संघटना शास्त्राचे भाष्यकार: डॉक्टर हेडगेवार
येत्या ३० मार्च ह्या इंग्रजी तारखेला वर्ष प्रतिपदा ही हिंदू तिथी येते आहे. हिंदू समाजासाठी हा नववर्षाचा शुभारंभ आहे. निसर्गाच्या चक्रानुसार आमच्या ऋषी-मुनींनी शास्त्रीय पद्धतीने कालगणना विकसित केली आणि नववर्षाची सुरुवात याच दिवशी करण्याचे मार्गदर्शन दिले.
याच दिवशी नियतीने आणखी एक महत्त्वाचा संयोग घडवला आहे. हिंदू समाजाच्या पुनरुत्थानासाठी आणि त्याला बलशाली करण्यासाठी जन्म घेतलेल्या महापुरुषांपैकी एक म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार. काही महापुरुषांचा जन्म नियती उद्दिष्ट्यांसाठी घडवते आणि त्यांचे जीवन त्या ध्येयाशी इतके एकरूप होते की ते जणू त्या ध्येयाचे साक्षात रूप वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, स्वामी विवेकानंदांचा हिंदू धर्म प्रसार, आदी शंकराचार्यांची सनातन धर्म प्रतिष्ठापना यासारख्या कार्यांप्रमाणेच, डॉ. हेडगेवार हे खंडित आणि दुर्बल झालेल्या हिंदू समाजाच्या संघटनाचे ध्येय घेऊन जन्माला आलेले
१९८९ साली त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली होती. त्यावेळी अनेक स्वयंसेवकांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, परंतु अनेकांना प्रश्न पडला ‘कोण आहे हे डॉ. हेडगेवार?’ कारण त्यांच्या निधनाला ५० वर्षे लोटली होती. आज त्यानंतर आणखी ३६ वर्षे झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आता मात्र डॉ. हेडगेवार यांचे योगदान सर्वदूर पोहोचले आहे. देशभरातील आणि जागतिक स्तरावरील अनेक मान्यवर नागपूर येथील त्यांच्या समाधीला भेट देत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठी संमेलनात त्यांचे योगदान गौरवले आहे. मृत्यूनंतरही दीर्घकाळ प्रभाव टाकणारे डॉ. हेडगेवार यांचे जीवन हा निश्चितच अभ्यासाचा विषय आहे.
एक सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ. हेडगेवार लहानपणापासून देशभक्तीने प्रेरित होते. वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी कलकत्त्याची निवड केली, कारण तेथे क्रांतिकारक चळवळींचे केंद्र होते. तेथे ते अनुशीलन समिती आणि योगी अरविंद यांच्या संपर्कात आले. नागपूरला परतल्यावर त्यांनी काँग्रेस चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि लोकमान्य टिळकांचे निस्सीम अनुयायी बनले. मात्र, त्यांनी व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन स्वीकारण्याऐवजी देशासाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देतानाच, इंग्रज गेले तरी भारत पुन्हा गुलामगिरीत जाण्याची भीती त्यांना जाणवू लागली. याचे कारण म्हणजे हिंदू समाजाची असंघटित अवस्था. याच चिंतनातून त्यांच्या मनात संघटनेचा विचार आकार घेत गेला. दार्शनिक महापुरुषांच्या कर्तृत्वानंतरही देश वारंवार गुलामगिरी मध्ये जात असेल तर मूलभूत उपाय केले पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले आणि ह्या त्यांच्या चिंतनातून त्यांच्या मनात हिंदू समाजाच्या संघटनेचा जन्म झाला.
त्याकाळी हिंदू समाज विविध जाती, भाषा आणि प्रांतांमध्ये विभागलेला होता. समाजाची अवस्था अशी होती की, "गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका." हिंदू समाजाने आपले भाग्य आणि भविष्य काँग्रेस चळवळीशी जोडले होते. मात्र,त्या चळवळीतील नेते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एकीकडे मुस्लिम तुष्टीकरणात गुंतले होते, तर दुसरीकडे हिंदू समाजाचा सातत्याने अवमान करत होते. या पार्श्वभूमीवर, डॉक्टर हेडगेवार यांनी मांडलेली हिंदू संघटनेची कल्पना दुर्लक्षित केली जात होती. हिंदू संस्कृती, हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र या संकल्पनांना वेडगळ आणि भ्रामक ठरवत सर्वत्र नाकारले जात होते. मात्र, हेडगेवार यांचा जन्मच या नियत कार्यासाठी झाला असल्याने त्यांनी स्वतःच हे शिवधनुष्य उचलण्याचा निश्चय केला. या दृढसंकल्पातूनच १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी, "आजपासून संघ सुरू करीत आहोत," या साध्या निवेदनातून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
१९४० साली डॉक्टरांचे निधन झाले, तो पर्यंत त्यांनी संघ वाढवण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. त्यांच्या अखेरच्या आजारपणात त्यांच्या पाठीतील पाणी काढताना अक्षरशः पाण्याची धार लागली होती, असे सांगितले जाते. कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय, आणि इंग्रज तसेच स्वकीयांचा विरोध असतानाही, त्यांनी अखंड भारतभर संघटनेचे कार्य प्रस्थापित केले. त्यामुळेच त्यांचे संघ शिक्षा वर्गातील शेवटचे उद्गार होते – ‘मी हिंदू राष्ट्राचे लघुरूप पाहत आहे.’
प्रारंभीचे स्वयंसेवक आज उच्चशिक्षित, पदवीधर झाले. परंतु डॉक्टर हेडगेवार ह्यांच्या ‘ये हृदयीचे ते हृदयी’ ध्येय संक्रमित करण्याच्या पद्धतीमुळे हे सर्वजण देशासाठी, संघटनेसाठी समर्पित झाले, त्यांच्या हृदयात हिंदू समाजासाठी समर्पणाचे बीज रोवले होते. जगाच्या इतिहासात अशा प्रकारे एका ध्येयवेड्या व्यक्तीने हजारो समर्पित कार्यकर्ते घडवले, याचे उदाहरण सापडणे कठीण आहे. त्यांच्या परिसस्पर्शाने अनेक ‘परीस’ निर्माण झाले. हिंदू समाज संघटनेची आवश्यकता अनेकांनी मान्य केली होती, पण संघटनेसाठी शाखेची कार्यपद्धती त्यांनी विकसित केले. शाखा हे संघटनात्मक शास्त्र होते, जिथे छोट्या-छोट्या गोष्टींतून मोठे धडे दिले जात. त्यामुळे आज १०० वर्षांनंतरही संघाच्या कार्यपद्धतीत कुठलाही बदल संघाच्या मूळ विचाराशी पूर्णतः सुसंगत वाटतो. हिंदू संघटन आणि भारताला परमवैभवाला नेण्याचे ध्येय त्यांनी स्वयंसेवकांसमोर ठेवले, पण ते फक्त भाषणांपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या संघटनेमागील तत्त्वज्ञान कुठेही लिखित स्वरूपात आढळत नाही. मात्र, संघ स्थापनेनंतरचा त्यांचा प्रत्येक क्षण हा संघटनेचा नवीन सिद्धांत, नवा धडा आणि प्रशिक्षणाचा एक भाग ठरला. त्यामुळे संघ स्थापनेनंतरची त्यांच्या आयुष्यातील शेवटची १५ वर्षेच त्यांच्या हिंदू टनेवरील विचारांचे आणि भारताच्या परमवैभवाविषयीच्या दृष्टिकोनाचे प्रत्यक्ष भाष्य होते. डॉ. हेडगेवार यांनी केवळ भाषणांवर भर दिला नाही, तर ते स्वतः संघटनेच्या कार्यात झोकून गेले. त्यामुळे त्यांचे जीवनच हिंदू समाज संघटनेवरील भाष्य ठरले. संवाद कौशल्य आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा उत्तम उपयोग त्यांनी संघटन घडवताना केला. विविध वयोगटांतील आणि सामाजिक स्तरांतील लोकांशी संवाद साधून त्यांनी त्यांना एका ध्येयाने प्रेरित केले. संघटन करण्यासाठी नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडणे आवश्यक आहे, हा मूलमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे, प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्त्यांच्या मनात विजिगीषु वृत्ती वास करत होती. ह्याच जिद्दीची प्रेरणा समाजात संक्रमित झाली आणि "गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका" या मानसिकतेपासून "गर्व से कहो, हम हिंदू हैं!" या आत्मविश्वासाकडे समाजाची वाटचाल सुरू झाली. हे परिवर्तन डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनानंतरही सुरू राहिले, आणि हेच त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे विलक्षण लक्षण म्हणावे लागेल.
अविचल निष्ठा हे त्यांच्या जीवनाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. अनेक वेळा तात्कालिक चळवळींत भाग घेण्याचे प्रसंग आले, परंतु संघटनाच्या मूलभूत कार्यावर त्यांचे लक्ष ढळू दिले नाही. त्यामुळे आजही संघाच्या नेतृत्वाने मूळ ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याचा आदर्श कायम ठेवला आहे.
डॉ. हेडगेवार यांचे मानवी संबंधातील समज आणि संघटन कौशल्य अद्वितीय होते. प्रत्येक माणसामध्ये असलेल्या चांगुलपणाला जागवून, त्याचा उपयोग संघटनासाठी आणि समाजहितासाठी कसा करता येईल, यावर त्यांनी भर दिला. भगवे वस्त्र न परिधान करता त्यांनी सन्यासी वृत्ती अंगीकारली आणि हजारो स्वयंसेवकांना प्रेरित केले. अशा या महापुरुषाचे चरित्र एका लेखात सामावणे कठीण आहे. आमच्या पिढीने त्यांना पाहिले नाही, पण त्यांच्या अनुयायांनी आम्हाला ती अनुभूती त्यांच्या आचार-विचारांतून दिली. ही अनुभूती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे आणि संघ १०० वर्षांची वाटचाल करत आहे.
संघाची अनुभूती घेतली तर डॉ. हेडगेवार यांना अनुभवता येईल. संघाला शताब्दीचा अभिमान आहे, पण डॉक्टरांनी बिंबवलेल्या ध्येयपूर्तीसाठी अजूनही प्रवास बाकी आहे. त्यांच्या जन्मदिनी आपण अधिक दृढ संकल्प करून समाज संघरूपी करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग देऊया !
रवींद्र मुळे.
(लेखक विविध सामाजिक विषयांचे अभ्यासक, वक्ते आणि ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आहेत)