रावडी, (ता. भोर, जि. पुणे) दि. १२ एप्रिल २०२६ : "हिंदू संस्कृतीमध्ये मानवी जीवनासोबतच निसर्ग आणि सजीव सृष्टीचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. मानवी जीवन आणि निसर्ग यांचा योग्य समन्वय साधणे हाच खरा धर्म असून, हिंदू धर्म व संस्कृतीबद्दलचे सकारात्मक प्रबोधन राष्ट्रहितासाठी अनिवार्य आहे," असे मत जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी व्यक्त केले.

सकल हिंदू समाज व हिंदू संमेलन आयोजन समितीतर्फे भोर तालुक्यातील रावडी, कर्नावड, चिखलगाव आणि टिटेघर या गावांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विराट हिंदू संमेलन' अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले. याप्रवेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी महाराज मोरे बोलत होते. व्यासपीठावर गुरुकुल धामचे संस्थापक ह.भ.प. उमेश महाराज शिंदे, दुर्गा वाहिनीच्या कु. हर्षदा धुमाळ व रा. स्व. संघाचे बारामती तालुका कार्यवाह अमोल देशमुख उपस्थित होते.
प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमाता यांच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाचा प्रारंभ झाला. प्रारंभी चारही गावांतील भजनी मंडळांनी भजने सादर केली. संघशताब्दीनिमित्त 'सांस्कृतिक वार्तापत्र'तर्फे प्रकाशित विशेषांकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ह.भ.प. उमेश महाराज शिंदे यांनी भारताचा दैदीप्यमान इतिहास आणि धर्मनिष्ठ महापुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कु. हर्षदा धुमाळ यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना, "हिंदू संस्कृतीत स्त्रीचे स्थान नेहमीच प्रेरणादायी राहिले असून मातृशक्तीने विघातक घटकांपासून सावध राहावे," असे आवाहन केले. अमोल देशमुख यांनी पंचपरिवर्तन आणि संघाची समाजातील वाढती स्वीकारार्हता यावर मार्गदर्शन करत, समाजात एकत्वाची भावना वाढीस लागणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे संयोजक बबनराव गिरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विष्णू वाडकर यांनी करून दिला. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विश्वास जोशी, सोपान तांगडे, राजेंद्र कुडपणे, शशिकांत कुडपणे, विनायक गोखले, अरविंद जाधव, अजय धुमाळ, मंगेश धावले, माधव जोशी व प्रदीप गोरड यांनी परिश्रम घेतले. कु. श्रेया कोंढाळकर व सृष्टी कुडपणे यांनी सूत्रसंचालन केले. सामूहिक पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.