•  28 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

क्रांतिकारी संत चक्रधरस्वामी!

वर्षा महाजनी 24 days ago
दिन विशेष   व्यक्तिविशेष  

             क्रांतिकारी संत 
             चक्रधरस्वामी!  


     एकीकडे मूर्तीभंजक परधर्मीय परकीयांचे आक्रमण आणि दुसरीकडे स्वधर्मात कर्मकांड, अद्न्यान,अंधश्रद्धा,चातुर्वर्ण्य,सामाजिक विषमतेची बजबजपुरी माजलेली…अशा वेळी सामाजिक विषमता नाकारून स्त्रियांसह समस्त मानवजातीला मोक्ष आणि परमेश्वरप्राप्तीच्या समान अधिकाराचा ‘महा अनुभव’ देणारा एक महापुरुष जन्माला आला आणि बाराव्या शतकातील एका नव्या क्रांतिपर्वाचाच जणू प्रारंभ  झाला! या महापुरुषाचे नाव,चक्रधरस्वामी!


           चक्रधरस्वामींचे पूर्वचरित्र मोठे अद्भूत आहे.म्हाईंभटाने आपल्या “लीळाचरित्र” या चक्रधरस्वामींच्या चरित्र  ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे  गुजरात प्रांतातील भडोचचा राजा मल्लदेव याचा प्रधान विशालदेव व त्याची पत्नी म्हाळईसा या दांपत्यास दत्तप्रभूंच्या कृपेने शके 1116 म्हणजे इ.सन 1194 मध्ये पुत्र जन्मास आला.त्याचे नाव हरपाळदेव असे ठेवण्यात आले.तो मोठा शूर व पराक्रमी होता.कमळाईसा बरोबर त्याचा विवाह झाला.आपल्या राज्यावर स्वारी करणा-या यादवराजा सिंघणचा त्याने पराभव केला.संपन्न आयुष्य जगत असतानाच हरपाळदेवाला आजारी लोकांची सेवा करण्याचा छंद जडला.परंतु  वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी हरपाळदेवाचे निधन झाले.अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह स्मशानात नेण्यात आला.त्याच सुमारास द्वारावती येथील श्री चांगदेव राऊळ या संत पुरुषाचे निधन झाले होते.महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार  पंचअवतारातील तिसरा अवतार म्हणजे हे चांगदेव राऊळ किंवा श्री चक्रपाणि प्रभू.त्यांचा आत्मा मृत हरपाळदेवाच्या शरीरात प्रविष्ट झाला आणि हरपाळदेव जिवंत झाला. या पुनर्जन्मात त्यांना एक मुलगाही झाला आणि त्यांचे सेवाव्रती आयुष्यही पूर्ववत सुरु झाले.परंतु संसारात त्यांचे मन रमेना.सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून आपले आयुष्य पूर्णपणे लोकसेवेसाठी  अर्पण करायचे अशी इच्छा मनाशी बाळगून  त्यांनी संसाराचा त्याग केला.परिभ्रमण करत असताना ते रुद्धिपूर येथे आले.तेथे श्री गोविंदप्रभू या सिद्ध पुरुषाकडून त्यांनी द्न्यानशक्ती ग्रहण केली.गोविंदप्रभूंना पूर्वी  श्री चक्रपाणि प्रभू यांनी द्वारावती येथे असताना अनुग्रहित केले होते.तीच द्न्यानशक्ती घेऊन हरपाळदेव श्री चक्रधरस्वामी म्हणून प्रसिद्ध झाले.द्वापार युगात प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराचा अवतार म्हणजे श्री कृष्ण; तर, त्रेतायुगातील अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय.श्री चक्रपाणी  प्रभू यांच्यावर श्री दत्तात्रेयांनी कृपा केली.श्री चक्रपाणी प्रभूंनी श्री गोविंद प्रभूंना आणि श्री गोविंदप्रभूंनी श्री चक्रधर स्वामींना द्न्यानबोध दिला.महानुभावीयांच्या पंचअवतारातील पाच अवतारी पुरूषांचे सर्वच चरित्र व कार्य अद्भूत असे आहे.मात्र महानुभाव पंथाची स्थापना केली ती, या पंथाचा पाचवा अवतार असलेले श्री चक्रधर स्वामी यांनी!
             

अनुग्रह घेतल्यानंतर श्री चक्रधर स्वामींनी सालबर्डीच्या डोंगरात बारा वर्षे तपश्चर्या केली.त्यानंतर ते पुन्हा पदभ्रमणास निघाले. भोगावतीच्या तीरावर श्री दत्तगुरुंचे दर्शन झाल्यावर त्यांनी संन्यासदीक्षा घेतली आणि आपल्या कार्यास प्रारंभ केला.वेदांवर त्यांची श्रद्धा होती. मात्र महानुभव पंथाची स्थापना करताना ब्रह्मापेक्षा ईश्वर श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.परमेश्वर,देवता,जीव आणि प्रपंच या चार गोष्टी परस्परांपासून भिन्न असून त्यांचे परस्परांशी किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही असे त्यांचे तत्त्वद्न्यान आहे.त्यामुळे हा पंथ द्वैत मताचा पुरस्कार करणारा अध्यात्ममार्ग आहे.आत्मद्न्यान,भक्ती आणि गुरुकृपा या तिन्हीमुळे परमेश्वर व मोक्ष प्राप्त होतो.मोक्षासाठी  स्त्रियांसह सर्व प्राणिमात्र पात्र आहेत,असे त्यांनी आग्रह्पूर्वक सांगितले. चातुर्वर्ण्य,जातिभेद अशा गोष्टी स्वामींना अजिबात मान्य नव्हत्या. स्त्रियांच्या बाबतीत तर त्यांचे विचार आधुनिक काळातील समाजसुधरकाप्रमाणे होते.ते म्हणत,”पुरूषांना जीव आहे आणि स्त्रियांना नाही काय? पुरुषांचा व स्त्रियांचा देव वेगवेगळा असतो काय?” स्त्रीच्या मासिकधर्माविषयीचे त्यांचे विचार असेच क्रांतिकारक होते.माणसाच्या नवद्वारांतून ज्याप्रमाणे अश्रू,घाम,शेंबूड,मल-मूत्र बाहेर पडते, त्याचप्रमाणे स्त्रीच्या शरीरातून विटाळ बाहेर पडतो.त्यामुळे तिला त्या काळात अपवित्र  मानण्याचे कारण नाही, असे त्यांचे स्पष्ट  मत होते. अहिंसा,परस्परांशी बंधुभाव,सत्य व प्रिय बोलणे या गोष्टींना त्यांच्या लेखी फार महत्त्व होते. “तुम्हां परस्परे प्रीती होआवी”;स्वातंत्र्य ह मोक्षु,पारतंत्र्य हा बंधु”;”विषयाचा संगु न करावा” अशी त्यांची  मोलाची वचने म्हणजे महानुभाव पंथाची श्रुती आहे.स्वामींची ही सर्व शिकवण सूत्रबद्ध रीतीने “सूत्रपाठ” या ग्रंथात एकत्रित केली आहे.महाराष्ट्राबद्दल स्वामींना अतिशय प्रेम व अभिमान होता.साधकांनी त्यांना विचारले की ‘कोठे जावे’,तर ते म्हणत,”महाराष्ट्री असावे”.महाराष्ट्रा प्रमाणेच मराठी भाषेविषयी त्यांना अतिशय ममत्व होते.आपली सारी शिकवण त्यांनी सर्वसामान्यांना समजेल अशा मराठी भाषेतूनच दिली.आपल्या शिष्यांनाही त्यांनी महानुभाव तत्त्वांचा प्रसार मराठीतूनच करण्यास सांगितले. त्यामुळेच म्हाईंभट या त्यांच्या शिष्याने लिहिलेला  स्वामींचा  ‘लीळाचरित्र’ हा चरित्रग्रंथ मराठीमधील पहिला चरित्रग्रंथ ठरला.त्या अर्थाने संत द्न्यानदेवांच्याही आधी ‘मराठीचा बोलु’ सर्वमान्य करण्याचे श्रेय चक्रधर स्वामींकडे जाते.महाराष्ट्र देश,मराठी भाषा या बरोबरच स्थान-माहात्म्य हाही स्वामींच्या जिव्हाळ्याचा विषय.साधकाने सतत भ्रमंती करावी,जेथे जाऊ तेथील वैशिष्ट्ये,माहात्म्य लिहून ठेवावे,अशी त्यांची शिकवण.अशा स्थानपोथ्यांमधून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचा शोध लागला आहे.लोणार येथील दैत्यसूदन मंदिर    मूर्तीभंजकांपासून     वाचवण्यासाठी मातीच्या ढिगा-याखाली लपवले गेले होते.परंतु नंतरच्या काळात स्वामींच्या अशा स्थानपोथीमुळेच ते उजेडात येऊ शकले.  
               

आपले अवतारकार्य पूर्ण झाल्यावर श्री चक्रधरांनी उत्तरेकडे  हिमालयात प्रस्थान केले.स्वामी अजूनही  अस्तित्त्वात आहेत,अशी महानुभावीयांची श्रद्धा आहे.स्वामी दृश्यमान नाहीत,हे खरे आहे.पण  या सर्वगामी,बहुआयामी व द्रष्ट्या चक्रधर स्वामींची शिकवण आजही लाखमोलाची आहे, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे!
                   -

वर्षा महाजनी,
      पुणे
              


 


- वर्षा महाजनी

  • chakradhar Swami
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

वर्षा महाजनी

वर्षा   महाजनी 

 इतिहास (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.