समाजाने डॉ. आंबेडकरांचे वैचारिक वारसदार बनावे - प्रा. ईश्वर रायण्णवर
कराड, दिनांक ः आधुनिक भारतासाठी केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नसून सामाजिक व सांस्कृतिक लोकशाही गरजेची आहे. असे स्पष्ट मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले. त्यांचे कर्तृत्त्व हे जातीधर्माच्या चौकटीत न बांधता सर्वांनी त्यातून प्रेरणा घेत वैचारिक वारसदार बनावे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. ईश्वर रायण्णवर यांनी व्यक्त केले. कराड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संघाची भवानी शाखा आणि लोककल्याण मंडळ ट्रस्टच्या वतीने हे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी, संघाच्या कराड नगराचे कार्यवाह महंतेश तुळजनवर उपस्थित होते. प्रा. रायण्णवर पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा संघर्ष हा विद्वेषाचा किंवा विद्रोहाचा नाही तर सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा आहे. पू.बाबासाहेबांनी धम्म परिवर्तन करताना ठासून सांगितले होते की कोणत्याही प्रकारे अराष्ट्रीय आणि अभारतीय धर्म मी स्वीकारणार नाही. म्हणूनच त्यांनी भारतीय परंपरेतील बुद्ध धम्माचा स्वीकार केला. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळे सकल हिंदू समाजावर पू. बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. फाळणीच्या काळात मुस्लिम तुष्टीकरणाच्या विरोधात ठाम उभे असलेल्या डॉ. आंबेडकरांनीच कम्युनिस्ट विचारधारेच्या प्रभावाच्या काळात देखील अभ्यासपूर्ण मांडणीने या विचारधारेचे खंडन केले." अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खडतर संघर्ष करत डॉ. आंबेडकरांनी आपले कर्तृत्व, व्यक्तिमत्व विकसित केले. परंतु त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणत्याही घटकाचा द्वेष केला नाही, असेही प्रा. रायण्णवार म्हणाले.