राष्ट्रधर्म, बंधुभाव आणि अखंड भारताचा भावी संकल्प

अखंड भारताची चर्चा करताना अनेकदा हा विषय केवळ भूतकाळातील भूगोल किंवा राजकीय सीमांपुरता मर्यादित ठेवला जातो. मात्र, आधुनिक संदर्भात अखंड भारत हा केवळ सीमांचा विस्तार नसून तो एक विचार, एक जीवनदर्शन आणि राष्ट्रधर्माची अभिव्यक्ती आहे. भारतातील अनेक विचारवंत, समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांनी अखंड भारताच्या संकल्पनेला केवळ राजकीय पुनर्रचना म्हणून पाहिले नाही, तर त्याला आत्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे स्वरूप दिले:
महर्षी अरविंदो यांनी भारताच्या भवितव्याबद्दल भाकीत करताना म्हटले होते, "मी स्पष्टपणे चित्र पाहत आहे की भारत माता अखंड होऊन पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर आरूढ झाली आहे." स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'काश्मीर ते रामेश्वरम आणि सिंध ते आसाम' या संपूर्ण भूभागात राहणाऱ्या लोकांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय एकतेवर भर दिला. त्यांनी सैनिकीकरण आणि राष्ट्ररक्षण यासोबतच अखंड भारतासाठी प्रतिज्ञाबद्ध होण्याचे आवाहन केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी स्पष्ट केले की, अखंड भारत ही केवळ एक राजकीय मागणी नाही, तर तो विचारपूर्वक केलेला संकल्प आहे. अटकेपासून कटकापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतची ही भूमी आपल्यासाठी केवळ भौगोलिक जमीन नसून ती आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे.
डॉ. राममनोहर लोहिया व लोकनायक जयप्रकाश नारायण: यांसारख्या समाजवादी विचारवंतांनीही भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमधील लोकांचे मूळ एकच असल्याचे मानले. राजकीय सीमा वेगळ्या असल्या, तरी या तिन्ही देशांतील जनतेची राष्ट्रीयता आणि संस्कृती एकाच वृक्षाची फळे आहेत, असा दृष्टिकोन त्यांनी मांडला.
भारतीय राष्ट्रविचाराचा मूळ आधारदेवेन्द्र स्वरूप यांच्या विश्लेषणानुसार, भारताची व्याख्या केवळ 'भूगोल' या शब्दाने करता येत नाही. भारत हा एका प्रवाही संस्कृतीचे नाव आहे. अथर्ववेदातील पृथ्वी सूक्त या विचाराला पायाभूत आधार देते, जिथे म्हटले आहे: "माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्या:"
अर्थात, ही भूमी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. जेव्हा भूमीला केवळ उपभोगाची वस्तू न मानता 'माता' मानले जाते, तेव्हा त्या भूमीशी असणारे नाते राजकीय नसून आत्मिक बनते. भारताने जगाला नेहमीच "वसुधैव कुटुंबकम्" (संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे) आणि "एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति" (सत्य एकच आहे, विद्वान ते निरनिराळ्या प्रकारे सांगतात) या वैश्विक तत्त्वांची देणगी दिली आहे. सर्व उपासना पद्धतींचा आदर करणे आणि विविधता सामावून घेणे हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.
- भविष्यातील दिशा आणि संकल्प ः
अखंड भारताचा आधुनिक संकल्प हा कोणत्याही शेजारी देशावर लष्करी आक्रमण करण्याचा किंवा बळजबरीने भूभाग जिंकण्याचा नाही. हा संकल्प आहे—वैचारिक, सांस्कृतिक आणि आर्थिक एकात्मतेचा. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात राजकीय सीमा जरी कायम असल्या, तरी ऐतिहासिक चुकांमधून शिकून दक्षिण आशियाई देशांमध्ये परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे शक्य आहे. जोपर्यंत या भूभागातील लोक आपल्या सामायिक वारशाची, इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव ठेवतील, तोपर्यंत अखंड भारताचा आत्मा जिवंत राहील. हा संकल्प द्वेषावर नव्हे, तर शांतता, बंधुभाव आणि जागतिक कल्याणाच्या भावनेवर आधारलेला आहे.
- संदर्भ
१. Devendra Swarup (2016) Akhand Bharat: Swapan Aur Yatharth, Prabhat Prakashan,
२. KM Munshi (1942) Akhand Hindustan, Kitab Mahal, Mumbai
३. RK Mookerji (1945) Akhand Bharat Kitab Mahal, Mumbai
४.Sadanand Damodar Sapre (2015) Pratyek Rashtrabhakta Ka Sapna: Akhand Bharat, Archna
Prakashan, Bhopal