•  15 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

अहिल्यादेवी होळकरांची अर्थक्रांती

रेखा धामणकर 21 days ago
भाष्य  

 

अहिल्यादेवी होळकरांची अर्थक्रांती

अहिल्यादेवी होळकर या झंझावाती व्यक्तिमतवाविषयी त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त लिहिण्याची जेंव्हा वेळ आली तेव्हा आपण अजून काहीच साध्य केलेले नाही या कटू सत्याची जाणीव झाली. आपण एक चार्टर्ड अकौंटंट म्हणजे अर्थकारणामध्ये मुरलेले आहोत आणि आपल्याकडे आर्थिक विषयातील सर्वोच्च पदवी आहे हा अहंकार एक क्षणात संपून गेल्याची जाणीव अहिल्यादेवी यांचे अर्थविषयक विचार, या विषयाचा ज्ञान आणि धोरणे अभ्यासताना झाली.

या तडफदार व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जसे की सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरिती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक घेणे, वारसाहक्क, प्रजेविषयी तळमळ तसेच एक उत्कृष्ट लढाऊ स्त्री नेतृत्व  हे सर्वपरिचित आहेत तथापि त्यांचे प्रशासनिक कौशल्य, न्यायप्रियता, सक्षम राजकीय नेतृत्व, आर्थिक विचार व याबतीत त्यांनी दाखविलेले विविधांगी कर्तृत्व स्तिमित करणारे आहे

अवघ्या २९ व्या वर्षी वैधव्याचा सामना कराव्या लागलेल्या तरीदेखील आपल्या अतुलनीय पराक्रमाने मराठी मुलूखाचे आणि रयतेचे रक्षण करणाऱ्या योगिनी अहिल्यादेवींची तुलना जिजामाता, शिवाजी महाराज किंवा समकालीन पेशव्यांशी आणि त्यांचा प्रशासकीय आणि आर्थिक धोरणांशी केल्यास वावगे ठरू नये.

आज उच्च शिक्षित महिला किंवा इतर वर्ग देखील “आर्थिक साक्षरता” हा विषय जेंव्हा येतो तेंव्हा कित्येक बाबतीत निरक्षर आहेत असे म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे तथापि या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी या कोणतेही औपचारिक किंवा तांत्रिक शिक्षण न घेता केवळ तात्कालिन मौखिक शिक्षणाच्या बळावर आपल्या उच्चशिक्षित वर्गास एक अनुकरणीय व्यक्तिमत्व ठरतात यातच त्यांची महान कारकीर्द, प्रशासन कौशल्य आणि आर्थिक नियोजन सिद्ध होते. महिलांच्या आर्थिक सक्षमतेवर त्यांनी भर दिला. त्यांनी विधवा स्त्रियांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार व पारिवारिक संपत्तीचा आपल्या इच्छेनुसार उपयोग करण्याचा अधिकार दिला.

कोणत्याही राज्यव्यवस्थेची घडी ही त्या राज्यातील अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. अहिल्यादेवी यांनी  अर्थव्यवस्थेचे अनेक पैलू सांगितले आहेत, त्यातील प्रमुख पैलू म्हणजे 1. अर्थनिर्माण 2. अर्थव्यवस्थापन 3. अर्थविनियोग. त्यांच्या मते कोणतीही अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी या तीनही बाबी महत्वाच्या आहेत.

अर्थनिर्माण म्हणजेच पैसा मिळवण्याचे विविध मार्ग किंवा संधी. सर्वात आधी शेती व्यवस्थापन तसेच व्यवसायाच्या, व्यापाराच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे महत्वाचे कार्य त्यांनी हातात घेतले. यासाठी त्यांनी युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या अनेक वीरपत्नींना विणकामचे शिक्षण देऊन स्वयंरोजगार सुरू करून कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी पेलण्यास सक्षम बनवले इतकेच नव्हे तर त्यांनी बनविलेल्या वस्तूंना एक ब्रॅंड वॅल्यू मिळवून देण्याचे काम पण केले. तसेच समाजाला उपद्रवी ठरू शकतील असे काही चोर, लुटारू, भिल्ल अशा लोकांना त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन करवासुलीचे काम देऊ केले. 

कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक बाबी म्हणजे कौशल्य, भांडवल, जमीन, पाणी, कामगार व कच्चा माल. या सर्व घटकांसाठी बाहेरील लोकांवर अवलंबून न रहाता आवश्यक ते प्रशिक्षण देऊन, सर्व सोई निर्माण करून देऊन, कच्च्या मालाचे उत्पादन राज्यातच करून राज्य स्वावलंबी बनविण्याबरोबरच अर्थनिर्माणाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या.  सामूहिकरित्या व्यवसाय करण्याची कल्पना आणि त्यांची सहकारी संस्था उभी करण्याची कल्पना अहिल्यादेवींनी सर्वात प्रथम अस्तित्वात आणली.

विदेशी गुंतवणूकदाराला आकर्षित करायचे तर आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक सलोखा, व्यापारस्नेही वातावरण, पोषक कर धोरण आणि योग्य पर्यावरण असे अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यकाळात या मु्द्द्यांकडे लक्ष दिले.

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना राज्यातील अतिरिक्त जमीन देणे, किफायती व्याजदरावर कर्जे देणे, शेती करू इच्छिणाऱ्या पण स्वतःची जमीन नसणाऱ्या लोकांना जमीन कसायला देणे, पाण्याची सोय करणे अशी पावले उचलणे त्या उत्पन्नातील काही हिस्सा सरकारी तिजोरीत जमा करण्यास सांगणे अशा अनेक मार्गानी सरकारी तिजोरी सक्षम केली.

उचित करांची वसूली, उत्पन्नाधारित कर लावणे, आवश्यक तिथे आणि आवश्यक त्या वेळी कर माफी, काही प्रसंगी सुलभ हप्त्यामध्ये करवसुली असे अतिशय लवचिक पण शिस्तीचे असे अर्थकारण त्यांनी राबवले. त्यांचे अनुशासन, निष्पक्ष भूमिका व नियमांची कठोर अंमलबजावणी प्रशंसनीय होती. त्यांचे स्वत:चे खर्च, अगदी खाण्यापिण्याचा खर्चही व दानधर्मही वैयक्तिक कोशातून होत असे.

अर्थविनियोग मुख्यतः गोरगरीब जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, व्यापार उद्योग करणाऱ्या जनतेला भांडवल, जागा, बाजारपेठा उपलब्ध करून देणे, मूलभूत तसेच कौशल्यावर आधारित तसेच तांत्रिक शैक्षणिक सुविधा देणारी यंत्रणा निर्माण करणे, राज्याची सुरक्षा व्यवस्था सक्षम करणे, इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे यासाठी केला जात असे.

थोडक्यात सांगायचे तर आज आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात ज्या ज्या बाबींचा समावेश होतो, अगदी “good governance” सकट सर्व बाबी, अहिल्यादेवी यांनी सुमारे २७५ वर्षापूर्वी अंमलात आणल्या होत्या. आपली आजची अर्थव्यवस्था ज्या मूल्यांवर आधारित आहे ती मूल्ये एका कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या आणि केवळ मौखिक शिक्षणाच्या जोरावर संपूर्ण राज्याचा कारभार चालविणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या ३०० व्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन.

एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून, एक आर्थिक क्षेत्रातील उच्च शिक्षित व उच्च पदस्थ असून देखील त्यांच्या कारकिर्दीकडे बघता अजून आपण काहीच मिळवले नाही यांची जाणीव होते आणि या जाणिवेतूनच आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी योगदान देण्याची आपल्या जबाबदारीची जाणीव होते. या शुभदिनी ही जबाबदारी घेण्याचे वचन दिले तरच ती त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली होईल.

सौ. रेखा धामणकर

चार्टर्ड अकौंटंट , पुणे


- रेखा धामणकर

  • अहिल्यादेवी होळकरांची अर्थक्रांती
Share With Friends

अभिप्राय

कुशल प्रशासक आणि दानशूर व्यक्तिमत्व व न्यायप्रिय योगिनी दामिनी होत्या, स्त्री ही विश्वाची जननी आहे हे त्यांच्या लोकमाता राजमाता बिरुदावली नी सिद्ध केले आहे ना...
Dr.Vijaya Shivaji Hotkar MBBS 27 Jun 2025 04:03


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

रेखा धामणकर

रेखा धामणकर 

 इतिहास (1), सामाजिक (1), महिला (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.