एकोणिसाव्या शतकाच्या अगदी पूर्वार्धात जे प्रबोधनपर्व सुरू झाले ते एका अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येऊन पोहोचते. या संपूर्ण प्रबोधनपर्वातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे राजर्षी शाहूमहाराज होत. उणेपुरे ४८ वर्षांचे आयुष्य शाहू महाराजांना लाभले. या आयुष्यामधील सुमारे २८ वर्षांची त्यांची कारकीर्द सामाजिक कार्यांची होती. वास्तविक महाराजांचा कालखंड हा समाजसुधारणांना अनुकूल असा मुळीच नव्हता. महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यशकट हाकता हाकता जो समाजसुधारणांचा एक आवेग उत्पन्न केला तो खरोखरच आश्चर्यमुग्ध करणारा असा आहे. समाजसुधारक राष्ट्रपुरुषांचे चरित्र अवलोकन करताना त्या काळातील पार्श्वभूमीसुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे. महाराजांच्या कालखंडात आणि त्यापूर्वीच्या कालखंडातही समाजसुधारणेचे जे प्रयास झाले त्यांचा प्रामुख्याने चळवळी, आंदोलने आणि संघटनात्मक प्रयास असा उल्लेख करता येईल. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेला विरोध केला तेव्हापासून ते अगदी राजर्षी शाहूंनी ५० टक्के आरक्षणाचे धोरण जाहीर केले तेथपर्यंत हा समाजसुधारणेचा कालखंड अतिशय वेगवेगळ्या आवर्तांमधून गेला आहे. या काळातील समाजसुधारणेच्या विविध चळवळींशी उदा. प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज यांच्याशी आपण परिचित आहोतच. या सर्व संस्थांना एक संघटनात्मक बांधणी प्राप्त होत होती आणि समाजसुधारणांच्या दृष्टीने एक वातावरण तयार केले जात होते. याच वातावरणातील शाहूमहाराज हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
शाहूमहाराजांचे प्रतिमान (मॉडेल) एका अर्थाने वेगळे होते; ते खरोखरच अभूतपूर्व असे होते. शाहूमहाराजांकडे राज्याधिकार असल्यामुळे त्यांना एक मोठा विशेषाधिकार (प्रिव्हिलेज) प्राप्त झाला होता. अशा प्रकारचा विशेषाधिकार अन्य समाजसुधारकांना प्राप्त झालेलॆट नव्हता. त्यामुळे त्यांना आपल्या आंदोलनासाठी प्रतिकूलतेच्या काळात धार उत्पन्न करावी लागली होती. शाहूमहाराजांच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे होती. त्यांच्या समोर अशी द्विधा परिस्थिती होती की राजनिष्ठा बाळगायची किंवा राजद्रोह करायचा!! कारण शाहूमहाराज हे ब्रिटिशांचे संस्थानिक होते. त्यांच्या अनेक नियमांचे आणि बंधन महाराजांवर होते. तरीही महाराजांच्या मनात स्वातंत्र्याची एक ऊर्मी जागृत होती. हे त्यांच्या जीवन चरित्रावरून आपल्या लक्षात येते. राजर्षीचा क्रांतिकारकांशी कधी छुपा तर कधी उघडही संबंध आलेला होता. वेदोक्त प्रकरणाच्या पूर्वी त्यांची टिळकांविषयी भूमिका आणि टिळकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी दिलेला समर्थ पाठिंबा हा संदर्भही आपण पाहिला पाहिजे. योगी अरविंदांच्या बद्दल राजर्षीना ममत्व होते, तसेच स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या आध्यात्मिक चळवळीबद्दलही त्यांच्या मनामध्ये सक्रिय आदर होता. हा सर्व त्या द्विधा परिस्थितीचा एक भाग म्हणता येतो. त्यामुळे राजनिष्ठा आणि राजद्रोह अशा द्विधेतील एका अर्थाने निखाऱ्यावरून वाटचालीचा भाग शाहूमहाराजांच्या जीवनपटात आपणास आढळतो.
शाहूमहाराजांनी आपल्या समाजसुधारणांचा केंद्रबिंदू जो मानला आहे तोच केंद्रबिंदू अन्य समाजसुधारकांच्या कार्याचाही राहिला आहे, आणि हा केंद्रबिंदू म्हणजे शिक्षणप्रसार. राजर्षी शाहूमहाराजांनी सर्व प्रकारच्या जाति-जमातींसाठी विद्यार्थी वसतिगृहे काढली आहेत. बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली झाली पाहिजेत हाच त्यांचा हेतू होता. इतरही समाजसुधारकांच्या बाबतीत हाच आग्रहाचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. शिक्षणसंस्थांच्या विषयीही त्यांनी मोठ्या गांभीर्याने विचार केला होता. १८८४ मध्ये पुण्यात डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर हे या सोसायटीचे संस्थापक होते. नंतरच्या कालखंडात शाहूमहाराजांनीही शिक्षण संस्था सुरू केल्या.
हिंदू समाज त्या कालखंडात जातीपातीच्या रोगाने ग्रस्त झालेला होताच आणि आजही यातून त्याची पूर्णांशाने मुक्तता झाली आहे असे म्हणता येत नाही. त्यामुळे शिक्षणाची वाटणीही तेव्हा जातीनिहाय अशीच झाली होती. जितक्या प्रमाणात तथाकथित वरच्या जातींना शिक्षणाची दारे खुली होती तितक्या प्रमाणात अन्य मागास जातींना शिक्षणाची सुविधा प्राप्त नव्हती. केवळ १५-२० वर्षांच्या कालखंडात राजर्षीनी २०-२२ विद्यार्थी वसतिगृहे अठरापगड जातीतील लोकांसाठी सुरू केली. त्या वेळी समाजात अशीही भावना होती की केवळ ब्राह्मण समाजातील विद्यार्थीच बोर्डिंगात राहून आणि माधुकरी मागून आपले शिक्षण घेऊ शकतात, पण पुण्याच्या शिवाजी बोर्डिंगमध्ये मराठा समाजातील विद्यार्थीसुद्धा माधुकरी मागून शिक्षण घेत होते.
शाहूमहाराजांनी कोल्हापुरामध्ये अशा पद्धतीने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीचीही जोड दिली आणि माधुकरी मागून शिक्षण घेता येईल अशीही व्यवस्था लावून दिली. वसतिगृहांच्या एका मालिकेचे उदाहरणच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. साळी, माळी, कोष्टी, नाभिक या सर्व समाजाकरिता वसतिगृहे होती. आज जरी आपल्याला हे जातीनिहाय असे वाटत असले तरी ती काळाची गरज होती, कारण तेव्हा सर्व व्यवहार जातीपातीवरच आधारित होते. गावात बलुतेदारी होती आणि बलुतेदारांची मुले आपापल्या गावात राहून शिक्षण घेऊ शकत नव्हती, त्यामुळे त्यांच्यासाठी वसतिगृहांची आवश्यकता होती. नंतरच्या काळातसुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशाच प्रकारे वसतिगृहांची मालिका यशस्वीपणे चालविल्याचे आपणास दिसते. असा विचार करण्यात शाहूमहाराजच अग्रस्थानी होते. निदान महाराष्ट्रापुरता विचार करता तरी आपणास असेच आढळते. महात्मा जोतिबा फुले यांचा प्रबोधनाचा वारसा पुढे नेत शाहूमहाराजांनी माणगावच्या परिषदेत तो डॉ. आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. १८२७ ते १९२७ असा एक शतकाचा कालखंड आपण पाहू शकतो. १८२७ म्हणजे महात्मा फुले यांच्या जन्माचा कालखंड आणि १९२७ हा चवदार तळे सत्याग्रहाचा कालखंड होय. १९२० सालच्या माणगाव परिषदेत डॉ. आंबेडकरांकडे वारसा सोपविताना शाहूमहाराजांनी त्यांच्याबद्दल मोठ्या अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या. १९२२ साली शाहूमहाराजांचे निधन झाले. आणखी पाच वर्षांचे आयुष्य जर त्यांना मिळाले असते तर १९२७ सालच्या चवदार तळे सत्याग्रहाचे स्वरूप काय राहिले असते असा विचार मनात डोकावल्याशिवाय राहात नाही. इतिहासाचा संदर्भच कदाचित बदलला असता असे महाराजांचे कर्तृत्व होते.
धनंजय कीर यांनी 'राजर्षी शाहू छत्रपती' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असा उल्लेख केला आहे की, खरोखर बुद्धानंतर भारतात राजर्षी शाहू हाच असा एक राजा होऊन गेला की जो हरिजन, गिरीजन यांच्या पंक्तीस प्रेमाने, निर्भयपणे व उघडपणे जेवला. थोडया वेगळ्या संदर्भात विचार केला तर काय दिसते? भगवान बुद्ध यांनी राज्यत्याग केला होता. समाजातील दुःखे त्यांना दिसली होती. त्यामुळे मानवप्राण्याच्या कल्याणासाठी पुढे त्यांनी एका नवधर्माची स्थापना केली. त्यांना अनुयायी भिक्षू मिळाले. त्या वेळच्या तथाकथित ब्राह्मणवादी अहंकाराला त्यांनी विरोध केला. परमेश्वराची आळवणी करण्यात असलेल्या जाचक उतरंडीला विरोध केला. शाहूमहाराजांनी राज्यत्याग केला नाही, पण सामाजिक चळवळीला आणि समाजसुधारकांना राजाश्रयाचे एक वलयांकित समर्थन प्राप्त करून दिले. त्या कालखंडात आवश्यक असणाऱ्या एका नवधर्माचा पुनरुच्चार शाहूमहाराजानी केला. अशा अर्थाने राजर्षी शाहूमहाराज एका सर्वस्पर्शी समाजपरिवर्तनाचे उद्गाते आहेत, ज्यामध्ये आपणास १९ व्या आणि २० व्या शतकाच्या कालखंडाचे अद्भुत मिश्रण पाहावयाम मिळते. कालखंड बदलतात, संदर्भ बदलतात, परंतु त्या संदर्भामध्ये जे शाश्वत तत्त्व असते. त्याच्या आधारावर कामे सुरू राहतात आणि अशा शाश्वत तत्त्वाचा शोध आपणास अशा महापुरुषांच्या जीवनातील छोट्यामोठ्या घटनाप्रसंगांतून घेता येतो.
समाजसुधारक म्हणून न्यायमूर्ती रानडे असतील, महात्मा जोतिबा फुले असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, परंतु समाजसुधारणांच्या बाबतीत एक सर्वव्यापकता शाहूमहाराजांच्या जीवनामध्ये आपणास अनुभवास येते.
समतायुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी सामाजिक समरसतेची गरज आहे. मात्र सामाजिक सन्मान हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. अपेक्षित समाजघटकाला भौतिक सुविधा प्राप्त झाल्या असतील, परंतु सामाजिक सन्मान मिळाला आहे का? त्याच्या अभावी समरसतेला काही अर्थ उरणार नाही. समतायुक्त समाजाच्या बरोबर भौतिकतेच्या अर्थातून शोषणमुक्त समाजाचीही निर्मिती अभिप्रेत आहे. अशा अर्थाने समतायुक्त समाज व त्याबरोबर भौतिक दृष्टीने प्रगतिशील शोषणमुक्त समाज या दोन्ही गोष्टींचा एक सुंदर मिलाफ आपणास शाहूमहाराजांच्या चरित्रातून आढळून येतो.
शाहूमहाराजांचा विदेशातही प्रवास झालेला होता. तेव्हा त्यांची दृष्टी अशी होती की तेथे ज्या चांगल्या गोष्टी आढळतील त्यांचा उपयोग आपल्या देशातील समाजसुधारणांसाठी किंवा भौतिक सुधारणांसाठी करता आला पाहिजे. चहा-कॉफीची लागवड इकडच्या भागात दक्षिण महाराष्ट्रात होऊ शकते याची कल्पना त्या कालखंडात कोणालाही आलेली नसेल. शेतीविषयक अनेक प्रयोग केले. दुष्काळाच्या कालखंडात दुष्काळ निवारणासाठी तात्कालिक विचार न करता दीर्घसूत्री पद्धतीने दुष्काळनिवारण कसे करता येईल याचा विचार केला. त्यातून धरणाचे काम उत्पन्न झाले. आजही कोल्हापूरकरांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत नाही. उद्योगनिर्मिती कशी करायची, स्वयंरोजगाराच्या आधारावर माणसाने स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं असा सर्व प्रकारचा आग्रह शाहूमहाराजांच्या जीवनपटात आपल्याला सहजगत्या पाहायला मिळतो.
ब्रिटिशांनी त्या कालखंडात एक तथाकथित उदारमतवाद आणावयास सुरुवात केली होती. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रभावही वाढीस लागला होता. भारतातील समाजसुधारकांना मिशनऱ्यांचा पाठिंबाही मिळालेला आपणास दिसतो. सनातनवाद्यांनी निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांचे वलयसुद्धा दुर्दैवाने याच कालखंडात आपल्याला आढळते. विधवा विवाह करावा की नाही, बाल विधवांचे केशवपन करावे की नाही अशा प्रश्नांवर सनातनवादी आणि सुधारणावादी यांच्यामध्ये मोठा बाद उसळला होता. ते एक आंदोलनाचे मोठे पर्वच आपल्याला पाहावयास मिळते. शाहूमहाराजांनी मात्र या सर्व गोष्टींचा अचूक वेध घेतलेला आढळतो.
शाहूमहाराजांनी माणगाव परिषदेतच घोषणा केली होती, माझ्या राज्यात मी महार वतने रद्द करून दाखवीन. महार वतने खालसा करण्याची गरजच निर्माण झाली होती कारण या वतनाच्या मोबदल्यात अतिशय हिणकस पद्धतीची कामे करून घेतली जात होती. स्वाभिमान जागृत करण्यासाठी महार समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करण्याची आवश्यकता होती. शाहूमहाराजांनी हे महान कार्य करून दाखविले.
शाहूमहाराजांचे व्यक्तिमत्त्व वादळी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समाजाची भौतिक प्रगती आणि समरसतेचा उद्गम यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. सतत चर्चेत राहणारा आरक्षणाचा विषय पाहू. शाहूमहाराजांच्या काळातील शासकीय कार्यालयात मोठ्या संख्येने ब्राह्मणवर्ग नोकरीत असायचा. मात्र ब्राह्मणवादाच्या भूमिकेतून अहंकार बाळगून त्यांचे जे अन्य जातींशी वर्तन व्हायचे त्याला महाराजांनी ठामपणे विरोध दर्शविला होता. एखाद्या माणसाचे कर्तृत्व हे जातीनिहाय असू शकत नाही. जन्माधिष्ठित उच्चनीचतेच्या समजुतीमुळे कुणाला ना कुणाला पीडेचा अनुभव आला होता आणि ज्यांनी असा अनुभव घेतला होता ते काही कर्तृत्वाने कमी नव्हते, मात्र त्यांना संधी मिळत नव्हती. त्यांना समान संधी प्राप्त करून देणे गरजेचे होते. त्यासाठी शाहूमहाराजांनी ५० टक्के आरक्षणाची कल्पना प्रत्यक्षात आणली. मागासवर्गीयांनी आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीत शिरकाव करावा आणि पुढे मात्र आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करावी, अशी शाहूमहाराजांची कल्पना होती. अशा रीतीने समाजसुधारणांच्या बाबतीत सक्रिय पाठिंबा महाराजांनी दिला.
आणखी एक गोष्ट म्हणजे वंचितांचे दुःख काय असते याचा अनुभव प्रत्यक्ष राजा असूनही महाराजांना घ्यावा लागला होता. त्यांच्या कालखंडात वेदोक्त प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रभरातच मोठे वादंग निर्माण झाले होते. पंचगंगा नदीवर राजाने स्नान करतेवेळेस वेदोक्त मंत्र म्हणण्याचा प्रघात असताना छत्रपतींना 'शूद्र' संबोधून त्या वेळी पुराणोक्त मंत्र तेथील ब्राह्मणांकडून म्हणण्यात आले. त्यावेळी केवळ आत्मसन्मानाला इजा पोहोचते. यामुळे नव्हे तर येणाऱ्या भावी पिढ्यांनाही वेदोक्ताचा अधिकार आहे, अशी भूमिका घेऊन छत्रपतींनी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. लोकमान्य टिळकांनी वेदोक्त प्रकरणी येतलेल्या भूमिकेचे परीक्षण वेगळ्या अंगाने करावे लागेल. 'केसरी' मधून त्यांनी शाहूमहाराजांना जो सल्ला दिला होता तो वादंगाच्या आवर्तात उठला होता, दुर्दैवाने आज त्याच गोष्टींचा संदर्भ पुढे आणला जातो. या दोन्ही महापुरुषांची महानता फुले-आंबेडकर शाहूमहाराज यांची नामावळी रात्रंदिवस जपणाऱ्या मंडळींच्या लक्षात आलेली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. केवळ राजकारणाच्या भूमिकेतूनच वादंग निर्माण करण्याचे काम आज चालू आहे. स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र सांगितले जाणार नाहीत असे ब्राह्मणाने शाहूमहाराजांना बजावले होते.
एका वेगळ्या संदर्भात २५० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आपणास दिसते. २५० वर्षांपूर्वीचा संदर्भ असा की शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळीही अशाच स्वरूपाचा प्रश्न उभा केला गेला होता. भोसले घराणे शूद्रांमध्ये येते की क्षत्रियांमध्ये असा तो प्रश्न होता. पराक्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा हा ब्राह्मणवादी अहंकारच होता. या अहंकाराच्या वरवंट्याखाली प्रत्यक्ष राजालादेखील आणते गेले. त्यालादेखील वगळायचे नाही ही अहंकारी वृत्ती होय. उपनयन झाल्याशिवाय गादीवर बसता येणार नाही असे शिवाजीमहाराजांना सांगण्यात आले. उपनयनाचा अधिकार कुणाला असतो, वेदमंत्रांचा अधिकार कुणाला असतो अशा प्रश्नांचे एक दुर्दैवी आवर्त समाजापुढे उत्पन्न झाले होते. आधुनिक कालखंडात याचा फारसा विचार कुणी करीत नसले तरी त्या कालखंडात याचा मोठा वादंग माजला होता. संपूर्ण जीवनामध्ये शाहूमहाराजांनी कधीही धर्माची मोडतोड केली नाही. धर्माचा त्यांनी अगदी यथार्थ म्हणता येईल असाच अर्थ लावला होता. समाजाची धारणा करतो तो धर्म अशा अर्थाने समाजधारणेकरिता सर्व समाजघटकांचा सहभाग सन्मानपूर्वक मिळविला पाहिजे आणि सर्वांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. नंतरच्या कालखंडात शाहूमहाराजांनी बहुजनवर्गांतील मराठा समाजातील मुलांना वेदोक्ताचे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विद्यालयही सुरू केले होते. मात्र महाराजांनी कुठेही प्रतिशोधाची भावना ठेवली नव्हती आणि असे सर्वच समाजसुधारकांच्या बाबतीत आपणास म्हणता येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मनात आणले तर संपूर्ण समाजाचे मी वाटोळे करून टाकीन मात्र त्यामुळे इतिहासात 'समाजद्रोही' म्हणून माझी नोंद होईल, यासाठी मी असे कधीही करणार नाही. डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतर प्रकरणाच्या वेळचे संदर्भ पाहता आपल्या लक्षात असे येते की त्यांना तसे करणे अशक्य मुळीच नव्हते. मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनीही त्यांना आपापल्या बाजूस ओटण्याचा प्रयत्न चालविला होता त्यावरून हे सहज लक्षात येते, परंतु डॉ. आंबेडकरांनी जे काही सोसले त्याबाबत प्रतिशोधाची भावना त्यांच्या मनात मुळीच नव्हती. हा समाज माझा आहे, या समाजावर माझे प्रेम आहे ही भावना त्यांच्या मनात होती.
शाहूमहाराजांच्या काळात भारतात काही कमी संस्थाने नव्हती. महाराष्ट्रातही संस्थाने होतीच. मात्र बडोदा येथील संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्यासारखा अपवाद वगळता अन्य संस्थानिकांनी त्यांच्या संस्थानांत विविध सामाजिक समस्या असताना समाजसुधारणेच्या दृष्टीने काही प्रयत्न केल्याचे आढळत नाही. तसे इतिहासात वाचायलाही मिळत नाही. कुठेतरी छोट्या-मोठ्या गोष्टी तुरळक असतील. ब्रिटिशांच्या मेहरनजरेवरती आपले राज्य अवलंबून आहे असे मानून सर्व संस्थानिक ब्रिटिशांच्या मनधरणीत गुंग होते आणि आपापली संस्थाने चालवीत होते. मात्र शाहूमहाराजांनी समाजसुधारणांकडे लक्ष पुरवून अद्वितीय कार्य केले आहे.
राष्ट्रवाद आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राष्ट्र अस्तित्वात आहे, परंतु समाजसुधारणा नाहीत. समाजातील जातीपातींनी यादवी माजविली असून आपापसात भिंती उभ्या केल्या आहेत, असे चित्र प्रखर राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी कधीही अनुकूल होऊ शकत नाही. म्हणून शाहूमहाराजांनी राष्ट्रवाद आणि समाजसुधारणा यांचा विचार अतिशय योग्य पद्धतीने केल्याचे दिसून येते. १५ ऑगस्ट १९२० साली जी आर्य क्षत्रिय परिषद भरली होती तेव्हाच्या त्यांच्या भाषणातील एका छोट्या परिच्छेदातून हे आपल्या लक्षात येते. शाहूमहाराज म्हणाले होते 'ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजाची उन्नती करण्याची काळजी वाहणे हे योग्यच आहे, परंतु त्या समाजाच्या बाहेरही एक फार मोठा समाज आहे. त्याचीही सेवा आपण केली पाहिजे. म्हणून जातीचा अभिमान मर्यादित असावा. आपण सारे हिंदी आहोत. देशाची उन्नती करण्याची जबाबदारी आपल्याबर आहे, याची विस्मृती होऊ देता कामा नये. थोडक्यात, जात्याभिमान हा राष्ट्रकार्यांस पोषक असावा, राष्ट्रसेवा नजरेआड करणारा नसावा.
ज्या कालखंडात संपूर्ण समाज जातीपातीच्या अभिमानाने ग्रस्त झाला होता त्या काळातच राजर्षी शाहूमहाराजांनी असे विचार मांडलेले आहेत. राष्ट्रसेवा, राष्ट्रक्य आणि जात्याभिमान यातील संबंध त्यांनी चांगल्या प्रकारे उलगडून दाखविला आहे. तेव्हा राष्ट्रवाद आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.
महात्मा फुले यांनीही वेदांना नाकारले होते. म. फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये वेदांना फारसे महत्त्व दिलेले नव्हते. फुले यांनी ब्राह्मणांचे कसब ओळखून शेतकऱ्यांचा आसूड ओढण्याचे काम केले होते. ईश्वराधिष्ठित समाजाची कल्पना मांडून सर्व समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न प्रार्थना समाजाने केला होता. वेदपठणाचा अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे असे आर्य समाजाचे म्हणणे होते. त्यासाठी महर्षी दयानंद यांनी एक मोठी चळवळ सुरू केली होती. शाहूमहाराजांना अशा सर्वच समाजसुधारकांबद्दल योग्य तो आदर होता. मात्र त्यांनी आपले कार्य करताना चांगल्या गोष्टींचा समावेश करून घेतला होता. त्यांनी एका अर्थाने वेदांनाही चांगले स्थान दिले होते. अपौरुषेय वेदांवर कुणा एकट्याचा अधिकार नाही. शाहूमहाराजानी क्षात्र जगद्गुरूचे पीठ उत्पन्न केले, वेदशाळा स्थापन करून बहुजन समाजातील मुलांना वेदोक्त प्रकारे पौरोहित्य करण्याचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. एक प्रकारे तेव्हा झालेल्या सर्व समाजसुधारणांच्या चळवळीचे इंद्रधनुषी मिश्रण आपल्याला शाहूमहाराजांच्या कार्यात दिसते. अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रत्यक्ष राजाने कार्य करणे यात एक औचित्याचा भाग आहे. अस्पृश्य समाजातील गंगाराम कांबळे याला पाण्यावरून मारहाण करणान्यांना स्वतः शासन करून ते थांबले नाहीत तर स्वयंरोजगारासाठी त्याला हॉटेल काढून दिले. वा हॉटेलमधील चहा केवळ ते स्वतः पीत असत अन् इतरांनाही पाजत असत. हे एक उदाहरणच आपल्याला फार मोठा वस्तुपाठ घालून देणारे आहे. शाहूमहाराजांनी फासेपारध्यांनाच राखणदार नेमले. चोरी करून पोट भरणे हा त्यांचा धंदा होता पण त्यांनाच पोलिसाचे कार्य सोपवून जगण्याचा सन्माननीय मार्ग उपलब्ध करून दिला. पण आजही कुठे कुठे आपल्याला असे आढळते की गावात चोरी झाल्यास भटके-विमुक्त समाजातील व्यक्तीला पोलीस ताब्यात घेतात. स्त्री, पुरुष, लहान मुले असा कोणताही फरक केला जात नाही. पण शाहूमहाराजांनी या समाजावर विश्वास टाकून त्यांना सन्मानाने जगायला लावले होते. शोषणमुक्तीबरोबर समरसतायुक्त व्यवहार जर साधायचा असेल तर ज्यांचा सन्मान हिरावून घेतला गेला आहे अशा समाजालाही त्याचा आत्मसन्मान प्राप्त करून दिला पाहिजे हे कार्य शाहूमहाराजांनी आले, पण ते करत असताना उपकारकर्त्याची भावना बाळगली नाही. स्वतःचे कुलदैवत असलेल्या भवानीमातेच्या मंदिरात महाराचे पोर घेऊन त्यांनी प्रवेश केला होता. झालेल्या विरोधाला जुमानले नव्हते. मंदिरप्रवेश, वसतिगृह सुरू करणे, मुलींच्या विवाहबद्दल कायदाकानून करण्याचा प्रयत्न करणे आदी सर्व गोष्टी पाहून असे वाटते की प्रबोधनपर्व संपून त्याचे रूपांतर क्रांतिपर्वात होण्याची ती घटका असावी. हा शब्दच्छल नाही. कारण प्रबोधन ही क्रांतीची पहिली पायरी असते. एस. जी. वेल्स या समाजशास्त्रज्ञाने समाजपरिवर्तनाचे असे टप्पे सांगितले आहेत, पहिला म्हणजे मोबिलायझेशन (प्रबोधनकार्य), दुसरा म्हणजे कन्सॉलिडेशन (एकत्रीकरण) आणि तिसरा म्हणजे कन्फ्रेटेशन (संघर्ष करणे) हा होय. त्यामुळे असे म्हणता येईल की प्रबोधनकार्यामुळे 'मोबिलायझेशन' झाले व शाहूमहाराजांनी 'कन्सॉलिडेशन' केले आणि डॉ. आंबेडकरांनी 'कन्फ्रंटेशन' केले.
मोबिलायझेशन आणि कन्सॉलिडेशन हे नेहमी दीर्घसूत्री असते परंतु कन्सॉलिडेशनचा काळ कमी असतो, कारण मोबिलायझेशनमुळे एक मानसिक भूमिका तयार झालेली असते आणि पुढे संघर्षांकरिता एक पार्श्वभूमी - एक पाया (फाउंडेशन) चांगल्या पद्धतीने तयार झालेला असतो. डॉ. आंबेडकर आणि शाहूमहाराज खांद्याला खांदा लावून समाजपरिवर्तनासाठी कार्यरत राहिले असते, परंतु महाराजांचे निधन झाल्यामुळे असे चित्र दिसू शकले नाही. तरीही या तीन टप्प्यांच्या कालखंडाकडे पाहिल्यास शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा अर्थ आपल्या लक्षात येतो. शाहूमहाराजांनी कोणती त्रिसूत्री दिली हे शब्दबद्ध करू शकत नसलो तरी या त्रिसूत्रीचा पाया त्यांचे कार्य हाच होता हे मात्र निश्चित आहे. आजच्या काळात मात्र जातीपातीचेच राजकारण अधिक घट्ट होते आहे असे दिसते. इतिहासाची पुनरावृत्ती करण्यापलीकडे आपण त्यापासून काही शिकत नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. शाहूमहाराजांचा कालखंड तसा फारसा दूरचा असे नाही. १९२२ मध्ये त्यांचे निधन होण्यापूर्वी दिल्लीत भरलेल्या भारतीय अस्पृश्य परिषदेला अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना जणू त्यांनी त्यांच्या स्वप्नातील भारतीय समाजाचाच विषय मांडला असे मला वाटते. शाहूमहाराज या परिषदेमध्ये असे म्हणाले होते की 'मला तुम्ही अध्यक्षपद देऊन माझा गौरव केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दुसऱ्यावर भरवसा ठेवून बावरू नका. स्वयंसिद्ध व्हा, स्वाभिमान जागृत करा. समतेची चळवळ ही स्वाभिमानाची चळवळ आहे. कोणीतरी आपला उपकारकर्ता असावा अशा स्वरूपाची ही चळवळ नाही. आपला उद्धार आपणच केला पाहिजे. आता दलित समाजात विद्वान माणसे उभी होऊ लागली आहेत. धर्मरूढी आणि समाजरूढी यांची बंधने आपण झिडकारून टाकली पाहिजेत. आपली संघटना झाल्याशिवाय तरणोपाय नाही.'
असे म्हणतात की, Eternal Vigilance is the price of Liberty. या संदर्भामध्ये शाहूमहाराजांनी म्हटले आहे की 'जागेल तो जगेल.' परिषदेत बोलताना त्यांनी असेही सांगितले होते की जागेल तो जगेल ही वृत्ती आपण डोळ्यांसमोर ठेवून प्रयत्न करीत राहिलो तर आपला उद्धार होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या हाकेस 'ओ' देण्यास मी तयार आहे. तुमची अस्पृश्यता नष्ट व्हावी, इतरांच्या बरोबरीने तुमचे जीवनही सुखाचे व्हावे, असे मी इच्छितो. एक राजा ब्रिटिशांच्या साम्राज्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी जाऊन कार्यक्रमाच्या वेळी गुप्तहेरांची पाळत असल्याची जाणीव असूनही 'जागेल तो जगेल' अशी घोषणा करतो हे तर अप्रूपच आहे. आपली जागृती आपणच करावी, आपला दीप आपणच प्रज्वलित करावा अशी भूमिका जाहीरपणे त्या कालखंडात मांडणे ही सोपी गोष्ट नव्हती.
पुन्हा एकदा वेदोक्त प्रकरणाकडे थोडे गेले पाहिजे. किती दुर्दैवी पद्धतीचा होता. जातीचं विश्लेषण अनेकांनी केले आहे. जॉन स्टुअर्ट मिल यांचे भारतातील जात विवेचन करणारे एक पुस्तक आहे. जॉन स्टुअर्ट मिल यांनी त्यात वर्णव्यवस्थेचा उल्लेख केला आहे. येथील जातीचा अभ्यास पाश्चात्त्यांनी आपल्यापेक्षा चांगला केला आहे. वर्ण कसे उत्पन्न झाले? त्या वर्णामधला अहंकार कसा उत्पन्न झाला? क्षत्रियांना नमवता येत नाही म्हणून तथाकथित ज्ञानाच्या आधारावर त्यांना नमवण्याचा उच्च कसा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टींचे वर्णन पुस्तकात आहे. 'राजर्षी शाहूमहाराज आणि माणूस' हे पुस्तक सूर्यवंशींनी लिहिले आहे. त्या पुस्तकात या सगळ्या गोष्टीचा उल्ले आहे. आपल्याला धनंजय कीर यांच्या पुस्तकातही वेदोक्त प्रकरण वाचायला मिळते.
इतिहासामध्ये एखादा प्रसंग घडतो आणि त्यातून उत्पन्न झालेले वाद आपल्याला किती महागात पडतात याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याची किंमत समाजाने मोजल्यानंतर त्यातून जे अनिष्ट उत्पन्न झालं ते दूर करण्याचे काम आपण सगळ्यांनी हातामध्ये घेतले आहे. समरसता मंच म्हणून आपण ते करतो ते तरी का करतो? उत्पन्न झालेली वावटळही बाजूला ठेवणे, न संपलेले अनिष्ट दूर करण्याचा प्रवास करणे यासाठीच. १८२४ मध्ये म. जोतिबा फुलेंनी स्वत:च्या घरातली विहीर अस्पृश्यांकरिता खुली करून दिल्यानंतर सुमारे १०० वर्षांच्या कालखंडानंतरही पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उत्पन्न होतो आहे १९२७ सालचे चित्र आपल्याला माहीत आहे. पुनः पुन्हा त्याच समस्यांकरिता लढावे लागेल. कदाचित अवगुंठने वेगळी असतील. Covers वेगळी असतील. चार पावले पुढे तर दोन पावले मागे अशा गतीने चालणाऱ्या समाजाचे चित्र आपल्याला अपेक्षित नाही. पण चित्र आपल्याला दिसत आहे. म्हणून कंबर कसून कामाला लागले पाहिजे. लो. टिळकांनी वेदोक्त प्रकरणामध्ये एक भूमिका घेतली. ज्या राजोपाध्यायांचे महाराजांनी वतन खालसा केलेले होते ते वतन व त्यांची दक्षिणा चालू 7करा असे 'केसरी' मधून टिळकांनी सांगितले. दुर्देवाने अर्थ असा लावला गेला की वेदोक्त प्रकरणामध्ये, शूद्रांना वेदांचा अधिकार नाही, पुराणोक्ताचा अधिकार आहे हेच टिळकांना म्हणायचे आहे.
शिवाजीमहाराजांना वेदोक्त प्रकरणामधून राज्याभिषेक करून घ्यावा लागला, त्याकरिता १६७७ सालचा आलेला खर्च 'एक लाख ६० हजार होन इतका होता. कुण एका ब्राह्मणाने असे सांगितले की तुम्ही सुरत लुटली त्या वेळेला काही ब्राह्मणांना मारले असेल त्याचे पापक्षालन केले पाहिजे. त्याकरिता इतके होन दक्षिणा तसेच जनावरांना मारले असेल त्याच्या पापक्षालनार्थ इतके होन, सगळे ठरवणारे तेच. कायदे त्यांनीच ठरवायचे दुर्दैवाने दुसऱ्या तथाकथित खालच्या जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाकडून काही चुका झाल्या असतील तर शासनही त्यांनीच करायचे. या सगळ्या आवर्तातून बाहेर पडण्याची आवश्यकता होती. त्यासाठी एक छोटासा झटका एका अर्थानं, 'Shock Treatment आवश्यक होती. राजर्षीनी वेद नाकारले नाहीत पण वेदांचा अधिकार सर्वांना असावा असे सांगितले. त्यावेळेला लो. टिळकांच्या भूमिकेच्या बरोबर राहणाऱ्या संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकरांचे कन्फेशन वाचल्यानंतर ही सगळीच माणसे किती मोठी होती हे आपल्या लक्षात येते. लो. टिळकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शाहूमहाराज पहिले अध्यक्ष झाले. ज्या वेळी लो. टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला, त्या वेळी शाहूमहाराजांनी टिळकांना असे म्हटले की तुम्ही या संस्थेचे संस्थापक आहात हे आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही हे अध्यक्षपद स्वीकारले. आता तुम्हीच राजीनामा देत असल्यामुळे मला त्या अध्यक्षपदामध्ये कोणत्याही प्रकारची रुची नाही. टिळकांनी त्यांना पत्र टाकून असे सांगितले की, आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व इतिहासामध्ये मौजूद आहे की, नाना वाड्यामध्ये मी ज्या वेळी पहिल्यांदा शाळा काढली तेव्हा मी हातामध्ये शेणाच्या बादल्या घेऊन जात असे. त्या ठिकाणी बहुजन समाजातील मुले-मुली शिकायला येणार होते. मीच पहिल्यांदा धोतराच्या काचा मारून शेणाने ती जमीन सारवत असे. नाना वाड्यामध्ये सुरू केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही राष्ट्रीय शिक्षणाची शाळा तर आहे, त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणासाठीची शाळा आहे. त्याच बहुजन समाजाच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे आपण लोकोत्तर राजे आहात. तुम्हाला अध्यक्षपदावर राहण्याचा बहुमान हा आपल्या कर्तृत्वामुळे प्राप्त झालेला आहे. आपण तो नाकारण्याचे काही कारण नाही.
लो. टिळक आणि राजर्षी यांनी खोटे भांडण केले नाही. प्रत्येकाची काही एक निश्चित भूमिका होती. त्या भूमिकेला त्या कालखंडात संदर्भ होता. आज राजकारण सर्वतोपरी झाले आहे. मात्र समाजसुधारणा सर्वतोपरी झाल्या नाहीत. अच्युत बळवंत कोल्हटकर हे टिळक परंपरेतले आहेत. समाजाचे भले, हित त्यांच्या डोळ्यासमोर होते. शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर ७ मे १९२२ रोजी 'संदेश' च्या अंकामध्ये कोल्हटकरांनी मृत्यू लेख लिहिला. त्या मृत्यू लेखामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की पुढारलेले लोक व मागासलेले लोक, जन्मतः जास्त अधिकारप्राप्त झालेले लोक, (प्रिव्हीलेज क्लासेस) व जन्मत: कमी अधिकार प्राप्त झालेले लोक, धर्मदृष्ट्या अग्रमान असलेले लोक व धर्मदृष्ट्या अग्रमान नसलेले लोक, सुविद्य लोक व निर्विद्य लोक, ज्ञानाचा जन्मसिद्ध हक्क असलेले लोक व ज्ञानाला पिढ्यान्- पिढ्या आचवलेले लोक, ज्ञान-व्यवसायाची दारे खुली असलेले लोक व ज्ञान व्यवसायाची दारे बंद असलेले लोक, सुशिक्षित लोक व शिक्षणाला मुकलेले लोक अथवा स्पृश्य लोक व अस्पृश्य लोक यांच्या दरम्यान जो घोर संग्राम सध्या चाललेला आहे, त्यात कनिष्ठ पक्षाचा अभिमान धरून वरिष्ठ पक्षाच्या लोकांना सळो की पळो करून सोडणारा जो कोणी आजपर्यंत असेल तर तो कोल्हापूरचा राजा रयतेचा राजा 'राजर्षी शाहूमहाराज'. धर्मकारणात आपण कोल्हापूरच्या महाराजांचा कार्यभार घेतला पाहिजे. आपण अस्पृश्यांना बजावले पाहिजे की, अनाथ होऊ नका. आम्ही तुम्हाला वर घेतो. प्रचंड ब्राह्मणेतर समाजालाही आपण आश्वासन दिले पाहिजे की, कोल्हापूरच्या महाराजांशी भांडलो कारण तेही भांडायला खंबीर होते. पण आता त्यांचे कार्य 'आमचे' झाले आहे. आता आम्ही जाहीर करतो की हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीस वेदोक्ताचा अधिकार आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती समान आहेत, सारखे आहेत, एक आहेत. अच्युत बळवंत कोल्हटकरांनी 'संदेश' मध्ये असे म्हटले आहे. मात्र वेदोक्त प्रकरणाच्या वेळचे अंक जर काढले तर ते वेगळेच सांगतात. १९२२, ७ मे चा अंक आपल्यासमोर वेगळ्या पद्धतीने येतो. ज्यांना समाजाविषयी आस्था आहे, कळकळ आहे, समाजाच्या व्याकुळतेने ते स्वतः व्याकुळ होतात त्यांच्या मनातून घटना मागे जातात व शाश्वत सिद्धांत पुढे नेण्याचा आग्रह असतो.
समाजपरिवर्तनाचे चक्र हे अशा अनेक समस्यांमधून अडत असते. परंतु ते गतिमान करत राहणे हे आपले काम आहे. हे गतिमान करण्याचे काम रयतेच्या एका लोकोत्तर राजाने केले. शाहूमहाराज क्रांतिकारकांना तुरुंगात जाऊन भेटत असत. मी ब्रिटिशांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला भेटायला येतोय असे वरकरणी भासवत असत. परंतु क्रांतिकारकांना आवश्यक साधनसामग्री शाहूमहाराज पुरवत असत. दुर्दैवाने रमेश जाधव यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना डॉ. य. दि. फडक्यांनी मात्र नेमके यांच्याविरुद्ध असे लिहिले की, ब्रिटिशांना माहिती देण्याकरिता शाहूमहाराज क्रांतिकारकांना भेटायला जात असत. कोणत्या राष्ट्रीय पुरुषाचे गुणगान करावे आणि कुणाचे नाही हे ठरवण्याचा अधिकार पुन्हा या ब्राह्मणवादी लोकांनी आपल्या हातातच घेतला आहे. या सगळ्या आवर्तांतून आपल्याला पुढे जायचे आहे. शाहूमहाराज हा या प्रबोधन कार्याच्या कन्सॉलिडेशनच्या मधल्या टप्प्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा होता. त्यांनी कन्सॉलिडेशनच्या अवस्थेला एक गती प्राप्त करून दिली. आवर्तातून पुढे जात असताना आपण हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
प्रा. अनिरुद्ध देशपांडे
(भारतीय विचार साधनाच्या सौजन्याने, 'राजर्षी शाहू - जीवन व कार्य' या पुस्तकातून)