•  02 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 14 days ago
भाष्य  

युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होतील. या देशव्यापी संघटनेचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा गुढीपाडवा हा जन्मदिन. डॉ. हेडगेवार यांनी समाजासाठी काम करणाऱ्या भक्कम अशा संघटनेची बांधणी केली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या कार्याचे शंभरावे वर्ष पूर्ण करत असताना या महत्त्वाच्या टप्प्याकडे संघ कशा प्रकारे पाहतो, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. असे प्रसंग साजरे करण्यासाठी नसतात, तर आत्मपरीक्षण करण्याची आणि त्यासाठी पुन्हा समर्पित होण्याची संधी देणारे असतात, हे संघाच्या स्थापनेपासूनच अत्यंत स्पष्ट आहे. या कार्याला मार्गदर्शन करणाऱ्या थोर, खंबीर आणि सदाचरणींच्या योगदानाची आणि या प्रवासात नि:स्वार्थपणे सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मांदियाळीची दखल घेण्याची ही संधी आहे. जागतिक शांती आणि समृद्धीसाठी सौहार्दपूर्ण आणि अखंड भारताच्या भवितव्याचा संकल्प करण्यासाठी शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती, जी वर्ष प्रतिपदा असून हिंदू वर्षाचा पहिला दिवस आहे, यापेक्षा चांगला मुहूर्त असूच शकत नाही.

डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. भारताबद्दलचे निःस्वार्थ प्रेम आणि अतूट समर्पण हा त्यांचा गुण लहानपणापासूनच त्यांच्या कृतीतून दिसून येत होता. भारताला ब्रिटिश वसाहतीतून मुक्त करण्यासाठी केलेल्या सशस्त्र क्रांतीपासून सत्याग्रहापर्यंतच्या सर्व प्रयत्नांची त्यांना कोलकात्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण होता-होताच जाणीव झाली होती. संघ वर्तुळात त्यांना प्रेमाने डॉक्टरजी म्हटले जाते. त्यांना त्या सर्व मार्गांबद्दल आदर वाटत होता आणि त्यापैकी कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य हा त्या काळी चर्चेचा केंद्रबिंदू होता. त्याचबरोबर ज्या मूलभूत समस्यांमुळे आपण आपले स्वातंत्र्य गमावून बसलो त्याचे निदान करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे भारतीय समाजाचे डॉक्टर या नात्याने त्यांनी ठरविले. दैनंदिन जीवनातील देशभक्तीचा अभाव, सामूहिक राष्ट्रीय चारित्र्याचा ऱ्हास होऊन संकुचित अस्मिता निर्माण होणे आणि सामाजिक जीवनात शिस्तीचा अभाव ही बाह्य आक्रमणकर्त्यांनी भारतात पाय रोवण्याची मूळ कारणे आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. सततच्या आक्रमणांमुळे लोकांना आपल्या गौरवशाली इतिहासाची सामूहिक विस्मृती झाली आहे, हा अनुभव त्यांना येत होता. त्यामुळे आपल्या संस्कृतीबद्दल आणि ज्ञानपरंपरेबद्दल निराशा आणि न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती. केवळ काही नेत्यांच्या नेतृत्वाखालील राजकीय हालचालींमुळे आपल्या प्राचीन राष्ट्राचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत, याची त्यांना खात्री पटली होती. त्यामुळे लोकांना देशासाठी जगण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची पद्धत शोधण्याचे त्यांनी ठरविले. शाखा पद्धतीवर आधारित संघाची नावीन्यपूर्ण आणि अनोखी कार्यपद्धती ही राजकीय संघर्षाच्या पलीकडे असलेल्या या दूरदर्शी विचारसरणीचा परिणाम आहे.
 
राजकीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेताना आणि त्यासाठी इतरांनाही प्रोत्साहन देताना डॉ. हेडगेवार यांनी समाजात एक संघटना निर्माण न करता संपूर्ण समाजालाच संघटित करण्यासाठी प्रशिक्षणाची ही पद्धत विकसित केली. आज शंभर वर्षांनंतरही हजारो तरुण डॉ. हेडगेवारांनी दाखविलेल्या मार्गावर सहभागी होत आहेत आणि राष्ट्रकार्यासाठी स्वत:ला समर्पित करण्यास तयार आहेत. समाजामध्ये संघाची स्वीकार्यता आणि अपेक्षाही वाढत आहेत. हे आणखी काही नसून  डॉक्टरजींच्या द्रष्टेपणाला आणि पद्धतीला मिळालेल्या मान्यतेची चिन्हे आहेत.  

या चळवळीचे आणि तत्त्वज्ञानाचे क्रमशः होणारे विकसन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. संकुचित, अभिनिवेशवादी आणि वेगळेपणा जोपासणाऱ्या राष्ट्रवादाच्या युरोपीय कल्पनेने बहुसंख्य इंग्रजीशिक्षित उच्चभ्रू प्रभावित झालेले असताना हिंदुत्वाची कल्पना आणि राष्ट्राची कल्पना समजावून सांगणे सोपे नव्हते. डॉ. हेडगेवार यांनी विचारधारेचा सिद्धांत मांडला नाही, परंतु या प्रवासात मार्गदर्शक ठरलेला बीजरूपातील कृती कार्यक्रम त्यांनी दिला. त्यांच्या हयातीत संघाचे कार्य भारताच्या सर्व भागात पोहोचले होते.
 
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच वेळी दुर्दैवाने भारतमातेची धार्मिक आधारावर फाळणी झाली. तेव्हा संघ स्वयंसेवकांनीच पाकिस्तानातून हिंदू जनतेची सुटका करून त्यांचे सन्मानाने आणि प्रतिष्ठापूर्वक पुनर्वसन करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. संघटनेसाठीच संघटना हा मंत्र राष्ट्रीय जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये संघटनात्मक ऊर्जेचा संचार करत होता. समाजाबद्दलची जबाबदारीची आणि कर्तव्याची भावना अधिक असलेल्या स्वयंसेवक या संकल्पनेने शिक्षणापासून श्रम आणि राजकारणापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीची पुनर्रचना राष्ट्रीय मूल्यांच्या प्रकाशात करावी लागणार होती, त्यासाठी दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी (माधव सदाशिव गोळवलकर) या काळात मार्गदर्शक  बनले होते. भारत ही एक प्राचीन संस्कृती असून तिच्या आध्यात्मिक परंपरेच्या आधारे मानवतेच्या हितासाठी तिची भूमिका पूर्वनिश्चित  आहे. भारताला सार्वत्रिक सलोखा आणि एकात्मतेच्या विचारांवर आधारित भूमिका पार पाडायची असेल, तर भारतातील सर्वसामान्य जनतेला त्या ध्येयासाठी स्वत:ला तयार करावे लागेल. श्री गुरुजींनी त्यासाठी भक्कम वैचारिक पाया घातला. जेव्हा भारतातील सर्व संप्रदायांनी कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला धार्मिक मान्यता नाही असे जाहीर केले, तेव्हा हिंदू समाजाच्या सुधारणावादी अजेंड्याला नवी गती मिळाली. आणीबाणीच्या काळात राज्यघटनेवर क्रूर हल्ला झाला तेव्हा शांततेच्या मार्गाने लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याच्या लढ्यात संघस्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संघाने शाखा या संकल्पनेतून समाजाच्या नीतिशक्तीचा वापर करून सेवाकार्यात सहभागी होण्यापर्यंत विस्तार केला आहे आणि या नव्याण्णव वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. रामजन्मभूमी मुक्तीसारख्या चळवळींनी सांस्कृतिक मुक्तीसाठी भारतातील सर्व घटकांना आणि प्रदेशांना एकत्र जोडले. राष्ट्रीय सुरक्षेपासून सीमा व्यवस्थापनापर्यंत, सहभागात्मक कारभारापासून ग्रामीण विकासापर्यंत राष्ट्रीय जीवनातील कुठलाही पैलू संघ स्वयंसेवकांपासून  दूर राहिलेला नाही. सर्वात मोठे समाधान म्हणजे या व्यवस्थात्मक परिवर्तनाचा भाग होण्यासाठी समाज पुढे येत आहे.
 
प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची एक प्रवृत्ती असली तरी संघ अजूनही समाजाच्या सांस्कृतिक जागृतीवर आणि योग्य विचारसरणीच्या लोकांचे आणि संघटनांचे भक्कम जाळे निर्माण करण्यावर भर देत आहे. सामाजिक परिवर्तनात महिलांचा सहभाग आणि कौटुंबिक संस्थेचे पावित्र्य पुन्हा स्थापित करण्यावर गेल्या काही वर्षांपासून संघाचा भर आहे. संघाने लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म त्रिशताब्दी सोहळा साजरा करण्याचे आवाहन  केल्यानंतर सत्तावीस लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागासह संपूर्ण भारतभर सुमारे दहा हजार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले - आपण एकत्रितपणे आपल्या राष्ट्रीय महापुरुषांचा उत्सव कसा साजरा करीत आहोत याची ही साक्ष आहे. संघकार्याने शंभरव्या वर्षात प्रवेश केला, तेव्हा संघाने राष्ट्रउभारणीसाठी चारित्र्य निर्माणाचे मूळ कार्य तालुका व गावपातळीपर्यंत नेण्याचे ठरविले.  गेल्या वर्षभरात पद्धतशीर नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे दहा हजार शाखांची  भर पडणे हे  निर्धार आणि स्वीकृतीचे प्रतीक आहे. प्रत्येक गाव आणि वस्तीपर्यंत पोहोचण्याचे ध्येय अजूनही अपूर्ण आहे आणि हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. येत्या काही वर्षांत पंच-परिवर्तन - परिवर्तनाचा पंचसूत्री कार्यक्रम - हाच मुख्य केंद्रबिंदू राहील. शाखेचे जाळे विस्तारताना संघाने नागरी कर्तव्ये, पर्यावरणपूरक जीवनशैली, सामाजिक सलोख्याचे आचरण, कौटुंबिक मूल्ये आणि स्वत्वाच्या भावनेवर आधारित व्यवस्थात्मक परिवर्तन घडविण्यावर भर दिला आहे, जेणेकरून परम वैभवं नेतुम् एतत् स्वराष्ट्रम्  या व्यापक कार्यामध्ये प्रत्येकाचे योगदान असावे.

राष्ट्रीय पुनर्रचनेची चळवळ या नात्याने गेल्या शंभर वर्षांत  संघाने उपेक्षा आणि उपहासापासून कुतूहल आणि स्वीकृतीपर्यंत वाटचाल केली आहे. कोणालाही विरोध करण्यावर  संघाचा विश्वास  नाही आणि संघकार्याला विरोध करणारा कोणीही एक दिवस संघात सामील होईल, यावर त्याचा विश्वास आहे. हवामान बदलापासून हिंसक संघर्षापर्यंत अनेक आव्हानांना जग सामोरे जात असताना त्यावर उपाय योजना करण्यास भारताचे प्राचीन आणि अनुभवात्मक ज्ञान समर्थ आहे. भारतमातेच्या प्रत्येक अपत्याने ही भूमिका समजून घेतली आणि इतरांना अनुकरण करण्याची प्रेरणा देणारे देशांतर्गत प्रारूप तयार करण्यास हातभार लावला तरच हे प्रचंड पण अपरिहार्य कार्य शक्य आहे. सज्जनशक्तीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन समरस आणि संघटित भारताचा आदर्श जगासमोर मांडण्याच्या या संकल्पात आपण सहभागी होऊया. 

दत्तात्रय होसबाळे 
सरकार्यवाह,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • गुढीपाडवा
  • आत्मपरीक्षण
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (16), सामाजिक (167), कला (3), संस्कृती (41), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (82), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (10), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

trending

आणीबाणी : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन, जनआंदोलन आणि लोकशाहीचे पुनरुज्जीवन

संघाच्या देशप्रेमाने प्रभावित होऊन जेपी यांनी 'संघ लोकशाही मानत नाही' हा काँग्रेसचा...
विश्व संवाद केंद्र - पुणे 7 दिवसांपूर्वी

 पुस्तक परिचय  दिन विशेष   संपादकीय शिफारस  मनोरंजन  पर्यावरण  'अर्थ'पूर्ण  आंतरराष्ट्रीय  मुलाखत   कायद्याचे बोल  संकीर्ण   बातम्या   पर्यटन  
Read more

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.