' या आडनावाचा वापर त्यांनी फार थोडे दिवस केला होता. पण घरच्या जुन्या पोथ्या पाहून 'हेडगे पासून बदल करून ते 'हेडगेवार' नाव वापरू लागले व तेच रूढ केले. डॉक्टरांच्या आजोळच्या मंडळींनी आपली मूळ नावे व आडनावे बदलून नवीन नावे स्वीकारली होती व तसे करण्यास डॉक्टरांनासुद्धा आग्रह धरला होता. पण डॉक्टरांना आपले मूळ आडनाव चालू ठेवण्यातच धन्यता वाटली व त्यांनी तसे करण्यास साफ नकार दिला. ही माहिती डॉक्टरांचे मामेभाऊ डॉ. पैठणकर यांनी दिली होती. हेडगेवारांचे नागपूरचे घर त्यांच्या कंदकुर्ती येथील घराची प्रतिकृती होती. नागपूरच्या घराला उघडखांब अधिक संख्येत होते एवढाच काय तो फरक अशी माहिती विश्वनाथशास्त्री संगमकरांनी दिली होती.
डॉक्टरांचे आजोळ
डॉक्टरांचे आजोळ (बुर्रावार घराणे) मूळचे तेलंगण भागातील चिन्नूर जि. करीमनगरचे असून मध्य प्रदेशात स्थायिक झाले होते. त्यानंतर हे घराणे प्रथम चांदा (चंद्रपूर) आणि नंतर नागपूर (कामठी) येथे स्थायिक झाले. डॉक्टरांच्या मातोश्री, नरसिंह व सौ. यमुनाताई बुर्रावार यांच्या तीन अपत्यांपैकी सर्वात धाकट्या. त्यांचे बंधू पुलय्या (पुरुषोत्तम) यांनी पुढे आपले आडनाव बदलून 'पैठणकर' आडनाव घेतले. तेलंगणातून नागपूरला स्थायिक झालेले अनेक जण आपले आडनाव बदलून वऱ्हाडातील देशस्थ समाजात विलीन झाले. उदा. बंकावार 'जोशी' झाले तर, मंचकट्टीवार 'वैद्य' झाले. त्याप्रमाणे बुर्रावार 'पैठणकर' झाले. डॉक्टरांच्या आईचे मातुल घराणे बंकावारांचे. डॉक्टरांचे मामा पुरुषोत्तम पैठणकर नोकरीनिमित्त १९०८ मध्ये कामठीला व नंतर १९३६ नंतर नागपूरला होते, तेव्हा डॉक्टर आणि त्यांचे थोरले बंधू सीतारामपंत अधूनमधून त्यांच्या घरी जात. तापट स्वभाव, दुसऱ्याचे चांगले करण्याची वृत्ती, काटक व काटकसरी स्वभाव ही पैठणकर घराण्याची वैशिष्ट्ये.
हेडगेवार परिवार
डॉक्टरांच्या आईचे नाव रेवतीबाई होते, असा उल्लेख डॉक्टरांच्या चरित्रात आहे. काही जणांच्या मते त्यांचे माहेरचे नाव सुभद्राबाई होते. डॉक्टरांच्या वडिलांचे नाव बळीराम असल्यामुळे लग्नानंतर डॉक्टरांच्या आईचे नाव 'यमुनाबाई' ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या आई शरीराने सुदृढ व गौर वर्णाच्या होत्या. त्या स्वभावाने फारच शांत होत्या. डॉक्टरांचे वडील बळीरामपंत अत्यंत तापट स्वभावाचे होते. आई-वडील दोघेही अत्यंत काटकसरी व चिकाटीने वागणारे होते. डॉक्टरांच्या स्वभावात त्या दोघांचे गुण केंद्रित झाल्याचे दिसतात. त्यांचा चेहरा आईसारखा असून शरीरयष्टी वडिलांच्या नमुन्यावर वाटत असे. बळीरामपंत व सौ. रेवतीबाई हेडगेवार यांना सहा अपत्ये झाली - महादेवशास्त्री अथवा माधवशास्त्री, राजू (लग्नानंतरचे आडनाव विंचुरे), शरयू किंवा सरू (लग्नानंतरचे आडनाव देव), सीतारामपंत, केशवराव आणि रंगू (लग्नानंतरचे आडनाव पट्टलवार). थोरले बंधू महादेवशास्त्री अविवाहित होते. ते १९१६ (किंवा १९१४) साली प्लेगने गेले. सीतारामपंत यांच्या पत्नीचे नाव रमाबाई (विवाह १९१७ साली) असून त्यांना वेणू (लग्नानंतरचे आडनाव देशकर) नावाची मुलगी होती. सीतारामपंतांचे निधन प्रदीर्घ आजारानंतर दि. १५ फेब्रुवारी १९५२ ला पहाटे साडेतीन वाजता वयाच्या ७० व्या वर्षी झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला बाबासाहेब आपटे, कृष्णराव मोहरीर आणि आप्पाजी जोशी उपस्थित होते. सन १९१५ पासून त्यांचे नागपुरात वास्तव्य होते. डॉ. हेडगेवार यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यार्थ व्यतीत होत असताना त्यांच्यावर पितृतुल्य प्रेमाची पाखर घालून त्यांना त्यांच्या खाजगी जीवनात सर्वतोपरी निश्चिंत करण्याबाबतचे बरेचसे श्रेय सीतारामपंतांकडे जाते.
आपले व्यक्तिगत जीवन राष्ट्रार्पण करणाऱ्या डॉक्टरांचा थेट वंशज आज नाही. परंतु केवळ भगव्या ध्वजाखालोखाल डॉक्टरांना मानणारे लक्षावधी स्वयंसेवक डॉक्टरांचे वंशजच होत यात शंका ती काय?
(अभिलेखागार संदर्भ : १. Dr. Hedgewar's Family Tree and Background/ Dr. Hedgewar's Purva Charitra; यात हेडगेवार पूर्व चरित्र मंडळाचा अहवाल आणि यादवराव कंदकुर्तीकर यांचे नाना पालकर यांना दि. १६ फेब्रुवारी १९५८ (महाशिवरात्री) ला लिहिलेले पत्र आहे. २. डॉक्टरांचे बंधू सीतारामपंत यांच्या निधनाचा संदर्भ : Nana Palkar/ Hedgewar notes - 4, 4_149)
डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले
(साभार युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार सांस्कृतिक वार्तापत्र)