वैदिक काळातील ज्ञानाची तेजावळे - स्त्री-शक्तीची गौरवगाथा

कधी विचार केला आहे का, की आजपासून हजारो वर्षांपूर्वी ‘स्त्रीची समाजरचनेत कौटुंबिक व्यवस्थेत भूमिका किंवा स्थान कसे असेल ?? तिने केवळ चूल आणि मूल सांभाळले नाही, तर ब्रह्मांडाच्या रहस्यांना आपल्या हाताच्या ओंजळीत पकडले होते. एखाद्या ऋषीकन्येचा मंत्रोच्चार, एखाद्या विदुषीचा आत्मविश्वास आणि एका आईचा नि:स्सीम त्याग प्रत्यक्ष अनुभवता येतो.
अंधाराचा काळ कधीच नसतो, फक्त विचारांची धूसरता असते. आपण अनेकदा इतिहासाकडे पाहताना एका ठराविक चष्म्यातून पाहतो, जिथे स्त्रियांचे स्थान केवळ पडद्याआड असल्याचे आपल्याला भासवले जाते. पण, ज्या वेदांनी या विश्वाला ज्ञानाचा प्रकाश दिला, त्या वेदांच्या ऋचा लिहिणारी लेखणी एका स्त्रीच्या हातातील होती.
भारतीय संस्कृतीच्या इतिहासात डोकावताना अनेकदा आपण एकतर्फी इतिहास वाचतो. वेदकालीन स्त्री म्हणजे केवळ परंपरेत अडकलेली व्यक्ती नसून, ती विज्ञानाची, तत्त्वज्ञानाची आणि आध्यात्मिक ज्ञानाची एक मोठी आधारस्तंभ होती.वैदिक काळाचा विचार करता आपण 'ब्रह्मवादिनी' हा शब्द वारंवार ऐकतो. ब्रह्मवादिनी म्हणजे अशी स्त्री, जिच्याकडे ब्रह्माचे, म्हणजेच अंतिम सत्याचे ज्ञान आहे. त्या काळातील स्त्रियांनी घर तर सावरलेच पण त्या सोबत त्यांनी ऋचांचे दर्शन घडवून वेदवाङ्मयाला समृद्ध केले. घोषा, अपाला आणि सूर्या सावित्री यांसारख्या विदुषी स्त्रियांनी लिहिलेल्या ऋचा आजही आपल्याला भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाच्या उंचीची साक्ष देतात. मैत्रेयीच्या 'अमृतत्वाचा' शोध घेणाऱ्या प्रश्नांचा विचार करतो, तेव्हा लक्षात येते की, त्या काळातील स्त्रियांची बुद्धिमत्ता केवळ भौतिक जगापुरती मर्यादित नव्हती, तर ती विश्वाच्या गूढ प्रश्नांची उत्तरे शोधण्याइतकी प्रगल्भ होती.राजा जनकाच्या दरबारात याज्ञवल्क्यांशी वाद-संवाद करणारी गार्गी इतिहासातील एक सोनेरी पान आहे. आजच्या काळातही एखाद्या व्यासपीठावर तर्काने आणि ज्ञानाने बलाढ्य ऋषींना प्रश्न विचारणे ही मोठी गोष्ट वाटते, ती गार्गीने हजारो वर्षांपूर्वी करून दाखवली होती. तिची विद्वत्ता त्यातून प्रकटली. तिला मिळालेले ते स्वातंत्र्य, ज्ञानाचा अधिकार हा स्त्री-पुरुषांच्या लिंगभेदाच्या पलीकडे होता.वैदिक स्त्री निसर्गाशी अत्यंत जवळ होती. ती कौटुंबिक जीवनाचा केंद्रबिंदू आणि संस्कारांची जननी होती. तिच्यातील सहनशीलता तिची ताकद होती. या स्त्रियांनी आपल्या कुटुंबाला आणि समाजाला एक दिशा दिली होती. त्या काळातील स्त्रीकडे 'दुय्यम' म्हणून पाहिले जात नव्हते, तर तिला 'सहधर्मचारिणी' म्हणून सन्मान होता. ती यज्ञाची स्वामिनी होती, ती उपदेश करणारी गुरू होती आणि ती आपल्या पतीची मार्गदर्शकही होती.
आपण आधुनिक काळात स्त्री सक्षमीकरणाबद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्याला आपल्या मुळांचा शोध घेणे गरजेचे आहे.आपल्या पूर्वजांच्या काळात स्त्रिया वेद-पुराणांचे ज्ञान आत्मसात करून समाजाला दिशा देऊ शकत होत्या.भारतीय संस्कृतीत स्त्री ही नेहमीच ज्ञानाची आणि शक्तीची देवता आहे. आपण तिच्यातील बुद्धीला आणि प्रतिभेला पुन्हा एकदा ओळखणे काळाची गरज आहे.
या स्त्रियांनी समाजाला दिशा दिली, यज्ञाची सूत्रे सांभाळली आणि घराघरातून ज्ञानाचे दिवे लावले. भारतीय संस्कृतीच्या या पाऊलखुणा आपल्याच आत्मस्वरूपाचे प्रतिबिंब आहेत. वैदिक काळातील विदुषींच्या या खुणा आपल्याच अस्तित्वाच्या केंद्रस्थानी उपजत आहेत हे जाणवते.आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या ज्ञानाच्या या वाटांवरून चालणे आपल्या मूळ चैतन्याकडे परतण्याचा ध्यास आहे. हा आत्मबोधच आपल्याला आधुनिकतेच्या गर्दीतही स्वतःचे वेगळेपण आणि वैश्विक अस्तित्व जपण्याचे बळ देत आहे.
अंजली तागडे संपादक विश्व संवाद केंद्र, पुणे
संदर्भ – वेदकालीन स्त्रीरत्ने