
- पुण्यात परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांची उपस्थिती
- प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याण नामजोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण
- एकता मासिकाच्या मणिपूर वरील विशेषांकाचे प्रकाशन
पुणे : भारतीय संस्कृती संवर्धन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाच्या वतीने मोतीबाग येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांनी ध्वजवंदन आणि भारत माता पूजन केले. याप्रसंगी भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी व कसबा भाग संघचालक अॅड प्रशांत यादव उपस्थित होते.
यावेळी नामजोशी यांनी देशात पुन्हा रामराज्य यावे. धर्म म्हणजे सत्य वचन असून रामराज्याची व्यवस्था म्हणजे प्रजेचे शासन असावे. प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा देशातील भक्तीभावाला जागृत करणारी आणि त्रेतायुगाला पुन्हा प्रस्थापित करणारी ठरली आहे. समाज हेच त्याचे विराटरूप आहे.समाजरूपातच देव जन्म घेत असतो. नागपूरातील रेशीम बाग आणि पुण्यातील मोतीबाग हे काशी - मथुरे प्रमाणेच तीर्थक्षेत्र आहेत असे मत मांडले.
यावेळी एकता मासिकाच्या मणिपूर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) उपस्थित होते. त्यांनी मणिपूर मधील सद्य परिस्थिती तेथील पर्यटन आणि मणिपूरचे भारतातील विलीनीकरण याविषयी मनोगत व्यक्त केले.
कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांतजी यादव यांनी देशातील स्थिती तसेच बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यातील परिस्थितीचे विवेचन केले. अखंड सावधानता बाळगणे हिंदू धर्मासाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन राजीव वाल्हेकर यांनी केले.

----
सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजारोहण

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात (महाल परिसरातील मुख्यालय) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी बोलताना आपल्या शेजारील बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेवर देखील भाष्य केलं आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, असं डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. (RSS Chief Mohan Bhagwat on Bangladesh)
देशासाठी चिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. पण फक्त चिंतन करून चालणार नाही. 1857 पासूनच्या संघर्ष चालला, त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळविले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नायकांची मोठी संख्या आहे. त्यात अहिंसक आंदोलनापासून क्रांतिकारक यांचा समावेश आहे. मात्र, हेच नायक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. तर सामान्य नागरिक ही तेव्हा देशासाठी रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाने वाटा उचलला. देशासाठी बलिदान करणारा समूह आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज या कारणामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी तर निघून गेली, मात्र आजच्या पिढीवर स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आपल्या स्वातंत्र्य देशासाठी आम्ही जे मार्ग निवडले आहे, त्यावर चालणे आवश्यक आहे, त्यासाठी घटनात्मक नियमांचे पालन करणे गरजेचं असल्याचं डॉ. भागवत यांनी यावेळी सांगितलं आहे.