महात्मा गांधींचे संघाच्या शाखेवर ऐतिहासिक संबोधन
फाळणीच्या काळात दिल्लीतील प्रभात शाखेला दिली होती भेट; 'त्या' ऐतिहासिक संबोधनाची आठवण

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता, पण त्यासोबतच फाळणीच्या वेदना, विस्थापन आणि जातीय दंगलींच्या ज्वाळांनी दिल्ली होरपळत होती. अशा अत्यंत संवेदनशील आणि अस्वस्थ वातावरणात, १६ सप्टेंबर १९४७ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रभात शाखेला भेट देऊन स्वयंसेवकांना संबोधित केले होते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात या भेटीला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. गांधीजींच्या विचारसरणीची चौकट, त्यांचा सनातन धर्माबद्दलचा दृष्टिकोन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनकौशल्याबद्दलचे त्यांचे विचार या भेटीदरम्यान अत्यंत स्पष्टपणे समोर आले होते.
१९४८ मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर तत्कालीन सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. या कटात संघाचा हात असावा, असा संशय त्यांना होता. मात्र, पुढे न्यायालयाने सर्व आरोपांतून संघाला दोषमुक्त केले आणि बंदीही उठवण्यात आली. या कालावधीत आणि त्यानंतरच्या काळात राजकीय संघर्षातून संघाविरोधात प्रचंड वातावरणनिर्मिती झाली. त्यामुळे गांधीजी हे संघाचे पूर्णत: विरोधी होते, अशी एक सार्वत्रिक धारणा जनमानसात तयार झाली. परंतु, ऐतिहासिक वस्तुस्थिती यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. गांधीजी संघाचे कडक शिस्तबद्ध काम, स्वयंसेवकांची साधेपणाची वृत्ती आणि विशेषतः अस्पृश्यताविरोधी कार्यप्रणालीचे ते मोठे प्रशंसक होते. १९३४ मध्ये वर्धा येथील संघ शिबिराला दिलेली भेट असो वा १९४७ मध्ये दिल्लीतील शाखेत केलेले संबोधन असो, गांधीजींनी संघातील सकारात्मक मूल्यांची नेहमीच मोकळेपणाने नोंद घेतली होती.
दिल्लीतील ही घटना घडली त्या पार्श्वभूमीची कथाही तितकीच रंजक आहे. दिल्लीतील मंदिर मार्गावर एक वाल्मीकी वस्ती (ज्याला तत्कालीन काळात भंगी कॉलनी म्हटले जाई) होती. तिथे उद्योगपती बिर्ला यांनी एक मंदिर आणि पुजाऱ्यांसाठी तीन खोल्या बांधल्या होत्या; मात्र तिथे कोणी पुजारी राहत नसे. या खोल्यांच्या मागील मोकळ्या मैदानात संघाची प्रभात शाखा भरत असे. जागा मोकळी आणि पडीक असल्याचे पाहून स्वयंसेवकांनी त्या खोल्यांची स्वच्छता केली आणि तिथे राहू लागले. हळूहळू तिथे संघाच्या बैठका होऊ लागल्याने ते स्थान अघोषितपणे संघाचे एक कार्यालयच बनले.

दरम्यान, महात्मा गांधी दिल्लीत आल्यावर त्यांनी काही काळ या वस्तीत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी (बृजकृष्ण चांदीवाला, कृष्णन नायर, प्यारेलाल, सुशीला नायर इत्यादी) तिथे येऊन जागेची पाहणी केली आणि स्वयंसेवकांना ही कल्पना दिली. स्वयंसेवकांनी त्वरित ते परिसर खाली केला. गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निवासाची सोय तिथे करण्यात आली. मैदान क्षेत्रात सैनिकी पद्धतीचे दोन तंबू (छोलदार्या) ठोकून त्यात दऱ्या अंथरल्या गेल्या, जिथे स्वयंसेवक राहू लागले. वस्तीतील मोठ्या खोलीत गांधीजींच्या बैठकीची आणि दैनंदिन प्रार्थना सभेची सोय करण्यात आली, तर बाजूच्या छोट्या खोलीत गांधीजींचा मुक्काम होता. याच ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लॉर्ड माउंटबॅटन यांसारख्या तत्कालीन शीर्षस्थ नेत्यांच्या गांधीजींसोबत बैठका होत असत.
गांधीजींच्या दिनक्रमात किंवा प्रार्थनेत शाखेच्या हालचालींमुळे काही अडथळा येऊ नये, म्हणून स्वयंसेवकांनी अत्यंत समंजसपणा दाखवत आपली शाखा काही अंतरावर हलवली. गांधीजी रोज सकाळी फेरफटका मारत असत. अशाच एका प्रभातफेरीदरम्यान त्यांची नजर जवळच चाललेल्या शाखेवर पडली. ६०-७० तरुणांना एका शिस्तीत एकत्र आलेले पाहून त्यांनी उत्सुकतेने चौकशी केली आणि स्वयंसेवकांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यावेळी दिल्लीचे प्रांत प्रचारक वसंतराव ओक होते. गांधीजींच्या इच्छेची माहिती मिळताच त्यांनी १६ सप्टेंबर १९४७ ची वेळ निश्चित केली. दिल्लीतील तत्कालीन दंगली, संचारबंदी आणि पावसामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती असूनही, १६ सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजता दिल्लीतील सर्व शाखांचे गटनायक व त्यावरील दर्जाचे सुमारे ५०० ते ६०० प्रमुख कार्यकर्ते पूर्ण गणवेशात मैदानात उपस्थित झाले.
सकाळी ठीक सहा वाजता महात्मा गांधी मैदानात आले. ध्वजारोहण, संघाची प्रार्थना आणि ध्वजावतरण पार पडले. विशेष म्हणजे, गांधीजींनी स्वतः दक्ष स्थितीत उभे राहून संघाच्या प्रार्थनेचा सन्मान केला. त्यानंतर गांधीजींना व्यासपीठावर येण्याची विनंती करण्यात आली. व्यासपीठावर गांधीजी आणि त्यांचे सहकारी बसले, तर संघाचा कोणताही पदाधिकारी व्यासपीठावर न बसता सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी खाली रांगेत शांतपणे बसले.
आपल्या संबोधनाची सुरुवात करताना गांधीजींनी आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "वर्षांपूर्वी मी वर्ध्यात असताना जमनालाल बजाज मला संघाच्या एका शिबिरात घेऊन गेले होते. त्यावेळी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हयात होते. तेथील स्वयंसेवकांची कडक शिस्त, साधेपणा आणि अस्पृश्यतेचे झालेले पूर्ण निर्मूलन पाहून मी अत्यंत प्रभावित झालो होतो. तेव्हापासून आजपर्यंत संघाचा मोठा विस्तार झाला आहे."
सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर आणि मूल्यांवर प्रकाश टाकताना गांधीजी पुढे म्हणाले, "सेवा आणि आत्मत्यागाच्या आदर्शाने प्रेरित असलेल्या कोणत्याही संस्थेची ताकद वाढतेच, यावर माझा ठाम विश्वास आहे. परंतु, समाजोपयोगी ठरण्यासाठी या त्यागासोबतच ध्येयाची पवित्रता आणि खऱ्या ज्ञानाचा मेळ असणे अत्यंत आवश्यक असते. या दोन गोष्टींचा अभाव असलेला त्याग समाजासाठी अनर्थकारी ठरू शकतो."
शाखेवर गायल्या गेलेल्या प्रार्थनेचा संदर्भ देत गांधीजींनी आपल्या धार्मिक आणि सामाजिक भूमिकेचा पुनरुच्चार केला: "आज शाखेच्या सुरुवातीला गायलेल्या प्रार्थनेत भारतमाता, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माची प्रशंसा आहे. मी स्वतःला एक सनातनी हिंदू मानतो. हिंदू या शब्दाचा मूळ अर्थ अत्यंत व्यापक आहे. दुर्दैवाने, जेव्हापासून हिंदू धर्मात अस्पृश्यतेचे विष पसरले, तेव्हापासून त्याचा पाडाव सुरू झाला. जर अस्पृश्यता टिकून राहिली, तर हिंदू धर्म मिटून जाईल, हे मी सातत्याने सांगत आलो आहे."
देशातील तत्कालीन जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, "जर हिंदूंना असे वाटत असेल की भारतात हिंदूंशिवाय इतरांना स्थान नाही आणि मुस्लिमांना जर इथे राहायचे असेल तर त्यांना गुलामांसारखे राहावे लागेल, तर अशा विचारांमुळे हिंदू धर्माचाच नाश होईल. त्याचप्रमाणे, पाकिस्तानने जर असा विचार केला की तिथे फक्त मुस्लिमांनाच स्थान आहे आणि बिगर-मुस्लिमांना गुलामासारखे राहावे लागेल, तर त्यामुळे भारतातून इस्लामचे नामोनिशान मिटून जाईल."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी (माधवरराव गोळवलकर) यांच्याशी झालेल्या बैठकीचा उल्लेख करत गांधीजींनी स्पष्ट केले, "काही दिवसांपूर्वीच माझी तुमच्या गुरुजींशी भेट झाली होती. दिल्ली आणि कोलकत्तात संघाच्या वर्तनाबद्दल माझ्याकडे आलेल्या तक्रारी मी त्यांच्या कानावर घातल्या. त्यावर गुरुजींनी मला स्पष्ट आश्वासन दिले की, जरी संघ प्रत्येक सदस्याच्या वैयक्तिक आचरण किंवा कृत्याची जबाबदारी घेऊ शकत नसला, तरी संघाचे धोरण हे केवळ हिंदू आणि हिंदू धर्माची सेवा करणे हेच आहे—कोणाचेही नुकसान करून नाही. संघाचा अहिंसेवर विश्वास नसला, तरी त्याचा आक्रमकतेवरही विश्वास नाही; तो केवळ आत्मरक्षणाचे कौशल्य शिकवतो आणि सूड उगवण्याची शिकवण संघ कधीही देत नाही."
स्वतःवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, "काही लोक मला मुस्लिमांचा मित्र आणि हिंदू व शिखांचा शत्रू मानतात. हे खरे आहे की मी मुस्लिमांचा मित्र आहे, जसा मी पारशी किंवा इतरांचा आहे; पण जे मला हिंदू व शिखांचा शत्रू मानतात, ते मला ओळखत नाहीत. संघ ही एक अत्यंत सुसंघटित आणि अनुशासित संस्था आहे. या संघटित शक्तीचा वापर भारताच्या हितासाठी किंवा अहितासाठी केला जाऊ शकतो. संघावर लागणाऱ्या विविध आरोपांमध्ये किती सत्यता आहे हे मला ठाऊक नाही, परंतु आपल्या सुसंगत आणि राष्ट्रहितैषी कार्यातून हे आरोप खोटे ठरवणे हे खुद्द संघाचेच कर्तव्य आहे."
गांधीजींच्या या प्रदीर्घ भाषणानंतर त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले, परंतु संपूर्ण मैदानात शांतता होती आणि कोणीही प्रश्न विचारला नाही. कार्यक्रम संपल्यानंतर संघाचे वरिष्ठ अधिकारी गांधीजींना अत्यंत आदराने त्यांच्या निवासापर्यंत सोडून आले.
(संदर्भ: संपूर्ण गांधी वाङ्मय, खंड ८९, पृष्ठ २१५ ते २१७, प्रकाशन विभाग, भारत सरकार.)