पुणे : विश्व हिंदू परिषदे च्या मठ मंदिर आयाम महाराष्ट्र-गोवा यांच्या वतीने दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता, मंदिरावर रोषणाई आणि भगवा ध्वजाचे विविध समाजाच्या तरुण जोडप्यांतर्फे पूजन असा त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यातील ५ हजार मंदिरात गाभारा ते अंगण असे स्वच्छता सेवा अभियान राबविण्यात येणार आहे. रविवार, दिनांक २० आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत हे अभियान संपूर्ण राज्यात होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र व गोवा धार्मिक विभाग प्रमुख संजय मुद्राळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, मंदिर अर्चक आयाम प्रमुख धनाजी शिंदे, सूर्यकांत थोरात उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, गाभारा ते अंगण या अभियानात सामील होणे बिन खर्चिक असून सेवाभाव जपणारा हा उपक्रम आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ते सुंदर, स्वच्छ असले पाहिजे ही विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. मंदिर समाजातील सर्व घटकांचे आहे. सर्वांना त्यात स्थान असून सन्मान आणि वाव देखील आहे. हा समरसतेचा संदेश सर्व दूर जाण्यासाठी आणि नवीन पिढीला मंदिरांशी जोडण्यासाठी भगव्या ध्वजाचे पूजन तरुण जोडप्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
धनाजी शिंदे म्हणाले, दिवाळी हा हिंदू धर्मामध्ये मोठा सण आहे. त्यानिमित्त आपल्या घरावर रोषणाई केली जाते, तशीच मंदिराची स्वच्छता करून मंदिरावर रोषणाई करण्याचे आवाहन राज्यातील सर्व मंदिरांना करण्यात आले आहे. आपल्या जवळच्या मंदिरात नागरिकांनी जाऊन स्वच्छता सेवा द्यावी. अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे, यासाठी महाराष्ट्र राज्याच्या चारही प्रांतात काम सुरू आहे.
महिला विश्वस्त, पुरोहित आणि भाविक या उपक्रमात पुढाकार घेत आहेत. विविध सांप्रदायाचे, संतांचे अनुयायी, पुरोहित महासंघ या अभियानात सामील झाले आहेत. मागील वर्षी ५५० मंदिरात हे अभियान राबविण्यात आले होते. त्यातून अनेक मंदिरात ‘मंदिर स्वच्छता समूह’ तयार झाले आणि काही ठिकाणी दररोज, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा स्वच्छता सेवा ते देतात.