स्वतंत्रता सेनानी तिलका मांझी

भारताचा स्वतंत्रता संग्राम 1857 च्या कितीतरी आधी सुरू झाला होता. त्याआधी अंदाजे 80 वर्ष संताल विद्रोह सुरू झाला होता. हळूहळू इंग्रजांची सत्ता प्रस्थापित होत होती आणि त्या काळात वनात राहणाऱ्या आदिवासींवर अन्याय होत होता. त्यांचे जंगल,त्यांची जमीन यावर इंग्रजांचा कब्जा सुरू झाला होता.जंगल कापले जात होते. जंगला मधील वनउपज म्हणजे लाकूड,मध, फळे अशा अनेक गोष्टींवर लोकांचे जीवन अवलंबून होते, त्यावरचा अधिकार काढून घेण्यात आला होता. याच बरोबर इंग्रजांनी अजून एक खेळी केली होती . त्यांच्याजवळ माणूस बळ कमी होते, पण देशातील व्यवस्थेमध्ये जात-पात, धर्म यावरून फूट पाडणे सहज शक्य होते.सुपीक शेतीच्या आधारावर भरपूर कर लावायला त्यांनी सुरुवात केली आणि हे कर वसुलीचे काम त्यांनी समाजातील उच्चवर्णीय लोकांवर सोपविले. त्यासाठी त्यांना भरपूर सवलती दिल्या.त्यांच्याकडे काम होते की त्यांनी तेथील सामान्य जनतेकडून कर वसूल करायचा आणि त्यांना मजूर म्हणून राबवून पण घ्यायचे. अशा अनेक दृष्टीने होणाऱ्या अन्यायामुळे जनतेत असंतोष होता.अशावेळी जबरा पहाडिया म्हणजे तिलका मांझी यांनी सरकार विरुद्ध आवाज उठवला. जबरा पहाडिया हे त्यांचे नाव होते पण इंग्रजांच्या विरोधात त्यांच्या डोळ्यात दिसणारा त्वेष, बरसणारा अंगार पाहून इंग्रजांनी त्यांना तिलका म्हणजे अतिशय रागीट हे संबोधन दिले. स्वतःच्या कर्तृत्वाने ते धार्मिक आणि सामाजिक स्तरावर गावकऱ्यांचे नेता बनले, म्हणजेच मांझी बनले, म्हणून तिलका मांझी हे नाव इतिहासात प्रसिद्ध झाले.
11 फेब्रुवारी 1750 मध्ये बिहार मधील तिलकापूर या छोट्याशा गावात जबरा पहाडिया यांचा जन्म झाला. ही व्यक्ती शरीराने उंच, धिप्पाड व मनाने निर्भीड होती. जंगलामध्ये जंगली शापदांमध्ये त्यांना वावरताना कधीच भीती वाटली नाही.त्यांची शिकार करण्यात ते पटाईत होते, तसेच उंच झाडावर सहजपणे चढणे त्यांना अवगत होते.
राजमहल येथे मॅजिस्ट्रेट क्विवलँड याची हत्या, उंच झाडावर चढलेल्या जबरा पहाडिया याने विषारी बाण वापरून केली आणि इंग्रजांविरुद्धचा सशस्त्र संग्राम सुरू झाला. इंग्रजांना अजिबात अपेक्षा नव्हती की हा सामान्य माणूस ,जंगलात राहणारा माणूस एवढ्या कुशलतेने आणि हिमतीने एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करू शकतो. एका वर्षी दुष्काळ पडला असताना जबरा पहाडिया ने इंग्रजांचा खजाना लुटून आणला आणि सर्व लोकांना वाटून दिला. अशा एकेक प्रसंगांनी त्याच्याभोवती मोठा समाज जमा झाला.आता त्याने त्याची सेना जमवली. 1778 मध्ये पहाडी सरदारांसमवेत त्यांनी मोर्चा काढला आणि इंग्रजांविरुद्ध आपला रोष प्रकट केला.
1784 मध्ये मोठे युद्ध झाले त्यामध्ये इंग्रज अधिकारी आयर ब्रुक आणि त्याची हजारोंची सेना आणि दुसरीकडे तीलकाच्या नेतृत्वामध्ये धनुष्यबाण घेऊन लढणारी स्थानिक जनता. या युद्धात इंग्रज अधिकारी जबरी पहाडिया याला पकडू शकले नाहीत, पण काही काळाने त्यांनी सामान्य लोकांमध्ये लालूच दाखवून,धाक दाखवून जबरी पहाडिया याला पकडून देणाऱ्यास मोठे बक्षीस जाहीर केले आणि त्यांची योजना सफल झाली. या जबरी पहाडिया ला, या तिलका मांझी याला इंग्रजांनी पकडले आणि चार घोड्यांना बांधून रस्त्यावरून फरफटत नेले. तरीही तिलका जिवंत होता. चेहऱ्यावर भय नव्हते, होते ते डोळ्यात इंग्रजांच्या विरोधात बरसणारे अंगार. 13 जानेवारी 1785 रोजी गावकऱ्यांच्या देखत त्याला वडाच्या झाडाला बांधून फाशी देण्यात आले.
महान लेखिका, महाश्वेता देवी यांनी तिलका मांझी यांच्या जीवनावर आधारित, बांग्ला भाषेत ' शालगिरर डाके ' ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी अतिशय लोकप्रिय आहे .
तिलका मांझी यांच्या शौर्याला, साहसा ला शत शत प्रणाम.
मोहिनी प्रभाकर पाटणकर
जनजाती कल्याण आश्रम कार्यकर्ती