
आपल्या अभंगातून संत सेना महाराजांनी विठ्ठलाचे नामस्मरण सोपे आणि मुक्ती देणारे आहे, हे सांगितले. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका चमत्काराचा प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे. एकदा घरी साधुसंतांची सेवा करत असताना त्यांना दरबारी राजाच्या सेवेला जायला उशीर झाला. त्यामुळे संतप्त राजाने त्यांना देहदंडाची शिक्षा सुनावली. पण आपल्या भक्तासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाने सेना महाराजांचे रूप धारण करून राजाची सेवा केली. राजाला कुष्ठरोगातून मुक्ती मिळाली आणि आरशात त्याला सेनाच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन झाले. या घटनेमुळे राजाला सेना महाराजांच्या मोठेपणाची जाणीव झाली आणि त्याने त्यांचा गौरव केला.
पंढरपूरच्या वारीची तीव्र ओढ त्यांना होती. एकदा संधी मिळाल्यावर ते महाराष्ट्रातील वारकरी बांधवांसोबत पंढरपूरला आले. तेथील भक्तीमय वातावरण, संतांचा सहवास आणि पांडुरंगाचे दर्शन पाहून ते भारावून गेले. त्यांनी पंढरीचे वर्णन करताना म्हटले आहे:
जाता पंढरिस सुख वाटे जीवा || आनंदे केशवा भेटतांचि ||

संत सेना महाराजांनी केवळ अभंगच नाही, तर ओव्या, गौळण, विराण्या, पाळणा आणि भारुडे अशा विविध काव्यप्रकारात रचना केल्या. यातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्याप्रती असलेला त्यांचा आदर त्यांच्या 'आळंदी माहात्म्य' या रचनेत दिसून येतो.
संत सेना महाराजांनी आपला बराच काळ महाराष्ट्रात घालवला आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. शेवटी ते पुन्हा बांधवगडला परतले आणि तिथेच त्यांनी समाधी घेतली. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर त्यांचे समाधी मंदिर आजही भक्तांना प्रेरणा देत आहे.