शारदा शक्ति पुरस्कार सोहळा
अहिल्यादेवींनी आऊट ऑफ कव्हरेज कार्य उभे केले – चंदाताई साठ्ये
पुणे - पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे काम म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आऊट ऑफ कव्हरेज आहे इतके प्रचंड काम त्यांनी केले आहे. रयतेच्या प्रती असलेली तिची निष्ठाच त्यांना अहर्निश असे लोक कल्याणकारी कार्य करण्यास प्रवृत्त करती झाली.असे मत अखिल भारतीय महिला समन्वय सहसंयोजिका चंदाताई साठये यांनी व्यक्त केले.
शक्ति स्थापना दिनाच्या निमित्ताने आय. एम. डी.आर.,येथील सावरकर सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शारदा शक्ति ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. विज्ञान, आरोग्य, पर्यावरण,
शिक्षण, डिजिटल साक्षरता या विषयांमध्ये वेगवेगळी व्याख्याने, परिसंवाद, स्पर्धा, संमेलने, प्रशिक्षण अशा माध्यमातून जागृतीचे काम केले जाते.
कार्यक्रमाची सुरुवात शक्तिच्या प्रार्थनेने आणि भारतमाता पूजनाने करण्यात आली. शारदा शक्तिच्या अध्यक्ष डॉ. प्रियंवदा हेर्लेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले अस्तित्व प्रतिष्ठानच्या संस्थापक आणि संचालिका पुरस्कारार्थी गीता देगावकर, यांचा सत्कार शारदा शक्तिच्या उपाध्यक्ष डॉ. मानसी देशपांडे यांनी सत्कार केला केला. अहिल्यादेवी शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या कु. श्रद्धा गोविंद तौर या विद्यार्थिनीला 'स्व शक्ति सन्मान' पुरस्कार जाहीर करण्यात आला.
यावेळी डॉ. मानसी देशपांडे यांनी 2024-25 या वर्षाचा शारदा शक्तिचा अहवाल सादर केला. शारदा शक्तिने मागील वर्षभरात विज्ञान कट्टा, युवाशक्ति अभियान, आयुर्वेदाचे क्रेडिट कोर्सेस आणि Science Symposium असे अनेक महत्त्वाचे उपक्रम घेतले आहेत.
यानंतर गीतांजली देगावकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयीन जीवनात प्रचिती संस्थेच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगार, त्यांच्या स्त्रिया यांच्या रोजच्या जीवनात असणारा संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला. त्यांच्या शालाबाह्य मुलांसाठी हंगामी साखर शाळा त्यांनी चालवली. महिलांनी, मुलांनी स्वतःच्या पायावर उभं रहावं, म्हणून त्यांना अत्तरे, दिवे, साबण करायला शिकवणे, इतर काही पर्याय शिकवणे असा प्रयत्न त्या सातत्याने करतात.
शालाबाह्य मुले आत्मनिर्भर व्हावीत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण चांगली व्हावी यासाठी गीतांजलीताई निवासी शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय शक्तिच्या महासचिव डॉ. लीना बावडेकर यांनी शक्तिच्या आगामी कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्यामध्ये महिला वैज्ञानिकांची संमेलने आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिकांच्या भेटी असे महत्त्वाचे उपक्रम आहेत असे सांगितले. वैद्य मृणाल वर्णेकर यांनी अहिल्यादेवींवरील सुरेख गीत सादर केले.
साठे पुढे म्हणाल्या की, अहिल्यादेवी यांनी गाईगुरे पक्षी यांच्यासाठी चरण्यास वेगळी वने राखून ठेवणे, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे पाट काढून वापरायच्या पाण्याचे पाट वेगळे ठेवणे आणि त्या माध्यमातून पाण्याची शुद्धता जपणे आणि आरोग्य राखणे, जागोजागी विहिरी आणि कुंड बनवणे, वड, आंबा, चिंच, पिंपळ अशी झाडे लावणे आणि त्यायोगे भूजल पातळी स्थिर आणि चांगली ठेवणे अशा अनेकविध उपायाने त्यांनी आपल्या प्रजेचं हित जपले होते. त्यांनी विधवा स्त्रियांना संपत्तीमध्ये कायद्याने अधिकार दिले, दत्तक घेण्याचा अधिकार दिला. हुंडा प्रथा बंद केली. सती जाण्याची प्रथा असताना त्या स्वतः सती गेल्या नाहीत. तर अत्यंत साधे राहून त्यांनी आपले आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी अर्पण केले. पूर्ण भारतामध्ये त्यांनी सुमारे बारा हजारहून अधिक कामे उभी केली. म्हणूनच कर्तृत्वाचा आदर्श म्हणून पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंकडे पाहता येते.आपण सर्वांनी त्यातून काहीतरी शिकावे असे आवाहन त्यानी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. शीलाताई गोडबोले यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये त्यांच्या Virology इन्स्टिट्यूट मध्ये चालणाऱ्या संशोधन कार्याची थोडक्यात माहिती दिली. HIV वरील संशोधनाने वैद्यकीय क्षेत्राला खूप लाभ झाला आहे, तसेच भारत सरकार या आजारासाठी बऱ्यापैकी मोफत उपचार करते हे ही त्यांनी नमूद केले. कोविड काळातही त्यांच्या संस्थेने बरेच संशोधन केले. सूत्रसंचालन गीता गोडबोले आणि डॉ. हिमानी गोडबोले यांनी केले.
शारदा शक्तिच्या विविध पदाधिकारी आणि सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.