पंचपरिवर्तनातील स्वबोध जागरण 'जेन-झी'साठी अत्यंत महत्त्वाचे : आरोह वेलणकर

पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुण्यात उत्साहात संपन्न
पुणे, दि. १६ ऑगस्ट : "सध्या सोशल मिडिया आणि इन्फॉर्मेशनचा खूप ओव्हरलोड आपल्यावर होत आहे. त्या नादात आपल्या वागण्याबोलण्यामध्ये काही वैचारिक बैठक आहे की नाही असा प्रश्न पडतो. पंचपरिवर्तनाचे विषय खूपच महत्त्वाचे आणि आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. स्वतःपासून सुरू करायच्या या सर्व गोष्टी आहेत. स्वबोध जागरण हा विषय तर जेन-झी साठी अत्यंत महत्त्वाचा आहे." असे मत सुप्रसिद्ध मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आरोह वेलणकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म व रील फेस्टिवल आज पार पडला. त्यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी रा.स्व.संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश (नाना) जाधव, छ. संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास, मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेलणकर पुढे म्हणाले, "रोजच्या जगण्यात खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक शॉर्ट फिल्म असते. ते पाहता येणे हे प्रत्येक फिल्ममेकरसाठी महत्त्वाचे आहे."

एरंडवणे परिसरातील सेवा भवन येथील सभागृहात हा सोहळा पार पडला. या स्पर्धेत पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, समरसता, नागरी शिष्टाचार व स्वबोध जागरण या पाच विषयांवरील शॉर्ट फिल्मस् व रील संपूर्ण राज्यभरातून मागविण्यात आल्या होत्या. स्पर्धेत विजयी झालेल्या रील्स व शॉर्ट फिल्मस् यांचे स्क्रीनिंग यावेळी करण्यात आले. विजेत्या संघांना वेलणकर व जाधव यांच्या हस्ते पारितोषिके व प्रशस्तिपत्रे देण्यात आली. शॉर्ट फिल्म श्रेणीतील तृतीय पारितोषिक रु. ५०००, द्वितीय पारितोषिक रु. १०,००० तर प्रथम पारितोषिक रु. १५,००० होते. तर रील श्रेणीत तृतीय पारितोषिक रु. २०००, द्वितीय पारितोषिक रु. ३०००, तर प्रथम पारितोषिक रु. ५००० होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश आण्णाजी तथा नाना जाधव आपल्या मनोगतात म्हणाले, "देशभरात आज संघ विचारांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पंचपरिवर्तन हा शताब्दीनिमित्त संघाने हातात घेतलेला उपक्रम आहे. यामध्ये देशाचे चित्र बदलण्याचे सामर्थ्य आहे. हे सर्व विषय सामान्य माणसाला अगदी सहज करता येण्यासारखे आहेत. मात्र हे विषय केवळ शॉर्ट फिल्मस् किंवा रीलच्या माध्यमातून मांडून भागणार नाही. तर ते प्रत्यक्षात आचरणात कसे येतील हे पाहावे लागेल. हे सर्व समाजात रुजायला वेळ लागेल. मात्र आतापासूनच त्याची सुरूवात करणे आवश्यक आहे."

मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील भूमिका विशद केली. चांगला प्रेक्षक घडवणे हे फिल्म सोसायटीचे काम आहे. चांगले चित्रपट, चांगले विषय लोकांसमोर आणण्याचा मिती फिल्म सोसायटीचा नेहमी प्रयत्न असतो. यंदा संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. अशी शतकी वाटचाल करणाऱ्या अनेक संस्था असतात. पण संघ ही एकमेव अशी संघटना आहे की जी आपल्या ध्येयावर अविरतपणे आणि अभंग राहून काम करत आहे. त्यांनी शताब्दीनिमित्त हातात घेतलेले विषय हे खरंच सर्वांनीच करण्यासारखे आहेत. म्हणूनच मिती फिल्म सोसायटीने ठरवले की हे विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत. आणि यासाठीच हा फेस्टिवल आयोजित केल्याचे लेले यांनी सांगितले.
अभिजीत मकाशीर, देवेंद्र जोशी व मंदार गोडसे यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. सिनेमा हा काळानुरूप बदलत जाणारा आणि प्रवाही असतो. सिनेमा माध्यमात खूप ताकद असते आणि त्यामुळे त्याचा खूप खोलवर परिणाम प्रेक्षकांच्या मनावर होत असतो. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे क्रियाशीलतेला आणि विचारांना चालना मिळते. त्यामुळे या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. चित्रपट हा त्याचे व्याकरण समजून केला पाहिजे. त्यासाठी सिनेमॅटिक अँगल, तांत्रिक बाजू, दर्जा या बाबी जपणे आवश्यक असते. यंदा आलेल्या फिल्मस् आणि रील्स तयार करणाऱ्यांनी चांगला प्रयत्न केला आहे असे मंदार गोडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
फिल्म स्क्रिनिंग सत्राचे सू्त्रसंचालन डॉ. सुचेत गवई यांनी तर पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. मिती फिल्म सोसायटीचे सचिव आमोद खळदकर यांनी आभारप्रदर्शन केले. तर प्राची फाटक यांच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.