•  25 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

राणी माँ गायदेन्ल्यू पूर्वांचलातील स्त्रीरत्न

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
भाष्य  

राणी माँ गायदेन्ल्यू पूर्वांचलातील स्त्रीरत्न

 

भारतातील आपल्या अनेक स्त्रीस्त्नांच्या स्मृती जागविण्यात आल्या. पण राणी माँ गायदेन्ल्यू यांची स्मृती ईशान्य भारतापुरती मर्यादित राहिली. इतर भारताच्या मानाने ईशान्य भारत तसा उपेक्षितच राहिला आहे. महाभारतातील उलुपी व चित्रांगदा महाराण्या नागालैंड व मणीपूरच्या राजकन्या होत्या. भगवान श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध व बाणासूर राजाची राजकन्या उषा यांची प्रेमकहाणी तेजपूर येथे घडली. येथेच प्रसिद्ध हरीहर युद्ध झाले. त्यावेळी खत्ताचे पाट वाहिले, म्हणून तेजपूरला पूर्वी शोणितपूर म्हणत असत. म्हणजेच ईशान्य भारताचा उर्वरीत भारताशी अनन्य संबंध आहे. येथील नागा, दिभासा आदीवासींनी भारताच्या स्वातंत्र्य युद्धात हिरीरीने भाग घेतला होता. त्यातील प्रमुख स्वातंत्र्य सैनिक स्त्रीरत्न राणी माँ गायदेन्ल्यू आहेत.

राणी माँ गायदेन्ल्यू यांचा जन्म २६ जानेवारी १९१५ रोजी पश्चिम मणीपूर येथील लुगकाओ या खेडयात झाला. त्यांचे वडील लोथोनांग हे नागा जमातीचे प्रमुख होते आणि त्यांच्या आठ मुलांपैकी तिसरे अपत्य राणी माँ होत. लहानपणापासूनच त्याच्यातील दैवीगुणांच्या खुणा दिसत होत्या. त्या अतिशय कनवाळू व दुसन्यऱ्यांना मदत करण्यास तत्पर असायच्या त्याच्या काही अलौकिक कृती पाहून सर्वजण अचंबित व्हायचे लोकांचे नेतृत्व करणे हा त्यांच्यातला उपजत गुण होता. व्याच्या १३ व्या वर्षी त्या जदोनांग या ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करणाऱ्या क्रांतीकारकाच्या संपर्कात आल्या त्या काळात ब्रिटिशांनी नागा आदिवासींचे क्रूर हाल केले होते. त्याच्यावर घरपट्टी लादली होती व वेठबिगारांप्रमाणे ते त्यांचे शोषण करीत होते, त्यांचे सक्तीने धर्मातर केले जात होते. जदोनांग यांनी त्याविरुद्ध लढा उभारला. घराचे टॅक्स देणे बंद केले व वेठबिगारीला विरोध केला त्यांच्यात पण दैवी शक्ती होती. त्यांचे दैवत टिंगवॉगने त्यांना दृष्टांत देऊन त्यांना सिलचर जवळील भुवन तुहेमध्ये जाण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ते गायदेन्ल्यूसह भुवनगुहेत जाऊन तपश्चर्या करू लागले. तेथे टिंगयोंगने त्यांना "हराका" धर्माचे पुनरुत्थान करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जदोनांग व गायदेन्यू यांनी १०० हून अधिक धार्मिक गाणी रचली. आपले पारंपारिक नृत्य, पूजा विधी व हराका परंपरा आत्मसात केली. या कारणामुळे भुवनगुहा है नागालोकांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते. भुवनगुहेतून आल्यावर त्यांनी हराका परंपरेचा प्रचार व प्रसार सुरू केला व नागा समुदायाला धर्मांतर करण्यापासून रोखले. ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या गनिमी कारवाया चालू होत्या. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी इनाम घोषित केले होते. शेवटी कपट कारस्थानाने जदौनांग यांना पकडले व २९ ऑगस्ट १९३१ रोजी इंफाळ येथे फाशी दिले,

त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची व हराका परंपरेच्या प्रसाराची धुरा गायदेन्ल्यू यांच्याकडे आली. त्यांनी घोषणा केली की, आपण नागा स्वतंत्र आहोत गोरे लोक त्यांचे कायदेकानून आपल्यावर लादू शकत नाहीत. त्यांचे बेकायदेशीर कर व वेठबिगारी जबरदस्ती आपण झुगारून टाकायची. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी झेमी, रोगमाई व लियांगमाई या विखुरलेल्या नागा जमातींना एकत्र केले. या समुदायाला झिलीयनग्रांग म्हणतात. हे सर्व हराका परंपरेचे पालन करतात. हळूहळू आसाम, नागालँड व मणीपूर मधील नागा एकत्र येऊ लागले व त्यांनी गायदेन्ल्यूंचे नेतृत्व स्वीकारले. सर्व लोक गायदेन्ल्यूंना ईश्वराचे प्रेषित मानू लागले. पण त्यांनी त्याचा इन्कार केला. ब्रिटिश व त्यांच्या विरुद्ध असलेल्या जमातींनी गायदेन्ल्यूचा अपप्रचार सुरू केला. ब्रिटिशांना त्यांची भीती वाटू लागली व त्यांचा नायनाट करण्याची ते सबब व संधी शोधू लागले. यावेळी गायदेन्ल्यू फक्त १७ वर्षांच्या होत्या. ब्रिटिशांनी त्यांना लुटारू व दरोडेखोर ठरविले. हळूहळू गायदेन्ल्यूंच्या समर्थकांची संख्या वाढू लागली. लोक त्यांच्या कार्यासाठी देणग्या देऊ लागले. शेकडो समर्थक सशस्त्र लढा देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने गोळा झाले.

गायदेन्ल्यूंना पकडण्यासाठी आसामच्या काउन्सेलर जनरलने मणीपूरच्या डेप्युटी काउन्सेलर जे.पी. मिल्स यांना आदेश दिला. नॉर्थ काचार जिल्ह्याच्या कलेक्टरवर व आसाम रायफल्सच्या ३ व ४ बटालीयनवर ही कामगिरी सोपविली. त्यांनी नागालँड, मणीपूर आणि आसामच्या नॉर्थ काचार हिल्समधील सर्व खेड्यात गायदेन्ल्यूंचे फोटो लावले. गायदेन्ल्यू व डिलेन्ल्यू नांवे असलेल्या सर्व मुलांची चौकशी केली. गायदेन्ल्यूंची माहिती देण्यासाठी ५०० रू. चे ईनाम ठेवले. पण गायदेन्ल्यूंच्या गुप्तहेरांनी त्यांना कायम सुरक्षित ठिकाणी ठेवले.

काचार १६ फेब्रुवारी १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या जवानांनी नॉर्थ हिल्समधील नागा क्रांतीकारकांची हत्या केली. त्यांची खेडी जाळून टाकली. शेवटी मार्च १९३२ रोजी नॉर्थ काचार हिल्स मधील हांयुम या खेड्यात शेकडो नागा क्रांतीकारकांनी ब्रिटिशांच्या चौकीवर सशस्त्र हल्ला केला. पण त्यांच्या कोयत्या व भाल्याच्या शस्त्रांचा ब्रिटिशांच्या बंदुकांपुढे टिकाव लागला नाही. ७ नागा तेथे हुतात्मा झाले. अनेक जवान पण मेले. गायदेन्ल्यू तेथून पूर्वोत्तर नागालँडमधील अंगामी नागांकडे गेल्या. तेथे अंगामींचे अधिपत्य होते. गायदेन्ल्यू अंगामीमध्येपण लोकप्रिय होत्या. गायदेन्ल्यूंनी मंतरलेल्या पाण्यात अद्भुत शक्ती असते, या समजुतीने "गायदेन्ल्यू पाणी" तेथे विकले जात असे. अंगामींनी जर गायदेन्ल्यूंबरोबर हातमिळविणी केली तर, नागालँड, मणीपूरमध्ये ब्रिटिशांना माघार घ्यावी लागेल. या भीतीने आसाम रायफल्सने गायदेल्न्यूंच्या शोधाची मोहीम तीव्र केली.

ऑक्टोबर १९३२ मध्ये पोलोमी या खेड्यात, गायदेन्ल्यूंनी ब्रिटिशांना मोठी धडक देण्याची तयारी सुरु केली. हांग्रुममधील ब्रिटिशांच्या भक्कम लाकडी बालेकिल्ल्याप्रमाणे पोलोमीत बांधकाम सुरु केले. साधारण १००० सशस्त्र नागांची तैनात तेथे होणार होती. ब्रिटिशांना याचा सुगावा लागला. कमिशनर मिल्सने कॅप्टन मॅकडोनाल्ड याच्या अधिपत्याखाली आसाम रायफल्सना पोलोमीवर आक्रमण करण्यास सांगितले. १७ऑक्टोबर १९३२ रोजी पोलोमी खेड्यावर हल्ला केला. गायदेन्ल्यू व नागा बेसावध होते. त्यांचा पाडाव झाला. गायदेन्ल्यूंना अटक करून त्यांच्या कमरेला दोर बांधून त्यांची धिंड काढली. अंगामी नागांनी त्याचा प्रतिकार केला, पण त्यांना मारण्यात आले. गायदेन्ल्यूंना कोहीमाला नेले. तेथे त्यांच्यावर खटला चालवून त्यांना हिगिन्स या पोलिटिकल एजंटने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गायदेन्ल्यूंनी १४ वर्षे ब्रिटिश कारागृहात काढली. १ वर्ष गुवाहाटी, ६ वर्षे शिलाँग, ३ वर्षे ऐझॉल व ४ वर्षे तुरा कारागृहात काढली. १९३७ साली पंडित नेहरूंजींनी आसामला भेट दिली. तेव्हा त्यांना गायदेन्ल्यूंच्या ब्रिटिशांबरोबर दिलेल्या लढ्याची हकीकत कळाली. एका विशीतल्या तरुणीची संग्राम गाथा ऐकून ते फार प्रभावित झाले. त्यांनी गायदेन्ल्यूंना "नागांची राणी' हा किताब दिला. तेव्हापासून गायदेन्ल्यू, राणी गायदेन्ल्यू झाल्या. नागा लोकांनी त्यांना माँ चा सन्मान दिला व तेव्हापासून त्यांना लोक "राणी माँ" म्हणून संबोधू लागले. पंडितजींनी काँग्रेसच्या माध्यमातून राणी माँ च्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले, पण ब्रिटिशांनी त्याला नकार दिला. कारण राणीमाँ पुन्हा सशस्त्र उठाव करेल याची त्यांना धडकी भरली होती. शेवटी १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांची सुटका झाली. पण त्यांना मणीपूरला जायला प्रतिबंध केला. त्या नागालँड येथे थीमरुप खेड्यात राहू लागल्या. त्यांना सरकारतर्फे पेन्शन देण्यात आली. नंतरची १४ वर्षे त्या सक्रीय राजकारणापासून दूर राहिल्या १९५६ च्या सुमारास नागा लोकांनी त्यांच्या हराका धर्माच्या प्रसारात बाधा आणायला सुरवात केली. त्यांनी राणी माँ व हराका विषयी अपप्रचार व हिंसक कारवाया सुरु केल्या. त्याला तोंड देण्यासाठी राणीमाँ आपल्या १००० अनुयायांबरोबर १९६० साली भूमिगत झाल्या व त्यांनी सशस्त्र विरोध सुरु केला. त्यांनी जेमी, लियांगमई व रोंगमाई नागा असलेल्या नागालँड, मणीपूर व आसाममधील प्रदेशांचे एकत्रीकरण करुन झिलीयानग्रांग्र कौंसीलची मागणी पुढे केली. ६ वर्षाच्या प्रदीर्घ सशस्त्र संघर्षानंतर भारत सरकारच्या विनंतीला मान देऊन त्या बाहेर आल्या आणि २० जानेवारी १९६६ पासून कोहिमा येथे राहू लागल्या. नंतर त्यांनी आपले लक्ष नागा लोकांच्या शांती व समृद्धीच्या कार्यासाठी दिले. एव्हांना त्यांची कीर्ती भारतभर पसरली होती. त्या जेथे जात असत तेथे त्यांचे जंगी स्वागत होत असे. त्या भारताच्या "जोन ऑफ आर्क" होत्या. १९७२ साली

स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांना ताम्रपत्र दिले. तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने १९८२ साली "पद्मभूषण" पदवी देऊन त्यांना गौरविले. ३१.१.१९८७रोजी त्यांना विवेकानंद पुरस्कार देण्यात आला. १९७९ साली अलाहाबाद येथे भरलेल्या "विश्व हिंदू परिषद" मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याकडे "मातृ सम्मेलन" चे अध्यक्षपद देण्यात आले. त्या अखिल भारतीय स्वातंत्र्यसैनिक असो.च्या १९८६ पासून उपाध्यक्ष होत्या. नॉर्थईस्टमधील विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याणाश्रम आदी संस्थांच्या त्या आश्रयदात्या होत्या. नंतर त्या काही वर्षे होलाईचाक व हांयुम येथे राहील्या. तेथून त्या परत आपल्या जन्मगावी लुंगकाव, मणीपूर येथे आल्या. एक अल्प आजाराचे निमित्त होऊन १७ फेब्रुवारी १९९३ रोजी राणीमाँचे निधन झाले. सरकारी इतमामाने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्या प्रसंगी आसामचे गव्हर्नर श्री. चिंतामणी पाणिग्रही उपस्थित होते. राणीमाँ खरोखरीच एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व होते. त्यांचे पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संबंध होते. स्वतंत्र आणि जनतंत्र भारतात नागा जमातीला आदरपूर्वक आणि मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईत जुहूयेथील इंडियन नॅशनल फेलोशीप सेंटर, हेड क्वार्टरला राणा गायदेन्ल्यू भवन असे नांव देण्यात आले. डेहराडून येथील इन्फरमेशन टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट फॉर ट्रायबल्स ऑफ इंडियाच्या रॅम्पस मध्ये राणीमाँचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या मरणोत्तर भारत सरकारने १२ सप्टेंबर १९६६ रोजी १ रुपयाच्या तिकिटावर त्यांचे चित्र छापले होते. २००१ साली भारत सरकारने स्त्री शक्ती पुरस्कार भारतातील पांच अलौकिक व्यक्तिमत्त्वांच्या स्त्रीरत्नांचे नांवाने देण्याची घोषणा केली. त्यात राणी गाइदेन्ल्यूचा समावेश होता. पुरस्कार दरवर्षी अलौकिक धैर्य, सामाजिक कर्तव्य, निर्भिडपणा, अन्यायविरूद्ध लढा देणाऱ्या शूर मातांना दिला जातो. २००३ साली हांगुम येथे १९३१-३२ साली ब्रिटिशांबरोबरच्या युद्धात हुतात्मा झालेल्यांचे स्मारक उभारले आहे. तेथेच राणीमाँची पदचिन्हे पण एका खडकावर काढलेली आहेत.

राणीमाँचे कर्तृत्व असाधारण आहे. त्यांचे त्याग, कष्ट, हराका पद्धतीचे पुनरुत्थान, नागा संस्कृती व परंपरा याची जपणूक, त्यांना धर्मांतरापासून रोखणे ही कार्ये अलौकिक आहेत. खरोखरच राणीमाँ एक ईश्वराचे वरदान होत्या. येत्या २४/२५ जानेवारी २०१४ पासून त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव लायसाँग या गांवापासून सुरू झाला.

संदर्भ : राणीमाँचे स्वीय सचिव श्री. रामकुइंगजी यांच्याशी चर्चा व लेख


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • स्वातंत्र्य
  • पोलोमी
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (139), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.