नारी ते नारायणी: स्त्रीशक्तीच्या जाणीवेचा प्रवास

दिल्लीतील 'विज्ञानभवन'च्या विशाल प्रांगणात ७ आणि ८ मार्च २०२६ रोजी झालेली ‘नारी ते नारायणी’ परिषद, स्त्रीत्वाच्या खऱ्या सामर्थ्याचा शोध घेणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरली. राष्ट्रसेविका समितीच्या ९० वर्षांच्या अखंड तपस्येची गाथा या परिषदेत उमटली. देशभरातील १५०० हून अधिक महिलांची उपस्थिती लाभलेल्या या परिषदेने 'प्रत्येक नारी हीच नारायणी' असल्याचा साक्षात्कार घडवला.
परिषदेचे उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते झाले. त्यांनी "निर्णय क्षमता आणि मेहनतीला कोणतेही लिंग) नसते." स्त्रीने कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या अस्तित्वाचा आणि आनंदाचा बळी देऊ नये, तर स्वतःप्रती असलेली कर्तव्येही पार पाडावीत.असे सांगितले.
राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी भारतीय संस्कृतीतील स्त्रीचे स्थान अधोरेखित केले. वराहमिहीर ग्रंथातील संहितेचा दाखला देत त्यांनी सांगितले की, भारतीय स्त्री ही उपजतच 'बावनकशी सोने' आहे. पाश्चात्य जगात १८०० च्या शतकात शिक्षणाचे अधिकार मागावे लागले, मात्र भारतात अनादी काळापासून स्त्री विद्यार्जन करत आली आहे. तिला हक्क मागावे लागले नाहीत, कारण ती मुळातच सक्षम होती.
महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी शासकीय योजनांची माहिती देताना काही गंभीर वास्तवही मांडले. शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण (माध्यमिक स्तरावर ७% आणि उच्च शिक्षणात १५% पर्यंत) चिंताजनक आहे. पदवीधर महिलांची संख्या ३८% वरून ४२% वर गेली असली, तरी त्या शिक्षणाचा उपयोग अर्थार्जन आणि समाजकार्यासाठी होणे आवश्यक आहे. "डायनिंग टेबलपासून बेर्रूमपर्यंत स्त्रीचा आवाज ऐकला गेला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
दोन दिवसांच्या मंथनातून—'मुक्ती' आणि 'स्वातंत्र्य' यातील फरक लक्षात आला. मुक्ती ही कशापासून तरी सुटका असते, पण स्वातंत्र्य हे स्वतःच्या शक्तीच्या ओळखीपासून सुरू होते. स्त्रीने स्वतःच्या मानसिक सीमा ओलांडून, भयमुक्त होऊन समाजाचे नेतृत्व करणे काळाची गरज आहे.
समारोप सत्रात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्त्रीशक्तीचा गौरव केला. सेवा, समर्पण आणि राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत नारीशक्ती श्रेष्ठ असल्याचे सांगताना "स्त्री परिवर्तनाची वाहक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विद्या, शक्ती, मुक्ती, चेतना, प्रकृती, संस्कृती, सिद्धी आणि कृती या 'अष्ट-विषयांवर' झालेले हे मंथन प्रत्येक महिलेला सकारात्मक ऊर्जा देऊन गेले. स्वतःची क्षमता ओळखून, तळागाळातील भगिनींना सोबत घेऊन प्रगत समाज घडवण्याचा संकल्प करूनच प्रत्येक 'नारायणी' या परिषदेतून बाहेर पडली.
सुनिता पेंढारकर
लेखिका या परिषदेच्या राज्य संयोजक आहेत.
व ज्ञानभारती प.महाराष्ट्र प्रांत सदस्य
New era in woman empowerment every woman will realise her value
Dr Anjali kari
30 Mar 2026 20:16