डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताचे कार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांच्या सामाजिक धोरणातील सकारात्मक बदलाचा सामाजिक समरसतेवर झालेला परिणाम अशा थोड्याशा वेगळ्या विषयावरची चर्चा मी आज करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीची पार्श्वभूमी काय होती, हे पाहणं सयुक्तिक होईल. आपण सामाजिक चळवळींचा मागोवा घेत गेलो तर आपल्या असे लक्षात येते, की या प्रवाहाचा उगम राजा राममोहन राय यांच्यापर्यंत जातो. वास्तविक समरसतेच्या कल्पनेचा पुरस्कार स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महंतांनीसुध्दा केला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फ़ुले, न्यायमूर्ती रानडे आणि महर्षी कर्वे यांच्यापर्यंत अनेक समाजसुधारकांनी हे कार्य वेगवेगळ्या नावाने, निमित्ताने आणि उद्देशाने पुढे नेले. या सर्वांच्या कामाचा गाभा वा सारांश एकच होता - ”हिंदू समाजातील जातीय विषमतेची दरी संपून संपूर्ण हिंदू समाज एक व्हावा, त्यांच्यात समरसता निर्माण व्हावी आणि त्यासाठी काही उपाय असेल तर तो आहे शिक्षण. फ़क्त शिक्षणच हे करु शकते. स्पृश्यास्पृश्य भेदास शिक्षणाचा अभाव हेच खरे कारण आहे.”
आर्य समाजानेही स्पृश्यास्पृश्य भेद आपल्या पंथातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला होताच. पण सर्वात मोठा व अभिमानाचा प्रयत्न जर कुठे झाला असेल तर तो महाराष्ट्रात. तो कुणी केला? महात्मा ज्योतीबा फ़ुले यांनी. अतिशूद्रांच्या शिक्षणाकडे आपले लक्ष वळवत भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेबरोबरच १० सप्टेंबर १८५३ साली अस्पृश्यांसाठीही शाळा काढत त्यांनी दलितोध्दाराच्या कार्याची सुरवात केली होती. अतिशय धैर्याने आणि चिकाटीने त्यांनी आपले कार्य पुढे नेले. राजश्री शाहू महाराज, श्रीमंत सयाजीराव गायकवाड, श्री. म. माटे यांच्यासारख्या अनेक समाज सुधारकांनी मोठ्या साहसाने समरसतेचा हा रथ पुढे नेण्यासाठी आपापल्या परीने यथाशक्ती हातभार लावला. पण हे सगळं पुरेसं होतं का? तर अजिबात नव्हतं. परंतु हजारो वर्षे बहिष्कृत राहिलेल्या समाजाला पाश्चात संस्कृतीतला मोकळेपणा आणि उदारवाद भुरळ घालणं अगदी साहजिक होतं. म्हणूनच आधी सामाजिक सुधारणा की आधी स्वातंत्र्य या संघर्षामध्ये भारतातले अनेक आघाडीचे लोकनायक अडकले होते. अशा परिस्थितीत या चळवळी भरकटण्याचीही श्यक्यता नाकारता येत नव्हती.
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळींच्या आकाशात एका नव्या सूर्याचा उदय झाला ज्याचे नाव होते डॉ. भिमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वरील सर्व समाजसुधारकांचे जातीसंस्थेचे विश्लेषण आणि बाबासाहेबांचे विश्लेषण यात मुख्य फरक हा होता, की वरील सर्वांचे चिंतन हिंदुराष्ट्र बळकट कसे होईल या प्रेरणेतून जन्माला आले होते, तर बाबासाहेबांनी समाजशास्रीय दृष्टिकोनातून भारतीय जातीसंस्थेचे विश्लेषण केले. त्यांचे चिंतन समाजबांधवांच्या वेदनेतून जन्माला आले होते. बाबासाहेबांना वाटत होते, की केवळ शिक्षण समाजातली दरी कधीच संपवू शकणार नाही कारण जात हा भारतीय समाजधारणेचा पाया आहे. त्याच्यावर आघात केल्याशिवाय कोणतेही ठोस परिणाम हाताला लागणार नाही.
हे लक्षात आल्यावरच त्यांनी २० मार्च १९२७ ला महाड येथील चवदार तळ्याच्या संगराने अस्पृश्योध्दाराच्या कार्याचे तसेच हजारो वर्षांपासून जातीय विषमतेच्या अंधारात खितपत पडलेल्या आपल्या अस्पृश्य बांधवांच्या सर्वांगीण उत्थानाचे बिगुल वाजवले. चवदार तळ्याचा हा संगर सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्याही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचा ठरला आणि सामाजिक चळवळींच्या इतिहासात एक मैलाचा दगड बनून राहीला. हा संगर जरी वरवर दलितांच्या उत्थानासाठी आहे, असे वाटत असले तरी त्यात बहुजनांचा विशेषत: चित्रे-टिपणीस यासारख्या ब्राम्हण वर्गाचा असलेला सक्रिय सहभाग हा त्यानंतरच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर सामाजिक समरसतेवर सकारात्मक परिणाम करणारा ठरला. येथूनच समरसतेच्या पहिल्या अध्यायाची सुरवात झाली.
अतिशय चपखलपणे बाबासाहेबांनी हा दुवा हाताळला होता. त्यावेळी घेतलेले अनेक निर्णय बाबासाहेबांचे बहुजनांच्या मनातले स्थान उंचावून गेले. मग ते सत्याग्रहाच्या दरम्यान कुठलाही हिंसक प्रतिकार न करण्याविषयी असेल किंवा ज्यावेळेस बाबासाहेबांना महाड गावातून काही बहुजन समाजातील लोकांचा संदेश आला की तुमच्या स्टेजवर असलेल्या ब्राम्हणांना जर स्टेजवरून खाली जायला सांगितले तर आम्ही तुमच्या या आंदोलनाला पाठींबा देऊ वगैरे. या संदेशाला बाबासाहेबांनी दिलेल्या उत्तराने त्यांच्या मनातले राष्ट्रप्रेम, त्यांच्या अंतकरणातील बंधुत्वाची भावना आणि त्यांची दूरदृष्टी याचे दर्शन सगळ्या जगाला घडवून गेले. त्यांच्या या भूमिकेचा परिणाम तेव्हाही आणि आताही संपूर्ण बहुजन समाजाच्या मनावर खोलपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते, “माझे आंदोलन यशस्वी झाले नाही तरी चालेल पण या आंदोलनात भाग घेणार्या आणि जातीय विषमतेविरुध्द लढणार्या प्रत्येकाला या स्टेजवर बसण्याचा अधिकार आहे. माझा विरोध ब्राम्हणांना नाही तर ब्राम्हण्याला आहे.“ याचाच अर्थ बाबासाहेबांचा संघर्ष केवळ हिंदू समाजातील पिढीजात वैगुण्य घालवण्यासाठी नव्हता तर शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी होता. पण बाबासाहेबांना हेही माहीत होते की भारतीय जातीसंस्थेला शेकडो वर्षांच्या अनिष्ट रूढी परंपरेने भारतीय विचारसरणीचा अविभाज्य भाग बनवून टाकलेले आहे. त्यामुळे या विचारधारेला आधारभूत असलेली धर्मशास्रे आणि धर्मसंस्था नाकारल्याशिवाय जातिसंस्थेची खोलवर गेलेली मुळे उखडली जाणार नाहीत. बाबासाहेबांच्या लढ्यातला हा विचार जर लक्षात घेतला तर त्यांच्या सामाजिक चळवळीने पुढे घेतलेली वळणे आणि बाबासाहेबांच्या सामाजिक विचारधारेतील बदलांचा अर्थ आपल्याला लावता येतो.
बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या आंदोलनानंतर केलेल्या अनेक आंदोलनांपैकी मंदिर प्रवेशासाठी दिलेला लढा हा सुद्धा त्यांच्या वर सांगितलेल्या चिंतनाचाच एक भाग होता. चळवळी प्रतिकात्मक होत्या. अस्पृश्यांच्या मनातला न्यूनगंड आणि स्पृश्यांमधला अहंगंड कमी होऊन त्यांच्या मनातल्या दूरी मिटाव्यात आणि त्यांच्यात बंधुत्वाची भावना वाढीस लागावी ही आंतरीक तळमळ त्यात होती. १९३१ ते १९३५ असे पाच वर्ष चाललेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहाने बाबासाहेबांना उद्दीग्न केले असले तरी त्यांचा संयम तीळमात्र ढळला नव्हता. या चळवळीने त्यांच्या संयमाची परिसीमा झाली होती. तरीही कुठलाही हिंसक प्रतिकार एकाही सत्याग्रहीकडून झाला नाही, हे अद्भुत होते. पण त्यानंतर बाबासाहेबांचा चळवळीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मात्र मोठा बदल झाला. कारण १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्यान्वये प्रांतिक स्वायत्तेचे तत्व लागू होणार होते आणि भारताच्या संसदीय राजकारणाचा खर्या अर्थाने आरंभ होणार होता. बाबासाहेब या सगळ्या बदलांचा अभ्यास करून होते. त्यामुळेच ते वेळोवेळी आपल्या भूमिकेत अनुकूल बदल करत गेले. त्यांनी १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पण यातही समरसतेचाच मंत्र त्यांनी दिला. ते म्हणतात ’‘अस्पृश्यता निवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरूप जरी जातिनिष्ठ असले तरी तत्वत: तो लढा आर्थिक आहे...अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधापेक्षा वेगळे असल्याने अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे क्रमप्राप्त होते. पण आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी, कामकरी वर्गाचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्पृश्य शेतकरी, कामकरी वर्गाच्या सहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही.”
शिक्षणातून वा अंनुभवातून आलेल्या शहाणपणाला बाबासाहेबांनी कधीच नाकारले नाही. आणि त्यानुसार आपली भूमिका बादलायलाही त्यांनी कधीच संकोच केला नाही. त्यांच्यातला हा गुण शेवटपर्यंत कायम राहीला मग ती संविधान निर्मिती असो किंवा त्यांनी संसदेत मांडलेले हिंदू कोडबील असो...समरसता मनातून तयार झाली तरच समता प्रस्थापित होऊ शकते, हे त्यांना माहीत होते. म्हणूनच ते म्हणत, "जर माझ्या मनात द्वेष असता, सुडाची भावना असती तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते." हिंदू संस्कृती न सोडण्याविषयीची त्यांनी घेतलेली खबरदारीसुध्दा त्यांचे मन वाचता येण्यासाठी पुरेशी आहे. ते नेहमी म्हणत, "जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवील असा कोणताही धर्म मी केंव्हाही स्वीकारणार नाही. कारण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वत:च्या नावाची नोंद करुन घेण्याची माझी इच्छा नाही." हे त्यांचे तेजस्वी विचार हेच सिध्द करतात, की राष्ट्रीयता आणि बंधुता अर्थात समरसता हेच त्यांच्यासाठी सर्वप्रथम होते.
काशीनाथ पवार, पुणे
कार्यकारिणी सदस्य
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य
९४२३४६९३२९, ९७६५६३३७७९