२९ वा ‘बाया कर्वे पुरस्कार’ श्रीमती इंदुमति काटदरे यांना प्रदान
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने यंदाचा म्हणजेच २९ वा बाया कर्वे पुरस्कार अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या विद्यमान कुलपति श्रीमती इंदुमति काटदरे यांना विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. निवेदिता भिडे यांच्या हस्ते प्रदान केला गेला.
“भारत देश हा प्राचीन काळापासून ज्ञाननिष्ठ राहिला आहे. पण मधल्या काळात झालेल्या सांस्कृतिक आक्रमणांमुळे मूळ ज्ञानप्रधान विचार दबल्यासारखा झाला. हा विचार पुन्हा प्रतिष्ठित होण्याची गरज असून पुनरुत्थान विद्यापीठ या कार्यासाठीच प्रयत्नरत आहे", असे विचार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती इंदुमति काटदरे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम विद्या संकुलात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती स्मिता घैसास, उपाध्यक्ष श्रीमती स्मिता कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष श्रीमती विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, बाया कर्वे पुरस्कार निवड समिती सदस्य श्रीमती सौजन्या वैगुरु, श्री. प्रशांत महामुनी हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित महिलांच्या जीवनकार्यावर आधारित ‘कर्त्या करवित्या भाग २’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘Trailblazers Part 2’ चे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादक श्रीमती विनया बापट यांनी या वेळी पुस्तकाबाबत माहिती दिली.
बाया कर्वे पुरस्कार निवड समितीच्या वतीने श्री प्रशांत महामुनी यांनी यावर्षीच्या पुरस्काराच्या निवडप्रक्रियेबाबत उपस्थितांना माहिती दिली. श्रीमती इंदुमती काटदरे यांच्या कार्यावर आधारित एक चलचित्र प्रस्तुत केल्यानंतर त्यांना 'बाया कर्वे पुरस्कार २०२४' ससन्मान प्रदान करण्यात आला.
'लहान मुलांना एखादे बक्षीस मिळाल्यानंतर जो आनंद होतो तसाच आनंद आज मला महर्षी कर्वे यांच्या या पावन भूमीत मिळालेल्या पुरस्कारामुळे होत आहे' असे भावपूर्ण उद्गार काढून श्रीमती काटदरे यांनी आपल्या जीवनकार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘भारतीय विचारांनुसार ज्ञान हे अर्थनिरपेक्ष आहे. 'पैशांच्या बदल्यात शिक्षण' हा भारतीय विचार नव्हे. शिक्षण हे आजीवन आणि सार्वत्रिक आहे. आपले घर हेही एक मोठे विद्यापीठ आणि आई-वडील हे वस्तुतः महान शिक्षक आहेत. अशा पद्धतीची घरे आणि माणसे घडविणे हे आजच्या भौतिकताप्रधान काळामध्ये अत्यावश्यक झाले आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून या कार्यामध्ये आम्ही आपली अल्पसे योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या पुरस्कारामुळे आमच्या प्रयत्नांना निश्चितपणे बळ मिळाले आहे.'
प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना डॉ. निवेदिता भिडे यांनी श्रीमती इंदुमति काटदरे यांचा ज्ञानमूर्ति असा गौरवपूर्ण उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, ‘१८२२ साली ब्रिटिश प्रेसिडेंसी द्वारा घेतलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणानुसार भारतातील एकही गाव असे नव्हते, जिथे शाळा नाही. या शाळा पूर्णतः भारतीय शिक्षणपद्धतीवर आधारित होत्या. ही पद्धती इंग्रजांनी पुढे कुटीलतापूर्वक नष्ट केली. तिचीच पुनर्स्थापना करण्याचे काम पुनरुत्थान विद्यापीठ करत आहे. ही ज्ञान परंपरा आपण पुढे घेऊन गेले पाहिजे. त्यासाठी इंदुमतीताईंसारखी जीवने प्रेरणादायी आहेत मात्र असे कार्य करण्यासाठी प्रेरणेपेक्षा परिश्रम अधिक आवश्यक आहेत. स्वतः इंदूमतीताईंनी पुनरुत्थान चे कार्य करताना विविध विषयांवर १००० पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. असे कार्य परिश्रमांखेरीज होत नाही. ही गोष्ट नीटपणे समजून घेऊन असे परिश्रम करण्याची तयारी आपण सर्वांनीच करावी आणि भारतीय शिक्षणपद्धतीला पुनर्स्थापित करण्याच्या कार्यामध्ये आपले अधिकाधिक योगदान देण्याचा संकल्प करावा'
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता घैसास यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या माध्यमातून पुनरुत्थान चे कार्य कसे पुढे नेता येईल याचा सकारात्मक विचार करून संस्था त्याबाबत कार्यवाही करेल, असे आश्वासन दिले आणि असा समर्पित भाव आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न सर्वांनीच करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र देव यांनी तर सूत्रसंचालन स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी च्या प्राध्यापिका श्रीमती मल्लिका सामंत आणि कमिन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साची शहा यांनी एकत्रितपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या आजन्म सेविका श्रीमती कांचन सातपुते यांनी औपचारिक आभार प्रदर्शन केले. संपूर्ण 'वंदे मातरम' गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.