राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाला श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यांचा परिचय करून घेणे, त्यांना समजून घेणे हा एक पैलू आहे. यानुसार त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य देखील समजून घेतले होते असे निश्चितपणे म्हणता येईल.

डॉ. आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला दिलेल्या भेटी, संघाच्या उन्हाळी प्रशिक्षण वर्गाला दिलेली भेट, तेथे मांडलेले विचार, संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या वेळी झालेल्या भेटी याबद्दल संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष भेटींमध्ये वारंवार सांगितलेदेखील आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक आदरणीय कै. दत्तोपंत ठेंगडी, संगमनेरचे कै. अण्णा बागूल, पुण्यातील कै. भास्करराव गद्रे, कै. वासुकाका खाडिलकर, पंढरपूरचे कै. डॉ. हरिभाऊ मोहोळकर, सांगलीचे कै. वसंतराव भिडे, भोरचे कै. नारायणराव मिलगीर, मुंबईचे कै. राजाभाऊ केणेकर, बाबासाहेबांनी सुरू केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्यांनी काम केले असे कै. प्रा. ठकार, संघ कार्यकर्ते आणि लेखक कै. ना. ह. पालकर अशा अनेक कार्यकर्त्यांची नावे सांगता येतील.
दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके हे विद्यार्थीदशेपासूनच बाबासाहेबांच्या कार्याशी जोडले गेले होते. पुण्यातील रात्र शाळा, असंघटित कामगारांची संघटना, पुणे नगरपालिकेतील कामगारांची संघटना, ज्या भोर संस्थानात त्यांचे जन्मगाव होते त्या भोर संस्थानातील राजकीय आणि सामाजिक कार्य यामध्ये बाळासाहेब आजीवन सक्रिय राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात भोर संस्थानाच्या मंत्रिमंडळात आरोग्य, शिक्षण तसेच अन्य खात्यांचे मंत्री, १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्यावतीने निवडून आल्यानंतर १९६१पर्यंत (मृत्यू १०/०९/१९६१) खासदार म्हणून बाळासाहेबांनी काम केले. दिवंगत बाळासाहेब साळुंके यांचे चरित्र विलक्षण प्रेरणादायक आहे. एका आदर्श लोकप्रतिनिधीचे ते चरित्र आहे. दिवंगत बाळासाहेबांनी आपल्या हयातीत १९५९ मध्ये स्वतःचे संक्षिप्त चरित्र प्रसिद्ध केले.
२०१२ मध्ये बाळासाहेबांचे "आमचं सायेब" या नावाने विस्तृत चरित्र प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकातील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२ मे १९३९ या दिवशी पुण्यात झालेल्या भेटीचा आणि त्यानंतर बाबासाहेबांनी संघाच्या उन्हाळी शिबिराला भेट दिल्याचा उल्लेख सापडतो.
दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांचे चिरंजीव श्री. काश्यपदादा साळुंके यांनी "आमचं सायेब" या पुस्तकात दिलेल्या संदर्भाच्या आधारे या भेटीचा तपशीलवार उल्लेख सापडतो. पुण्यातील भावे हायस्कूल येथे या दोन महापुरुषांची भेट झाली होती.
१२ मे १९३९ या दिवशी टिळक रोड च्या जवळ असलेल्या चिमणबागेतील प्रथितयश वकील ॲड. भाऊसाहेब गडकरी यांच्या 'प्रभातगड' बंगल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होऊन संघासंबंधी बराच वेळ चर्चा झाली. तेथे उपस्थित असलेले पुण्याचे संघचालक भाऊसाहेब अभ्यंकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले, "संघासंबंधी चर्चा तर खूप झाली; आता प्रत्यक्ष संघ पाहायला येता का ?'"

त्यावर आनंदाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिळक रस्ता ओलांडून लगेच असलेल्या भावेस्कूल मध्ये वर्ग पाहण्याकरता आले. त्यावेळी तेथे भोजनाची वेळ असल्यामुळे सर्व स्वयंसेवक आणि संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांच्या समावेत बाबासाहेबांनी भोजनाचा आस्वाद घेतला. नंतर विश्रांती आणि विश्रांतीनंतर बौद्धिक वर्गाची वेळ होती. (बौद्धिक वर्ग म्हणजे भाषण.) खरंतर डॉ. हेडगेवार यांचाच बौद्धिक वर्ग होणार होता. मात्र डॉक्टरांनी स्वतः भाषण न करता अचानक बाबासाहेबांचा उल्लेख करुन म्हटले, "आज आपल्यामध्ये परमश्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित आहेत. मी त्यांनाच भाषण करण्याची विनंती करतो." यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "मी आता काय म्हणू ? मी असेच म्हणतो परमश्रध्येय डॉ. हेडगेवार आणि बंधूंनो...." आणि त्यांनी "लष्करी शिक्षण आणि हिंदू संघटन" यावर व्याख्यान दिले. अशी आठवण भोर येथील श्री. गजाननराव मिलगिर यांनी सांगितली आहे. तर ना. ह. पालकर यांनी आपल्या रोजनिशी मध्ये श्रध्येय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणातील आषयामुळे आपण आजीवन संघ कार्य करायचे असे ठरवले - असे नमूद करुन त्या पानाच्या अखेरीस स्वाक्षरी केली आहे. तसेच ३ जानेवारी १९४० ला कराड येथील 'भवानी सायं' शाखेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली.